समाजमाध्यमांमुळं नार्सिसिझम

नीलांबरी जोशी 
सोमवार, 18 मार्च 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चेहऱ्यांमुळं देखणा चेहरा, उन्मादक ओठ आणि सरळ - चमकदार केस याबद्दल प्रत्येक प्रेक्षकाला आकर्षण वाटायला लागतं. आपणही २४ तास तसंच देखणं दिसावं, असं जवळपास प्रत्येकाला वाटत असतं. या मोहापायी १९८० आणि १९९० च्या दशकात चित्रपटातल्या सेलिब्रिटीजसारखं दिसण्यासाठी त्यांचे चाहते प्लॅस्टिक सर्जरी करून घ्यायचे. २००० च्या दशकात चित्रपटांइतकंच टीव्हीवरच्या सेलिब्रिटीजना महत्त्व आलं. परिणामी, प्लॅस्टिक सर्जरीचं प्रमाण वाढलं. सोशल मीडियाच्या जमान्यात प्लॅस्टिक सर्जरी आणि तत्सम प्रक्रिया करून घेण्यासाठीचे आदर्श मात्र फक्त सेलिब्रिटीज उरले नाहीत. त्यात एका गोष्टीची भर पडली, ती म्हणजे - सेल्फी! 

आज निरनिराळ्या सामाजिक माध्यमांसाठी दररोज ९.३ कोटी सेल्फी काढल्या जातात. एकट्या इन्स्टाग्रामवरच १० सेकंदाला १००० सेल्फीज पोस्ट होतात. सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या सेल्फी तयार करण्यासाठी फक्त इन्स्टाग्रामवर साधारण १५ प्रकारचे फेस फिल्टर्स उपलब्ध आहेत. पण सोशल मीडियावर तो सुंदर सेल्फी पोस्ट करून सगळ्यांना समाधान लाभत नाही. त्या सेल्फीप्रमाणं आपण प्रत्यक्षात सुंदर (!) दिसावं, यासाठी मग कॉस्मेटिक सर्जनशी संपर्क साधला जातो. २०१० मध्ये कॉस्मेटिक प्रक्रिया करून घेणाऱ्यांचं प्रमाण एक कोटीच्या आसपास होतं. २०१८ मध्ये वीस कोटी लोकांनी कॉस्मेटिक प्रक्रिया करून घेतल्या. त्यापैकी ८६.४ टक्के स्त्रिया होत्या, असा ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर एस्थेटिक प्लॅस्टिक सर्जरी’चा (ISAPS) अहवाल सांगतो. 

या कॉस्मेटिक प्रक्रियांप्रमाणंच सामाजिक माध्यमांमुळं अजून एक प्रकार वाढीला लागतो तो म्हणजे ‘नार्सिसिझम!’ ‘नार्सिसिझम’ हे प्रकरण काय आहे? तर एका ग्रीक पुराणकथेनुसार, नार्सिसस हा ग्रीक राजपुत्र तळ्यात दिसणाऱ्या स्वतःच्या देखण्या प्रतिबिंबाच्या प्रेमात पडला. ती प्रतिमा बघण्यात तल्लीन होऊन त्याला जगाचा विसर पडलाच; पण देहभान हरपल्यानं तो चक्क मरण पावला. त्यानंतर स्वतःवर प्रचंड प्रेम करण्याच्या वृत्तीला ‘नार्सिसिझम’ हे नाव पडलं. स्वतःबद्दलची भ्रामक आणि प्रचंड फुगवलेली प्रतिमा मनात बाळगणं, आपण साध्य केलेल्या गोष्टी आणि आपल्यातल्या क्षमता प्रमाणाबाहेर वाढवून सांगणं, आपण कोणीतरी महत्त्वाचे किंवा सेलिब्रिटी आहोत असं वाटणं, इतरांबद्दल तुच्छता असणं, इतरांच्या भावनांबद्दल काडीचं देणंघेणं नसणं, इतरांची किंचितही काळजी न वाटणं ही सगळी ‘नार्सिसिझम’ची लक्षणं आहेत. 

