साज-शृंगाराचा ‘एव्हरग्रीन’ ट्रेंड

महिमा ठोंबरे
सोमवार, 13 डिसेंबर 2021

विवाह विशेष

सध्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे लग्नसोहळा साध्या पद्धतीने पार पडत आहे. पण असे असले तरी त्यातून वाचलेला खर्च दागिन्यांकडे वळवण्याकडे कल वाढला असल्याचे निरीक्षण सराफ व्यावसायिक नोंदवत आहेत... थोडक्यात काय, लग्नसोहळानिमित्त होणाऱ्या दागिन्यांची खरेदी पूर्वीइतकीच उत्साहाने होत आहे! 

विवाहसोहळा म्हटला की अजेंड्यावरचा पहिला विषय येतो, तो म्हणजे दागिन्यांचा. विशेषतः वधूच्या दागिन्यांची चर्चा लग्नाआधी, लग्नात आणि लग्नानंतरदेखील अनेक काळ सुरू असते. माहेरच्या माणसांनी कोणते दागिने दिले, सासरच्या माणसांनी कोणते दागिने दिले, अशा अनेकविध चर्चांशिवाय वऱ्हाडी मंडळीच्या घशाखाली घास उतरत नाही. ‘मंगळसूत्र कमी तोळ्याचं वाटतंय, बाई’, ‘बांगड्यांना सोन्याचं पाणी दिल्याचं ऐकलंय मी’ किंवा ‘काय सुंदर तन्मणी आहे तिचा’... असे शेरे लग्नमंडपातल्या ठरावीक कोपऱ्यात अगदी हमखास ऐकायला येतात. थोडक्यात काय, तर ‘दागिने राग’ आळवल्याशिवाय कुठलाच विवाहसोहळा पूर्णत्वाला जात नाही. 

  विशेष म्हणजे, काळ बदलला, पिढ्या बदलल्या तरी दागिन्यांचा हा सोस आणि त्यांच्या चर्चा मात्र त्याच उत्साहाने केल्या जातात. अगदी आजदेखील हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे सध्या दिवाळीनंतर सुरू झालेल्या लग्नसराईच्या मोसमात सराफांची दुकाने गजबजली आहेत, यात काही नवल नाही. खरेतर, कोरोनाचा फटका बसल्यानंतर एकूणच लग्नसोहळ्यांचे प्रमाण आटोपशीर करण्याकडे बहुतेकांचा कल होता. अनेक ठिकाणी आर्थिक आघाडीवर खडखडाट असल्याने दागिने खरेदीतही हात आखडता घेतला जाईल का, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र ती खोटी ठरवत पूर्वीच्याच उत्साहाने खरेदी केली जात आहे. उलटपक्षी निर्बंधांमुळे लग्नसोहळा साध्या पद्धतीने पार पडत असल्याने त्यातून वाचलेला खर्च दागिन्यांकडे वळवण्याकडे कल वाढला असल्याचे निरीक्षण सराफ व्यावसायिक नोंदवत आहेत.

याच कारणामुळे अलीकडे अधिक वजनाचे आणि ठसठशीत दागिने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. नेकलेस, बांगड्या, पैंजण यामध्ये हा ट्रेंड दिसून येत आहे. विशेषतः मंगळसूत्राच्या खरेदीत हा ट्रेंड सर्वाधिक दिसून येत आहे. एक मोठे, ठसठशीत मंगळसूत्र आणि चोकर, अशा प्रकारच्या दागिन्यांना पसंती दिली जात आहे. ७०-८० ग्रॅम ते ३०० ग्रॅमपर्यंतच्या मंगळसूत्रांना यात मागणी आहे. सुमारे २८ ते ३० इंचांची ही मंगळसूत्रे आहेत. पूर्वी पारंपरिक सोन्याच्या मंगळसूत्रांना अधिक मागणी होती. मात्र आता टेम्पल डिझाईनच्या मंगळसूत्रांची मागणी वाढली आहे. शिवाय विशिष्ट कार्यक्रमांसाठी एक मोठे मंगळसूत्र आणि रोजच्या वापरासाठी एक वेगळे मंगळसूत्र, अशी विभागणी करण्याकडे अनेक स्त्रियांचा कल आहे. त्यामुळे रोजच्या वापरासाठी कमी उंचीचे आणि काहीसे टिकाऊ मंगळसूत्र खरेदी केले जात आहे. 

