एका स्वप्नसोहळ्याची गोष्ट 

डॉ. गौरी कानिटकर 
सोमवार, 13 डिसेंबर 2021

विवाह विशेष

लग्नसोहोळ्यांचा विचार करत असताना, लग्न निभावण्याच्या जबाबदारीचापण विचार करायला हवा असं मात्र मनापासून वाटतं. विवाहाचा अर्थ काय? विवाह निभावून नेण्यासाठी मला नेमकं काय काय शिकायला हवं? एकमेकांना माणूस म्हणून वागवणं, एकमेकांचा आदर करणे म्हणजे काय? याचा विचार विवाहोत्सुक मुले-मुली आणि त्यांचे पालकही मनापासून करतील तो सुदिन........!! 

मानसीचे लग्न ठरले होते. त्यामुळे ती खूप आनंदात होती. तिच्या मनात असंख्य विचारांचे आवर्त सुरू झाले होते. कुठले कपडे घ्यायचे? नऊवारी कधी नेसावी? ती शिवून घ्यावी का? शरारा रेडीमेड घ्यावा की शिवून घ्यावा? साड्या कधी कधी नेसायच्या? त्यावरच्या ब्लाउजची फॅशन कशी करायची? त्यावर मस्त भरतकाम करून घ्यावे का? दागिन्यांचे काय करायचे? इमिटेशन ज्वेलरीपण घ्यावी. पण तरीही खरे दागिने हवेतच. सोन्याचेपण आणि हिऱ्याचेपण.  नुकतेच मानसीच्या एका मैत्रिणीचे पण लग्न झाले होते. त्यातले फ्लॉवर डेकोरेशन तिला फारच आवडले होते. त्याच वेळी तिने मनात ठरवले होते की असेच डेकोरेशन आपल्या लग्नात करायचे. मनातून ती जाम खूश  होती. रोजचीच हवा आज नवी नवी, वेगळीच वाटत होती. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. इतक्यात तिचा होणारा नवरा, संदीप, त्याचा फोन आला. तो म्हणत होता की प्री-वेडिंग शूट करूया. तिला इतके छान वाटले होते – तिला वाटले की ते दोघेही जण सारखाच विचार करतायत. 

कुणाचेही लग्न ठरले की त्या दोन्ही घरांमध्ये अगदी आनंदाचे वातावरण असते. एक ‘फील गुड फॅक्टर’ पसरलेला असतो.  स्वतः वधू, वर आणि त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक, आई-वडील, भावंडे , जवळच्या वर्तुळातले मित्र-मैत्रिणी,  या सगळ्यांचे जोरदार प्लॅनिंग सुरू होते. ‘संगीत’साठी डान्स बसवले जातात. त्यासाठी कोरिओग्राफर  नेमला जातो. आठ आठ दिवस त्याची प्रॅक्टिस चालते. मेंदी काढण्यासाठी  कुणाला बोलवायचे याची उजळणी मनातल्या मनात सुरू होते. सध्याच्या काळात तर कोपरापासून तळहात आणि गुडघ्यापासून ते पावलापर्यंत मेंदीने रंगवायची पद्धत आहे. 

सगळीकडे नुसती धूम असते. लाजणे, मुरडणे, चिडवणे याला नुसता ऊत आलेला असतो. घरातले वातावरण अतिशय आल्हाददायक असते. लग्नसमारंभाच्या बेसिक गोष्टी पक्क्या झाल्या की ‘चि. आणि चि.सौ.कां’ अशा दोन्ही घरांतल्या आई-वडिलांची लगबग शिगेला पोचलेली असते.  लग्नाला  कुणाला बोलवायचे, जेवायला कुणाला बोलवायचे याच्या याद्या करणे सुरू होते. आईचीही खरेदीची लगबग असतेच. तिलाही त्या निमित्ताने एखादा नवा दागिना हवा असतो. साड्याही नवीन नवीन फॅशनच्या घ्यायच्या असतात. निमंत्रण पत्रिका तर हटके हवी असते. नुकतेच इंटरनेटवर सर्च करत असताना एका इको-फ्रेंडली पत्रिकेची माहिती मिळाली. समारंभ झाल्यावर पत्रिकेचे तुकडे करून ते मातीच्या कुंडीत टाकायचे. त्यातल्या झेंडूच्या बिया रुजतील आणि त्यातून झेंडूची रोपे मिळतील, अशी कल्पना होती. असे नवीन नवीन विचार निमंत्रण पत्रिकेच्या निमित्ताने पुढे आले आहेत.

