रूपानं देखणी...!

स्वप्ना साने
सोमवार, 13 डिसेंबर 2021

विवाह विशेष

लग्नाचा दिवस म्हणजे नवऱ्या मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो आणि त्या दिवशी तिला तिचा ‘बेस्ट लुक’ हवा असतो. अशा वेळी काय तयारी करायची आणि किती दिवस आधी प्लॅनिंग करायचे हे ठरविणेही महत्त्वाचे असते.

लग्नप्रसंगी कोणत्या गोष्टी कराव्यात (डूज्) आणि कोणत्या करू नयेत (डोन्ट्स) याबाबत काही टिप्स...

डूज्
लग्न ठरल्यावर लगेच आपल्या ब्यूटी थेरपिस्टला भेटावे. आपल्या ओळखीचा कोणी ब्यूटी थेरपिस्ट नसेल, तर माहिती काढून चांगल्या ब्यूटिशियनशी संपर्क साधावा. स्किन केअर आणि हेअर केअरबद्दल विचारून घ्यावे.

 मेकअप आर्टिस्ट आधीच बुक करावा. थोडी माहिती काढून त्यांनी केलेले मेकअपचे फोटो बघून आपल्याला काय सूट होईल, असा मेकअप लुक आधीच फायनल करावा. लग्नाचा मेकअप आणि हेअर स्टाइलची ट्रायल जरूर घ्यावी. मेकअप आर्टिस्टकडून ते आधीच फायनल करावे, ऐनवेळी प्रयोग करू नयेत.

 स्वतःची ब्यूटी केअर किट तयार करावी. त्यात गरजेचे सगळे सामान आधीच आणून ठेवावे. बेसिक स्किन केअर प्रॉडक्ट्स आणि हेअर केअर प्रॉडक्ट्स घ्यावेत. त्याशिवाय हलका सेल्फ मेकअप करता येईल अशी छोटी मेकअप किट असू द्यावी. 

 त्वचेची खास काळजी घ्यावी. ऑफिसला जात असाल, तर वेळ काढून सुट्टीच्या दिवशी फेशियल करून घ्यावे. बॉडी पॉलिशिंगचे सेशन घ्यावे आणि जर काही स्किन प्रॉब्लेम्स असतील तर त्यावर योग्य तो उपचार घ्यावा.

 केस ड्राय, डल आणि फ्रीझी झाले असतील, तर हेअर स्पा ट्रीटमेंट जरूर घ्यावी. 

  पौष्टिक आहार घ्यावा. आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन डाएट प्लॅन आखावा. कारण हेल्दी डाएट असल्यास त्वचाही हेल्दी राहते. 

 बॉडी हायड्रेट करत राहावी, म्हणजेच भरपूर पाणी प्यावे. शरीरात पाणी नियंत्रित असेल तर त्वचा निरोगी आणि टवटवीत दिसते, डोळे तजेलदार दिसतात आणि ओठही फुटत नाहीत. 

 हातापायांची आणि नखांची खास काळजी घ्यावी. हात टॅन झाले असल्यास अँटी टॅन ट्रीटमेंट घ्यावी. ग्लोव्ह्ज वापरावेत. पायाला भेगा असल्यास पेडिक्युअर करावे. फूट क्रीम लावावे. शक्य असल्यास सॉक्स वापरावेत म्हणजे टॅन होणार नाहीत. 

 काही सिलेक्टिव्ह लिपस्टिकच्या शेड्स किटमध्ये असाव्यात, लिप बाम अवश्य लावावे. काजळ स्वतःचे वापरावे. जे तुम्हाला नेहमी सूट होते तेच लावावे. 

