ॲड्जस्टमेंट

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 1 मार्च 2021

माइण्ड रि- माइण्ड

कोरोनाची लाट आली आणि क्षणार्धात त्या लाटेने आपल्या वेगवान जगण्याला एक ब्रेक लावला. आपण अक्षरशः एका जागी स्तब्ध झालो. क्षणभर भांबावल्यासारखं झालं पण नंतर प्रत्येकाने आपापल्या परीने मार्ग शोधायला सुरुवात केली. अचानक खूप सारे बदल झाले, वर्क फ्रॉम होम सुरू झालं. घरातल्या आबालवृद्धांना चोवीस तास एकमेकांच्या सोबत रहावं लागलं. आपल्या जगण्यावर अनेक निर्बंध आले. हात धुणे, मास्क, अंतर अशा अनेक सवयी आत्मसात करणं अनिवार्य झालं. असं बरंच काही..... अचानक झालेल्या या बदलांबरोबर काहींनी लगेच जुळवून घेतलं; काहीजणांना थोडा वेळ लागला, तर काही जणांना जरा जास्तच झगडावं लागलं.. हे असं का झालं?

कोरोनाशी झगडताना आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. या काळातून जाताना अनेक मानसशास्त्रीय संज्ञा- संकल्पनांची ओळख आपल्याला या अनुभवातून झाली. 
ॲड्जस्टमेंट, परिस्थितीशी जुळवून घेणं, ही त्यातली एक महत्त्वाची गोष्ट! हा आपल्या सर्वांच्याच जगण्यातला महत्त्वाचा शब्द! आपली बऱ्याचदा अगदी पावलापावलाला या शब्दाची गाठ पडतच असते. 

 • लग्नानंतर ॲड्जस्ट करावंच लागतं. (हे वाक्य तर किती सुपरिचित आहे.)
 • मला आता खरंतर मनापासून कॉफी प्यायची आहे पण चहावर चालवून घेतलं. 
 • मी जागा आरक्षित करून प्रवासाला निघाले आणि शेजारच्या सीटवर एक बाई तिच्या वय वर्ष एक आणि तीन अशा दोन मुलांना घेऊन बसली. “सॉरी, पण कराल नं थोडं ॲड्जस्ट??’’ असं कुणी म्हणालं की करतोच आपण ॲड्जस्ट…
 • घरात एकाला पंखा हवा आहे आणि एकाला नको. अशावेळी एकाला तडजोड करावीच लागते.
 • बायकोला शॉपिंगला जायचंय आणि नवऱ्याला घरात आराम करायचा आहे. (आता यात कोणी ॲड्जस्ट केलं? तुम्हीच ठरवा.)
 • बॉसचा स्वभाव आवडत नाही. काय करणार..सांभाळून घेतोच आपण.. 
 • कामाच्या ठिकाणी आपल्या ठरलेल्या कामाव्यतिरिक्त कामं करावी लागतात तेव्हा इलाजच नसतो.
 • थोडक्यात आपल्या जगण्यातल्या प्रत्येक भागात आपल्याला या शब्दात सामोरं जावंच लागतं. 
 • पण ॲड्जस्टमेंट, समायोजन; जुळवून घेणं म्हणजे नेमकं काय? 

आपण कायमच आपल्या नात्यांसोबत, आजूबाजूच्या वातावरणासोबत जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला आपल्या स्वतःच्या मनात, नात्यांमध्ये आणि परिस्थितीसोबत संतुलन, एक प्रकारचा सुसंवाद हवा असतो. जन्माला आल्यापासून आपण जगणं शिकत जातो म्हणजेच इतर माणसांसोबत आपण कसं ॲड्जस्ट व्हायचं हेच शिकत जातो. पण जगणं म्हणजे तरी काय? तर आपल्या अनुभवाला येणारे चढउतार. कधी गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, माणसं मनासारखी वागत नाहीत, आसपासच्या माणसांशी पटत नाही, एखाद्या ठिकाणचं वातावरण आवडत नाही आणि कधी कोरोना विषाणूसारखंच आयुष्य काही वेगळ्याच मागण्या घेऊन सामोरं येतं. पण असं जेव्हा कधी होतं तेव्हा या गोष्टींना सामोरे जाण्याचे मार्ग आपण आजमावत जात असतो. आपल्या जगण्यात (असे कोरोना विषाणूसारखे) काही बदल झाले तर आपल्या गरजा व परिस्थिती यात तफावत निर्माण होते ज्याने मनात एक प्रकारची अस्वस्थता, कलह निर्माण होतो. तो कमी करायला आपण आपल्या वागण्यात, विचारांमध्ये, दृष्टिकोनात बदल करून मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच त्या परिस्थितीशी मिळतंजुळतं घेण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतो. 

