नोमोफोबिया 

नीलांबरी जोशी 
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

‘मी  ऑफिसमधून बाहेर पडलो. शर्टच्या खिशात हात घातला. हाताला मोबाईल लागला नाही. मी एकदम घाबरलो, जगाशी नातं तुटल्यासारखंच वाटलं. क्षणभर हृदयाचे ठोकेच वाढले. मोबाईल कुठं ठेवला होता असा विचार करायचं भानही उरलं नाही..!’ असे अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येत असतात. आपला मोबाईल सापडला नाही, मोबाईलचा चार्ज संपला, मोबाईलला रेंज नसेल किंवा मोबाईलच्या डेटा पॅकचं लिमिट संपलं तर काय, अशी अनेकजणांना कमालीची भीती वाटते. याला ‘नोमोफोबिया’ (नो-मोबाईल-फोबिया) म्हटलं जातं. 

मुळात भीती या नैसर्गिक भावनेची व्याप्ती वाढून ती आपल्या दैनंदिन आयुष्यातली कामं करताना मधे यायला लागली, तर त्याला ‘फोबिया’ असं म्हणतात. विविध गोष्टी किंवा प्रसंग यांच्या भीतीतून अनेकविध फोबिया माणसांमध्ये निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, ‘गुलाबजाम’ या चित्रपटातल्या राधाला असतो तो ‘ॲजायरोफोबिया’ म्हणजे ‘रस्त्यांची किंवा रस्ता ओलांडायची भीती.’ ‘ओडोंटोफोबिया’ म्हणजे दंतवैद्याची भीती. ही बहुतेक सर्वांना असतो. ‘क्‍लास्ट्रोफोबिया’ म्हणजे बंदिस्त जागांची भीती (उदा. लिफ्ट) किंवा दारंखिडक्‍या बंद असताना घुसमटल्यासारखं वाटणं. याच कारणामुळं अनेकजणांना हॉटेलमध्ये जायचं असेल, तर आतल्या बंद जागेत बसण्यापेक्षा बाहेर बगीच्यात बसायला आवडतं. समाजात सुमारे १२ टक्के लोकांना कोणता ना कोणता फोबिया असतो. स्त्रियांमध्ये फोबिया असण्याचं प्रमाण पुरुषांच्या दुप्पट असतं. स्त्रियांना विशेषतः ‘ॲनिमल फोबिया’ असतो. आजतागायत सुमारे ५३० फोबियाजची यादी केली गेली आहे. 

‘नोमोफोबिया’ हा शब्द २०१० मध्ये इंग्लंडमध्ये प्रथम वापरला गेला. त्या वर्षी इंग्लंडच्या पोस्ट ऑफिससाठी ‘युजीओव्ही’  (yougov) या संशोधनसंस्थेनं मोबाईल वापरणाऱ्या लोकांना वाटणाऱ्या चिंतांबाबत एक सर्वेक्षण केलं होतं. त्या सर्वेक्षणात आपला फोन हरवला, बॅटरी संपली किंवा डेटाचं लिमिट संपलं किंवा नेटवर्क कव्हरेज संपलं, तर ५३ टक्के जण अस्वस्थ होत होते असं दिसून आलं होतं. त्याला या संस्थेनं ‘नोमोफोबिया’ हे नाव दिलं. 

