टेस्टी डेझर्ट्‌स

सुजाता नेरुरकर
शनिवार, 4 मे 2019

आंबा विशेष
आंबा हा फळांचा राजा आहे. एप्रिल-मे महिना आला, की आंब्याचा सीझन सुरू होतो. आंबा हा सर्वांनाच आवडतो. त्याच्यापासून आपण नानाविध पदार्थ करू शकतो. आंबा हा आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. आंब्याच्या रसापासून केलेले काही गोड पदार्थ म्हणजेच डेझर्ट्‌स इथे देत आहोत.

मॅंगो मस्तानी
साहित्य : चार कप दूध, २ कप आंब्याचा रस, २ टेबलस्पून साखर, ४ स्कूप व्हॅनिला किंवा मॅंगो आइस्क्रीम, २ टेबलस्पून फ्रेश क्रीम (आवडत असेल तर फेटून घालावे), सजावटीसाठी ड्रायफ्रूट्‌स व आंब्याचे तुकडे.
कृती : प्रथम आंब्याचा रस मिक्‍सरमधून ब्लेंड करून घ्यावा. मग त्यामध्ये दूध, साखर घालून परत मिक्‍सरमधून ब्लेंड करावा. एका आकर्षक ग्लासमध्ये प्रथम आंब्याच्या फोडी घालाव्यात. मग थोडे व्हॅनिला किंवा मॅंगो आइस्क्रीम घालून आंब्याचा मिल्कशेक घालावा. परत थोडे आइस्क्रीम घालून वरून आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट व आवडत असेल, तर फ्रेश क्रीम घालून सजवावे. हा ग्लास फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर मॅंगो मस्तानी सर्व्ह करावी.


आंब्याच्या साटोऱ्या
साहित्य : एक कप आंब्याचा घट्ट रस, २ कप नारळ (खोवून), १ कप पिठीसाखर, १ टीस्पून वेलचीपूड, २ कप मैदा, २ टेबलस्पून तूप, चवीनुसार मीठ, पीठ भिजवण्यासाठी दूध, पुरी तळण्यासाठी तूप.
कृती : मैदा, मीठ, गरम तूप घालून एकत्र करावे. मग त्यामध्ये दूध घालून घट्ट पीठ मळावे. आंब्याचा रस घट्टसर आटवावा. नंतर त्यामध्ये खोवलेला नारळ, पिठीसाखर, वेलचीपूड घालून मिश्रण तयार करावे. मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून पुरी लाटावी. त्यामध्ये एक टेबलस्पून मिश्रण भरून पुरी बंद करावी व जाडसर लाटावी. कढईमध्ये तूप गरम करावे. त्यामध्ये आंब्याच्या साटोऱ्या गुलाबी रंगावर तळाव्यात.


मॅंगो कस्टर्ड
साहित्य : दोन कप दूध, २ टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, २ टेबलस्पून साखर, १ कप हापूस आंब्याचा पल्प, २ टेबलस्पून फ्रेश क्रीम, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्‌स, द्राक्ष, डाळिंबाचे दाणे व २ टेबलस्पून हापूस आंब्याच्या फोडी.
कृती : एका बाऊलमध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर व अर्धा कप दूध घालून एकत्र करावे. आंब्याचा रस मिक्‍सरमध्ये ब्लेंड करून घ्यावा. एका जाड बुडाच्या भांड्यात बाकीचे राहिलेले दूध गरम करायला ठेवावे. दूध गरम झाल्यावर त्यामध्ये कस्टर्ड घातलेले दूध घालून मंद विस्तवावर पाच मिनिटे शिजवावे. कस्टर्ड शिजले, की त्यामध्ये साखर घालून एकत्र करून गार करावे. कस्टर्ड गार झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा पल्प व फ्रेश क्रीम घालून हॅंड मिक्‍सरने ब्लेंड करावे. डेकोरेटिव्ह ग्लासमध्ये कस्टर्ड घालून वरून आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट्‌स, द्राक्ष व डाळिंबाचे दाणे घालून सजवावे व फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवावे. मॅंगो कस्टर्ड थंड झाल्यावर सर्व्ह करावे.