जेव्हा असे साथीचे आजार पसरतात व माणसांना असं विलगीकरणात रहावं लागतं तेव्हा अशावेळी बरीच माणसं त्यांचा या दिवसातला एक दिनक्रम बसविण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच आपल्या जगण्याला, दिवसाला एक चौकट देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना आपलं आपल्या आयुष्यावर नियंत्रण आहे असं वाटायला लागतं आणि मनातल्या अनिश्चिततेची भीती कमी व्हायलाही त्याने मदत होते असं याबाबतचं संशोधन सांगतं. तुम्हाला आठवत असेल तर आपणही असंच काहीसं करून कोरोनाच्या काळातून जाताना आयुष्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला होता. 

कोरोनाच्या काळातच काय आपण कायमच काहीना काही ॲड्जस्ट करत जगत आलो आहोत. पण या सगळ्यात आपण जे काही वागत असतो ते शहाण्यासारखं, वेड्यासारखं, हट्टी, दुराग्रही, समतोल साधणारं, कधी यशस्वी तर कधी सपशेल अयशस्वी असतं इतकचं!

आपण ज्या वातावरणात (मनोसामाजिक अर्थाने) राहात असतो, तिथे आपल्या मानसिक गरजा पूर्ण व्हाव्यात व मला शांतपणे माझं आयुष्य जगता यावं अशी सर्वांचीच अपेक्षा असते. पण असं जेव्हा घडत नाही तेव्हा मात्र समस्या निर्माण होते. 

उदा. चित्रा लग्नानंतर तिच्या नवऱ्यासोबत बंगळूरला रहायला गेली. त्याआधी ती कधीच तिच्या घरच्यांना सोडून राहिली नव्हती. अनोळखी शहर, नवीन नातं, न येणारी भाषा, आजूबाजूला अनोळखी माणसं.. अशावेळी नवीन लग्नानंतर आपण जी स्वप्न रंगवली ती तशी होताना दिसत नाहीत कारण चित्रा दिवसभर घरात एकटीच....

मनात योजलेल्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेव्हा मन खट्टू होतं, मनात साशंकता निर्माण होते, भीती वाटायला लागते आणि या सगळ्याची तीव्रता खूप वाढली तर नैराश्य येतं, त्याचाही नात्यावर परिणाम होतो. पण यातून ॲड्जस्टमेंटचा प्रश्न सुटत नाही. अशावेळी ॲड्जस्ट होण्यासाठी, आयुष्य सुकर बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी स्वतःमध्ये बदल करावे लागतात.

उदा. चित्राला येणाऱ्या अडचणी. तिने नवऱ्यावर, परिस्थितीवर, नशिबावर दोषारोप न करता; त्याची चर्चा करून परिस्थितीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणं उपयोगाचं ठरू शकेल. परिस्थितीसोबत, नात्यांसोबत अशी तडजोड करताना आपल्याला यातून नेमकं काय साध्य करायचं आहे आणि ही तडजोड आपण का करतो आहोत याचा संपूर्ण भान असण्याची आवश्यकता असते. अशा तडजोडी चुकीच्या गृहीतकांवर, समजुतींवर आधारित असतील तर मात्र त्यातून समस्या गुंतागुंतीची होण्याची शक्यता वाढते. 

अशा कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाताना आपल्यासमोर असणाऱ्या सर्व पर्यायांचा विचार करणंही इथे महत्त्वाचं ठरतं. 

इथे आपल्या व्यक्तिमत्त्वात असणारी मानसिक पातळीवरची लवचिकता (flexibility) खूपच मदत करणारी ठरते. आपल्यामध्ये अशी लवचिकता असते तेव्हा आपण जास्त सुस्पष्ट विचार करू शकतो. त्यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्याचे पर्यायही आपल्याला दिसू शकतात. 

