भीती

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 29 मार्च 2021

माइण्ड रि- माइण्ड

भीती ही माणसाच्या आदिम भावनांपैकी एक! भीतीची भावना समजावून घेऊन भीतीबरोबरचे आपले नाते बदलण्याची एक चांगली संधी सद्यपरिस्थितीत आपल्या हातात आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

‘कोरोनाचा काळ...’. गेल्या वर्षी पासून आपल्या बोलण्यात हे एक नवीन परिमाण आलं. कोरोनाचा काळ अजूनही चालूच आहे. पण मागे वळून पाहिलं तर बरेच दिवस होऊन गेले असंही लक्षात येतंय. आपण सगळे आपापल्या परीने प्रत्येक दिवसाला सामोरं जाण्याचा, जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोच आहोत. दिवस जसजसे पुढे जातात तसतसे आपले विचारही... अगदी लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी आपण या परिस्थितीचा जो विचार करत होतो आणि आता जो करतो आहोत यातही खूप फरक आहे. फक्त या सगळ्यात एक गोष्ट आपल्या मनात कायम राहिली... वेगवेगळ्या आकारात, कमी-जास्त प्रमाणात, कधी खूप जास्त तर कधी कमी, कधी वर खाली होत, कधी संथपणे चालत येत... भीती.. काही जणांच्या मनात खूप साशंकता, काहींच्या मनात चिंता नाहीतर काळजी... या भीतीने आपलं बोट धरून ठेवलं आहे. (की आपण तिचं?) या भीतीचीही या निमित्ताने नव्याने ओळखच झाली. आता एका बाजूने लस आली आहे; पण कोरोनाही ठाण मांडून बसलाच आहे. त्यामुळे भीती पण आपल्या आजूबाजूला वावरत आहेच. कधी या भीतीची छाया गडद तर कधी पुसट होत राहाते.

या साथीच्या आजाराने आपलं रोजचं सुरळीत चाललेलं आयुष्य बदलून टाकलं. ज्या गोष्टी आपण अगदी सहजतेने करत होतो त्या करतानाही आता अडचण यायला लागली. जसं सहज बाजारात गेलो, सहज कोणाबरोबर तरी शेकहँड केला. जगण्यातली सहजता संपली आणि आपण एका आणीबाणी सदृश परिस्थितीत वावरायला लागलो. हा आजार मला व्हायला नको, माझ्या जवळच्यांना तर नकोच नको या विचारांनी भीती वाढायला लागली. हा एक नवीनच आजार. बऱ्याच जणांना मग मरणापेक्षा पंधरा दिवस रुग्णालयात कोंडून ठेवतील याचीही भीती वाटते. इतर लोक काय म्हणतील याची लाजही वाटते आणि असं लाजिरवाणं वाटेल म्हणून आजार होण्याची भीती वाटते.

लॉकडाउन परत होईल का, या भीतीने आवश्यक गोष्टींचा अनावश्यक साठा केला तर बरं वाटतं. अशा गोष्टीत आपण सुरक्षितता शोधत राहातो. पण त्याने भीती कमी होतेच असं नाही. कारण ही जी भीती आहे ती अज्ञात गोष्टींची भीती आहे. हा विषाणू नवीन आहे, ह्या आजाराने नेमकं काय होतं हे आपल्याला नक्की माहिती नाही. लक्षणं तर फ्लू सारखी आहेत म्हणतात. पण हा फ्लू नाही त्यापेक्षा त्रासदायक आहे, पण म्हणजे नेमकं काय?