मँगो फज
साहित्य : दोन कप ओला नारळ (खोवून), १ कप दूध, १ कप साखर, १ कप आंब्याचा रस, १ कप खवा, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्‌सचे तुकडे.
कृती : एका कढईमध्ये खोवलेला नारळ व दूध एकत्र करून पाच मिनिटे मिश्रण शिजवून घ्यावे. साखर घालून सात ते दहा मिनिटे मिश्रण पुन्हा शिजवावे. मग त्यामध्ये आंब्याचा रस व खवा घालून एकत्र करावे व थोडे घट्ट होईपर्यंत शिजवावे. एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून शिजवलेले मिश्रण प्लेटमध्ये ओतून एकसारखे पसरावे. त्यावर ड्रायफ्रूट्‌सचे तुकडे घालून सजवावे. प्लेट सजवल्यावर फ्रीजमध्ये दोन-तीन तास थंड करायला ठेवावे. मँगो फज थंडच सर्व्ह करावा.


आंब्याची मलई बर्फी 
साहित्य : अर्धा लिटर दूध (म्हशीचे), पाव कप हापूस आंब्याचा रस (घट्ट), १ टेबलस्पून मिल्क पावडर, २ टेबलस्पून साखर, एक चिमूट तुरटी, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्‌स. 
कृती : दूध गरम करायला ठेवून त्यामध्ये तुरटी विरघळवून घ्यावी. दूध गरम झाले, की साखर, मिल्क पावडर, आंब्याचा रस घालून मंद विस्तवावर आटवायला ठेवावे. मिश्रण पूर्ण आटले पाहिजे. मिश्रण आटल्यावर एका स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा स्टीलच्या ट्रेमध्ये ओतून एकसारखे पसरून घ्यावे. मग त्यावर ड्रायफ्रुट्‌सने सजवावे. आंब्याची मलई बर्फी गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावी.


आंब्याची खीर
साहित्य : अर्धा लिटर दूध, १ कप आंब्याचा रस, अर्धा कप शेवया, पाव कप साखर, पाव टीस्पून वेलचीपूड, १ टेबलस्पून साजूक तूप, पाव कप ड्रायफ्रूट्‌सचे तुकडे (काजू, बदाम).
कृती : दोन आंबे धुऊन त्याचा रस काढून मिक्‍सरमध्ये ब्लेंड करून घ्यावा. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया दोन मिनिटे परतून घ्याव्यात. मग त्यामध्ये दूध घालून एक उकळी आणावी. नंतर त्यामध्ये साखर घालून दोन-तीन मिनिटे गरम करावे. नंतर वेलचीपूड घालून गार करायला ठेवावे. खीर गार झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा रस घालून एकत्र करावे. नंतर फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवावे. आंब्याची खीर सर्व्ह करताना वरून आंब्याचे तुकडे व ड्रायफ्रूट्‌सने सजवून थंड थंड खीर सर्व्ह करावी.


आंब्याच्या केशरी करंज्या 
साहित्य : एक कप रवा, १ कप मैदा, २ कप आंब्याचा रस, १ नारळ (खोवून), १ कप साखर, २ कप दूध, १ टीस्पून वेलचीपूड, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तूप.
कृती : रवा, मैदा, मीठ, अर्धा कप गरम तूप एकत्र करावे. दुधामध्ये अर्धा कप आंब्याचा रस एकत्र करून त्यामध्ये रवा, मैदा मिसळून घट्ट पीठ मळून घ्यावे व अर्धा तास बाजूला ठेवावे. एका कढईमध्ये खोवलेला नारळ, दूध, आंब्याचा राहिलेला रस घालून एकत्र करावे व कोरडे होईपर्यंत शिजवून घ्यावे. मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून लाटून घ्यावे व त्यामध्ये एक टेबलस्पून सारण भरून बंद करावे. त्याला करंजीचा आकार द्यावा. अशा प्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात. कढईमध्ये तूप गरम करून सर्व करंज्या तळून घ्याव्यात.