उदा. चित्रासमोर; सतत नवऱ्यावर फक्त दोषारोप करणे (तुझ्यामुळे मला या गावात यायला लागलं), दिवसभर इथे कसं कंटाळवाणं आहे अशी धुसफूस करणे, तिथे नोकरी शोधण्याचा किंवा तिथली भाषा किंवा अन्य काही नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करणे, तिचे छंद जोपासणे असे बरेच पर्याय असू शकतात. यातला मदत करणारा पर्याय दिसणं महत्त्वाचं. 

आपल्या विचारांमध्ये जेवढा हट्टीपणा, आग्रहीपणा जास्त, जितके आपले विचार हट्टी तितका अशा परिस्थितीला सामोरे जायला जास्त त्रास! मग ॲड्जस्टमेंट मीच करायची का? ॲड्जस्टमेंट या शब्दाशी निगडित असणारा महत्त्वाचा गैरसमज! 

मीच ॲड्जस्टमेंट करायची म्हणजे मीच स्वतःला बदलायचं, ‘मीच माघार घ्यायची’ हा आपल्या मनातला अर्थ. पण ॲड्जस्टमेंट करणं म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्त्व हरवून बसणं किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वाला नाकारून जगणं असा निश्चित नाही. ॲड्जस्टमेंट करत असताना आपण आपलं मन आणि भवताल यात काही समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो. पण असं करताना मला माझ्या मनासारखीच उत्तरं यातून मिळतातच असंही नाही याचंही भान असायला हवं. 

ज्यांना ॲड्जस्टमेंट सहजपणे करायला जमते अशा व्यक्तींना त्यांच्यातल्या क्षमतांची- मर्यादांची पूर्ण जाणीव असते. अशा व्यक्तीचं स्वतःवर प्रेम असतं आणि स्वतःबद्दल आदराची भावनाही त्यांच्या मनात असते. त्यामुळे ते त्यांच्या जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू शकतात. त्यामुळे समोरच्या परिस्थितीला सर्व अंगांनी विचार त्यांना करता येतो. 

अशा व्यक्तींच्या वागण्याबोलण्यात एक सहजता असते. समोर येणाऱ्या अनुभवांपासून पळवाट शोधण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जाण्याकडे त्यांचा कल असतो. माणूस आणि जगणं जेव्हा एकमेकांशी सांगड घालून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतं तेव्हा जगणं आपल्यावर काय प्रभाव टाकत आहे आणि आपणही जगण्यावर काय प्रभाव टाकत आहोत याची जाणीव असणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी एकंदरीतच स्वतःकडे, जगण्याकडे बघण्याचा निरोगी दृष्टिकोन जोपासणं ही यातली महत्त्वाची किल्ली आहे.

आजच्या काळात अनेक माणसं ॲड्जस्टमेंट या शब्दाशी येऊन अडखळताना दिसतात. तुम्हालाही तसंच अडखळल्यासारखं वाटत असेल तर ...  

 • समोर असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार करा. त्याविषयी मनमोकळेपणाने बोला. स्वतःला व्यक्त करा. खूपदा स्वतःला व्यक्त करताना परिस्थितीतल्या, स्वतःमधल्या अनेक गोष्टी आपल्या नकळतपणे तपासल्या जातात. त्यातून काही गोष्टींची उत्तरं सापडायला मदत होते. 
 • आपल्याला ॲड्जस्ट व्हायला त्रास होतोय याचा दोष फक्त स्वतःला, इतरांना, परिस्थितीला देऊ नका. पण या परिस्थितीत माझ्यामुळे या समस्येत कशी भर पडते आहे याचा आढावा घ्या तरच आपण स्वतःला मदत करू शकतो. 
 • मला ॲड्जस्ट व्हायला त्रास होतो म्हणजे ‘मी नॉर्मल व्यक्ती नाही’ असं  लेबल स्वतःला चिकटवू नका. 
 • ॲड्जस्टमेंट हा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करणारा विषय आहे. जगणं अस्थिर आहे, अशाश्वत आहे. त्यामुळे ते सतत बदलत जाणारं आहे या गोष्टींचा स्वीकार केला तर जगण्याला सामोरं जाणं आणि त्याबरोबर ॲड्जस्ट होणं अवघड जाणार नाही. आपल्या आयुष्याला सुंदर बनवण्याचा हा ही एक मार्ग आहे

संबंधित बातम्या