मानसिक आरोग्य

डॉ. संज्योत देशपांडे 
मंगळवार, 27 एप्रिल 2021

माइण्ड रि- माइण्ड

सर्वांसाठीच हा तणावपूर्ण काळ आहे आणि या ताणाचा नकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या जगण्यावर होऊ द्यायचा नाही हे आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार आणि त्यामुळे झालेला लॉकडाउन.... गेल्या वर्षीही आपण अशाच परिस्थितीत होतो. तेव्हा टाळेबंदी, कडक निर्बंध या आपल्यासाठी नवीन गोष्टी होत्या. पण आता वर्षभराने पुन्हा एकदा तीच परिस्थिती... या परिस्थितीत आपण सर्वांनी कमी अधिक मानसिक चढ-उतार अनुभवले. आत्ताही आपण एका संदिग्धच अवस्थेतून जात आहोत. अशी परिस्थिती सारखी येतच राहणार का..? काय होईल आता इथून पुढे..  ही कोरोनाची लाट संपणार की नाही.... कधी जाणार हा विषाणू? असे अनेक प्रश्न आपल्या मनात रेंगाळत आहेत. त्यामुळे याही अनिश्चिततेचा ताण यायला सुरुवात झाली आहे. पण मला असं वाटतं या सगळ्या अनुभवातून जाताना आपण सगळे आपल्या मनाच्या खूपच जवळ आलो आहोत... नाहीतर कुठेतरी दूर भरकटत राहायचो मनापासून लांब... पण आता मनात काय चाललंय, काय वाटतंय हे जाणवायला लागलंय.

‘मन म्हणजे काय?’ हा प्रश्न तसा आता जुना झाला; पण तरीही खूप जणांना ‘मन म्हणजे काय..’ याचं उत्तर देता येत नाही, हा माझा अनुभव आहे. मग मन कुठे असतं? हा तर अजून गहन प्रश्न.. मग या निमित्ताने आपल्याला सर्वांना बहिणाबाईंची आठवण मात्र येते एवढं मात्र नक्की!!

पण तरीही एवढ्या साऱ्या दिवसांत (मी कोरोनाच्या आधीच्या काळाबद्दल बोलतेय) या मनाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हताच आपल्याकडे... आणि आता मनाची व्याख्या शोधतानाच जर एवढा वेळ जातोय तर ‘मानसिक आरोग्य’ म्हणजे काय हा तर खूप खूप प्रश्नचिन्हांचाच प्रश्न!

मन ही गृहीत धरण्याची गोष्ट आहे असंच मला नेहमी दिसलं आहे... आपण गृहीतच धरलेलं असतं मनाला. म्हणून तर मनात त्रास होणाऱ्या कितीतरी गोष्टी साठवून ठेवतो, त्याचा कितीही ताण आला तरी!

आपल्या सर्वांकडे ताणाला सामोरी जाण्याची अमाप क्षमता असते आणि आपणही आपल्या मनाला त्या ताणासोबत राहायला भाग पाडतो. कितीही ताण आला तरी तो सहन करत करत चालत राहातो पुढे.

मग मन केव्हातरी दुखायला लागतं, त्रास द्यायला लागतं, कधी शरीरातून व्यक्त व्हायला लागतं तर कधी नात्यांमधून-कामामधून आपली व्यथा मांडत राहातं. आपण जमेल तसं लक्ष देतो किंवा देतही नाही. आजही आपण असंच करतो आहोत का? पण मग या मनाकडे आणि पर्यायाने मानसिक आरोग्याकडे कधी लक्ष देणार?

हा लॉकडाउन आणि त्याबद्दलची अनिश्चितता याचा परिणाम मनाच्या आरोग्यावर होतो आहे आणि म्हणून त्याकडे लक्ष हे द्यायलाच हवं.