डोन्ट्स

 •  त्वचेवर मुरूम, पुटकुळ्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नखाने फोडू नये, इन्फेक्शन होते. 
 •  त्वचेवर आणि केसांवर भरपूर केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करू नये. इन्स्टन्ट ग्लोच्या नादात त्वचेला नुकसान पोहोचू शकते. नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रॉडक्ट्स वापरावेत.
 •  जंक फूड सतत खाऊ नये. ते पचायला जड असते त्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते, ज्याचा परिणाम थेट त्वचेवर होतो. 
 •  कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि अल्कोहोल कटाक्षाने टाळावे. यामुळे बॉडी डीहायड्रेट होते, त्वचा काळवंडलेली दिसते, डोळ्याखाली पफीनेस येतो. 
 •  जुने झालेले मेकअप प्रॉडक्ट्स वापरू नयेत. असे केल्यास चेहऱ्यावर ॲलर्जी येऊ शकते, फंगल इन्फेक्शन होऊ शकते. 
 •  वेट लॉस प्लॅन करत असाल, तर फास्टिंग डाएट करू नये. इन्स्टन्ट वेट लॉसमुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. न्यूट्रिअन्ट्सच्या कमतरतेमुळे विकनेस जाणवू शकतो आणि याचा परिणाम लगेच जाणवला नाही तरी भविष्यात नक्कीच जाणवतो. खूप तीव्रतेने व्यायाम सुरू करू नये, हळूहळू स्टेप बाय स्टेप करावा. शक्य असल्यास पर्सनल ट्रेनर अपॉइंट करावा. माहिती नसल्यास स्वतः काहीही ठरवू नये. दुसऱ्याला जे सूट झाले आहे ते तुमच्यासाठी योग्य असेलच असे नसते.
 •  हिरॉईन आणि मॉडेल्सचे मेकअप लुक बघून मलाही असाच मेकअप हवा, असा अट्टहास करू नये. भडक मेकअप करणे टाळावे. कारण त्यांना आपण स्क्रीनवर बघतो, आणि तो मेकअप खूप हेवी असतो. लग्नात लोक तुम्हाला प्रत्यक्षात बघणार असतात, त्यामुळे मास्क लावल्यासारखा मेकअप करू नये. 
 •   खूप जागरण आणि उशिरा उठणे टाळावे. आपले रूटीन नीट सेट करावे. जागरण केल्यास डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात. अपचन आणि त्यामुळे होणारे त्रास उद्‍भवतात. त्यामुळे हेअर फॉलही होऊ शकतो. म्हणून ब्यूटी स्लिप आवश्यक आहे. 
 •  लग्नाच्या दिवशी किंवा लग्नानंतरही, खूप सुंदर दिसण्याच्या नादात कुठलीही जाहिरात बघून त्याचे प्रयोग त्वचेवर करू नयेत. तुमच्या त्वचेला काय सूट होते, ते ब्यूटी थेरपिस्टला विचारूनच प्रॉडक्ट्स  वापरावेत.

क्विक टिप्स

 •  फेशियल करून आल्यावर त्याचा ग्लो टिकवण्यासाठी दोन दिवसाआड हनी अलमंड पॅक लावावा. बदाम रात्री भिजत घालून सकाळी पेस्ट करून घ्यावी. त्यात थोडा मध घालून हा पॅक पंधरा मिनिटे लावून ठेवावा. 
 •  अँटी टॅनिंग ट्रीटमेंट सुरू असतानाच हातांना घरगुती पॅक लावावा. बेसन, दही आणि चिमूटभर हळद मिक्स करून पंधरा मिनिटे लावावे व नंतर धुवावे.
 •  थंडीच्या दिवसांत त्वचा रूक्ष होते. त्यासाठी रात्री झोपायच्या आधी चांगले बॉडी लोशन किंवा बदाम तेलाने मालिश करावे. 
 •  बॉडी पॉलिशिंगचा इफेक्ट टिकवण्यासाठी बॉडी पॉलिशिंग करून आल्यानंतर शक्य असल्यास उटण्याने अंघोळ करावी. कारण साबण वापरल्यास त्वचा ड्राय होते. 
 •  लग्न घर म्हणजे काम, पाहुणे आणि जागरण गप्पा, त्यामुळे झोप कमी होते. डोळ्याखाली डार्क सर्कल्स दिसू लागतात. काकडीचे काप किंवा बटाट्याचे काप डोळ्यावर ठेवावेत, फ्रेश वाटेल. वापरलेल्या टी बॅग्ज फ्रीजमध्ये गार करून डोळ्यावर ठेवाव्यात. डार्क सर्कल्स कमी होतील. 
 •  रेग्युलर फेस पॅक अथवा मास्कचा वापर करावा. पपई मॅश करून त्यात मध मिक्स करून १५ मिनिटे हा पॅक लावावा. त्वचा टवटवीत दिसेल, काळे डाग कमी होतील. मुलतानी माती आणि चंदन पावडर गुलाब जलमध्ये मिक्स करून हा पॅक लावावा. हा पॅक सगळ्या स्किन टाईप आणि सगळ्या एज ग्रुपला सूट होतो. 
 •  केसांची काळजी घेताना आठवड्यातून दोन वेळा तरी ऑइल मसाज करावा. माइल्ड शाम्पू वापरावा. हेअर कंडिशनिंग पॅक लावावा. तुमच्या केसांना कोणता पॅक सूट होईल, ते ब्यूटी थेरपिस्टला विचारून लावावा.

संबंधित बातम्या