फिल्टर बबल्स (भाग १) 

नीलांबरी जोशी 
गुरुवार, 3 जानेवारी 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
माध्यमांच्या बदलत्या स्वरूपांचा मानसिक स्वास्थ्यावरचा परिणाम दिवसेंदिवस वाढत जात आहे. नैराश्‍य, चिंता, ताणतणाव, व्यसनाधीनता असे मानसिक विकार वाढत आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून लाइफस्टाइल डिसिजेस वाढायला लागले... ‘माध्यमं आणि मानसशास्त्र’ ही लेखमाला यावरच आधारित आहे.

‘कुत्रा पाळणं योग्य/चांगलं आहे का?’ अशी सर्च ‘गुगल’ला देऊन बघा. मग कुत्रा पाळणं किती चांगलं आहे, कुत्रा पाळण्याचं तंत्र काय आहे वगैरे रिझल्टस गुगल दाखवेल. त्यानंतर लगेचच ‘कुत्रा पाळणं हा दुष्टपणा आहे का?’ अशी सर्च द्या. त्यानंतर कुत्रा किंवा इतर प्राणी पाळणं किती आणि कसं दुष्टपणाचं आहे यावर रिझल्टस येतील. अशा प्रकारे तुमचा कल ओळखून गुगल तुम्हाला वेगवेगळी वेबपेजेस दाखवतं आणि हे तुमच्या लक्षातही येत नाही. मुळात हा प्रकार इतक्‍या मामुली गोष्टींपर्यंत मर्यादित नाही. याच प्रकारे ‘स्टेम सेल्सवरचं संशोधन’ याबद्दलचे रिझल्टस त्या विषयाच्या विरोधातल्यांना आणि त्यावर संशोधन करणाऱ्यांना वेगवेगळे दिसतात. ‘पर्यावरणाची हानी’ या विषयावरचे निकालही पर्यावरणावर सामाजिक काम करणाऱ्या माणसाला आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्याला वेगवेगळे दिसतात. याच प्रकारे आपल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदर्शांना/आवडीनिवडींना अनुसरून इंटरनेटवरच्या अनेक वेबसाईट्‌स आपल्याला रिझल्टस दाखवतात. असं कसं होतं? याचं उत्तर आहे ‘फिल्टर बबल्स’..! 

‘फिल्टर बबल’ हा शब्द एलि पॅरिसर यानं २०११ मध्ये प्रथम वापरला होता. याच विषयावरचं त्याचं पुस्तक आणि टेड टॉकही खूप गाजला होता. जो माणूस इंटरनेट वापरत असतो त्याचं ठिकाण, तो कोणत्या गोष्टींवर क्‍लिक करून त्या गोष्टी जास्तीत जास्त वेळा पाहतो (उदाहरणार्थ, स्त्रिया दागिने आणि पुरुष मोटारगाड्या) आणि तो कोणकोणत्या गोष्टी सर्च करतो (उदा. शिवाजी महाराज, डोनाल्ड ट्रंप, गोवा, पॅरिस, मिसळ असं काहीही) अशा अनेक गोष्टींवरून असंख्य वेबसाईट्‌स माहिती गोळा करतात. त्यावर अल्गॉरिदम्स लिहितात. त्यावरून त्या माणसापुरतं त्याचं वैयक्तिक विश्‍व वेबसाइट्‌स तयार करतात. यानंतर इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडी सोडून इतर गोष्टी/दृष्टिकोन वेबसाइट्‌सवर दिसणं बंदच होतं. यालाच पॅरिसरनं ‘फिल्टर बबल’ असं नाव दिलं आहे. 

याची सुरुवात झाली ४ डिसेंबर २००९ रोजी! त्या दिवशी गुगलच्या ब्लॉगवर ‘पर्सनलाईज्ड सर्च फॉर एव्हरीवन’ या शीर्षकाची एक बातमी होती. सर्वसाधारण सर्च आणि पर्सनलाईज्ड सर्च यात काय फरक आहे? तर सर्वसाधारण सर्चमध्ये तुम्ही ज्या शब्दावर सर्च दिली आहे, त्यावर युगांडापासून भारतापर्यंत सगळीकडे आणि सगळ्यांना सारखेच रिझल्टस दिसतात. पण पर्सनलाईज्ड सर्चमध्ये तुमच्या वैयक्तिक माहितीनुसार विशिष्ट रिझल्टस वेबसाईट्‌सवर दाखवले जातात. 