गमतीचा भाग म्हणजे आपला स्मार्टफोन सापडत नसेल तरी तो शोधतानाही काहीवेळा आपण खिशात किंवा पर्समध्ये स्मार्टफोनची मदत घ्यावी या अपेक्षेनं हात घालतो. कॅलेंडर, अलार्म, वाढदिवस, पत्ता शोधणं, कशाचाही अर्थ शोधणं अशी असंख्य कामं करायला आपण स्मार्टफोन्सवर प्रचंड प्रमाणात अवंलबून असतो. आपल्या माहितीचा स्रोत आता स्मार्टफोन झाला आहे. एका क्‍लिकसरशी मिळणाऱ्या या माहितीची आपल्याला चटक लागते. त्यानं आपल्या मानसिकतेवर दोन प्रकारे परिणाम होतात. पहिला परिणाम ‘ट्रॅंझॅक्‍टिव्ह मेमरी’शी निगडित आहे. समजा, अचानक वीज गेली तर जोडप्यापैकी एकाला मेणबत्ती कुठं आहे ते माहिती असल्यानं तो/ती लगेच मेणबत्ती पेटवतो/ते किंवा जोडीदाराला विचारून मेणबत्ती शोधून पेटवली जाते. अशा प्रकारे आपल्या लक्षात राहणारी माहिती आणि आपल्या जोडीदाराच्या लक्षात राहणारी माहिती, यांचा गरज पडेल तेव्हा एकत्रितपणे वापर आपण सर्वजण करत असतो. एकेकट्याच्या स्मरणशक्तीपेक्षा दुसऱ्याची स्मरणशक्ती त्यात एकत्र करून सगळ्यांनाच जास्त फायदे होतात. अशा प्रकारे कोणत्याही जोडप्यांच्या/मित्रमैत्रिणींच्या एकत्रित स्मरणशक्तीला ‘ट्रॅंझॅक्‍टिव्ह मेमरी’ म्हटलं जातं. 

थोडक्‍यात, तुमची बायको जर रेल्वेचं टाइमटेबल किंवा संगीताच्या कार्यक्रमांच्या तारखा सहज लक्षात ठेवत असेल, तर ते काम तुमचा मेंदू तिच्यावर सोपवून टाकतो. मग त्या तारखा तुम्ही तिला कधीही विचारू शकता या विचारानं तुम्ही निर्धास्त असता. स्मार्टफोन्सच्या आधी अशा प्रकारे जोडीदाराकडून माहिती मिळवली जात होती. आता त्या माणसांची जागा स्मार्टफोन घेतो. त्यामुळं स्मार्टफोन हाच आयुष्याचा जोडीदार होतो. ते नातं जर स्मार्टफोन काहीही कारणानं वापरता येणार नाही हे लक्षात आल्यानं तुटलं तर माणसाला दुःख व्हायला लागतं. 

दुसरं म्हणजे, स्मार्टफोनवरून माहिती मिळवणं यावर अतिप्रमाणात विसंबून राहण्यामुळं स्मरणशक्तीच्या क्षमतेवरच आघात होतो. विश्‍वासार्ह माहिती मिळवण्यासाठी बाह्य स्रोत उपलब्ध आहेत हे स्मार्टफोन्समुळं मानवी मेंदूच्या लक्षात येतं. मग कोणत्याही विषयाबद्दल माहिती करून घेण्याची माणसाची प्रेरणा आणि क्षमता कमी होत जाते. 

उदाहरणार्थ, एका सर्वेक्षणात दंतवैद्यकाच्या ५०० विद्यार्थ्यांपैकी अनेकजणांना सुरुवातीच्या सत्रात चांगले गुण होते. पण दुसऱ्या सत्रात त्यांना अचानक कमी गुण पडले. त्याचं कारण ४० टक्के जणांनी ‘स्मार्टफोनवर जास्त वाया घालवलेला वेळ’ हे सांगितलं होतं. स्मार्टफोन्सवर आपण इतके अवलंबून असल्यामुळे ‘नोमोफोबिया’ निर्माण होतो. पाढे किंवा असंख्य फोन नंबर्स पाठ असणाऱ्या अनेकजणांना आता पाढे आठवत नाहीत त्यामागं हेच कारण आहे. 

‘नोमोफोबिया’मुळं असे मानसिक परिणाम होतातच, पण नातेसंबंधही बिघडत जातात. माणूस शरीरानं समोर आहे पण मनानं तिथं नाही असं मोबाईलच्या अतिवापरानं हमखास घडतं. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखादा सेल्समन ग्राहकांबरोबर मीटींगमध्ये असताना इमेल्स/एसएमएस/व्हॉटसॲप लगेच पाहात असेल तर ती ऑर्डर तर हातची जाऊ शकतेच. पण त्याला नोकरीही गमवावी लागू शकते. 

