फॅंटम रिंगिंग सिंड्रोम 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 4 मार्च 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

अनेक दिवसांनी निवांत वेळ मिळालेला असतो. समोर अथांग समुद्र असतो.. आणि आकाशात ढगांचे विविध आकार असतात.. तुम्ही त्या ढगांकडं पाहात असताना त्यात तुम्हाला वेगवेगळे चेहरे दिसतात. कधी भेसूर, कधी मोहक, कधी ओळखीचे..! कोणत्यातरी वस्तूत असे चेहऱ्यांचे आकार दिसणं याला मानसशास्त्राच्या भाषेत ‘पॅरेडोलिया’ म्हटलं जातं. 

‘पॅरेडोलिया’ हा मनोविकार नव्हे. माणसाचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी त्याची गरज होती. उदाहरणार्थ, पारध करून जगणारा आदिमानव जंगलात झाडामागं उभा असताना समोरच्या गवतात जर खसपस झाली, तर कधीकधी समोर वाघ नसतानाही त्याला तिथं वाघाचा चेहरा दिसायचा. अशावेळी तो भास आहे की खरा वाघ तिथं उभा आहे यावर विचार करत बसण्यापेक्षा तिथून पळ काढणं महत्त्वाचं होतं. त्यामुळं नंतरच्या प्रगत मानवातही कोणत्यातरी विशिष्ट गोष्टींत चेहऱ्यांचे आकार दिसणं ही प्रवृत्ती कायम राहिली. ख्रिस्तोफर फ्रेंच या ‘ब्रिटिश सॉयकॉलॉजिकल सोसायटी’च्या सदस्यानं या विषयावर भरपूर संशोधन करून हा सिद्धांत मांडला आहे. 

‘पॅरेडोलिया’ हा दृश्‍य गोष्टींबाबत होणाऱ्या भासांशी संबंधित आहे. पण मानवी मेंदूला आवाजाचेही भास होऊ शकतात. उदाहरणार्थ, जिवलग व्यक्तीला यायला उशीर झाला तर बाहेर त्याची/तिची गाडी वाजली असे भास आपल्याला अनेकदा होतात. आपल्या खिशात किंवा पर्समध्ये मोबाईल असतो. तो सायलेंट मोडवर असला, तरी तो व्हायब्रेट झाला किंवा त्याची रिंग वाजली असे भास आपल्याला होतात. आपला मोबाईल फोन व्हायब्रेट होत नसताना तसा भास होणं याला ‘फॅंटम व्हायब्रेशन सिंड्रोम’ म्हटलं जातं. तसंच, फोन सायलेंट मोडवर असताना तो वाजल्याचा आभास होणं याला ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ म्हणतात. मोबाईल वाजतोय असं वाटून खिशात सतत हात घालणं, महत्त्वाचा मेसेज, ईमेल किंवा व्हॉटसॲप पोस्ट आली असेल असं मनाला सतत वाटणं आणि फोन व्हायब्रेट होतोय असे भास होणं ही ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ची महत्त्वाची लक्षणं आहेत. 

आपल्याकडचं तंत्रज्ञानावर आधारित उपकरण वाजत नसताना ते वाजतंय असे भास होणं हा प्रकार प्रथम ‘डिलबर्ट’ या जगभर गाजलेल्या कार्टूनचा ॲडम स्कॉट यानं आपल्या एका कार्टूनमधून मांडला. त्यानं १९९६ मध्ये आपल्या एका कार्टूनला ‘फॅंटम पेजर सिंड्रोम’ आहे, असा उल्लेख केला होता. तेव्हा जगात पेजर्सचं स्तोम माजलं होतं. ‘फॅंटम व्हायब्रेशन/रिंगिंग सिंड्रोम’चा उल्लेख मात्र २००३ मध्ये ‘न्यू पिट्‌सबर्ग कुरिअर’मध्ये रॉबर्ट टी जोन्स या स्तंभलेखकाच्या एका लेखात होता. ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’चा पहिला उल्लेख मायकेल जे ल्युईस या मेलबर्नमधल्या लेखकानं केला होता की जोन्सनं, यावर आज वाद आहेत. 

आज जगाची लोकसंख्या ७३० कोटींच्या आसपास आहे. त्यापैकी ५०० कोटी लोकांकडं मोबाईल फोन आहेत. मोबाईल फोन असलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ सतावतो. विशेषतः: एकूण तरुणांपैकी ९३ टक्के तरुणाईला हा सिंड्रोम भेडसावतो आहे. आपला सेलफोन वाजतोय का हे चेक करावं या विचारानं ते अभ्यास, खेळ, खाणं, वाचन यापैकी कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. 

यावर ‘आयडिसऑर्डर’ या लॅरी रोझेन हिच्या पुस्तकात एका गमतीदार प्रयोगाचा उल्लेख आहे. या प्रयोगात कॉलेजच्या १६३ विद्यार्थ्यांना एका मोठ्या खोलीत बोलावलं. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना त्यांच्याजवळची पुस्तकं, फोन इत्यादी वस्तू समोरच्या डेस्कवर ठेवायला सांगितल्या. मात्र त्यांना फोन समोर असला तरी वापरायची परवानगी नव्हती. इतरांना फोन आणि पुस्तकं दुसरीकडं नेऊन ठेवायला सांगितलं. त्यांनी फोन वापरायचा प्रश्‍नच नव्हता. 