मधल्या काळात काही प्रश्नांची उत्तरं मिळाली; काही शंका कमी झाल्या, तरीही काही प्रश्न मनात रेंगाळत राहतात आणि भीती निर्माण करतातच. गोष्टी जेव्हा अज्ञात असतात तेव्हा आपल्याला दुबळं, हताश वाटायला लागतं. प्रतिसाद कसा द्यायचा ते समजत नाही. बाहेर जावं, मित्र-मैत्रिणींना भेटावं तर प्रादुर्भाव होण्याची भीती. घरात बसून राहावं तर एकटेपणाची भीती. वेगळ्यावेगळ्या बातम्या, सोशल मीडिया यात भर घालतात. कधीकधी खूप भीतीने रागही यायला लागतो, पण त्याने अनिश्चितता संपत नाही आणि कोणत्याही गोष्टीत फरक पडत नाही. म्हणून भीती ही भावना काय असते हे समजून घेऊ या.

भीती – आपल्या 
आदिम भावनांपैकी एक!
भीती ही भावना आपल्याला आपल्या समोरच्या संभाव्य धोक्यांची जाणीव करून देते आणि मग आपण आपलं संरक्षण करण्यासाठी योग्य तो पवित्रा घेतो, म्हणजे खालीलपैकी कोणती तरी कृती करतो..
 Flight –   पळून जाणे : समोरचा धोका माझ्या आवाक्यापलीकडचा आहे तर त्यापासून पळून जा आणि स्वतःला वाचवा. उदाहरणार्थ, आदिमानवाच्या काळात समोर वाघ आला - पळा. आत्ताच्या काळात ः परीक्षा आहे – पळून जा/ परीक्षा टाळा.
    Fight - लढा देणे : समोर आलेल्या आव्हानाला सामोरं जाणं. आदिमानवाच्या काळात: दुसरा माणूस मी साठवलेलं अन्न चोरतो आहे. आत्ताच्या काळात: एखाद्या गोष्टीबद्दल अन्याय होतो आहे असं वाटतं तेव्हा त्याला लढा देणं. मला उगीचच कुणीतरी गृहीत धरतंय तर त्याला स्पष्टपणे सांगणं.
 Freeze  : कोणतीही हालचाल न करणं आणि काय घडतंय हे पाहून पुढची उपाययोजना ठरवणं. आदिमानवाच्या काळात: रात्री झोपेत अंगावरून साप जातोय तर काहीही हालचाल न करता पडून राहाणं, तो लांब गेला आहे हे पाहून मग पुढची हालचाल करणं. आत्ताच्या काळात: कार्यालयात वरिष्ठ रागवताना शांत राहाणं.
    Fright : जेव्हा एखाद्या समोर आलेल्या आव्हानाने भीतीने गाळण उडते, तेव्हा पळून जाणं, लढा देणं, एका जागी शांत राहाणं काहीच जमत नाही. आता खूप काहीतरी भयंकर होईल एवढाच विचार मनात राहातो पण त्यावर कृती करणं जमत नाही. सतत अशाच परिस्थितीत राहिलं तर त्यातून हताशपणा, नैराश्य वाढत जातं.
तर थोडक्यात भीती ही भावना आपल्या उत्क्रांतीच्या काळापासून आपल्या सोबत आहे. आपल्या समोर आता आपल्या जीवनमरणाशी निगडित असणारी आव्हानं नाहीत जशी पूर्वी होती, उदाहरणार्थ – वाघ, अस्वल, साप, दुसऱ्या माणसांची टोळी, दलदल. आता आपल्यासमोर मनोसामाजिक आव्हाने आहेत (नाती जपायची आहेत, घराचे हप्ते भरायचे आहेत, प्रोजेक्टचं काम पूर्ण करायचं आहे, टार्गेट अचिव्ह करायचंय.)
भीती तेव्हाही होती आणि आत्ताही आहेच आणि ती आहे म्हणून तर आपण परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. जेव्हा भीती वाटते तेव्हा खूप अस्वस्थता मनात येते. म्हणून भीतीच वाटायला नको असं अनेक जणांना वाटत असतं. पण भीतीच न वाटणं म्हणजे बेफिकीर होणं, त्यामुळे आपल्याला संभाव्य धोका न समजणं, त्याची जाणीवच न होणं आणि हे जास्त धोकादायक आहे. म्हणून आपण निर्भय बनण्याचा प्रयत्न करू या. 