लग्नाच्या निमित्ताने माझे कौतुक व्हायला हवे असे वधू-वर, त्यांचे आई-वडील, भावंडे, बाकीचे नातेवाईक अशा साऱ्यांनाच वाटत असते. स्वतःला सजवणे हा मक्ता फक्त मुलींचा नाहीये, तर मुलगेही यात मागे नाहीत. सगळ्यांनाच स्वतःचे लाड करून घ्यायला आवडते.  लग्नाच्या निमित्ताने आपण सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन असणार ही भावनाच सुखावून टाकणारी असते. तसेच हे सगळे कमी म्हणून की काय पण हनिमूनला कुठे जायचे, किती दिवस जायचे, कुठल्या रिसॉर्टमध्ये राहायचे,  त्या ट्रिपची स्वतंत्र खरेदी कशी आणि कुठून करायची असे शंभर प्रश्न मनात घोंगावत असतातच. तसेच लग्न काय एकदाच होणार असे म्हणत म्हणत त्याचे प्लॅनिंग होत असते. शिवाय माझे लग्न संस्मरणीय ठरले पाहिजे अशीही प्रत्येकाची सुप्त इच्छा  असते. आणि काहीवेळा मनामध्ये एक सूक्ष्म स्पर्धाही असते. म्हणजे,  माझ्या बिझनेस पार्टनरच्या मुलीचे/ मुलाचे लग्न इतके इतके भव्य झाले होते, त्याच तोडीचे किंवा त्यापेक्षा जास्त भव्य दिव्य लग्न  माझ्या मुलाचे/ मुलीचे झाले पाहिजे अशी एक इर्षाही असते.  

विवाह समारंभांभोवती फिरणाऱ्या उलाढालीचा विचार केला तर ती प्रचंड मोठ्ठी आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल या निमित्ताने होत असते. अनेक माणसांना त्यातून रोजगारही उपलब्ध होतो. 

असंख्य विविध प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध असतात. नुसती दाढी करण्यासाठी आज कमीत कमी पन्नास प्रकारच्या  कंपन्या एकमेकींशी स्पर्धा करत आहेत. विविध प्रकारची लोशन्स, रेझर, दाढी रंगवण्यासाठी अनेक प्रकारचे कलर, दाढी करून झाल्यावर लावायची आफ्टर शेव्ह लोशन, दाढी शेपमध्ये कापण्यासाठी अनेक प्रकारचे ट्रिमर, वेगवेगळ्या आकाराचे, प्रकारचे कंगवे, एक ना दोन... अक्षरशः उत्पादनांची नुसती रेलचेल आहे. ही कथा तर फक्त दाढीची!!!  मुलींप्रमाणेच आता मुलगेही त्यांच्या भुवयांना आकार देतात. खूप पैसे खर्च करून ब्यूटी पार्लरमध्येही जातात. लग्नाच्या पूर्वी दोन दोन महिने स्कीन पॉलिशिंगची ट्रिटमेंटही घेतात. 

कपड्यांची तर तऱ्हाच निराळी. असंख्य प्रकारचे झब्बे, शेरवानी, कुर्ते, त्यावरच्या ओढण्या. .. त्याबरोबर पारंपरिक पोशाखसुद्धा हवाच असतो. धोतर, त्यावर शोभेल असा कुडर्ता, मग आवडीनुसार पगडी ... मग अर्थातच भिकबाळी असा सगळा साजशृंगार मुलगेही आवडीने करतात. प्रत्येक कपड्यांच्या प्रकारासाठी त्यावर शोभतील अशी पादत्राणे -चपला, सँडल, मोजड्या, बूट असे नाना तऱ्हांच्या पादत्राणांचे प्रकार उपलब्ध आहेत. हौसेला मोल नाही असे म्हणतात, तेही खरेच आहे. 