डॅनी सुलिव्हन या ब्लॉगरनं पर्सनलाईज्ड सर्चला ‘सर्च इंजिनच्या विश्‍वातला सर्वांत मोठा बदल’ असं म्हणतानाच ‘आता वेबवरच्या प्रत्येक साइटवर हे पर्सनलायझेशन अल्गॉरिदम्स आहेत. हा बाटलीबंद राक्षस आता परत बाटलीत जाणं शक्‍य नाही’ असंही विधान केलं होतं. त्या दिवशी सकाळपासून गुगलनं इंटरनेट वापरणारा कुठून लॉग इन करतोय, कोणता ब्राऊजर वापरतोय, काय सर्च करतोय, कोणत्या प्रकारच्या साइट्‌स जास्त वापरतोय, गुगलवरून त्यानं लॉग आऊट केलं तरी तो कोणती वेबपेजेस पाहू शकतो असे ५७ प्रकारचे अंदाज वर्तवायला सुरुवात केली. 

हे सगळं करून गुगलला काय मिळते? तर इंटरनेट वापरणाऱ्याची जितकी नेमकी आणि अचूक वैयक्तिक माहिती मिळवली जाईल तितक्‍या जास्त योग्य जाहिराती वेबसाइट्‌स त्याला दाखवू शकतात. इंटरनेट वापरणारा माणूस ऑनलाइन वस्तू विकत घेण्याची शक्‍यता त्यातून वाढत जाते. आपण जितके भराभर वेबवर सर्च करू, जितकी जास्त वेबपेजेस पाहू आणि जितक्‍या जास्त लिंक्‍सवर क्‍लिक करू तितक्‍या प्रमाणात वेबसाइट्‌सना आपली माहिती गोळा करायला जास्त संधी मिळते. त्या माहितीला अनुसरून जास्तीत जास्त जाहिराती दाखवण्याची संधी मिळते. आपण जास्तीत जास्त क्‍लिक मारणे यात अशा प्रकारे वेब दुनियेचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत.  उदाहरणार्थ, ‘ॲमेझॉन’ प्रत्येक ग्राहकाची आवड निवड ओळखून त्याच्यासमोर ती विशिष्ट गोष्ट ठेवते. ‘नेटफ्लिक्‍स’ ही त्यांच्या प्रेक्षकांना कोणते चित्रपट आवडतील याचा अंदाज वर्तवते. त्या अंदाजावरूनच त्यांना एकूण ग्राहकांपैकी ६० टक्के ग्राहक मिळतात. 

तुम्ही तुमच्या सर्वांत जवळच्या विश्‍वासू मित्रालाही सांगत नसाल इतकी माहिती ही ‘पर्सनलाईज्ड सर्च’ गोळा करते. पण हा डेटा गोळा करून वेबसाइट्‌स कोणते आणि कसे निष्कर्ष काढतात ते मात्र कधीच कळत नाही. जोनाथन मॅकेफी हा अधिकारी गुगलमध्ये सर्च पर्सनलायझेशनवर काम करतो. ‘अल्गॉरिदम्स वापरून तयार केलेल्या पर्सनलाइज्ड सर्चचा परिणाम माणसांवर कसा होतो ते सांगणे निव्वळ अशक्‍य आहे’ असे त्याचे म्हणणे आहे. आपली ही सगळी माहिती कॉम्प्युटरवरच्या ज्या छोट्या फाइल्स साठवतात त्यांना ‘कुकीज’ म्हटले जाते. तुम्ही काय शोधलेत त्याचा मागोवा ठेवण्यासाठी या ‘कुकीज’ विशिष्ट माहिती साठवून ठेवतात. नंतर ती माहिती तुम्हाला वापरता येते. याचेच उदाहरण म्हणजे तुमचे गुगल/फेसबुक/इन्स्टाग्राम अशा असंख्य ठिकाणची तुमची अकाऊंट नेम्स आणि पासवर्डस..! 

‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका संशोधनानुसार टॉप ५० वेबसाइट्‌स ग्राहकाची वैयक्तिक माहिती मिळवण्याच्या ‘कुकीज’ सर्रास वापरतात. उदाहरणार्थ ‘डिप्रेशन’ हा एक शब्द जर तुम्ही ‘डिक्‍शनरी डॉट कॉम’ला शोधलात तर त्या वेबसाइटवर २२३ ‘कुकीज’ आहेत. त्यातली तुमची माहिती मग या ‘कुकीज’ इतर वेबसाइट्‌सना पुरवतात. औषधे पुरवणारी वेबसाइट लगोलग तुम्हाला अँटीडिप्रेसंटची जाहिरात दाखवायला लागते. तसेच तुम्ही खाद्यपदार्थ बनवण्याचा एखादा लेख फेसबुकवर शेअर केलात तर तुम्हाला टेफलॉनच्या तव्याची जाहिरात दिसते. आता आपल्यापर्यंत कोणते इमेल्स पोचावेत, आपल्याला जोडीदार कसा मिळावा, आपण कोणत्या रेस्टॉरंट्‌समध्ये जावे सगळे काही या वेबसाइटवरच्या कंपन्या ठरवतात. अल्गॉरिदम्स आता जाहिराती दाखवण्याबाबत निर्णय घेताघेता आपल्या आयुष्याचे सुकाणूच हातात घ्यायला लागले आहेत. 

याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे, दिवसाला ९ लाख ब्लॉग पोस्ट्‌स, ५० कोटी ट्‌विट्‌स, ६० कोटींपेक्षा जास्त फेसबुक स्टेटस अपडेट्‌स, २.१० कोटी इमेल्सची दिवसाला देवाणघेवाण होते. युट्यूबवर मिनिटागणिक १३०००००००० तासांचे व्हिडिओज अपलोड होतात. माहितीचा भडिमार होत असताना यातले काय पाहायचे ते इंटरनेट वापरणाऱ्याला कळेनासे होते. यातली आपल्यासाठी योग्य आणि महत्त्वाची माहिती कोणती हे शोधणे हे एक वेळखाऊ काम होऊन बसते. मग फिल्टर्स जे दाखवतात ते आपण निमूटपणे मान्य करतो. 

दुसरे म्हणजे, ‘हिंसा, लैंगिकता, गॉसिप, टवाळखोर अशा उद्दिपित करणाऱ्या गोष्टी मनाला हव्याशा वाटतात. त्यामुळे आपण सनसनाटी बातम्या सर्वांत आधी वाचतो,’ असे दाना बॉईड या समाजशास्त्रज्ञ महिलेने एका व्याख्यानात म्हटले होते. याचाच परिणाम म्हणजे आपल्याला हवे ते वेबपेजेसवर समोर येते आणि जे आपल्याला नकोसे किंवा नावडते वाटते त्या गोष्टी समोर येतच नाहीत. आपले विचार, वागणूक, कृती या सर्वच गोष्टी संकुचित आणि बंदिस्त होऊन जातात. प्रत्यक्षात नवीन संकल्पनांमधूनच सृजनशीलता जन्म घेते. पण त्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी आणि विविध दृष्टिकोन मुळात माहिती असायला हवेत. ‘फिल्टर बबल’ तेच थांबवतो. उद्या जर पर्सनलायझेशन जास्त अचूक होत गेले, तर आपल्या समजुती, गृहीतके आणि संकल्पना यांना हादरे देणारे असे आपल्यासमोर काही येणारच नाही. ‘फिल्टर बबल’ हा प्रकार खरे तर नवीन नाही. पूर्वीपासून कोणत्याही माध्यमातले आपण आपल्याला हवे असेल तेच वाचतो/पाहतो/ऐकतो आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण ‘फिल्टर बबल’ने तीन नवीन गोष्टींना चालना दिली आहे.