आपण खूप कोणीतरी विशेष आहोत, आपली सतत कुणी तरी स्तुती करावी, आपल्याला कायम मान द्यावा असं या वृत्तीच्या लोकांना वाटत असतं. जरा कोणी आपल्याविरुद्ध बोललं तर तो माणूस आपला मत्सर करतो असं समजून ‘नार्सिसिस्ट्‌स’ भांडायलाच उठतात. त्यांना टीका सहनच होत नाही. आपण जसा विचार करतो त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन अस्तित्वात असू शकतो, हे त्यांना मान्यच नसतं. 

जवळपास प्रत्येक क्षेत्रात अशी स्वप्रतिमेच्या प्रचंड प्रेमात असणारी माणसं दिसतात. असा माणूस बहिर्मुख स्वभावाचा, इतरांवर छाप पाडणारा असतो. कोणाशीही ते नातं चटकन जोडतात. ‘नार्सिसिस्टिक’ व्यक्ती प्रथम भेटीत खूप आकर्षक भासतात. त्या लगेच आवडायला लागतात. आपल्या प्रभावानं समोरच्याला दीपवून टाकणाऱ्या ‘नार्सिसिस्टिक’ माणसांचा ‘नार्सिसिझम’ नातेसंबंधांमध्ये सुरुवातीला खपून जातो. व्यक्तींच्या हृदयाला हात घालणं त्यांना सहजी जमतं. ‘नार्सिसिस्टिक’ माणसांचा एक कटाक्ष, एक संभाषण यासाठी सुरुवातीला भोवतालची माणसं आतुर असतात. त्यांच्यावर निरतिशय प्रेम करतात. 

पण नातं जपण्याच्या बाबतीत ‘नार्सिसिस्ट्‌स’ व्यक्ती उथळ असतात. जोडीदाराशी ते भावनिक नातं जोडू शकत नाहीत. जवळच्या माणसांच्या भावना एकदा लक्षात आल्यानंतर ते जिवलग माणसांना दुखावत राहतात. त्यांचा पाणउतारा करतात. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी दुसऱ्यांचा वापर करतात. त्यामुळं त्यांचे कोणाशीच दीर्घकाळ चांगले संबंध राहात नाहीत. यामुळंच नार्सिसिस्टिक व्यक्ती सतत नवनवीन नात्यांच्या शोधात असते. उथळ नात्यांमध्ये ते जास्त रमतात. रोमॅंटिक, गहिरं नातं जपणारा प्रेमिक/जोडीदार, जिवश्‍चकंठश्‍च मित्र, सहकाऱ्याच्या सुखदुःखात सामील होणारा लीडर या भूमिकांमध्ये नार्सिसिस्टिक व्यक्ती असू शकतच नाहीत. ताणतणावांचा आणि घडणाऱ्या बदलांचा सामना करण्यात ते असमर्थ असतात आणि त्यांना आतून सतत असुरक्षित वाटत असतं. आपल्याला काही मानसिक समस्या आहे, हे त्यांना मान्यच नसल्यामुळं हा प्रकार बरा होत नाही. वृद्धापकाळी ते एकाकी होतात.

अर्थात, ‘नार्सिसिझम’ ही प्रवृत्ती आणि ‘नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर-एनपीडी’ हा मनोविकार यात अंतर असतं. थोडाफार ‘नार्सिसिझम’ असलेल्या लोकांच्या तुलनेत ‘एनपीडी’ असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी आणि जोडीदाराबाबत पुष्कळ समस्या असतात. आपण आहोत त्यापेक्षा खूप भव्यदिव्य आहोत, असं सततचं स्वप्नरंजन करणं आणि यश, सत्ता, पैसा, हुशारी, सौंदर्य किंवा प्रेम याबाबतीत सर्वोत्कृष्ट असेल त्यावर आपला अधिकार आहे, असं वाटणं ही ‘एनपीडी’ची दोन महत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत. 