‘नोमोफोबिया’ असेल तर अनेकजणांच्या कार्यक्षमतेवर आणि उत्पादनक्षमतेवरही परिणाम होतो. एक तर कामावर लक्ष केंद्रित होत नाही. त्यामुळं कामाचा वेळ वाढतो. एकूण दिवसभरातल्या ८ तासात संपणाऱ्या कामासाठी २ तास जास्त काम करावं लागतं. कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढल्यानं, पण त्या वेळात कंपनीची उत्पादनक्षमता न वाढल्यानं कंपनीला तोटा होतो. कंपनीचं काम जास्त वेळ केल्यानं कर्मचाऱ्यावरचा ताणही वाढतो. त्या ताणातून बाहेर यायला तो परत मोबाईलचाच आधार घेतो असं दुष्टचक्र चालू होतं. यामुळं अस्वस्थता, भीती, चिंता, निराश वाटणं हे मानसिक आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मळमळ असे शारीरिक परिणाम होऊ शकतात. 

‘नोमोफोबिया’बद्दल मोजमापं उपलब्ध नसताना त्याचा अभ्यास करणं शक्‍य नाही हे लक्षात घेऊन अमेरिकेतल्या ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’नं वीस प्रश्‍नांची एक चाचणी तयार केली आहे. ‘एनएमपी-क्‍यू’ या नावानं ओळखली जाणारी ही चाचणी विकसित करताना विद्यापीठातल्या संशोधकांनी पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्सबद्दल ‘तुम्ही फोन कशासाठी वापरता’, ‘तुम्ही घरी फोन विसरलात तर तुम्ही दिवस त्याशिवाय काढू शकाल का’, ‘तुम्हाला तुमचा स्मार्टफोन वापरायचा असताना तो वापरायला मिळाला नाही तर तुम्ही अस्वस्थ व्हाल का’ असे प्रश्‍न विचारले होते. 

या प्रश्‍नांच्या उत्तरांवरून एखाद्याला मोबाईलपर्यंत पोचता येत नसेल तर त्याच्या भावना आणि विचार यावर काय परिणाम होईल याबद्दल विचार करून ‘एनएमपी-क्‍यू’ ही चाचणी तयार झाली. त्या चाचणीत ‘मला स्मार्टफोनवरून सतत माहितीचा शोध घेता आला नाही, तर अस्वस्थ होईन’, ‘माझ्या महिन्याचं डेटा लिमिट संपलं तर मी पॅनिक होईन’, ‘मला इमेल्स चेक करता आल्या नाहीत तर मला चिंता वाटेल’, ‘एसएमएस किंवा फोन घेता आले नाही तर मी नैराश्‍यात जाईन’ अशा गोष्टींचं प्रमाण उत्तरांवरून मोजलं जातं. या चाचणीत जर तुम्हाला २१-५९ गुण मिळाले तर किंचित स्वरूपाचा, ६६-९९ गुण मिळाले तर मध्यम स्वरूपाचा, १०० पेक्षा जास्त गुण मिळाले तर तीव्र स्वरूपाचा ‘नोमोफोबिया’ असू शकतो असं मानलं जातं. 

महत्त्वाचं म्हणजे या चाचणीतल्या निष्कर्षांमुळं आयुष्याच्या सर्व पैलूंवर काय परिणाम होतो विशेषतः कोणत्याही व्यक्तीवर मानसिक परिणाम काय होतात यावरचं संशोधन अजून पूर्णत्वाला गेलेलं नाही. मनोविकारांची यादी केली जाते, त्या अमेरिकेतल्या ‘डीएसएम-डायग्नोस्टिक्‍स अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल’मध्ये ‘नोमोफोबिया’ची वर्णी अजून लागलेली नाही. मुळात अस्वस्थता किंवा चिंता यामुळं निर्माण होणाऱ्या अँक्‍झायटी डिसऑर्डर्स, तंत्रज्ञानामुळं बदलत जाणाऱ्या जगात निर्माण होणाऱ्या लाईफस्टाइल डिसऑर्डर्स किंवा व्यसनाधीनता यापैकी कोणत्या प्रकारात ‘नोमोफोबिया’ला टाकावं याबाबत मनोविकारतज्ज्ञामंध्येच दुमत आहे. 

