“कसं गेलं ना २०२०?”

डॉ. संज्योत देशपांडे
सोमवार, 18 जानेवारी 2021

माइण्ड रि-माइण्ड

नविन वर्ष जसं सुरू झालं तसा अनेकांच्या मनात हा प्रश्न डोकावलाच. काहींनी तो बोलून दाखवला आणि काही जणांच्या मनात तो रेंगाळत राहिला. आपल्याला सर्वांनाच केव्हा ना केव्हा आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर किंवा वाढदिवसांना किंवा नविन वर्षाच्या सुरुवातीला असं मागे वळून पहावसं वाटत असतं. मनातल्या मनात एक लेखाजोखा मांडावासा वाटतो. आपण काय कमावलं काय गमावलं हे समजून घ्यावसं वाटतं. आपण कुठे होतो आणि कुठे पोहोचलो हे बघावसं वाटतं. कोरोनामुळे या २०२०ने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर एक वेगळा ठसा उमटवला. त्यामुळे या वर्षी तर हा प्रश्न अनेक जणांच्या मनात डोकावला. हे २०२० साल आपल्या सर्वांसाठीच वेगळा अनुभव देणारं ठरलं. कोरोनाचं आगमन झालं आणि यापूर्वी कधीही न अनुभवलेली अभूतपूर्व टाळेबंदी आपण सर्वांनी अनुभवली. आपलं सर्वांचं जगणं पूर्णतः बदलून गेलं. आपलं वेगवान आयुष्य क्षणार्धात  emergency break लागल्यासारखं जागच्या जागी थांबलं. ‘गती’ या शब्दाचा आपल्या आयुष्याशी जगण्याशी असणारा संदर्भच जणू काही पुसला गेला. कालांतराने तो बदलत गेला. “टाळेबंदीच्या आधी आणि टाळेबंदी नंतर” असं आपल्या जगण्याला काळाचं वेगळं परिमाण मिळालं.

ध्यानीमनी नसताना आयुष्य खरंच इतकं बदलून जाऊ शकतं का? अजूनही विश्वास बसत नसला तरीही या प्रश्नाचं उत्तर, ‘हो’ असंच आहे. आपलं आयुष्य बदलत चाललं आहे. यातले काही बदल ठळकपणे दिसणारे आहेत, पण काही अस्पष्टसे, न दिसणारे...  
-रूपाली ३५ वर्षांची आहे आणि तिला चार वर्षाची गोड मुलगी आहे. ती, तिचा नवरा आणि मुलगी कामानिमित्त एका शहरात राहतात. त्यांच्या मूळ गावापासून लांब..  त्यामुळे त्यांच्या सारखे मित्र मैत्रिणी एकमेकांना जोडून राहतात. “इतके दिवस घरात अगदी डांबून टाकल्यासारखं झालं, पण आता आम्ही मित्रमैत्रिणी थोडे जण भेटतो आहोत. माझ्या सर्व मित्रमैत्रिणीच्या सगळ्यांच्याच घरात लहान मुलं म्हणून आम्ही फार कुठे जात नव्हतो एकामेकांकडे. पण आता जातोय. पण या टाळेबंदी नंतर एक खूप विचित्र गोष्ट झाली आहे. आम्ही भेटतो, भेटावसंही वाटतच आम्हाला..  पण आमच्याकडे बोलायला काही विषयच नाहीत. बोलता बोलता विषयच संपल्यासारखे वाटतात. काही घडलंच नाही गेल्या काही दिवसात.. उगीचच एक गॅप आहे असं वाटतं..  मग उगाच शांतता होते. पण खरंच असं वाटतं की देअर इज नथिंग टू टॉक अबाऊट.”

-सागर ४० वर्षाचा आहे. “कसलीतरी अस्वस्थता वाटत राहते हल्ली, पण कसली ते समजत नाही.. पण काहीतरी मिसिंग वाटतं....पण काय तेच  समजत  
नाही.” सागर त्याच्या व्यवसायाबाबत, कामाबाबत बरंच काही बोलत राहिला. कामाच्याही ठिकाणी त्याला येत असलेल्या अडचणी आणि गेल्या काही दिवसात बदलत गेलेली कामाची पद्धत .. असे बरेच प्रश्न.. पण कसलीतरी एक अस्वस्थता त्याच्या मनात सातत्याने रेंगाळत राहते आहे असं त्याला वाटत होतं. “कसली अस्वस्थता आहे ही?” 