यासह ‘मंगळसूत्र ब्रेसलेट’ हा एक नवीन प्रकार गेल्या काही वर्षांत उदयाला आला आहे. ज्या स्त्रियांना गळ्यात मंगळसूत्र घालणे जोखमीचे किंवा अडचणीचे वाटते, त्यांच्यासाठी हा प्रकार अतिशय उपयुक्त ठरतो आहे. मंगळसूत्राचा गाभा असणारे काळे मणी आणि सोन्याचे मणी गुंफलेले हे ब्रेसलेट बाजारात उपलब्ध आहे. नोकरदार स्त्रियांची या प्रकाराला अधिक पसंती मिळते आहे. हा प्रकार पुरुषांसाठीदेखील उपलब्ध आहे. ज्या पुरुषांना केवळ स्त्रियांनीच सौभाग्याची खूण म्हणून मंगळसूत्र घालायचे, हा विचार अमान्य आहे आणि त्यात बदल करण्यासाठी साथ द्यायची आहे, अशांना हे ब्रेसलेट उत्तम पर्याय ठरतो आहे. 

मंगळसूत्राव्यतिरिक्त इतर दागिन्यांची निवड करताना पोशाखाला अनुसरून निवड करण्याकडे कटाक्ष असल्याचे पाहायला मिळते आहे. आजकाल विवाहसोहळा एक किंवा दोन दिवसांचा नाही, तर आठवडाभर असतो. संगीत, हळद, मेंदी असे ‘इव्हेंट्स’ साजरे होतात. त्यामुळेच या प्रत्येक दिवसाच्या पेहरावानुसार दागिने घेतले जातात. त्यात रंग, पोत आणि प्रकारानुसार दागिन्यांची निवड केली जाते. 

लग्नातील सप्तपदीसारख्या विधींवेळी नवरी मुलगी नऊवारीसारखा पारंपरिक पोशाख परिधान करायला प्राधान्य देते. अशावेळी त्यावर मोत्यांचे दागिने घातले जातात. त्यामुळे मोत्यांचे नेकलेस, तन्मणी, नथ या प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. नथीमध्ये ब्राह्मणी घाट आणि चापेच्या नथीला प्राधान्य मिळते आहे. याशिवाय नेहमीचे पारंपरिक  बुगड्या, ठुशी, चिंचपेटी, कुड्या, तोडे, वाकी, लफ्फा, कोल्हापुरी साज असे दागिनेही ट्रेंडमध्ये आहेतच. काही ठिकाणी मोत्यांच्या मुंडावळ्यादेखील पाहायला मिळत आहेत. 

दुसरीकडे रिसेप्शन किंवा पार्टीसारख्या प्रसंगाना आधुनिक पोशाख परिधान केला जातो. त्यावेळी मात्र  हिऱ्यांच्या दागिन्यांना पसंती दिली जात आहे. लग्नात अलीकडे अगदी ठळकपणे वाढलेला ट्रेंड म्हणजे ‘कपल रिंग’. नवऱ्या मुलीची आणि मुलाची अंगठी एकाच ‘थीम’नुसार डिझाईन करून घेण्याचे प्रमाण यात वाढले आहे. या प्रकाराला ‘वेडिंग बँड’ म्हणूनही ओळखले जाते. इंटरनेटवर पाहून त्यानुसार आपल्या पसंतीचे अंगठीचे डिझाईन करून घेण्याकडे अनेकांचा कल आहे. यात हार्ट शेप, राउंड शेप आणि खडे बसवलेल्या अंगठ्या खरेदी केल्या जात आहेत. अंगठी घेताना हिऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. मात्र काहींनी प्लॅटिनमच्या अंगठ्यांनाही पसंती दिली आहे.