समाजात सर्वसाधारणपणे ६०-७० टक्के लोकांना ‘नोमोफोबिया’ असतो असं अनेक सर्वेक्षणं आणि संशोधनं सांगतात. शाळा-कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांमध्ये ‘नोमोफोबिया’चं प्रमाण प्रचंड आहे. अमेरिकेत ६५ टक्के लोक शेजारी स्मार्टफोन्स ठेवून झोपतात, ३४ टक्के लोक आठवडाभर अनवाणी चालू शकतील पण फोनपासून दूर राहू शकणार नाहीत, असं म्हणतात. तिथं निम्म्यापेक्षा जास्त लोक मोबाईल फोन कधीच बंद करत नाहीत. 

विष्णू शंकर, करण सिंग आणि महेंद्र कुमार या भारतातल्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’तल्या विद्यार्थ्यांनी ‘नोमोफोबिया’बद्दल १९३ विद्यार्थ्यांना प्रश्‍नावली सोडवायला दिली होती. त्यावरून भारतात १८ वर्षांपेक्षा वरच्या लोकांमध्ये पुरुषांपेक्षा (३८.४४ टक्के) स्त्रियांमध्ये (४४.७७ टक्के) ‘नोमोफोबिया’चं प्रमाण जास्त आहे. २६ ते ३५ वयोगटातल्या लोकांना इतर वयोगटातल्या लोकांपेक्षा जास्त प्रमाणात ‘नोमोफोबिया’ सतावतो असे निष्कर्ष त्यांनी काढले होते. 

‘नोमोफोबिया’वर काही उपचारही सुचवले जातात. त्यात दिवसभरात काही वेळ तरी स्मार्टफोन बंद ठेवावा आणि समोरच्या माणसांशी थेट बोलावे किंवा स्वतःशी संवाद साधावा; सोशल मीडियाचा वापर कमी करावा. त्यासाठी स्मार्टफोन्सवर जितकी ॲप्स जास्त तितकी नोटिफिकेशन्स जास्त येतात हे लक्षात घेऊन ॲप्स कमी करावे; तसंच फोनवर जितके जास्त फोटो असतील तितक्‍या त्याच्याशी जास्त भावना जोडलेल्या असतात. त्यामुळं स्मार्टफोन वारंवार तपासायची इच्छा होते. त्यामुळं स्मार्टफोनवर फोटो शक्‍यतो ठेवू नका; झोपताना फोन १५ फूट दूर ठेवा. तसं करताना अलार्म बंद करायला अंथरुणातून उठावं लागेल हे नक्की. पण ते करा; टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन अशा कोणत्याही स्क्रीनसमोर एक तास घालवला असेल तर तेवढाच वेळ कोणत्याही माणसाशी प्रत्यक्ष बोला; ‘नो स्क्रीन डे’ साजरा करा म्हणजेच कोणत्याही स्क्रीनशिवाय महिन्यातला एक दिवस घालवा असे काही उपाय ‘सेल्फ हेल्प’ पद्धतीत सुचवले जातात. पण स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी समुपदेशकाची मदत लागली तरी घ्यायला हवी. या थेरपीमध्ये सुरुवातीला फोन दुसऱ्या खोलीत ठेवून किती त्रास होत जातो याचा अंदाज घेतला जातो. प्रत्यक्ष उपचारांच्या वेळी स्मार्टफोन जवळ न ठेवण्याचा वेळ वाढवत नेला जातो. चीनमध्ये यावर उपचार म्हणून ‘डिजिटल डिटॉक्‍स कॅंपेन्स’ सुरू झाली आहेत. 

‘ॲपल’ आणि ‘ब्लॅकबेरी’ ही जेव्हा फक्त फळांची नावं होती, तेव्हा आयुष्य खूप आनंदाचं होतं, असं विनोदानं म्हटलं जात होतं ते आता वास्तव बनलं आहे.

संबंधित बातम्या