सजना है मुझे सजना के लियें...

सोनिया उपासनी
सोमवार, 13 डिसेंबर 2021

विवाह विशेष

एकदा लग्न ठरले, की खरेदीची मोठी यादी तयार होते. त्यात मुख्य खरेदी असते ती कपड्यांची. सध्या मुख्य लग्नाबरोबरच साखरपुडा, प्री-वेडिंग फोटो शूट, संगीत, मेंदी, हळद अशा असंख्य कार्यक्रमांसाठी नवरदेव आणि नवरी मुलगी दोघेही वेगवेगळे पोशाख निवडतात... 

तुळशीचे लग्न लागले की लग्नाच्या मुहूर्तांची सुरुवात होते. उपवर मुलामुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न. प्रत्येक लग्न सोहळ्यात हे ‘उत्सव मूर्ती’ सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र असतात. वधू आणि वर नटूनथटून आपल्या हौशी सर्व प्रकारे पुरवून घेत असतात. आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवशी सगळ्यात बेस्ट दिसायला तत्पर असतात. पूर्वी लग्न म्हणजे घरच्या घरी हळदीचा कार्यक्रम उरकला, की मुख्य सीमांत पूजन आणि लग्न सोहळ्यासाठीच हॉल बुक करायची पद्धत होती. पण आता प्री-वेडिंग पार्टीज, संगीत, मेंदी, हळद, सीमांत पूजन आणि लग्न असा सहा ते सात दिवसांचा कार्यक्रम असतो. 

लग्न ठरल्यानंतर वेळात वेळ काढून आधीपासूनच जर थोडी थोडी खरेदी केली, तर ऐनवेळचा गडबड गोंधळ टाळता येतो आणि बाकीची इतर महत्त्वाची तयारी करायला हाती वेळही शिल्लक असतो. थोडेसे नीट प्लॅनिंग केले, तर लग्नाच्या व्हेन्यूनुसार मुलाला व मुलीला त्या त्या दिवसासाठीच्या पोशाखांची नीट निवड करता येते. हल्ली तर वधू-वराचे पोशाख एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे असतात. डेकोरेटर्स आणि इव्हेन्ट मॅनेजर्ससुद्धा वधू-वराच्या फायनल-डे आऊटफीटवरून डेकोरेशनसाठी फुलांच्या रंगांची व इतर डेकोरेटिव्ह आयटम्सची निवड करतात, जेणेकरून उत्सवमूर्ती सगळ्यात उठून दिसाव्यात.

प्री-वेडिंग फोटो शूटची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेच आहे. प्री-वेडिंग फोटो शूट म्हणजे होणाऱ्या नवरानवरीची चंगळच. हल्ली प्रत्येक जण आपापल्याला आर्थिक सामर्थ्यानुसार देश-विदेशातील सिनिक लोकेशन्सला प्री-वेडिंग फोटो शूट्स आणि डेस्टिनेशन वेडिंग्स ठरवतात. प्री-वेडिंग शूट्ससाठी लोकेशनच्या हिशोबाने लोकेशनला साजेशा पोशाखांची निवड केली जाते. उदाहरणार्थ, नदीकाठी, तलावाकाठी, बीचवर, स्वीमिंग पूल अथवा खाडीचे लोकेशन असेल तर मुलीसाठी, फ्लोई ड्रेसेस अर्थात मॅक्सीसारखा लांबलचक वनपीस, घेरदार ड्रेस उठून दिसतात. परिकथेतील राजकुमारीप्रमाणे हे ड्रेस घालून फोटोशूट करणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते, आणि जोडीला हवा असतो हातात हात धरून सोबत करणारा राजकुमार; अगदी परिकथेसारखा फुग्यांच्या बाह्या असलेला लाइट कलरचा शर्ट घालून त्यावर वेस्टकोट व नॅरोबॉटम पँट आणि मोठे बूट्स घातलेला! मुलींचे ड्रेसेसही प्लेन, फ्लोरल नेट व ब्रोकेड अशा अनेक पॅटर्नमध्ये रेडिमेड उपलब्ध असतात, अथवा मुली त्यांच्या आवडीप्रमाणे डिझाईनरकडून शिवून घेतात. 

प्री-वेडिंग फोटो शूटसाठी एखादा पॅलेस, गुहा, जुना आलिशान वाडा, नेचर रिसॉर्ट, शूट इन द वूड्स, बर्फाने सजलेले हिल स्टेशन्स असे अनेक पर्याय आहेत. हल्ली कोविडच्या पार्श्वभूमीवर तर लग्नातल्या ट्रॅडिशनल कपड्यांत इनडोअर शूट्समध्ये जिम, क्लब हाऊस असेही पर्याय निवडताहेत. पॅलेस अथवा जुन्या वाड्यांमध्ये शूट करायचे असेल, तर लेहेंगा-चोळी, हेवी सॅटिनचे अथवा भरजरी काम केलेले वनपीस ड्रेसेसची निवड करू शकता. 