निर्भय बनणं म्हणजे भीतीमुक्त होणं नाही. निर्भय माणसांना भीती वाटतच नाही असं नाही, पण भीतीची जाणीव असते म्हणूनच तर ते धैर्य गोळा करून तिला सामोरं जातात. ते भीतीला वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना आपल्या जगण्यात ते भीतीचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेतात.
आपणही भीतीचा असा उपयोग, असा फायदा करून घेऊ शकतो का?
भीतीची भीती वाटून घेण्यापेक्षा तिच्या सोबतचं आपलं नातं बदलता येईल का? आणि हे नातं बदलायचं असेल तर प्रथम भीती ही भावना काय असते हे समजून घ्यायला हवी. 
१.    भीती वाटणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. भीती वाटणं हे आपण निरोगी असण्याचा दाखला आहे. भीती वाटणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही. आपल्याला भीती वाटते म्हणून तर आपण स्वतःचं संरक्षण करायला प्रवृत्त होतो, आपण सद््सद््विवेकबुद्धी जागी ठेवून वागतो, नियम पाळतो. त्यामुळे आत्ताच्या कोरोनाच्या काळातही काही गोष्टींची भीती वाटणं स्वाभाविक आहे. आत्ता जी भीती वाटते आहे ती का वाटते आहे, त्याचा माझ्या वागण्यावर काय परिणाम होतो आहे हे समजून घ्या. पण भीती वाटणं चुकीचं आहे असा समज करून घेऊ नका.
२.    भीती ही भावना आपल्याला अनेक छटांमध्ये जाणवत राहाते. कधी भीती सौम्य स्वरूपाची असते कधी भीतीने आपला थरकाप उडतो. काही वेळा आपण सतत भीतीच्या दडपणाखाली राहातो आणि त्याने मनावरचा ताण वाढतो.
    चिंता : बापरे हा आजार मला झाला तर काय होईल, किती दिवस रुग्णालयात राहावं लागेल आणि आजार खूप तीव्र झाला तर... जेव्हा मन अशा साशंकतांनी भरून जातं, भविष्यात काय होईल अशा काहीतरी अस्पष्ट कल्पना मनात घर करायला लागतात, उगाचच डोळ्यासमोर कसलीतरी चित्र उभी राहातात. असं जेव्हा होतं तेव्हा आपण चिंता करू लागतो.
    काळजी : मला आजार झाला तर माझ्या घराची, मुलांची काळजी कोण करेल, मला आजार सहन होईल का? आपण काळजी करतो तेव्हा समस्येचं उत्तर शोधण्यापेक्षा सतत फक्त त्यातल्या नकारात्मक गोष्टीचाच विचार करत राहातो. 
    Panic : भीतीने गाळण उडते. कसं सामोरं जायचं या भीतीला? भीतीला हाताळायला शिकायचं म्हणजे काय करायचं? निर्भय व्हायचं पण कसं?
१.    निर्भय माणसं भीती या भावनेची जबाबदारी स्वीकारतात. मला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण आहे या परिस्थितीकडे मी कसं बघत आहे, परिस्थितीचा काय विचार करत आहे हे समजून घेतात. महत्त्वाचं म्हणजे – परिस्थितीपेक्षा परिस्थितीकडे बघण्याच्या माझा दृष्टिकोन, त्याबद्दलचे माझे विचार भीती निर्माण करायला कारणीभूत आहेत याची त्यांना जाणीव असते. मी अतिरंजित विचार करत आहे का? ज्यामुळे माझं स्वास्थ्य हरवून गेलं आहे? निर्भय माणसं आपले याबद्दलचे विचार – आपला आतला आवाज समजून घेतात.
२.    निर्भय माणसं आपल्याला नेमकी कशाची भीती वाटत आहे हे तपासून पाहतात. कारण भीती ही आपल्या जडणघडणीचा भाग आहे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे भीतीला नाकारण्यापेक्षा, टाळण्यापेक्षा ती नेमकं काय सांगू पाहात आहे, याचा ते विचार करतात. मला माझ्या जिवाची भीती वाटते आहे का? मला माझ्या भविष्याची चिंता वाटते आहे का? नेमकी अस्वस्थता कोणत्या गोष्टीमुळे आहे हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे त्याला पर्याय शोधणं सोपं जातं.