‘एनपीडी’चं उत्तम उदाहरण डॉ. काशिनाथ घाणेकर या व्यक्तिमत्त्वात दिसतं. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या नुकत्याच गाजलेल्या बायोपिकमधले काही प्रसंग त्याची साक्ष पटवतात. उदाहरणार्थ, ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातली ‘लाल्या’ची भूमिका प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवून गेली. पण काही काळानंतर त्या नाटकातल्या ‘उसमें क्‍या है?’ या गाजलेल्या डॉयलॉगवर टाळ्या पडत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर डॉ. घाणेकर प्रचंड सैरभैर होतात. ते इतरांना तुच्छ लेखत असतात. ‘स्टार आहे आणि विजेचं बिल भरणं वगैरे कामं आपल्यासाठी नाहीत’ असं त्यांना सहज वाटत असतं. गर्दी, जाऊ तिथं कौतुक, प्रेक्षकांची दाद हेच त्यांचं आयुष्य होऊन बसलेलं असतं. मग एका नाटकात एका व्यक्तिरेखेला खूप मेकअप असतो. तेव्हा नाटक संपल्यावर मेकअप उतरवून बाहेर जाईपर्यंत प्रेक्षक थांबू शकत नाहीत आणि आपल्याला आपलं कौतुक ऐकायला मिळणार नाही, म्हणून ते नाटकच डॉ. घाणेकर सोडतात. आपण ज्या प्रकारच्या नाटकांमध्ये लोकप्रियता मिळवली त्या नाटकांचं स्वरूप बदलतंय हे त्यांना मान्यच होत नाही. सर्व समकालीन अभिनेत्यांना आपला हेवा वाटत असेल आणि त्यामुळं आपल्याला भूमिका मिळत नाहीत असं त्यांना वाटतं. एकदा रस्त्यावरच्या टपरीवर चहा घेताना आपल्याला कोणी ओळखत नाही याचं त्यांना पराकोटीचं वैषम्य वाटतं. 

इतकंच नाही, तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या बायकोला-इरावतीला आपल्याबद्दल काय वाटत असेल हे त्यांच्या खिजगणतीतही नसतं. सोबतचे नाटककार, सहकलाकार अशी कोणतीच नाती ते टिकवू शकत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, आपलं काही चुकतंय याची आंतरिक जाणीव नसल्यामुळं आपल्या प्रतिमेच्या मोहात पडून ते अखेरीस एकाकी मरण पावतात. नार्सिसिस्टिक माणसांचा असा अंत ठरलेलाच असतो. 

डॉ. घाणेकर यांच्या काळात सोशल मीडिया नव्हता. पण त्या काळातही नार्सिसिस्टिक व्यक्ती आणि नार्सिसिझम अस्तित्वात होतं, याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण त्या काळात समाजात ‘नार्सिसिझम’चं प्रमाण साधारण ३० टक्केच होतं. आज आयजनरेशन (इंटरनेट जनरेशन) आल्यानंतर सामाजिक माध्यमांचे फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्‍डइन, व्हाइन, रेडिट, युट्यूब असे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले. आजच्या जमान्यात ‘नार्सिसिझम’चं प्रमाण ७० टक्के झालं आहे. सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढल्यावर ‘नार्सिसिझम’च्या लक्षणांचं प्रमाण केवळ चार महिन्यांत २५ टक्‍क्‍यांनी वाढतं, असं सर्वेक्षणांमध्येही दिसून आलं आहे.