यानंतर वीस मिनिटांचे तीन भाग पाडून या विद्यार्थ्यांमधली अस्वस्थता प्राध्यापकांनी मोजली. ज्यांना फोन जवळ बाळगायची परवानगी होती (पण फोन चेक करण्याची परवानगी नव्हती), त्यांच्यात पहिल्या वीस मिनिटांत अस्वस्थता किंचित वाढली. पण पुढच्या २०/२० मिनिटांमध्ये ते फार अस्वस्थ झाले नाहीत. पण ज्यांचे मोबाईल फोन्स त्यांच्याजवळ नव्हते त्यांच्या अस्वस्थतेत मात्र लक्षणीय फरक पडला होता. 

थोडक्‍यात, तुम्ही चष्मा घालत असाल तर जसा तो तुमचाच एक भाग बनतो. तसंच आज मोबाईल फोनचं झालं आहे. उदाहरणार्थ, मोबाईल पर्समध्ये आणि पर्स मांडीवर असताना किंवा मोबाईल शर्टच्या खिशात असताना जर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं तर दहा वर्षांपूर्वी आपण तिथं हातानं खाजवत होतो. पण आज जर तिथं हुळहुळल्यासारखं वाटलं तर आपला मोबाईल व्हायब्रेट होतोय आणि ती शारीरिक हुळहुळ नव्हे असं मेंदूला समजतं. तंत्रज्ञानामुळं मेंदू माहितीच्या प्रक्रियेत कसा बदल करतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. 

एखाद्याच्या मोबाईलवर दिवसभर फोन किंवा मेसेज येतच राहतात हे मेंदूला जसजसं कळत जातं तसतशी मेंदूतली रसायनं फोन वाजल्याचे संदेश देतात. शरीराचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाईलच्या आज्ञा (रिंग किंवा मेसेजचा टोन) पाळणं हे मेंदूचं सततचं काम होऊन बसतं. या चक्रात अडकल्यानंतर खरोखर आलेला फोन/मेसेज आणि तसा भास यात गोंधळ उडतो आणि ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ हा प्रकार सुरू होतो. 

‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ हा ‘आयजनरेशन’ला जास्त प्रमाणात जाणवतो. तंत्रज्ञानाचा जसा विकास होत गेला त्या दृष्टिकोनातून अमेरिकेतल्या पिढ्यांचं वर्गीकरण केलं, तर १९४६-१९६४ या दरम्यान जन्माला आलेल्या लोकांना ‘बेबी बूमर्स’, १९६५ ते १९७९ या दरम्यान जन्माला आलेली ‘जनरेशन एक्‍स’, १९८० च्या काळात जन्माला आलेल्या लोकांना ‘नेट जनरेशन’ आणि १९९० च्या काळात जन्माला आलेल्या लोकांना ‘आयजनरेशन’ असं म्हटलं जातं. 

या चारही पिढ्यांमधले लोक १५ मिनिटांत स्मार्टफोनवर सतत किती आणि काय तपासतात याचं एक सर्वेक्षण केलं. तेव्हा ‘आयजनरेशन’मधल्या तीन जणांपैकी दोघं सतत मेसेजेस चेक करत असतात आणि तीन जणांपैकी एकजण सतत सोशल मीडिया तपासत असतो असं आढळून आलं होतं. इतर पिढ्यांमधले लोक स्मार्टफोन्स तुलनेनं कमीवेळा तपासत होते. मोबाईल फोन जर वारंवार तपासता आला नाही, तर खूप अस्वस्थ होण्याचं प्रमाणही ‘आयजनरेशन’मध्ये जास्त आहे. 

‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ची कारणं संशोधकांना अजून पुरेशी माहिती नाहीत. पण आपल्या मोबाईल फोनवर पराकोटीचं प्रेम असणं हे एक कारण असू शकतं. त्यामुळं मोबाईल फोन वापरायला लागल्यानंतर एक महिना ते एक वर्ष या दरम्यान ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ जाणवायला लागतो. व्यक्तिमत्त्व, भोवतालची परिस्थिती आणि संदर्भ यानुसार ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ची तीव्रता बदलते.  कोणत्याही माणसांच्या नातेसंबंधांमध्ये त्यांना असुरक्षितता जाणवत असेल, तर ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’ जास्त प्रमाणात जाणवतो. अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असताना त्यातली एखादी गोष्ट आपण करू शकणार नाही याची आपल्याला सोशल मीडियाच्या जमान्यात सतत भीती वाटत असते. याला ‘फिअर ऑफ मिसिंग आउट-फोमो’ असं म्हटलं जातं. सोशल मीडियावरचा किंवा स्मार्टफोनवरचा एखादा मेसेज पाहणं निसटेल याची चक्क आपल्या मनात एक भीती (फोमो) असते. त्यामुळं फोमो हेही एक कारण ‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’च्या मागं आहे. 

