साहित्य संमेलनाचे फलित

आशिष तागडे 
गुरुवार, 23 जानेवारी 2020

विशेष
उस्मानाबाद येथे झालेले ९३वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. ग्रामीण भागात सलग दुसऱ्या वर्षी झालेल्या या संमेलनाला अनेक वादांची किनार असली, तरी साहित्यविषयक जाणीव निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहे... 

यवतमाळ येथे गेल्यावर्षी झालेल्या साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर उस्मानाबाद येथे साहित्य संमेलनाला कसा प्रतिसाद मिळतो, याची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह साहित्यिक, प्रकाशक यांनाही उत्सुकता होती. उस्मानाबादकरांनी मात्र भरभरून प्रतिसाद देत ग्रामीण भागात साहित्याची भूक अजून कायम आहे आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी या क्षेत्रातील जाणत्यांनी घ्यावी, असा संदेश दिला आहे. 

राजकीय व्यक्तींबाबत दुटप्पी भूमिका
 उस्मानाबाद येथील साहित्य संमेलन वादाला अपवाद ठरले नाही. अगदी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते अन्य अनेक विषयांवर वादाचे प्रसंग आले. त्यावर मातही केली गेली. या संमेलनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय व्यक्तींच्या सहभागाशिवाय झालेले संमेलन (अर्थात तसे भासविले तरी गेले). संमेलनाच्या तीनही दिवस कोणत्याच मुख्य कार्यक्रमासह परिसंवादात एकही लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित नव्हता. अगदी उद्‌घाटनाच्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनीही समोर बसून सर्व कार्यक्रम अनुभवला (विशेष म्हणजे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर ते मंडपात उपस्थित होते). त्यानंतर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी सामान्य नागरिकांत बसले होते. यावर मोठी चर्चा झाली. संमेलनाचे उद्‌घाटक ना. धों. महानोर यांनी याबाबत आपल्या भाषणात लोकप्रतिनिधींना किंबहुना राजकीय व्यक्तींना आपल्या व्यासपीठापासून अलिप्त ठेवण्यात काहीच अर्थ नसल्याचे लक्षात आणून दिले. त्यांना जर आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहता येत नसेल, तर साहित्यिकांनाही राजकीय व्यासपीठावर जाण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविले. एका अर्थाने महानोर यांनी मांडलेली भूमिका रास्त आहे. अनुदानासाठी महामंडळ सरकारच्या दारी जात असेल, तर त्यांच्या प्रतिनिधींना व्यासपीठापासून दूर का ठेवायचे? राजकीय व्यक्ती साहित्यिकांच्या व्यासपीठावर का नको? याचा खुलासा करण्याचे धाडस मात्र महामंडळाच्या कोणी पदाधिकाऱ्याने दाखविले नाही. एकीकडे राजकीय व्यक्तींना बाजूला ठेवत असताना दुसरीकडे अधिकाऱ्यांना मात्र पायघड्या घातल्या गेल्या त्याचेही स्पष्टीकरण देण्याचे महामंडळाने टाळले. या दुटप्पी भूमिकेबाबत तीनही दिवस चर्चा होती.

