आम्र पुराण

ओंकार गरुड
सोमवार, 2 मे 2022

कव्हर स्टोरी

नोकरीच्या निमित्ताने जवळपास संपूर्ण भारत फिरण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने ठिकठिकाणचा आंबा ‘अनुभवता’ आला. फळांचा राजा असलेल्या आंब्याने भारतीय संस्कृती, जनमानस, इतिहास आणि राजकारणात मिळविलेल्या मानाच्या पानाचा हा आढावा...

भारतीय उपखंडात उत्पत्तीस्थान असलेल्या आंब्याला एकाच वेळी भारत, पाकिस्तान आणि फिलिपाईन्स या तीन देशांचे राष्ट्रीय फळ आणि बांगलादेशचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली आहे. इसवी सनापूर्वी २००० वर्षांपासून भारतीय उपखंडात आमराया जोपासून आंब्याचे रीतसर उत्पादन घेतले जात आहे. भारतीय संस्कृतीत सर्व मंगलकार्यात आम्रपल्लव, आम्रमंजिरी, आम्रफल यांचा वापर मंगल चिन्हे म्हणून केला जातोय. पैठणी, बनारसी शालू, गुजरातची तंचोई, मध्य भारतातल्या माहेश्वरी, दक्षिणेच्या कांचीवरम या सर्वच वस्त्र प्रावरण प्रकारांवर पारंपरिकरीत्या आंबा, आंब्याची पाने, कोयरी या नक्षीचा वापर आंब्याच्या प्रभावाची साक्ष देतो.

प्रणयाची देवता ‘कामदेव’ याच्या पाच मदनबाणांमध्ये आम्रमंजिरीचा अग्रक्रमाने समावेश आहे. उत्तरेत तोच आंब्याचा मोहोर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून महादेवाला अर्पण करण्याची प्रथा आहे. आम्रपल्लवांची तोरणे आणि मंगल कलशात आंब्याची पाच किंवा सात पाने भारतभर वापरतात. वराह पुराणात पाच आंब्याची झाडे लावणारी व्यक्ती स्वर्गाची अधिकारी असल्याचा उल्लेख येतो. तर बृहदारण्य उपनिषदात आंब्याच्या झाडाची तोड करणे निंदनीय कृत्य मानले आहे.

बौद्ध काळात तर आंब्याला धर्माश्रय आणि राजाश्रय मिळाला. एकदा भगवान बुद्ध ध्यानधारणा करण्यासाठी आंब्याच्या वृक्षातळी बसले होते. जवळच एक शुभ्र आंब्याचे रोप उगवले, त्‍या झाडाची फळे सफेद होती अशी एक कथा उत्तरेत आहे. आणि खरोखरच ‘सफेदा’ म्हणून आंब्याची एक प्रजाती आजही इथे आहे. बौद्ध भिक्खूंसोबत आंबा आग्नेय आशियात पोचला आणि पाहता पाहता लोकप्रिय झाला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मौर्य राजवटीत आमराया निर्माण करणे, रस्त्याच्या दुतर्फा आम्रवृक्ष लावणे, शेजारच्या राजांना, मंदिरांना बौद्ध मठांना विहारांना आंबे पाठवणे हा शासकीय धोरणांचा भागच होता. ग्रीक योद्धा अलेक्झांडर त्याच्या प्रसिद्ध युद्धानंतर पौरसशी मैत्रीचा तह करून स्वतःबरोबर भारतीय आंबे घेऊन गेल्याचे उल्लेखही आहेत. 

महंमद तुघलकने दिल्लीजवळ तुघलकाबाद वसवले होते. तिथे दहा हजार आंब्याच्या झाडांची बाग त्याने केली होती. सर्वच मुघल आंब्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मुघल साम्राज्यात तेव्हा शेकडो प्रकारचे आंबे होत असत. उत्तमोत्तम आंबे मुघल सम्राट आणि जनाना यांच्यापर्यंत पोचण्यासाठी खास हरकारे सांडणीस्वार आणि गंगा यमुनेतून चालणाऱ्या नावांची व्यवस्था होती. औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता, तेव्हा सम्राट शहाजहानसाठी दक्षिणेतून आंबे आले होते. ते औरंगजेबाने मधल्यामधे संपवले. याची खबर मिळताच शहाजहान आपल्या पुत्रावर रागावला, असाही मजेशीर प्रसंग आहे.

संस्कृत ‘आम्र’ उत्तरेत बोली भाषेत ‘आम’ झाला. दक्षिणेत तमीळ बंधू त्याला ‘आमकाय’ म्हणू लागले व केरळात ‘मांगा’ झाले. पोर्तुगीज व्यापारी या मांगा फळाचे चाहते झाले, वेडे झाले व मँगो म्हणून आंबा युरोपात प्रसिद्ध झाला. इति आम्र इतिहास! पण वर्तमानात आजही भारतात आंब्याच्या शेकडो प्रजाती आहेत. त्यातल्या बऱ्याचशा मला पाहता, हाताळता, चाखताही आल्या नाहीत. 