अर्धा तास किंवा एक तास फोनपासून दूर राहणंसुद्धा कित्येकांना जमत नाही. ज्यांना तो तपासायची संधी मिळत नाही, त्यांच्यात नैराश्‍य किंवा उन्माद, अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर (समाजात न मिसळणं), नार्सिसिझम (स्वतःवर पराकोटीचं प्रेम असणं), पॅरानॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर (कमालीची संशयी वृत्ती) अशा मनोविकारांची लक्षणं जास्त प्रमाणात दिसतात. ‘ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह बिहेविअर’ म्हणजे सतत एखादी गोष्ट करणं. काही लोकांना दिवसातून शेकडो वेळा हात धुण्याची सवय असते. हाच प्रकार मोबाईल तपासण्याबाबतही घडतो. मोबाईल वारंवार तपासणाऱ्या प्रत्येकाला हे मनोविकार असतात असं अजिबात नाही. पण मोबाईलची सवय एका विशिष्ट मर्यादेपलीकडं गेली तर हे मनोविकार होण्यासाठीचं ते एक कारण ठरू शकतं. 

‘फॅंटम रिंगिंग सिंड्रोम’वर वेळीच उपचार करण्याची गरज असते. त्यासाठी व्हायब्रेटर मोडवर फोन ठेवणं बंद करणं हा पहिला उपाय आहे. एकच रिंगटोन दीर्घकाळ ठेवला तर तो विशिष्ट रिंगटोन ऐकायची मेंदूला सवय लागते. उदाहरणार्थ, जर सतार किंवा अरिजित सिंगचं गाणं असे रिंगटोन असतील, तर टीव्ही पाहतानाही अचानक तसंच काहीतरी ऐकू येतंय असं वाटू शकतं. त्यामुळं रिंगटोन अधूनमधून बदलत राहणं हा एक उपाय आहे. फोनवर तुम्ही जितका वेळ घालवता तो कमी करणं हा अजून एक उपाय. त्यासाठी प्रत्येक तासानंतर दहा मिनिटांनी बाहेर जाऊन चक्कर मारून या, १० मिनिटं ध्यान करा, हातापायांचे व्यायाम करा, संगीत ऐका, स्वतः गाणं म्हणा, दुसरी कोणतीतरी भाषा शिका, जोकचं पुस्तक वाचा, प्रत्यक्षात कोणाशीतरी बोला. ईमेल, मेसेज, सोशल मीडिया पाहण्याचा वेळ दर १५ मिनिटांनी असा ठरवून घ्या. इतरवेळी ते उपकरण बंद करा. 

झोपायला जाताना फोन बंद करा किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा. यामुळं झोप चांगली लागेल. शक्‍य असेल तेव्हा एअरप्लेन मोड वापरा. यामुळं व्हायब्रेशन्स किंवा फोनची रिंग ऐकू येणं थांबू शकेल. घरातलं वायफाय, नेटवर्क ॲडाप्टर्स सगळंच काही काळ बंद करा. सेल फोनचे टॉवर्स, वायरलेस नेटवर्क यामुळं आपण सतत इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्सना तोंड देत असतो. मेंदूचा ट्यूमर आणि इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्सचा संबंध असू शकतो हे आता संशोधनानं सिद्ध झालं आहे. या सगळ्याचा फायदा म्हणजे मोबाईल फोनमधून निघणारे इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स तुमच्या शरीरावर परिणाम करण्याचं प्रमाण कमी होईल. 

गाडी चालवताना मोबाईल फोन दूर ठेवा. फोन प्रत्यक्ष वाजत असताना तुमचं लक्ष संभाषणावर जाऊन अपघात होऊ शकतोच. पण एखाद्या महत्त्वाच्या वळणावर ‘फॅंटम रिंगिंग’चा भास झाला तरी गाडी चालवण्यातलं लक्ष विचलित होऊ शकतं. मोबाईलचं व्यसन फार वाढतंय असं वाटलं तर दारूचं व्यसन सोडवताना ‘अल्कोहोलिक ॲनॉनिमस’मधले लोक जसे एकमेकांना भेटून व्यसन कमी करण्याचा प्रयत्न करतात तसं मोबाईलचं व्यसन सोडवणारा मित्र/मैत्रीण गाठा. हे व्यसन असलेले अनेकजण असतात. सर्वजण मिळून यावर चर्चा करून व्यसन सोडवू शकतात. 

अखेरीस, वजन कमी करण्यासाठी जसे उपास करता तसं डिजिटल डाएट किंवा आठवड्यातून एक दिवस ‘नो स्क्रीन डे’ साजरा करा. या काळात स्मार्टफोन जवळ नसेल तर तुम्ही सुरुवातीला पॅनिक होऊ शकाल. पण एक पूर्ण दिवस ते एक पूर्ण आठवडा मोबाईलवाचून काढायची हळूहळू सवय करा. स्मार्टफोन म्हणजे आयुष्य नव्हे, हे तेव्हा लक्षात येऊन तुम्ही खऱ्या आनंदात राहाल.

संबंधित बातम्या