मॅंगो मलई कुल्फी किंवा आइस्क्रीम
साहित्य : एक कप खवा, २ कप म्हशीचे दूध (आटवून), १ कप मिल्क पावडर, १ कप फ्रेश क्रीम, १ कप आंब्याचा रस, १ कप साखर, २ चिमूट खाण्याचा पिवळा रंग.
कृती : दूध व साखर एकत्र करून दहा मिनिटे आटवून घ्यावे व थंड करावे. आंब्याचा रस मिक्‍सरमध्ये ३० सेकंद ब्लेंड करून घ्यावा. ब्लेंडरमध्ये आटवलेले दूध, खवा, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम, आंब्याचा रस पिवळा रंग घालून ब्लेंड करावे. हे मिश्रण ॲल्युमिनियमच्या भांड्यात अथवा डब्यात ओतून चार तास डीप फ्रीजमध्ये सेट करायला ठेवावे. अथवा कुल्फीच्या मोल्डमध्ये सेट करायला ठेवावे.


सीताफळ-आंबा रबडी
साहित्य : एक लिटर दूध, १ कप साखर, १ कप शेवया, १ टीस्पून वेलचीपूड, २ कप सीताफळ पल्प, २ कप आंब्याचा पल्प.
कृती : सीताफळाच्या बिया काढून मिक्‍सरमध्ये ब्लेंड करून घ्यावे. आंब्याचा पल्पपण ब्लेंड करून घ्यावा. दूध थोडे आटवून घ्यावे व त्यामध्ये शेवया घालून पाच मिनिटे मंद विस्तवावर शिजवावे. शेवया शिजल्यावर त्यामध्ये साखर घालून दोन मिनिटे उकळून घेऊन थंड करायला ठेवावे. पूर्ण गार झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड, सीताफळ पल्प, आंब्याचा पल्प घालून एकत्र फ्रीजमध्ये गार करायला ठेवावे. सर्व्ह करताना वरून आंब्याच्या बारीक फोडी घालून सजवावे.


मॅंगो पनीर कटलेट
साहित्य : दोन मोठ्या आकाराचे बटाटे (किंवा ४ मध्यम आकाराचे बटाटे), २ टेबलस्पून फुटाणा डाळ पीठ, मिरपूड, चवीनुसार मीठ.
सारणासाठी : एक कप आंब्याचे तुकडे, अर्धा कप पनीरचे तुकडे, दोन हिरव्या मिरच्या (चिरून), १ टेबल स्पून काजू-बदाम तुकडे, ८-१० पुदिना पाने (चिरून), मिरपूड, चवीनुसार मीठ, ४ टोस्ट पावडर करून (ऐच्छिक), तेल.
कृती : आवरणासाठी : बटाटे उकडून, सोलून, किसून घ्यावेत. मग त्यामध्ये फुटाणा डाळीचे पीठ, मिरपूड व मीठ घालून एकत्र करावे व त्याचे एकसारखे आठ गोळे करावेत.
सारणासाठी : आंब्याचे तुकडे, पनीरचे तुकडे, हिरवी मिरची, मिरपूड, पुदिन्याची पाने, मीठ घालून मिश्रण तयार करावे. त्याचे एकसारखे आठ भाग करावेत.
कटलेट करण्यासाठी : बटाट्याचा एक गोळा घेऊन त्यामध्ये आंब्याचे मिश्रण भरून गोळा व्यवस्थित बंद करावा. नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल गरम करून घ्यावे. केलेले कटलेट टोस्टच्या पावडरमध्ये घोळून मंद विस्तवावर शॅलो फ्राय करावे. तसेच हे कटलेट डीप फ्राय केले, तरी छान लागतात. आंबा पनीर कटलेट गरम गरम सर्व्ह करावेत.


आंब्याचा भात
साहित्य : एक कप बासमती तांदूळ, २ टेबलस्पून तूप, ४ लवंग, ५-६ वेलची, अर्धा कप पाणी, अर्धा कप आंबा रस, चवीनुसार मीठ, १ कप साखर, १ चिमूट केशरी रंग, २ टेबलस्पून दूध.
कृती : तांदूळ धुऊन १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावा. दुधामध्ये केशरी रंग घालावा. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यामध्ये लवंग, वेलची, धुतलेला तांदूळ ३-४ मिनिटे मंद विस्तवावर भाजून घ्यावा. पाणी, आंबा रस व मीठ एकत्र करून उकळून घ्यावे व भाजलेल्या तांदळामध्ये मिसळावे. मंद विस्तवावर भात शिजवून घ्यावा. नंतर त्यामध्ये केशरी रंगाचे दूध व साखर घालून एकत्र करावे. मग पाच मिनिटे भात मंद विस्तवावर शिजवावा.

संबंधित बातम्या