मनोरंजन सृष्टीतही लग्नसराई
विवाह विशेष
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही लग्नाचे वारे वाहू लागलेले आहेत. काहींनी याआधीच लग्नगाठ बांधली आहे, तर काहीजण येत्या काही दिवसांत दोनाचे चार हात करणार आहेत.
सध्या अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाबाबतची चर्चा बी-टाऊनमध्ये चांगलीच रंगलेली आहे. गेले काही महिने त्या दोघे वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसत आहेत. त्यांच्या बाबतीत रोज काही ना काही नवे अपडेट्स समोर येत असतात. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवरा या रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाह होणार आहेत. या लग्नात जवळपास दोनशे पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत त्यांनी लग्नगाठ बांधलेलीही असेल.)
हिंदी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि चुलबुली गर्ल आलिया भट हे दोघेही लवकरच विवाह करणार असल्याचे बोलले जात होते. त्यांचा विवाह याच महिन्यात मोठ्या थाटामाटात पार पडणार होता. परंतु, त्यांनी आपल्या लग्नाची तारीख पुन्हा बदलली असल्याचे बोलले जात आहे. ते दोघेही आपापल्या कामात आता कमालीचे बिझी आहेत. त्यामुळे ते दोघे पुढील वर्षी लग्नाच्या बेडीत अडकतील असे वाटते. असो!
एकीकडे काही कलाकार लग्न करण्याच्या तयारीत असताना, काही जणांनी मात्र आपल्या लग्नाचा बार आधीच उडविला आहे. लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतमने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी जून महिन्यात लग्नगाठ बांधली. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच त्यांच्यातील प्रेम बहरत गेले. हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावात जवळच्या आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पडला.
अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा हे गेली अकरा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी गेल्या महिन्यात काही मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. चंदीगढमधील ओबेरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. फराह खान आणि अभिनेता साकिब सलीम व्यतिरिक्त दोघांच्या खास मित्रांनी लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.
‘मुक्काबाज’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंगचेही दोनाचे चार हात झाले आहेत. त्यांनी अगदी खासगी पद्धतीने लग्न केले. केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र या लग्नाला उपस्थित होते. त्याची पत्नी रुचिरा महाराष्ट्रीय असल्यामुळे महाराष्ट्रीय आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पद्धतींनुसार हा विवाह सोहळा पार पडला.
प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेदेखील नुकतीच लग्न बंधनात अडकली. शाल्मली खोलगडने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. ‘बलम पिचकारी’, ‘लत लग गई’ ही तिची गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. तिच्या गाण्याचा अंदाज व स्टाइल कमालीची आहे. २२ नोव्हेंबर रोजी तिने फरहान शेखसोबत लग्नगाठ बांधली. दोघांनाही गाजावाजा नको असल्याने त्यांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. लग्नाला मोजून पंधराजण उपस्थित होते, असे समजते.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘गुमनाम है किसी के प्यार में’ या मालिकेत प्रमुख भूमिका करणारा अभिनेता नील भट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा यांनी मालिकेत काम करता करता प्रत्यश्र जीवनात संसार थाटण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत त्यांनी ‘विराट’ आणि ‘पाखी’ या भूमिका साकारल्या आहेत.
हिंदीमध्ये एकेक कलाकार लग्नबंधनात अडकत असताना मराठीतीलही काही कलाकारांनी प्रत्यक्ष जीवनात लग्नगाठ बांधली आहे. मराठीच्या छोट्या पडद्यावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका कमालीची लोकप्रिय ठरली. या मालिकेत ग्लॅमरस आणि बिनधास्त अशा ‘शनाया’ची भूमिका रसिका सुनीलने साकारली होती. या मालिकेमुळे तिला घरोघरी लोकप्रियता मिळाली. मध्यंतरी तिने ही मालिका सोडली होती, कारण तिला पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेमध्ये जायचे होते. तिने चित्रपटसृष्टीशी संबंधित कोर्स पूर्ण केले. तिथे तिची ओळख आदित्य बिलागीशी झाली. त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमामध्ये झाले. या वर्षाच्या सुरुवातीला रसिकाने आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि ऑक्टोबर महिन्यात गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये कुटुंबीयांबरोबरच काही मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी विवाह केला.
अभिनेता सुयश टिळक हा छोट्या पडद्यावरचा स्टार कलाकार. त्याने सन २०१८मधील ‘श्रावण क्वीन’चा किताब मिळविणाऱ्या आयुषी भावेबरोबर सात फेरे घेतले. तिने ‘श्रावण क्वीन’चा किताब मिळविला, तेव्हाच तिची आणि सुयशची छान ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री इन्स्टाग्रामवरून व्हॉट्सअॅप चॅटिंगवर आली. पुढे बोलणे वाढले, भेटी वाढल्या आणि आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत हे या दोघांना जाणवले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.