उन्हाळी मेवा - कैरी आणि आंबा 

उमाशशी भालेराव 
सोमवार, 6 मे 2019

आंबा विशेष
उन्हाळ्याची चाहूल लागली की, बाजारात कैऱ्या दिसू लागतात आणि गृहिणीला प्रचंड आनंद होतो. कैरीचे पन्हे, तऱ्हेतऱ्हेच्या चटण्या, ताजे लोणचे, कैरीची डाळ असे अनेक पदार्थ तिला सुचू लागतात. वर्षभर टिकणारा मुरांबा व लोणचे करण्याचेही वेध लागतात. मग पिकलेला आंबा मिळू लागला, म्हणजे तर जेवणाची लज्जत आणखीनच वाढू लागते. आमरस पुरीचा बेत आखला जातो. आम्रखंड, आंब्याचा शिरा, आंब्याचा भात असे अनेक पदार्थ केले जातात. मुलांसाठी खास मॅंगो मिल्कशेक, मॅंगो आइस्क्रीम केले जाते. कैरी व आंब्याचा सीझन तीन-चार महिनेच असल्याने त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा लागतो. कैरी व आंब्याचे काही पारंपरिक व काही जरा हटके पदार्थ....

कैरीचा कायरस (मेथांबा) 
साहित्य : दोन वाट्या कैरीच्या फोडी, दीड ते २ वाट्या चिरलेला गूळ, १ चमचा तिखट, अर्धा चमचा मेथ्या, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य. 
कृती : कैरीची साल काढून लहान लहान फोडी कराव्यात. तीन-चार चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात मेथीदाणा घालून परतावे. नंतर कैरीच्या फोडी व वाटी दीडवाटी पाणी घालून सर्व शिजवावे. फोडी शिजल्यावर त्यात गूळ (कैरीच्या आंबटपणाप्रमाणे कमी-जास्त), चवीनुसार मीठ व तिखट घालावे. पुन्हा मंद विस्तवावर जरा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. आंबट, गोड, तिखट आणि मेथ्याचा कडवटपणा अशा सर्व स्वादांचा कायरस फार चविष्ट लागतो.


कैरीचे सार 
साहित्य : अर्धी वाटी कैरीच्या फोडी, १ वाटी किसलेला गूळ, चवीनुसार तिखट, मीठ, अर्धा चमचा मेथीदाणा, २ चमचे चण्याचे पीठ (बेसन), कढीलिंबाची ८-१० पाने, २ लाल सुक्‍या मिरच्या, तेल व फोडणीचे साहित्य. 
कृती : कैरी चांगली आंबट असावी. साल काढून फोडी कराव्यात. दोन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. मेथीदाणा घालून तांबूस होईपर्यंत परतावे. नंतर कढीलिंब व सुक्‍या मिरच्या घालाव्यात. त्यानंतर कैरीच्या फोडी घालून चार ते सहा वाट्या पाणी घालून फोडी शिजू द्याव्यात. चांगले एकजीव शिजल्यावर चवीनुसार तिखट, मीठ आणि गूळ घालावा. बेसन पाण्यात कालवून लावावे. सार जास्त दाट वाटल्यास पुन्हा थोडे पाणी घालावे. सर्व चांगले उकळून घ्यावे. गरम गरम सार भाताबरोबर तर छान लागतेच पण नुसते प्यायलाही छान लागते.


कैरीच्या स्वादाच्या आंबट गोड पुऱ्या 
साहित्य : एक मोठी कैरी उकडून, १ वाटी गूळ, चिमूटभर मीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, गरजेप्रमाणे कणीक, तेल.
कृती : कैरी उकडून त्याचा गर काढून घेणे. त्यात किसलेला गूळ घालून सर्व नीट एकजीव करावे. चिमूटभर मीठ, रवा, तांदळाचे पीठ व गरजेप्रमाणे कणीक व दोन चमचे तेलाचे मोहन घालून सर्व छान मळून गोळा करावा. अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून तळावे. या आंबट गोड पुऱ्या मस्त लागतात.


कैरीची डाळ 
साहित्य : दोन वाट्या चण्याची डाळ, अंदाजे अर्धी वाटी कैरीचा कीस, ५-६ हिरव्या मिरच्या, ३-४ सुक्‍या मिरच्या, कढीलिंबाची ८-१० पाने, एक वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ, थोडी चवीपुरती साखर, तेल, फोडणीचे साहित्य. 
कृती : कैरीची डाळ करण्यापूर्वी चार तास चण्याची डाळ भिजत घालावी. नंतर ती रोळीत उपसून ठेवावी. भिजवलेली चण्याची डाळ व हिरव्या मिरच्या एकत्रितपणे मिक्‍सरमध्ये जाडसर वाटून घ्याव्यात. चार चमचे तेलात मोहरी जिरे, हिंग, हळद, कढीलिंब व लाल सुक्‍या मिरच्या घालून फोडणी करावी. वाटून घेतलेल्या डाळीत खोवलेले खोबरे, कोथिंबीर, कैरीचा कीस, मीठ, साखर हे सर्व कालवून वर फोडणी घालावी. चण्याच्या डाळीऐवजी मुगाची डाळ घालूनही हा पदार्थ करता येतो.