-बारावीत शिकणाऱ्या रितेशलाही सागर सारखेच प्रश्न आहेत. “मित्र भेटत नाहीत, सतत ऑनलाइन क्लासेस.. बाहेर जाता येत नाही.. शिक्षकांना शंका विचारायला अडचणी येतात...” रीतेशलाही बरेच प्रश्न आणि एक प्रकारचा डिसकम्फर्ट जाणवत होता...  सांगता येणार नाही अशी कसलीतरी हुरहूर वाटत होती. 

रूपाली, सागर रितेश सारखंच आपल्यापैकीही  अनेकांना वाटत असतं. कसलीतरी अनामिक हुरहूर.. न सांगता येणारी अस्वस्थता. कारण पूर्वीसारखं “नॉर्मल” आपल्याला राहता येत नाहीये.. काहीतरी निसटल्या सारखं वाटत राहतंय..

जवळच्या माणसांच्या आनंदाच्या प्रसंगाला जाता येत नाही ...दु:खद प्रसंगांना उपस्थित राहता येत नाही.. साधं कुणाला भेटायला जाता येत नाही...सगळं जगणंच बदलून गेला आहे.. समजतंय पण अस्वस्थ वाटत राहातच...

पण काय होतंय नेमकं आता? कशामुळे अस्वस्थ वाटतंय आपल्याला? आत्तापर्यंत या जगात कितीतरी गोष्टी आपण अगदी निःशंकपणे गृहीत धरलेल्या होत्या. अशा कितीतरी गृहीतकांनी आपल्या मनाभोवती सुरक्षिततेची चौकट तयार केलेली होती. या गृहीतकांवर आधारित आपण आपलं आयुष्य उभं केलेलं होतं आजवर...तुम्ही कधी विचार केलाय असा की अशी काय गृहीतकं होती.. अशा कोणत्या धारणा होत्या माझ्या ज्यावर मी माझं जगणं उभारलेलं होता.. आपल्या नकळतपणे आपल्या आयुष्यात अशी अनेक गृहीतकं असतात..  

उदाहरणार्थ... देवाच्या घरात न्याय असतो. आमचं आयुष्य एकदम सेट आहे आता, आता असंच चालू राहील शेवटपर्यत. वैद्यकीय शास्त्र इतकं प्रगत आहे की साथीच्या आजारापासून आपण मुक्त आहोत. (कोरोनाच्या आधीच्या काळात खूप जणांना ठामपणे वाटत होतं असं!) आपण लावलेल्या व्यवस्था कधीच कोलमडणार नाहीत. मी सर्वांशी चांगलं वागते/तो त्यामुळे माझ्याबाबतीत वाईट काही होणार नाही. 

कोरोना आपल्या आयुष्यात येण्याआधी आपल्या आयुष्यात अशी अनेक गृहीतकं होतीच. ती नकळतपणे आपल्या सोबत असतातच- तो एका अर्थी आपल्या जगण्याचा पाया असतो. खरंतर अशी गृहीतकं चुकीची असतात का? नाही.. पण हा ‘गृहीतकं’ आहेत आणि गृहीतकाबरोबरच वेगळं काही घडू शकतं, हे मनाच्या पातळीवर माहिती असलं तरी ती शक्यता आपल्या मनाने स्वीकारलेली नसते. कारण अशा धारणांसोबत, गृहीतकांसोबत जगताना आपल्याला सुरक्षित वाटत असतं. या गृहीतकांनी आपल्या भोवती सुरक्षिततेची एक चौकट तयार केलेली असते.

या गृहीतकांचा आवर्जून असा विचार आपण केलेला नसतो. त्यांना कोणतेही प्रतिप्रश्न विचारलेले नसतात, ना त्यांची काही उलटतपासणी केलेली असते. कारण असं करण्याचं कोणतंच कारण आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात घडलेलं नसतं. 

