रसाळ आंब्याची गोष्ट

डॉ. मंदार दातार
सोमवार, 6 मे 2019

आंबा विशेष
 

मला लहानपणी आठवते तसे पावसाळ्याच्या तोंडावर घरात आंबेच आंबे असत. करंड्यात घालून ते सगळे पुण्याला पाठवायची तयारी सुरू असे. आमच्या गावात शेतात पंचवीस एक आंब्याची झाडे होती. काही हापूस, पायरी अन्‌ काही रायवळ. प्रत्येक रायवळ आंब्याचे स्वतःचे असे वेगळेपण होते. वाकड्या नावाचा छोटी कोय असलेला रसाचा आंबा, घायाळा नावाचा फक्त लोणच्याचाच आंबा, केळ्या नावाचा चक्क आषाढी एकादशीला फळे येणारा आंबा, काही आंब्यांना फळाच्या छोट्या गोल आकारामुळे गोटी असेच म्हणत. खुडी, झेले, आढी, पाड हे शब्दही आंब्याबरोबरच बाहेर पडत असत. या विविधतेने आंब्याविषयी उत्सुकता चाळवली गेली. अनेक प्रश्न पडले. काही प्रश्नांची उत्तरे वडिलधाऱ्यांकडून मिळाली, तर काहींची पुढे वनस्पतिशास्त्र शिकल्यावर. काही अजूनही तसेच आहेत. पुढे आंबा बॉटनीमध्ये भेटला, फिल्डवर्क करताना जंगलात भेटला, भारतभराच्या बाजारांमध्ये भेटला आणि साहित्यातही त्याच विविधतेने भेटला. 

अस्सल फळांमध्येच भारतातच काय जगातही आंब्याचा क्रमांक फार वरचा आहे. या विषयी आपणच नव्हे, तर पाश्‍चिमात्य लोकांचेही एकमत होईल. आपण खातो ती पेरू, पपई, सीताफळ, अननस ही अन्‌ अशी अनेक फळे मूळची भारतीयच नाहीत. पण रसराज आंब्याचे तसे नाही. तो इथलाच आणि आपलाच आहे. याचा पुरावा आहे ईशान्य भारतात. २५० ते ३०० लक्ष वर्षांपूर्वीचा आंब्याचा सापडलेला जीवाश्‍म. भारतभर आंब्याच्या अक्षरशः हजारो जाती आहेत. यांना जाती म्हणणे वनस्पती वर्गीकरण शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य होईल. जाती म्हणजे स्पिसीज. ही खरे तर वाणे किंवा कल्टिव्हार आहेत. तोतापुरी, निलम, गोव्याचा माणकूर, रत्ना, केशर, पायरी, बागनपल्ली, नुरपरी, आम्रपाली, मल्लिका, सिंधू, सुवर्णरेखा, उत्तर भारतातले लंगडा, चौसा, रत्नाल हे त्यातले काही प्रसिद्ध. पण हापूस इतकी राजमान्यता कशालाच मिळाली नाहीये. 

असे उल्लेख आहेत, की अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज जनरलने आंब्यावर कलमाची पद्धत भारतात रूढ केली, म्हणून त्या आंब्याला अलफोन्सो व त्याचा अपभ्रंश होऊन हापूस हे नाव मिळाले. आंब्यातील मूळ जनुकीय विविधतेचा पाया इतका मोठा आहे आणि परत त्यात परपरागीभवन होत असल्यामुळे कोयीपासून वाढलेले प्रत्येक झाड हे स्वतःच एक वेगळा प्रकार असते. त्यामुळे आपल्याला मातृवृक्षात असलेले गुण टिकवायचे असतील, तर कलमांशिवाय पर्याय नसतो. या कलमांमुळे हव्या त्या जाती टिकवणे आपल्याला शक्‍य झाले आहे. मात्र, ही कलम करण्याची पद्धत पोर्तुगीजांच्या आधीही भारतात होती, असे काही विद्वान सांगतात. 

गावाकडचे आंबे सोडून शहरात आलो, तर अकरावीत जीवशास्त्रात वनस्पतीचे पहिले शास्त्रीय नाव शिकवले आंब्याचेच. ‘मॅंजिफेरा इंडिका’ म्हणून. रसाळ आंब्याला हे दातात अडकणारे नाव कसले, असेच पहिल्यांदा वाटून गेले. पण पुढे जेव्हा त्याचा अर्थ शोधला तेव्हा समजले, की तामिळमध्ये कच्च्या आंब्याला मंगाई असे म्हणतात. यावरूनच त्याचे मॅंगो हे इंग्रजी नाव आणि मॅंजिफेरा हे वनस्पती शास्त्रीय नाव आले. या नावाचे भारतीयत्व जाणून फार छान वाटले होते. इतर भारतीय भाषांतली नावे जेव्हा शोधली, तेव्हा सर्व द्रविड भाषांमध्ये या ‘मंगा’वरूनच व उत्तर भारतीय भाषेतली संस्कृत ‘आम्र’वरूनच आली आहेत हे चटकन उलगडले. मराठीतले आंबा तसेच. 