चित्रान्न 
साहित्य : दोन वाट्या तांदळाचा भात, २ चमचे चण्याची डाळ, २ चमचे शेंगदाणे, २ चमचे उडदाची डाळ, थोडे काजू, ५-६ सुक्‍या मिरच्या, १ वाटी कैरीचा कीस, १ वाटी खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, २ चमचे फेसलेली मोहरी पूड, चवीनुसार मीठ, चवीपुरती थोडी साखर, कढीलिंबाची ८-१० पाने, तेल, फोडणीचे साहित्य. 
कृती : चणाडाळ व शेंगदाणे अर्धा तास भिजवून ठेवावेत. दोन वाट्या तांदळाचा मोकळा भात करून परातीत ओतून गार करावा. चार चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीलिंबाची पाने व लाल सुक्‍या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात उडदाची डाळ, पाण्यातून उपसून काढलेली चणा डाळ, शेंगदाणे आणि काजू परतून घ्यावेत. दुसरीकडे मीठ, चवीपुरती साखर घालून, फेसून घेतलेली मोहरी पूड सर्व भातास लावावी. खवलेले खोबरे, कोथिंबीर, कैरीचा कीस मिसळून आणि शेवटी तयार केलेली फोडणी घालून सर्व नीट कालवावे. हा भात गारच खायचा असतो.


कैरी पोह्याचे कबाब 
साहित्य : दोन वाट्या पोहे भिजवून कुस्करून, २ बटाटे उकडून कुस्करून, २ चमचे रवा, अर्धी वाटी कैरीचा कीस, पुदिना, १ चमचा लसूण-मिरची ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, ब्रेडक्रंब्स, तेल. 
कृती : भिजवून नीट कुस्करून घेतलेले पोहे, उकडलेले व कुस्करून घेतलेले बटाटे, रवा, कैरीचा कीस, पुदिना, लसूण-मिरची यांचे वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र कालवून घ्यावे. त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्या आवडीच्या आकाराचे लांबट वा गोल कबाब करून ब्रेडक्रंब्समध्ये घोळवून तेलावर शॅलोफ्राय करून घ्यावेत.


आंब्याची पोळी 
साहित्य : एक वाटी हापूस आंब्याचा रस, २ वाट्या साखर, थोडी वेलदोडा पूड, १ वाटी रवा, १ वाटी मैदा, २ चमचे तेलाचे मोहन, चिमूटभर मीठ, तांदळाची पिठी. 
कृती : आंब्याचा रस व साखर एकत्र करून गोळा होईपर्यंत आटवावे. नंतर त्यात वेलची पूड घालावी. नंतर हा गोळा मळून मऊसर करून घ्यावा. तेल व मीठ घालून रवा व मैदा घट्ट भिजवावा व नंतर चांगला मळून मऊ करून घ्यावा. छोटे गोळे करावेत. पुरणपोळीप्रमाणे रवा-मैद्याच्या गोळ्यात आंब्याचा छोटा गोळा भरून तांदळाची पिठी लावून पोळी लाटून घ्यावी व तव्यावर छान भाजून घ्यावी. तूप लावून खाण्यास द्यावी. रवा-मैद्याच्या गोळ्यापेक्षा जरा मोठा आंब्याचा गोळा त्यात भरावा म्हणजे पोळी रुचकर लागते.
(आंब्याचा शिरा थोडा अधिक मऊ करून ते सारण भरूनही पोळी छान लागते.)


आंब्याचे घारगे 
साहित्य : दोन वाट्या हापूस आंब्याचा घट्ट रस, दीड वाटी पिठीसाखर, १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी रवा, गरजेप्रमाणे कणीक, थोडी वेलची पूड, चिमूटभर मीठ, थोडी खसखस, तळण्यासाठी तेल.. 
कृती : आंब्याच्या रसात पिठीसाखर घालून एकजीव करावे. त्यात तांदळाचे पीठ, रवा घालावा. दोन चमचे तेलाचे मोहन, चिमूटभर मीठ व गरजेप्रमाणे कणीक घालून, वेलचीपूड घालून छान मळून घ्यावे. मळलेला गोळा अर्धा तास झाकून ठेवावा. नंतर त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत. प्रत्येक गोळा थोड्या खसखशीवर दाबून पुरीच्या आकाराचे घारगे हातानेच थापून घ्यावेत व तेलात तळून काढावेत.


आंब्याच्या स्वादाची फिरणी 
साहित्य : दीड वाटी तांदळाचा रवा, १ लिटर दूध, २ वाट्या साखर, १ वाटी आमरस (हापूस आंब्याचा), एका हापूस आंब्याच्या फोडी, सजावटीसाठी काजू-बदामाचे काप. 
कृती : दूध तापत ठेवावे. उकळी आल्यावर त्यात प्रथम तांदळाचा रवा व थोड्या वेळाने साखर घालावी. शिजल्यावर मिश्रण घट्ट होत असताना त्यात एक वाटी घट्ट आमरस घालावा. सर्व एकत्र शिजल्यावर हे मिश्रण काचेच्या वा चीनीमातीच्या खोलगट डिशमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे. नंतर काजू-बदामाच्या कापांनी व आंब्यांच्या फोडींनी सजवून सर्व्ह करावे.


आंब्याचा मुरंबा/जॅम 
साहित्य : दोन वाट्या पिकलेल्या हापूस आंब्याच्या फोडी, २ वाट्या साखर, वेलची पूड, केशर, अर्ध्या लिंबाचा रस.
कृती : आंबे चांगले पिकलेले पण मऊ न झालेले असे निवडून घ्यावेत. आंब्याची साल काढून साधारण चौकोनी आकाराच्या फोडी कराव्यात. फोडी जितक्‍या वाट्या तितकीच साखर घ्यावी. साखरेत थोडे पाणी घालून पक्का पाक करावा. नंतर त्यात आंब्याच्या फोडी घालून पुन्हा सर्व घट्ट होईपर्यंत शिजवावे. वेलची पूड घालावी. थोडा पातळ ठेवल्यास मुरंबा व घट्ट शिजवल्यास जॅम होईल. अर्ध्या लिंबाचा रस घालावा व नंतर बाटलीत भरून ठेवावे. जॅममध्ये वेलची पूड घालू नये.

संबंधित बातम्या