याची कारणं कुठं लपली आहेत? तर सामाजिक माध्यमांवर विशेषतः फेसबुकवर दररोज आदर्श आणि परिपूर्ण चेहरे असलेल्या लोकांच्या; वाढदिवस/मॅरेज ॲनिव्हर्सरीजच्या दिवशी एकमेकांचं कौतुक करून आदर्श नातेसंबंध जोपासणाऱ्या लोकांच्या; उत्तम मार्क, खेळात आणि गायन/वादनात प्रावीण्य मिळवणाऱ्या आदर्श मुलं असलेल्या लोकांच्या; देखणं घर, आदर्श बगीचा, उत्तम गाडी असं सगळं जमवणाऱ्या लोकांच्या; साहित्य, संगीत यांच्या अभिरुचीसंपन्न आवडीनिवडी जपणाऱ्या लोकांच्या पोस्ट्‌स सतत पडत असतात. दीडशे कोटी लोक फेसबुकवर रोज लॉगइन होतात आणि पोस्ट्‌स टाकतात. दर मिनिटाला फेसबुकवर ५,१०,००० कॉमेंट्‌स, २,९३,००० स्टेटस अपडेट्‌स आणि १,३६,००० फोटोग्राफ्स अपलोड होतात. हे सगळे सुंदर फोटो, लाइक्‍स आणि ‘व्वा’, ‘छान’, ‘सुरेख’ अशा कॉमेंट्‌स हे वास्तवातलं जग नसलं, तरी या पोस्ट्‌सना सगळेजण भुलतात. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर असं सगळं आदर्शवत आणि परिपूर्ण भासावं यासाठी मग प्रत्येकजण स्वतःबद्दल काहीतरी चमकदार मजकूर/फोटो तयार करतो. तो फेसबुकवर टाकतो. स्वतःची भ्रामक प्रतिमा उंचावणं, भरपूर पैसे, यश, सत्ता, झटपट प्रसिद्धी मिळवणं याचा सगळेजण ध्यास घेतात. मी/माझं याला पराकोटीचं महत्त्व येतं आणि ‘नार्सिसिझम’ वाढत जातो. 

फेसबुकवर पोस्ट टाकल्यावर लाइक/कॉमेंटचं प्रमाण जर कमी झालं, तर आपल्याला हवी तितकी प्रसिद्धी मिळत नाही. यामुळं असंख्य लोक बेचैन होतात. त्यातून दुसऱ्यांच्या कोणत्याही पोस्टला लाइक करणं किंवा त्यावर कॉमेंट करणं हे प्रकार सुरू होतात. ज्यांच्या पोस्ट्‌सना लाइक केलं असेल, ते मग आपल्या पोस्टला लाइक करतात. अशा रीतीनं ‘तू मला चांगलं म्हण, मी तुला चांगलं म्हणतो’ असे गट फेसबुकवर तयार होतात. स्पष्ट आणि खरं मत देणारे बाजूला पडतात. या अशा गटांचे दोन तोटे म्हणजे, एक तर आपण सगळेचजण कसे आपापल्या क्षेत्रात ग्रेट आहोत असं त्या गटातल्या सगळ्यांनाच वाटतं. दुसरा तोटा म्हणजे, मी दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे असंही प्रत्येकाला आतून वाटू शकतं. वैयक्तिक पातळीवर वाढलेला ‘नार्सिसिझम’ त्या गटात पसरतो. वास्तवाचं भान सुटून ‘नार्सिसिझम’च्या विळख्यात जाणं सुरू होतं. अशा ‘नार्सिसिस्टिक’ लोकांनी एकत्र येऊन लिहिलेल्या पोस्ट्‌समुळं फेसबुकवर आणि समाजात तीच संस्कृती तयार होते. 

फेसबुकच्या अनेक सर्वेक्षणांमध्ये ‘नार्सिसिस्टिक’ माणसांची मित्रयादी सहसा जास्त असते; स्वतःचे फोटो सतत टाकणं, जवळपास सर्वच पोस्ट्‌समध्ये मी, माझा असा उल्लेख करणं हा प्रकार ते सर्वांत जास्त करत असतात, असं दिसून आलं आहे. उदाहरणार्थ, आपण पाहिलेल्या चित्रपटाबद्दल पोस्ट लिहिताना एखाद्या व्यक्तीनं तो चित्रपट कसा होता यापेक्षा थिएटरपर्यंत कसे पोचलो, तिथं काय खाल्लं, कोणते कपडे घातले होते, चित्रपटगृहात कोण भेटलं असे उल्लेख केले असतील; तर ती माणसं ‘नार्सिसिस्टिक’ आहेत असं खुशाल समजावं. दररोज सामाजिक माध्यमांवर कसं चमकायचं हा विचार अशा लोकांचा मेंदू कुरतडत असतो. साहजिकच त्यांच्या बाबतीत आयुष्याचा हेतू काय? आपल्या अस्तित्वाचा अर्थ काय वगैरे फडतूस (!!!) प्रश्‍न मागं पडत जातात, यात नवल नाही.

संबंधित बातम्या