खाद्य वनस्पतींचा इतिहास हा माझा आवडीचा विषय. या अभ्यासाचा एक भाग म्हणजे जुन्या लिखाणात वनस्पतींचे जुने जुने उल्लेख शोधत जाणे. आंबा या बाबतीत अत्यंत श्रीमंत आहे. वेदांपासून महाभारतापर्यंत सर्व जुन्या साहित्यात आंब्याचे उल्लेख आहेत. आजच्या काळाच्या तब्बल तीन हजार वर्षांपूर्वी ‘बृहदारण्यकोपनिषद’मध्ये म्हणे आंब्याचा पहिला उल्लेख आहे. गौतम बुद्धाला त्याच्या एका शिष्याने आंब्याची राई विश्रांतीसाठी भेट म्हणून दिली होती, असे उल्लेख आहेत. भारतात आलेले अनेक परदेशी प्रवासी आंब्याची महती सांगतात. त्यात आहेत सर्वमान्य युगांपूर्वी तिसऱ्या शतकात भारतात आलेला ग्रीक भूगोलतज्ज्ञ आणि अलेक्‍झांडरचा चंद्रगुप्ताच्या दरबारातील राजदूत असलेला मेगॅस्थेनिस, सातव्या शतकातला चिनी विद्वान युवान श्वांग आणि चौदाव्या शतकात आलेला मोरक्कन प्रवासी इब्ने बतूता. अलेक्‍झांडरनेच युरोपियन जगाला भारतीय आंब्याचा परिचय करून दिला. सतराव्या शतकात भारतात आलेल्या फ्रेयरने आंब्याच्या चवीपुढे जर्दाळू, नाशपातीच काय, तर सफरचंदेही फिकी पडतात असे लिहिले आहे. 

आंब्याच्या निरीक्षणाने अनेक वनस्पतिशास्त्रीय गुपितेही माझ्यापुरती उलगडली आहेत. कोणतीही फळे कच्ची खाल्ली, तर त्यातले बीज परिपक्व न झाल्यामुळे वनस्पतींचे मोठे नुकसान होते, म्हणून अनेक कच्ची फळे सुरुवातीस हिरव्या रंगांची पानांत दडून जाणारी असतात; पण एकदा त्यातल्या बिया नीट वाढल्या, की फळे पिकतात, रंग बदलतात आणि प्राण्यांना खुणावतात. हे वनस्पतिशास्त्रीय तत्त्व समजावून सांगताना त्यासाठी आंब्यासारखे चांगले उदाहरण नाही. याच कच्च्या फळात ते खायचा प्रयत्न करणाऱ्याला बाधेल असा चीकही असतो. एकदा आंबा पिकला आणि प्राण्यांनी खावा अशी झाडाची तयारी झाली, की फळात या बाकीच्या बदलांबरोबर हा चीकही कमी होतो. आंब्याच्या फुलोऱ्यात काही नर फुले, तर काही द्विलिंगी फुले असतात. ज्या वर्षी नर फुले जास्ती त्या वर्षी फळांचा बहर कमी येतो असे अभ्यासता येते. वनस्पतिशास्त्र अभ्यासाच्या उमेदीच्या दिवसात ही निरीक्षणे उत्साह वाढवणारी ठरली होती. पुढे आणखी अभ्यास करताना आंब्याचे आकर्षण अजून एका गोष्टीमुळे वाढले. ते म्हणजे आंब्यावरच आपिवानस म्हणून वाढणारी अनेक जातींची यक्षपुष्पे म्हणजे ऑर्किड्‌स. आंब्याच्या खडबडीत खोडावर ऑर्किडच्या मुळांना चांगली पकड घेता येते आणि त्याची साल या मुळांना आवश्‍यक मूलद्रव्येही देते. तेव्हा ऑर्किड शोधायची असतील तर जंगलात, वस्तीकडेने आंब्याची झाडे शोधणे आले. पण उन्हाळ्यातच फुलणारी ऑर्किड्‌स पाहण्यासाठी आंब्याच्या झाडाच्या मालकांची परवानगी ज्यावेळी घेत असे, तेव्हा त्यांची ‘आंबे चोरायला आलाय काय’ ही प्रश्नार्थक नजरसुद्धा पुढे पुढे परिचित झाली होती. 