कोविड-१९ने आपल्याला आपल्याही आयुष्यात अशी काही गृहीतकं होती याची जाणीव करून दिली. आपलं आयुष्य बदलून टाकण्याऱ्या अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला स्वतःत डोकावून पहावंच लागतं. आपल्या धारणा, गृहीतकं, क्षमता या सर्वांचा नव्याने विचार करावा लागतो. 

कोविड-१९ च्या आधी आपण सर्वांनीच या जगाला, या जगाच्या वेगाला, आपल्याला मिळणाऱ्या सुविधांना, आपल्या उपजीविकेच्या साधनांना अगदी आपल्या जगण्याला सुध्दा गृहीत धरलेलं होतं. 

‘कधीही काहीही घडू शकतं. हे माहिती होतं तरीही!’ 

या अर्थाने कोविड- १९च्या आधी या गृहीतकांवर आधारलेल्या एका ‘सुरक्षित’ जगात आपण जगत होतो. पण कोविड-१९ने आपलं सगळं जगणं बदलून टाकलं आणि आपण एका अनोळखी जगात प्रवेश केला. आपल्या सर्वांनाच खरंतर ही सारी अस्वस्थता या कारणाने आली आहे कारण कोविड-१९ मुळे आपल्या आजवरच्या असलेल्या अनेक गृहीतकांना तडा गेला आणि आपली सुरक्षिततेची चौकट हलली, डळमळीत झाली. जगण्याच्या ज्या पायावर आपण उभे होतो तो पाया हलला. त्यामुळे या नवीन जगात नव्या जगाची ओळख करून घेताना या गृहीतकांची पुनर्बांधणी करणं, आपल्या धारणा तपासून बघणं गरजेचं होऊन बसलं आहे. त्यामुळेच बऱ्याच जणांना चाचपडल्यासारखंही होत आहे. कारण आधी ज्या गृहीतकांवर, धारणांवर आपण अवलंबून होतो ती आपल्या जवळ नाहीत.. मग जगण्याचे संदर्भ समजेनासे होतात. रूपाली, सागर आणि रितेश ही झाली प्रातिनिधिक उदाहरणं... आपल्या सगळ्या जगण्यात असे दिसणारे ठळक आणि काही न दिसणारे सूक्ष्मसे बदल झाले आहेत.या बदलाचे आपल्या सर्वांच्या वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्यावर परिणाम झाले आहेत..पण आपण हे वर दिसणारे ठळक परिणाम सांगू शकतो..पण मनात खोलवर नेमके बदल समजायला कठीण जातात. 

आपलं जगणं बदलत चाललं आहे...

जेव्हा कोणत्याही गोष्टीत बदल होतात तेव्हा आधीची स्थिती जशीच्या तशी राहत नाही.  कोविड-१९ने जे काही बदल झालं यात बदलांसोबत आपण आपलं आधीचं जग हरवून बसलो, बऱ्याच गोष्टी गमावून बसलो. गमावून बसणं, हरवून जाणं कोणताही लॉस अनुभवणं हे आपण नेहमीच मृत्यू या संकल्पनेशी जोडत असतो. 

पण काही काही लॉसेस न दिसणारे असतात. कोविड-१९च्या या परिस्थितीमुळे आपल्या आयुष्यात जो बदल झाला त्यात अशा न दिसणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपण गमावून बसलो आहोत . 

काय काय गमावलं आपण या काळात? 

 • दिनक्रम 
 • आपलं स्वातंत्र 
 • आपली सुरक्षितता 
 • करमणूक 
 • आपलं सामाजिक आयुष्य 
 • कामाची जागा 
 • आपल्या भूमिका 
 • आयुष्यावरचं नियंत्रण 
 • काहीजणांसाठी त्यांची स्वप्न/ भविष्य
 • मनाची स्वस्थता
 • कामाच्या ठिकाणी रोज भेटणारी माणसं 
 • अनेक ठरवलेल्या गोष्टी, घटना, (एखादी सहल, वाढदिवस इत्यादी) 
 • संवाद 
 • सहवास 
 • नॉर्मल वाटणं  

कोविड-१९ मुळे आत्तापर्यंत ज्या वास्तवाला धरून आपण जगत होतो, जे संदर्भ गृहीत धरून वाटचाल करत होतो तेच आता दिसेनासे झाले आहेत, पुसले गेले आहेत. अशा परिस्थितीत वातावरणात आणि मनात एक प्रकारची संदिग्धता निर्माण होते. आपण काय गमावून बसलो आहोत आणि खरच गमावून बसलो आहोत का?