आपण आज हे एवढ्यासाठी बोलतो आहोत की कोणत्याही परिस्थितीतून जाताना काय होऊ शकतं याची कल्पना असेल तर त्याची त्या ताणाला सामोरं जाताना मदत होऊ शकेल.

 दुसरं या परिस्थितीचे नेमके काय काय परिणाम होतात हे समजलं, तर मला जे होतंय ते खूप वेगळं नाही, स्वाभाविक आहे हे ही समजतं आणि तिसरं, मी या बाबतीत काही करायला हवं आहे का? कोणाची मदत घ्यायला हवी आहे का? याचाही अंदाज यायला मदत होते.
आता या बाबतीत काही जणांना जास्त त्रास होतो तर काही जणांना सर्वसाधारण.. असं का होतं?

    ज्या व्यक्तींना यापूर्वी चिंतेचा आजार झाला होता किंवा ज्यांना नैराश्याच्या आजारासाठी मनोविकारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती त्यांना अशा परिस्थितीतून जाताना त्रास होण्याची जास्त शक्यता असते.

    या बरोबरीने माणसाचं व्यक्तिमत्त्व हा एक महत्त्वाचा मुद्दा.

ज्या माणसांची एकंदरीतच कुठलाही त्रास सहन करण्याची क्षमता (frustration tolerance) कमी असते, ज्यांना छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेण्याची सवय असते, ज्यांना अनिश्चितता पेलवत नाही किंवा आपण ज्यांना अतिसंवेदनशील व्यक्ती म्हणू अशा किंवा ज्यांना जगात सतत नकारात्मकच गोष्टी प्रथम दिसतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या माणसांना अशा परिस्थितीतून जाताना जास्त ताण जाणवू शकतो.

नेमके काय परिणाम होतात?

जेव्हा आपण लॉकडाउनसारखी परिस्थिती अनुभवतो तेव्हा इतर माणसांसोबतचा संपर्क पूर्णतः संपतो. याबाबतीतलं संशोधन असं सांगतं की विलगीकरणात माणसांना स्वातंत्र्य गमावून बसण्याची (loss of liberty) भावना निर्माण होते आणि त्याचा ताण आपल्या मनावर येत राहातो.

जेव्हा अशी परिस्थिती आपण दीर्घकाळासाठी अनुभवतो (याबाबतीत जे संशोधन केलं गेलं आहे. त्यामध्ये दहा दिवसांच्या लॉकडाउन / विलगीकरणाचा उल्लेख आहे.)  तेव्हा त्याचे त्या परिस्थितीतून जाताना काही परिणाम होतात तर काही जणांच्या बाबतीत हे परिणाम दूरगामी असू शकतात. त्यामुळे या काळातून जाताना प्रचंड भावनिक थकवा येतो, झोप न लागणे किंवा झोपेवर परिणाम व्हायला सुरुवात होते. खूप ताण वाढला तर त्यातून व्यसनाधीनताही वाढताना दिसते. पण याच बरोबरीने सतत वाईट वाटत राहतं, चिडचिड होते, अस्वस्थ वाटतं आणि याचा खूपच ताण वाढला तर कधी काही जणांच्या मनात आत्महत्येचेही विचार यायला लागतात. काही जणांना लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. त्यामुळे पुस्तकं वाचणं किंवा जिथे एकाग्रता लागते अशी कोणतीही गोष्ट सहजगत्या जमत नाही. लॉकडाउनमुळे आपण घरातल्या व्यक्तींसोबत सतत राहिल्याने, योग्य काळजी घेतली नाही तर नातेसंबंधात ताणतणाव व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सतत भांडणं, चिडचिडीचं प्रमाण वाढतं. याचा शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. एकंदरीतच खूप थकवा जाणवतो, अंग दुखायला लागतं, एकंदरीत उत्साह कमी होतो. काही वेळेला छातीत धडधड जाणवते. एक दडपण ओझं असल्यासारखं वाटायला लागतं.