नियोजनात ढिसाळपणा
 खरे तर उस्मानाबादमधील सामान्य नागरिकांचा या संमेलनाला खरोखर उत्स्फूर्त प्रतिसाद होता. परंतु, त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यात संयोजन समितीसह महामंडळाचे पदाधिकारी पूर्णतः अपयशी ठरले, असे स्पष्टपण जाणवले. संमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास मंत्री देशमुख वेळेपूर्वी उपस्थित राहू शकतात आणि बाकी मंडळी उशिरा येतात यातून नियोजनात फसगत झाल्याचे दिसते. उद्‌घाटनाचा कार्यक्रम किती वेळ असावा, याचे काही ताळतंत्र नव्हते. किमान चार तास चाललेल्या या कार्यक्रमामुळे सामान्य साहित्यप्रेमींच्या पदरी निराशा पडली. कारण एरवी त्यांना महानोर, संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांची भाषणे कधी ऐकायला मिळणार? सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सामान्य साहित्यप्रेमी, उस्मानाबादचे नागरिक व्यासपीठावरील सत्कार, त्यावरील भव्यता पाहायला आले नव्हते, तर मान्यवरांची व्याख्याने ऐकायला आले होते. केवळ वेळेअभावी संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांना मुख्य भाषण आवरते घ्यावे लागले यापेक्षा दुर्दैव ते दुसरे कोणते. हाच प्रकार अन्य परिसवांदांचाही होता. कविसंमेलन म्हटले, की व्यासपीठावर जेवढे कवी तितकेच समोर श्रोते असे सर्वसामान्य चित्र असते. हे संमेलनही त्याला अपवाद होते. पहिल्या दिवशी उद्‌घाटनाच्या रटाळ कार्यक्रमाने भ्रमनिरास झालेले साहित्यप्रेमी लगेचच झालेल्या कविसंमेलनाला शेवटपर्यंत उपस्थित होते. रात्री बारापर्यंत चाललेल्या कविसंमेलनाला सामान्य नागरिकांची लाभलेली उपस्थिती कशाचे द्योतक आहे, हे आयोजकांनी समजून घेतले पाहिजे. अर्थात त्या कविसंमेलनातही अनेकांनी आपल्या जुन्याच कवितांना उजाळा दिला हा भाग वेगळा. अन्य परिसंवादांची हीच अवस्था होती. एखादा परिसंवाद किती लांबवायचा यालाही काही मर्यादा असाव्यात. समोर बसलेल्या साहित्यप्रेमींना त्यातून आनंद मिळाला पाहिजे, याची जाणीव ठेवली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक परिसंवादांत खूप जड, तात्त्विक बोलले पाहिजे असा काही नियम आहे का? समोर बसलेले श्रोते लक्षात घेऊन सोप्या शब्दांत चांगली मांडणी करता येते. बहुतांश परिसंवादात संतांची उदाहरणे देण्यात आली. त्यावरून संत साहित्याचा पगडा स्पष्ट होतो. कारण संतांनी अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत विषय सांगितला आहे. इथे मात्र वक्‍त्यांनी (काही अपवाद) अवघड आणि रटाळ भाषेत विषय मांडणी केली. कधीतरी यावरही चर्चा झाली पाहिजे. हाच प्रकार समारोपसत्राच्या कार्यक्रमातही झाला. अनेक मान्यवर लेखक तीन दिवस साहित्य संमेलनाच्या मंडप परिसरात फिरत होते. ती जमेची बाजू होती. मात्र, त्यांपैकी काही जणांनी संमेलनाला आलेल्या साहित्यप्रेमींशी संवाद साधला असता किंवा गटचर्चा केली असती तर अन्य परिसंवादाची फारशी गरज भासली नसती. नियोजतील रटाळपणा टाळला असता, तर संमेलनाने वेगळी उंची गाठली असती.

वक्‍त्यांचा सूर आणि ढेरे यांची सूत्रबद्ध मांडणी
 संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे व कमी वेळ मिळाला म्हणून भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यांनी भाषणातून मूलतत्त्ववाद आणि देशाचे खरे प्रश्‍न यावर भाष्य करताना सामान्य जनतेला सत्य समजणार नाही, अशी सध्याची परिस्थिती असल्याचे सांगितले. साहित्याच्या निर्मितीसाठी लेखकावर कोणतीही बंधने नकोत, त्याच्यावर बंधने येतात तेव्हा त्याचे लेखन पोपटपंची ठरते, असे स्पष्ट केले. मात्र बंधने काय आहेत, याची कारणमीमांसा वेळेअभावी मात्र केली नाही. महानोर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांपासून ते राजकीय जोडे संमेलनापासून बाहेर ठेवण्याच्या भूमिकेपर्यंत सर्व विषयांचा सविस्तर आढावा घेतला. महानोर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना 
सखोल विचार निश्‍चितच करावा लागणार आहे. सर्वांत मुद्देसूद आणि सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली ती संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी. कोठेही आक्रमक न होता अत्यंत संयत पद्धतीने त्यांनी मांडणी केली. त्या म्हणाल्या, ‘आपल्याच होऊन गेलेल्या माणसांना आपण अमराठी-अभारतीय म्हणून आजवर कधी बाजूला ठेवलेले नाही. सच्चा आणि वृत्तीगांभीर्याने काम करणारा कोणीही साहित्यकार किंवा कलावंत हा जात, धर्म, देश, वंश यांच्या पलीकडेच जाणारा असतो, हे आपण विसरलो नाही, विसरून चालणारही नाही. कारण संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला एक भयभीत समाज ही आपली ओळख नाही. आपण सगळेच हे जाणतो की कोणतीही संस्कृती ही आरोळ्या देणाऱ्यांच्या, धाक दाखवणाऱ्यांच्या आणि बळजोरी करणाऱ्यांच्या आक्रमकतेवर तरलेली नाही. ती साध्या, सामान्य माणसांच्या सत्शील कृत्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर तरलेली आहे. साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रांत हाच अनुभव पुन्हा पुन्हा येईल अशा विश्‍वासाने आपण लिहीत मात्र राहिले पाहिजे. अत्यंत भ्रष्ट काळाचे प्रतिनिधी म्हणून उद्याच्या जगाने आपल्याला ओळखू नये असे जर वाटत असेल, तर मग आपला आंतरिक आवाज लावून धरणारे आणि नव्या पिढीवर विश्‍वास टाकणारे विवेकी लेखक आणि वाचक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या, घट्ट करण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नांत 
राहू या.’ 

समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी साहित्यिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दहशतवाद यावर साहित्यिक चर्चा करत असताना आपल्याच क्षेत्रात निर्माण होत असलेला जातीय दहशतवाद किती मारक आहे, हे सांगत बोराडे यांनी साहित्य क्षेत्राचे कान टोचले. लेखक, कलाकाराला जात नसते. वाङ्‌मयातील जातीयवाद गंभीर असून तो वाङमयाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, अशी स्पष्ट भीती त्यांनी व्यक्त केली. यावरही आगामी काळात गांभीर्याने चर्चा होण्याची आवश्‍यकता आहे.

लक्षवेधक ग्रंथदिंडी आणि थीम साँग...
संत गोरोबाकाकांच्या नगरीत हे संमेलन होत असल्याने अर्थातच ग्रंथदिंडीबाबत कमालीची उत्सुकता होती आणि ती पूर्ण करण्यात स्थानिक संयोजन समिती यशस्वीही झाली. केवळ उपचार म्हणून देखावे न करता त्यातून सामाजिक संदेश ठळकपणे दिला गेला. संत गोरोबाकाकांच्या जीवनावर आधारित देखाव्यांबरोबर पर्यावरण आणि अन्य गोष्टी चित्ररथातून साकारल्या होत्या. पारंपरिक लेझीम, डफाच्या तालावर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, विशेष लक्षवेधक होते. या संमेलनाच्या ठिकाणी विजयरामा कुंभार, नामदेव राठोड व शेषनाथ वाघ यांनी साकारलेला कुंभारवाड्याचा देखावा लक्ष वेधून घेत होता. संमेलनाच्या निमित्ताने ‘आली साहित्याची दिंडी...गोरोबांच्या दारी...’ हे थीम सॉंग अफलातून तयार झाले आहे. सहज सोपे शब्द, सुरेख चालीमुळे ते गीत सहजतेने गुणगुणता येते.

पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद
कोणत्याही साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शनाला झालेली गर्दी आणि विक्री यावरून त्याची यशस्विता ठरते. उस्मानाबाद येथील साहित्य संमेलन त्याबाबतीत मात्र खूपच उजवे ठरले. तीनही दिवस पुस्तक प्रदर्शनाला साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत पुस्तकांची जोरदार खरेदी केली. एरवी पुस्तक प्रदर्शनाच्या शेजारी असलेल्या ''खाऊगल्लीत'' जास्त गर्दी असते, उस्मानाबाद येथे मात्र परिस्थिती वेगळी होती. पुस्तक प्रदर्शनाला गर्दी होती. केवळ गर्दीच नव्हती तर खरेदीही मोठ्या प्रमाणावर झाली हे विशेष. या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सक्षमता. भव्य एलसीडी स्क्रीन, सक्षम ध्वनिक्षेपण यंत्रणा वैशिष्ट्यपूर्ण होती.

संमेलनाचे फलित
साहित्य संमेलनाचे फलित कशावरून ठरते, तर उपस्थित साहित्यप्रेमींना काय मिळाले? संमेलनाला तरुण वर्गाचा प्रतिसाद उदंड होता. सहाजिकच एका ग्रुपमध्ये जाऊन चर्चा केली असता, ओंकार नावाच्या मुलाने खूप बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, ''खरेच मराठीच्या उद्धारासाठी दरवर्षी एवढ्या मोठ्या खर्चाची आवश्‍यकता आहे का? साहित्याची चर्चा होते इतपत ठीक आहे, परंतु थेट महाविद्यालयीन स्तरावर काही करता येईल का?'' गावोगावी साहित्याची चर्चा होणे ही साहित्य संमेलनाची फलप्राप्ती असते. एरवी उस्मानाबादमध्ये एवढा मोठा कार्यक्रम होणे अवघड आहे. त्यामुळे साहित्याची चर्चा होण्याच्या दृष्टीने हे संमेलन नक्कीच यशस्वी झाले.

संबंधित बातम्या