३.    'जर-तर' असा विचार करत राहण्यापेक्षा मी आत्ता काय करू शकेन असा ते विचार करतात व तशी कृती करण्याचा प्रयत्न करतात. आत्ताच्या काळात त्यासाठी या कोरोना संदर्भातली योग्य शास्त्रीय माहिती मिळवणं, ती पडताळून पाहणं, योग्य व्यक्तीला शंका विचारणं याचा उपयोग होऊ शकेल.
४.    आपल्या नियंत्रणात कोणत्या गोष्टी आहेत आणि नियंत्रणाबाहेर कोणत्या गोष्टी आहेत याची त्यांना विशेष जाणीव असते व या गोष्टीचा ते भीतीला सामोरं जाण्यासाठी उपयोग करून घेतात. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण सतत आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींचा विचार करत राहिलो तर त्याने त्यात भर पडते. आत्ताच्या काळात मी कोरोना टाळण्यासाठीच्या सूचनांचं पालन करणं, माझा दिनक्रम आखणं, शारीरिक-मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं या गोष्टींवर माझं नियंत्रण आहे.
५.    निर्भय माणसांचा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो. या परिस्थितीला सामोरं जाताना आपल्याला कोणत्या गोष्टींची मदत होणार आहे आणि कोणत्या गोष्टींचा अडथळा होणार आहे हे त्यांना माहिती असतं. या जाणिवेचा त्यांना भीतीला सामोरं जायला उपयोग होतो.
६.    पण भीती वाटत असली तरी निर्भय माणसं पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात व त्याप्रमाणे ती गोष्ट अमलात आणण्याचाही त्यांचा प्रयास असतो.
७.    भीतीची दखल घेतल्याने, त्याविषयी बोलल्याने, ती व्यक्त केल्याने ती कमी व्हायला मदत होते. त्याने आपल्याला भीती जास्त चांगल्या प्रकारे हाताळता येते. त्यामुळे भीती वाटत असेल तर लिहून किंवा कोणाशी तरी बोलून मन मोकळं करायला हरकत नाही.
८.    सजगता. स्वतःची योग्य काळजी घेण्यानेही भीती हाताळायला मदत होते.
९.    भीती ही जरी मदत करणारी भावना असली तरी जेव्हा भीती वाटते तेव्हा त्याने शारीरिक, मानसिक त्रास होतो. भीती वाटणं ही काही सुखकारक भावना नाही. त्यामुळे कधीकधी भीतीला हाताळणं नीट जमत नाही. त्यामुळे आपण सतत चिंता करत राहिलो, अतिकाळजी करायला लागलो किंवा भीतीने आपला सतत थरकाप उडतोय (panic attack) असं व्हायला लागतं आणि याचा रोजच्या जगण्यावर परिणाम व्हायला लागला तर तज्ज्ञ व्यक्तीची मदत नक्की घ्यायला हवी. आपल्या मनात सतत भीतीचे, चिंता निर्माण करणारे विचार येत असतील.
    त्या विचारांचा शारीरिक-मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असेल.
    काही सुचेनासं होत असेल.
    असहाय वाटत असेल.
    परिस्थितीला सामोरं जायला पर्याय सुचत नसतील. 
असं काही होत असेल तर न लाजता तज्ज्ञ व्यक्तीची मदत घ्यायलाच हवी. निर्भय व्यक्तीही न लाजता हेच करतात.

निर्भय होणं म्हणजे भीतीमुक्त होणं नाही. भीतीची भीती कमी केली, भीतीला आपलंसं करून घेतलं तर भीतीचा आपल्याला फायदा करून घेता येईल. आणि मुख्य म्हणजे निर्भयपणे जगता येईल!!

संबंधित बातम्या