यापैकी पहिली गोष्ट म्हणजे, या बबलमध्ये तुम्ही संपूर्ण एकटे असता. टीव्ही बघताना अजूनही मोठ्या प्रमाणात चित्रपट, क्रीडास्पर्धा, मालिका एकत्रितपणे पाहिल्या जातात. नकळतपणे तो कार्यक्रम बघणाऱ्या लोकांमध्ये साहचर्य आणि जिव्हाळा निर्माण होत जातो. त्या कार्यक्रमाबद्दल चर्चा होते. पण स्मार्ट फोनवर किंवा वेबसाइट्‌सवर माणसे एकट्यानेच आणि त्यांना हवे तेच पाहतात. त्यामुळे फिल्टर बबल्स माणसामाणसांमध्ये दुरावा निर्माण करतात. 

दुसरे म्हणजे, ‘फिल्टर बबल’ हा अदृश्‍य स्वरूपात असतो. उदाहरणार्थ, टीव्हीवर बातम्या पाहताना आपला राजकीय दृष्टिकोन जसा असेल त्या प्रकारे बातम्या देणारी वाहिनी आपण पाहतो. पण वेबवर ज्या प्रकारच्या बातम्या आपल्यासमोर येतात त्यामागे वेबसाइट्‌सनी कोणते निकष लावले असतील ते आपल्याला कळत नाहीत. तुमच्या कोणत्या क्‍लिक्‍सवरून तुमच्या मतांबद्दल आडाखे बांधून विशिष्ट बातम्या तुम्हाला का दाखवल्या याचे कारण वेबसाइट्‌स आपल्याला सांगत नाहीतच. त्यामुळे तुमच्याबद्दल त्या वेबसाइटने गृहीत धरलेल्या गोष्टी चूक आहेत का बरोबर ते सांगायलाही तुम्हाला संधी मिळत नाही. ‘फिल्टर बबल्स’ कसे लावले जातात? त्यामागे कोणाकोणाचे हात असतात? त्याचे भवितव्य काय आहे? त्याने आपल्यावर काय परिणाम होणार आहे? आपले आयुष्य त्यामुळे कसे बदलणार आहे? यातले आपल्याला काहीच माहिती नाही. तिसरे म्हणजे, या ‘फिल्टर बबल’मध्ये तुम्ही स्वेच्छेने जात नाही. ‘एनडीटीव्ही’वरच्या बातम्या पाहणे, ‘सोनी’वरची मालिका पाहणे किंवा ‘इंडिया टुडे’ वाचणे हे तुम्ही स्वतःहून निवडलेले असते. निर्मात्यांच्या/संपादकांच्या चष्म्यातून मालिकांमधले/लेखांतले विचार मांडले असले तरी तुमचे मत वेगळे हे तुम्ही ठरवू शकता. मात्र वेबसाइट्‌सवर तुम्हाला असे पर्याय उपलब्धच होत नाहीत. त्यामुळे पर्याय निवडीचे तुमचे स्वातंत्र्य आणि नियंत्रण संपत जाते. 

‘कॅमेऱ्याच्या लेन्समधून जसे तुम्ही जग पाहता, तसे आता तंत्रज्ञानाच्या डोळ्यातून आपल्याला जग दिसायला लागले आहे,’ असे स्टॅनफर्डचा प्राध्यापक रायन कालो म्हणतो. त्या जगाबद्दलचा दृष्टिकोन गढूळ/धूसर करण्याच्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे ‘फिल्टर बबल्स’..! यासाठी ‘फिल्टर बबल्स’च्या आर्थिक आणि सामाजिक सत्ता कोणत्या आहेत? या सगळ्याचा राजकारण, संस्कृती आणि आपले भवितव्य यांच्यावर काय परिणाम होणार आहे ते समजून घ्यायलाच हवे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करत हवी ती गाणी/चित्रपट/मालिका ऐकतो/पाहतो, हवे ते खाद्यपदार्थ मागवतो आणि आनंदात असतो. मात्र रिॲलिटी टीव्ही, पाणीप्रश्‍न, शेतीप्रश्‍न, दारिद्य्र, विषमता, बेरोजगारी, गुन्हेगारी, अन्याय, उपासमार, दहशतवाद, पर्यावरणाची हानी, प्रदूषण हे जग क्षणार्धात नाहीसे करण्याची किमया या फिल्टर्सकडे आहे. तोच मानवजातीच्या अभ्युदयासाठी सर्वांत मोठा धोका आहे..!  

संबंधित बातम्या