मुलांचा अटायर मुलीच्या अटायरला साजेसा निवडला जातो. त्यामध्ये सूट्स, ब्लेझर्स, कुर्ते, जॅकेट्स, शेरवानी, धोती अशा अनेक प्रकारच्या कपड्यांचा समावेश असतो. प्रत्येकाच्या बजेटनुसार वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये हे सर्व पोशाख उपलब्ध असतात. सॅटिन, जॉर्जेट, सिल्क, ब्रोकेड, कॉटन सिल्क, ज्यूट, लीनन या आणि अशा अनंत फॅब्रिक व्हरायटी असलेल्या प्रकारांमध्ये वधूवरांचे सर्व पोशाख उपलब्ध असतात. आजकालची मुलेमुली लग्नाच्या इतर कार्यक्रमांबरोबरच प्री-वेडिंग शूटलाही तेवढेच महत्त्व देतात. कारण लग्नसराईच्या वेळची गर्दी टाळून सवडीने फोटो काढता येतात. 

मेंदीच्या कार्यक्रमासाठी हातभर व पायावर गुडघ्यापर्यंत मेंदी काढली, तरी सुटसुटीतपणे वावरता येईल, असे कपडे निवडावेत. या कार्यक्रमासाठी ग्रीन कलरमधल्या कोणत्याही शेड्स किंवा पेस्टल शेड्स निवडाव्यात. त्यामुळे मेंदीचे डाग इकडेतिकडे लागलेच, तरी संपूर्ण पोशाख खराब होत नाही. ग्रीन कलर शेडमध्ये हे डाग कॅमोफ्लाज होतात. स्लीव्हलेस क्रॉप टॉप व  हाय-लो कट लेहेंगा हल्लीच्या तरुणींची विशेष पसंती आहे. लो-हाय कट लेहेंग्यामुळे पायावर समोरच्या बाजूला काढलेली मेंदी उठून दिसते व फॅब्रिकही पायाला सारखे लागत नाही.

हल्ली लग्नाचा दिवस सोडला, तर इतर वेळी मुली साडीव्यतिरिक्त इतर ट्रॅडिशनल वेअर घालणे पसंत करतात. त्यात इंडोवेस्टर्न मॅक्सीज्, फ्लेअर्ड वनपीस ड्रेस, लेहेंगा विथ क्रॉप टॉप असे पोशाख असतात. संगीत समारंभालासुद्धा ब्राईट ह्यूजमधले मुला-मुलींचे एकमेकांना कॉम्प्लिमेंटिंग ड्रेस घालण्याचा ट्रेंड आहे. संगीतचा कार्यक्रम बहुतेक वधू-वर पक्ष एकत्रच करतात.

हळदीच्या कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा आउटफिट लागतो. त्यामध्ये भरपूर व्हरायटीज् उपलब्ध आहेत. पिवळ्या साडीपासून लेहेंगा चोळी, इंडो वेस्टर्न स्कर्ट टॉप, शॉर्ट ड्रेस विथ स्कार्फ, वनपीस  यांमधून सिलेक्शन करण्यासाठी नवऱ्या मुलीला मोठा वाव आहे.

महाराष्ट्रीय वधू सीमांत पूजनाला आवर्जून भरजरी साडी व लग्नाच्या दिवशी नऊवारी नेसते. लग्नाच्या साड्यांमध्ये सिल्कमध्ये विविध प्रकार आणि रंग उपलब्ध आहेत. नवऱ्या मुलाचे उपरणे-सोवळे, शेरवानी, ब्लेझर्स, धोती कुर्ता यामध्येही सिल्क, कॉटन व ब्रोकेडमध्ये नवनवीन डिझाईनर पीस बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मलमल, ब्रोकेड व सिल्क यामध्ये नऊवारी पैठणी, गढवाल सिल्क, सम्बलपुरी सिल्क, कांचीपुरम सिल्क, पटोला या सर्व प्रकारांमध्ये मुलींसाठी खास लग्नाच्या दिवशी नेसावयाच्या साड्यांनी सर्व दुकाने सजलेली आहेत. 

सोन्यांच्या दागिन्यांबरोबरच ग्रॅम ज्वेलरीमध्येही भरपूर भरजरी नवनवीन स्टॉक आहे. ब्रायडल फूटवेअरमध्येही प्रत्येकाच्या आवडीनुसार मोजड्या, चप्पल, हिल्ड वेजेस, कोल्हापुरी पॅटर्न फूटवेअरमध्येही विविधता आहे.

चला तर मग, खरेदीला सुरुवात करा व आपल्या आवडीचे पोशाख, बॅग्ज, फूटवेअर, ज्वेलरी आउट ऑफ स्टॉक होण्याआधीच खरेदी करा!

संबंधित बातम्या