जसजसा काळ पुढे जातो तसतसा या परिस्थितीचा कंटाळा यायला सुरुवात होते आणि त्यातून नैराश्य यायला लागतं. एकतर आधी आपण कशा प्रकारचं आयुष्य अनुभवत होतो, त्यातलं काहीच आत्ता नाही (ना कुठला उत्साह ना कुठलं चैतन्य) त्यामुळे एकप्रकारचा रटाळपणा जाणवतो. आपल्याला सतत कसल्या ना कसल्या आव्हानांना सामोरं जाण्याची सवय झालेली असते ती आव्हानं नाहीत, हे देखील कंटाळवाणे होते. यात काही जणांना खूप हताश वाटायला लागतं आणि त्यातून नैराश्यही बळावायला सुरुवात होते.

एकाकीपणाची भावना 
या सगळ्यात अन्य माणसांबरोबरचा संवाद कमी होतो आणि त्यातून एकाकीपणा वाढायला लागतो. सध्याच्या काळात मोबाईल फोन, इंटरनेट यामुळे ही कमतरता आपण भरून काढतो, पण त्यात माणसाचा स्पर्श नसतो आणि हा स्पर्श हिरावून घेतल्यासारखं वाटतं व त्याचाही त्रास व्हायला लागतो. ज्या व्यक्तींना बंद खोलीत राहण्याचा त्रास (claustrophobia) असतो त्यांच्यासाठीही ही अवस्था खूपच गुदमरल्यासारखी आणि त्रासदायक होते. ‘आपण अडकलो आहोत’ या भावनेतून काही जणांना पॅनिक ॲटॅकही येऊ शकतो. तर काही अति काळजीच्या चक्रात अडकतात.

दूरगामी परिणाम 
हा काळ संपला तरी काहीजणांना नंतरच्या आयुष्यातही अगदी पुढचे दोन-तीन वर्षे याचा त्रास होऊ शकतो, असं काही संशोधनातून दिसलं आहे. यात काही जणांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस रिस्पॉन्सचा त्रास होतो तर काहीजणांना नैराश्य ही येऊ शकतं.
काही संशोधनांमध्ये असंही दिसलं आहे की हा काळ संपल्यानंतरही बरेचजण सर्दी, खोकला असणाऱ्या लोकांना टाळत राहातात. बरेचजण गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळतात तर काहीजण ही हात धुण्याची सवय तशीच चालू ठेवतात. त्यामुळे हा सर्वांसाठीच तणावपूर्ण काळ आहे आणि या ताणाचा नकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या जगण्यावर होऊ द्यायचा नाही हे आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे.
हा त्रास किती गंभीर आहे, यासाठी स्वतःला कसं तपासता येईल? आपल्याला ही ताणाची जी काही लक्षणं जाणवतात त्याची
    वारंवारता (frequency) किती आहे?
    तीव्रता (Intensity) किती आहे?
    कालावधी (Duration) किती आहे?

या बाबींचा प्रथम विचार केला आणि मग रोजच्या जगण्यावर, नात्यांवर, कामावर किती परिणाम होतो आहे याचा आढावा घेतला तर आपण ही परिस्थिती हाताळू शकतो आहोत की आपण कुणाची मदत घ्यायला हवी याचा ढोबळ अंदाज येऊ शकतो. अशावेळी नक्कीच या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीची मदत कोणताही गंड न बाळगता, न लाजता घ्या.

कोरोना विषाणूनं आपल्या सर्वांनाच आपल्या आरोग्याचा विचार करायला शिकवलं आहे. पण पूर्वी आपण आरोग्य म्हणालं की फक्त शारीरिक आरोग्याचाच प्रामुख्याने विचार करत होतो...पण आपल्या मनाचीही संसर्ग प्रतिकारशक्तीही तितकीच महत्त्वाची आहे हे विसरून कसं चालेल?  

शेवटी ही न टाळता येण्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे यात महत्त्वाचं.

संबंधित बातम्या