ही अस्पष्टता, धूसरता किंवा लॉसशी निगडित असणारी संदिग्धता यामुळे परिस्थितीचं नेमकं आकलन होत नाही. अशावेळी परिस्थिती अवघड वाटायला लागते. मग जे काही घडतंय ते समजून घेण्याचा, त्याचा अर्थबोध करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो कारण ती आपल्या मनाची गरज असते. 

सर्वसाधारणपणे आपण काही गमावून बसतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या भावना जाणवतात, वाईट वाटतं, एकटं वाटतं, रडायला येतं.... असं बरंच काही होतं. पण आता आपण जे काही गमावून बसलो आहोत याची स्पष्टताच मनात नसल्याने मनाचा गोंधळ उडाल्यासारखा वाटतं. म्हणून अशा परिस्थितीला सामोरं जाताना काय करायला हवं?

- आपण काय गमावून बसलो आहोत याची नोंद घ्यायला हवी. 
आणि - त्याबद्दल आपल्याला जे काही वाटतंय तसं वाटण्याची मुभाही द्यायला हवी. शक्य असेल तर त्या भावनांना नाव देता आलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. 
उदाहरणार्थ 
-माझा दिनक्रम विस्कळित झाल्यामुळे माझी चिडचिड होत आहे.
-माझे मित्र भेटत नाहीत त्यामुळे वाईट वाटत आहे. 

आपण या भावना अनुभवण्याची मुभा स्वतःला देतो तेव्हा काय घडतंय याचं आकलन व्हायला मदत होते. 

 • आपल्या भावना व्यक्त करा. (कुणाशीतरी बोलून, डायरी लिहून)
 • आपल्याला सुरक्षित वाटणारं जग इतकं नाजूक होतं ही या सगळ्यांमध्ये स्वीकारायला, पचवायला अवघड वाटणारी गोष्ट. म्हणून अशा परिस्थितीमध्ये सुरक्षितता देणाऱ्या कोणत्या गोष्टी आपल्याकडे आहेत याची नोंद घ्यायला हवी.
 • आपल्या क्षमता, आपल्याला आधार देणारी माणसं, आपली कौशल्यं..
 • आपण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने विचार करत होतो, ज्या धारणांवर आपण जगत होतो, जी आपल्या जगण्यातली गृहीतकं होती, ज्या पद्धतीने भावना हाताळत होतो त्याचा निश्चित विचार करायला हवा व त्यात योग्य ते बदलही करायला हवेत. दृष्टिकोनातला बदल इथे महत्त्वाचा आहे. 
 • पूर्वीचं जग आता आपल्यासोबत नाही याचं दुःख होणं स्वाभाविक आहे पण या नविन जगाची ओळख करून घेताना या जगासोबत आपल्याला सुरक्षिततेचं नातं निर्माण करायचं आहे याचं भान सातत्याने जागं ठेवायला हवं.
 • आपण आत्तापर्यंत काय चुका केल्या (मग त्या नात्यांमध्ये असतील, वैयक्तिक, व्यावसायिक कोणत्याही प्रकारच्या असतील) त्या चुका दुरुस्त करता येतील का याचाही विचार करायला हवा. 
 • आपण या जगाला काय देऊ शकतो आणि हे जग आपल्याला काय देऊ करत आहे याची सांगड घालण्याचा प्रयत्न करायला हवा. 

या साथीच्या आजारा आधीचं जग आपल्या परिचयाचं होतं. त्याच जगात राहण्याची आपल्याला सवय होती. त्याच्या आठवणी मनात राहणारचं पण आता त्याला पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तरच नव्या जगात नव्याने आपली मानसिक ऊर्जा गुंतवायला आपली तयारी होऊ शकेल

संबंधित बातम्या