आपले राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याविषयी जेवढे लिहू तेवढे थोडेच आहे. विचार करा, काही शतकांपूवी जेव्हा साखर आजच्या इतकी वापरात नव्हती आणि गोड पदार्थ सहज मिळत नसत, तेव्हा आपले पूर्वज फलराज आंब्याच्या मधुर मोसमाची किती आतुरतेने वाट पाहत असतील. आंबा फळांच्या पलीकडेही आपला बराच आवडता आहे. फोडी खाणे आणि रसाव्यतिरिक्त आंब्याचे अनेकविध पदार्थ आपल्या अन्नात आहेत. पूर्वी पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी कैरीची पूड आमचूरही लोकप्रिय होती. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक कार्यांमध्ये अन्‌ सणांमध्ये वापरण्यात येतात. तर, त्याचे लाकूडही फार उपयोगाचे आहे. आफ्रिका खंडातही आता मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली गेली आहे. हेच आंबे आता युरोपातील आंबाप्रेमींची जीभ तृप्त करतात. बहुतांश आंब्यांना उन्हाळ्यात फळे येतात, पण मराठवाड्यात वर्षांतून दोन किंवा तीन वेळा फळे येणारे काही आंबे आहेत. चंडीगड मधला दीडशे वर्षे जुना आंब्याचा एक वृक्ष तर दरवर्षी सरासरी सतरा हजार किलो फळे देत असे, असे मोजले गेले आहे. वनस्पतिशास्त्र आणि इतिहासाच्या पलीकडे अनेक काव्यांमध्ये, साहित्यातही आंबा समरसून भेटला. कालिदासाच्या अनेक रचनांमध्ये आंबा आहे. मेघदूतात तर आम्रकुट नावाचा पर्वतच आहे. कामदेव मदनाच्या बाणांपैकी एक आहे आंब्याचा मोहोर, असे संस्कृत साहित्य सांगते. शायरश्रेष्ठ गालिब आणि अमीर ख़ुसरो यांच्याही काव्यात त्यांचा आवडता आंबा येतो. मराठीत अनेक काव्यात वसंत आणि आंब्याची जोडगोळी आहे. ‘आम्रतरुवर मोहोर होवूनी, वसंत ऋतु दर्वळे’ या अर्थाच्या इंदिरा संत यांच्या एका कवितेत त्यांचे हितगूज एका आंब्याशीच आहे. 
इथे मनस्वी आम्रतरू हा, 
धुंद सदा जरतारी स्वप्नी
कथिते त्याला मीही माझी,
मोहरलेली नवलकहाणी

हिंदीत गुलजारांच्या हमदम 
या नज्ममध्येही तो येतो. 
जब मैं छोटा था तो इक 
आम उड़ाने के लिए,
परली दीवार से कन्धों पे चढ़ा था उसके,
जाने दुखती हुई किस शाख से जा पाँव लगा,
धाड़ से फ़ेंक दिया था मुझे नीचे उसने,
मैंने खुन्नस मैं बहुत फेंके थे पत्थर उस पर। 
समर्थ रामदास यांनी तर आंब्याच्या विविधतेचे सुंदर वर्णनच केले आहे. 
आंबे वाटोळे लांबोळे, चापट कळकुंबे सरळे
भरीव नवनिताचे गोळे, ऐसे मऊ 
मरवे हिरवे सिंधुरवर्ण, गुलाबी काळे गौरवर्ण, 
जांभळे ढवळे रे नाना जाण, पिवळे आंबे 

ते पुढे म्हणतात 
आंबे लावावे लाटावे, आंबे वाटावे लुटावे 
आंबे वाटिता सुटावे, कोणी तरी 

गेल्या काही वर्षांत कोकणातला आंबा एका धोक्‍याची सूचनाही देत आहे. वाढत्या कारखान्यांमुळे हवेतल्या घातक वायूंचे 
प्रमाण हळूहळू वाढत आहे. त्यामुळे मोहोर आल्यावर या विषारी वायूंच्या हवेतल्या आर्द्रतेशी झालेल्या संयोगाने मोहरावर 
जमा झालेले दव मोहोर करपण्यासाठी व पुढे उत्पादन कमी मिळण्यासाठी कारणीभूत होत आहे. आज हा आंब्याचा धोका आहे, पण पुढे भविष्यात एकुणातच वनस्पती विविधतेसाठी हे काळजीचे कारण आहे. आंबा अनंत स्वरूपात आजवर भेटला आहे, भेटत आला आहे. प्रवास करताना मोहरलेले वृक्ष दिसण्यापासून ते एखाद्या गच्च देवराईत मध्यभागी त्याचा महाकाय वृक्ष दिसण्यापर्यंत. त्याची फळे तर भारतभरातल्या बाजारात पाहिली आहेत. आंब्याचा आपल्यावर प्रभाव इतका आहे, की आंब्याच्या आसपासच्या गटातील वनस्पतींना अंबाडा, आमटी, आंबेरी अशी आंब्यावरूनच नावे आहेत. जेव्हा ‘सकाळ’मध्ये चिंटू हे सदर सुरू होते, तेव्हा वाचक आंब्याच्या मोसमाची जेवढी आतुरतेने वाट पाहत, तेवढीच चिंटू जोशी काकूंच्या कैऱ्या शोधण्यासाठी कोणती नवी युक्ती वापरतोय याचीही. 

हिंदी भाषा जेव्हा शिकलो, तेव्हा सर्वसाधारण गोष्ट म्हणजे आम हे जेव्हा समजले तेव्हा जरासे वाईट वाटले. हा ‘आम’ ‘खास’च्या विरुद्ध कसा? ‘आम’ म्हणजेच ‘खास.’ उगाचच मोठ्या उत्साहाने खायला घेतलेल्या एखाद्या आंब्यात मोठी कोय आणि कमी रस निघाल्यासारखे वाटले. बाकी ही एक गोष्ट वगळता आंब्याचा गोडवा अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  

संबंधित बातम्या