मुलांसाठी जर इतके प्रकार आहेत तर मुलींच्या प्रसाधनाची काय कथा? अक्षरशः शेकडो प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. साड्या, दागदागिने, ड्रेसेस, सौंदर्य प्रसाधने,  पार्लर्स. स्वतःला सजवण्यासाठी जे जे म्हणून शक्य आहे ते ते सगळे करायचे असत. नवऱ्याच्या पोशाखाला मॅच होईल अशी पोशाख रचना हवी असते. त्याने धोतर झब्बा हा पारंपरिक पोशाख निवडला असेल तर त्याच्या पोशाखाच्या रंगाला साजेशी नऊवारी साडी, त्यावर शोभेल अशी केशरचना- खोपा वगैरे किंवा आणखी काही, त्यावर पारंपरिक गजरा किंवा केशरचना सजवण्यासाठीदेखील विविध दागिने उपलब्ध आहेत. अक्षरशः करू तितके कमीच आहे. रिसेप्शनला बहुतांश वेस्टर्न आऊटफिट किंवा इव्हिनिंग गाऊनला जास्त पसंती दिली जाते. लग्नातला मेन्यूही हटके हवा असतो. रिसेप्शनला खूप साऱ्या पदार्थांचे स्टॉल्स असतात. विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. 

लग्न विषयक स्वतंत्र मासिके प्रकाशित होत असतात. त्यात आत्ताच्या नवीन ट्रेंडबद्दल इत्यंभूत माहिती मिळते. वर्तमानपत्रांच्या मोठमोठ्या पुरवण्यादेखील निघत असतात. दागदागिने आणि वस्त्र प्रावरणे यांच्या दिमाखदार जाहिराती त्याबद्दलची माहिती घेऊन हजर असतात. 

लग्न कसे करावे? ते सजेल कसे? याचे मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था – अनेक ‘लग्न गुरू’ आहेत. ‘थीम वेडिंग’ ही यातली मुख्य संकल्पना. शाही सोहळ्याची थीम, राधा-कृष्ण, नल-दमयंती अशी विविध रूपे वधू वरांना दिली जातात, आणि एक प्रकारचा नाट्य सोहळाच तिथे घडतो. समारंभासाठी सल्लासेवा देणाऱ्या संस्था तुमच्या बजेटप्रमाणे लग्नाचे प्लॅनिंग करून देतात. थोडक्यात काय तुमचा तो फील गुड फॅक्टर अधिक भव्य दिव्य करायचे काम ही माणसे करतात; तुम्हाला एका स्वप्न नगरीत नेऊन सोडतात. 

लग्न एकदाच होणार आहे ना.... मग जितके शक्य आहे तितकी मजा करायची, शक्य तितके नटायचे....  ही मानसिकता पूर्वापार आहे. अगदी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातही – म्हणजे सुमारे दीडशे पावणेदोनशे वर्षांपूर्वीदेखील ऋण काढून, कर्ज काढून का होईना.. पण  दारापुढे वाजंत्री वाजलीच पाहिजे अशी मानसिकता होतीच. आजही त्यात कुणालाही कोणतीच कमतरता चालत नाही.                                         

लग्नाच्या सोहळ्याचा विचार करत असताना, लग्न निभावण्याच्या जबाबदारीचापण विचार करायला हवा असे मात्र मनापासून वाटते. आपल्याकडे लग्नाचा समारंभ, सोहळा करायची पद्धत मोठ्या प्रमाणावर आहे. आपण दागदागिने, साड्या, ड्रेसेस, लग्नाच्या दिवशीचे जेवणाचे पदार्थ ठरवण्यात आणि डिस्को पार्टी करण्यात मग्न असतो. या सगळ्यात लग्नाचा अर्थ काय? आपण लग्न का करतोय? लग्न निभावून नेण्यासाठी मला नेमके काय काय शिकायला हवे? एकमेकांना माणूस म्हणून वागवणे, एकमेकांचा आदर करणे म्हणजे काय? हा विचार विवाहोत्सुक मुले-मुली आणि अर्थातच त्यांचे पालकही मनापासून करतील तो सुदिन ........!!

संबंधित बातम्या