दागिने म्हटले की स्त्रियांची हौस म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. मात्र अलीकडे पुरुषही आपली दागिन्यांची हौस पूर्ण करताना दिसत आहेत. शेरवानीसारख्या पोशाखावर त्याला साजेसा गळ्यातला हार घालण्याचा पर्याय आता सर्रास वापरला जात आहे. यामध्ये मोत्यांच्या हारांना सर्वाधिक पसंती आहे. या व्यतिरिक्त सोन्याच्या अथवा चांदीच्या साखळ्याही पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. या साखळ्या सरासरी ३० ग्रॅमपर्यंत खरेदी केल्या जातात. इंडो-इटालियन डिझाईन या प्रकारातील हार/साखळ्या सर्वाधिक चलतीत आहे. या मशीन मेड प्रकारात रोडियम पॉलिश असलेल्या साखळ्या लक्ष वेधून घेत आहेत. विशेषतः ३०-३५ वयोगटातील पुरुषांची या प्रकाराला पसंती मिळते आहे. पूर्वी ब्रेसलेट आणि कडे या प्रकारांना खूप मागणी होती. ती आजही कायम असली, तरी त्यात फॅन्सी डिझाईन घेण्याकडे कल वाढला आहे. रोडियम पॉलिश आणि खडे लावलेले कडे पुरुषांच्या पसंतीला उतरत आहेत. या व्यतिरिक्त अंगठ्या, चष्म्याची फ्रेम, घडाळ्याचे पट्टे, बेल्टचे बक्कल इत्यादी गोष्टीही सोन्यात अथवा चांदीत डिझाईन करून मिळत आहेत. मात्र या पर्यायांकडे वळणाऱ्या पुरुषांची संख्या अद्याप कमीच आहे.

थोडक्यात काय तर  ‘हौसेला मोल नाही’, असे आपल्याकडे म्हटले जाते. हेच दागिन्यांच्या बाबतीत खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. लग्नातील इतर खर्चांना कात्री लागत असली, तरी दागिन्यांवरील खर्च मात्र कमी होत नसल्याचे दिसते आहे. याउलट दागिन्यांवरील खर्चात सरासरी २० टक्के वाढ झाल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे कोरोना असू दे, अथवा इतर कुठलेही संकट... उत्सवप्रेमी भारतीयांच्या उत्साहामुळे दागिन्यांची बाजारपेठ नवनव्या ट्रेंडसह कायमच गजबजलेली असेल, हे नक्की.         

‘सध्याचा काळ हा लग्नसराईचा अगदी सुगीचा काळ आहे. येत्या दोन महिन्यांत देशभरात सुमारे २५ लाख लग्न होतील असा अंदाज आहे. त्यामुळे साहजिकच सराफ व्यावसायिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे लग्नातील इतर खर्च कमी झाले असल्याने दागिन्यांवर मुक्तहस्ताने खर्च केला जात आहे. त्यातच दागिन्यांकडे गुंतवणूक म्हणूनदेखील पाहिले जात असल्याने ग्राहक खर्चात हात आखडता घेत नाहीत. त्यामुळे सध्या ऑफर्स आणि डिस्काऊंटपेक्षा हटके डिझाईन्सना अधिक मागणी आहे.’
– सौरभ गाडगीळ,  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,  पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स

‘गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक विवाहसोहळे रखडले होते. परिणामी यंदाच्या सीझनमध्ये त्यांची संख्या अजूनच वाढल्याचे दिसते आहे. उत्तम मुहूर्तांचीही त्याला जोड आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर सुरू झालेला खरेदीचा आलेख चढताच राहिला आहे, ही अतिशय सकारात्मक बाब आहे. सोन्याचा आणि चांदीचा भावदेखील गेल्या काही काळात स्थिरावला आहे. त्यामुळे त्यात लग्नाचे निमित्त साधून गुंतवणूक करण्यास ग्राहक उत्सुक आहेत.’ 
अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

संबंधित बातम्या