आंबे प्रथम दक्षिणेत तयार होतात. मार्चच्या शेवटी शेवटी केरळाचा ‘मुवदन’ (म्हणजेच तीन वर्षांत तयार फळे देणारा) पदार्पण करतो, आणि केरळी पानांत आंब्याची चटणी, लोणची, रायते दिसायला लागतात. सांबर, भाज्यांमध्ये आंबटपणासाठी कैरी वापरणे सुरू होते. आपला पाडवा म्हणजे कर्नाटकचा युगादी या मुहूर्तावर ‘रसपुरी’, ‘बादामी’ हे आंबे कर्नाटक पादाक्रांत करून रसना तृप्ती करतात. कैरीचा वापर करून चित्रन्ना, पानले, आंब्याच्या रसाची  सान्ने, देवदेवतांना आमरसाचे अभिषेक असा आंबा सर्व क्षेत्रात मुशाफिरी करतो. एप्रिलमध्ये गोव्याच्या ‘मानकुराद’ आंब्याने गोयंकर तृप्त होतात. आंबट गोड चव, भरपूर रस, अणकुचीदार शेंडा असा ‘मानकुराद’ आंबा गोव्याची शान, तर आपल्या कोकणचे ‘हापूस’, ‘पायरी’ एप्रिल-मेमध्ये सामान्यांच्या आवाक्यात येण्याएवढ्या किमतीत मिळू लागतात. गोव्याचा गव्हर्नर अल्फान्सो द अल्बुकर्क याने आंब्याच्या कलमांचे अनेक प्रयोग केले. याची फळे म्हणजेच ‘हापूस’, ‘पायरी’. आज हे दोन्ही आंबे जगावर राज्य करत आहेत. याच सुमारास फिकट पिवळ्या कांतीचा भरपूर गराचा आंध्र तेलंगणचा ‘बैंगनपल्ली’ तेलगू भाषक प्रांतातील लोकांवर आपल्या चवीची मोहिनी टाकतो. जगाच्या पाठीवर कोठेही तेलगू भाषक असेल आणि त्याला ‘बैंगनपल्ली’ आंबा दिसला, तर पडेल त्या किमतीला हा आंबा घेतला जातो. इकडे गुजरातेत लांब फळ, गर्द केशरी रंगाचा गर, मिठास चव आणि पातळ कोयीचा ‘केशर’ बाजारात येतो. गुजराती लग्नात आमरसाचे बेत ठरतात व कोण किती वाट्या रस हाणतो याच्या शर्यती लागतात. 

दक्षिणेत जूनपर्यंत उन्हाळा संपतो. मात्र इकडे उत्तरेत जून-जुलैपर्यंत म्हणजे जीवघेणा उन्हाळा. तेव्हा कैरीचे आंबट पन्हे, शिकंजी लोकांचा ताप हरण करतात. गंगेच्या खोऱ्यात पूर्वापार बनारसी ‘लंगडा’, ‘चौसा‘, ‘माल्दा’, ‘मलगोबा’ हे आंबे आपला शाही आब राखून आहेत. लखनौजवळच्या मलिहाबादच्या जमीनदारांनी शेकडो वर्षे जोपासलेल्या ‘दशहरी’ आंब्याचा बागा म्हणजे अभिमानाचा विषय, प्रेमाचा विषय. ‘दशहरी’ आंब्याला इथले जमीनदार आपली लेकच समजतात. मोहोर आला की बागेची काळजी एखाद्या गर्भवतीप्रमाणे घेतली जाते. फळे धरू लागली की प्रत्येक झाडाची निगराणी केली जाते, बडदास्त ठेवली जाते. रोगराई पडू नये, फळे पोसून मोठी व्हावीत म्हणून पूर्वापार चालत असलेले देशी ‘नुस्खे’ वापरात आणतात. काढणीला आलेला आंबा प्रेमाने उतरवून आंब्याची पूजा केली जाते आणि दोन दिवसांनी लेकीप्रमाणे दशहरीला बिदा केले जाते.

आमरायांमध्ये खास लोकांना आंबे खाण्यासाठी बोलावले जाते. घरोघरी ‘आम फिरनी’, ‘आमवड’, आंब्याच्या मिठाया तयार होतात. आंब्याचा मौसम संपता संपता पुढच्या वर्षाच्या आंब्याची आस घेऊन लोक नेहमीच्या उद्योगाला लागतात.

इति आम्रपुराण सुफळ संपूर्णम्!

संबंधित बातम्या