बोअरडम

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 10 मे 2021

माइण्ड रि- माइण्ड

कोरोना विषाणूमुळे आलेल्या निर्बंधांच्या काळात येणाऱ्या कंटाळ्याचं काय करायचं? आपण आज बोअरडम, कंटाळ्याविषयी बोलणार आहोत. तुम्ही म्हणाल कंटाळा हा काय बोलण्याचा विषय आहे का? त्यापेक्षा कंटाळा पटकन जाईल असं काहीतरी सांगा... 

कल्पना करा.. तसं पाहायला गेलं तर कल्पना करण्याची तशी गरज नाही, कारण ही गोष्ट आपल्यापैकी सर्वांनी कधी ना कधी अनुभवली आहेच. तरी कल्पना करू या की आपण अगदी उत्साहाने एखाद्या प्रवासाला निघालो आहोत. अगदी कसेही म्हणजे स्वतःची गाडी, आपली एस.टी. -लाल परी, शिवनेरी, रेल्वे किंवा विमान.. अगदी कोणत्याही मार्गाने किंवा वाहनाने, पण मग असं होतं की काही कारणानं तो प्रवास रेंगाळतो. बसचं चाकच पंक्चर होतं.. बस अगदी हळूहळू प्रत्येक गावाला थांबत थांबत पुढे जाते. किंवा अगदी पुढचं विमान उशिरा येणार म्हणून विमानतळावर तास न तास बसून राहावं लागतं. थोडक्यात काही कारणाने प्रवास अपेक्षेपेक्षा खूपच लांबतो, रटाळ होत जातो. आणि त्या परिस्थितीत आपल्या हातात बसून राहण्याव्यतिरिक्त करण्यासारखंही काही राहात नाही. कारण आपल्याला आपल्या मुक्कामाला पोहोचायचं तर असतंच. 

मग आपण काहीतरी तात्पुरती मजा शोधण्याचा प्रयत्न करतो. विमानतळावर असलो तर तिथल्या दुकानांमध्ये उगाच चक्कर मारतो. बसमध्ये सहप्रवाशाशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा उगाचच चणे शेंगदाणे विकत घेऊन खात बसतो. अशाने कंटाळा तात्पुरता गेला तर जातो किंवा गेल्यासारखा वाटतो पण लगेच येतोच तो...

प्रवास ही काही एकमेव परिस्थिती नाही जिथे आपल्याला कंटाळा येतो. आपण एखाद्या व्याख्यानाला जातो. व्याख्यान खूप लांबतं. उठूनही जाता येत नाही आणि काहीच करता येत नाही. तसंच एखादा सिनेमा – लांबलेलं नाटक.. अशा कंटाळा आलेल्या बऱ्याच गोष्टी आपण अनुभवल्या आहेत.

गेल्या वर्षीपासून पडलेला कोरोनाचा मुक्काम असाच लांबतच चालला आहे...त्यामुळे आता तसंच काहीसं झालं आहे का? कधी होणार यातून सुटका.. कंटाळा यायला लागलाय आता..

पण कंटाळा घालवायला काय ॲक्टिव्हिटी करायच्या याची तर आपल्या सर्वांकडे मोठी यादी आहेच. त्याबद्दल नव्याने बोलण्यासारखं काही नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सगळं करून कंटाळा काही पटकन जातोच असं नाही किंवा ते सगळं करून तो तात्पुरता जातो आणि परत येतोच.

तसं पाहायला गेलं तर या कंटाळ्याबद्दल ‘किती बोअर होतंय’, ‘कंटाळा आलाय’ या  व्यतिरिक्त आपण काही बोलतच नाही. पण खरं सांगू कंटाळ्याविषयी बोलणं यापेक्षाही खूप इंटरेस्टिंग असू शकतं. त्याची दोन कारणं -

     एका मानसशास्त्रज्ञाचं म्हणणं असं आहे की कंटाळा यायला आपण सगळ्यांनी थोडासा वाव द्यायला हवा. आपण सतत मोबाईल, टिव्ही, सोशल मीडिया अशा गोष्टींना कनेक्टेड असतो. माहितीच्या युगात तर याला तोटाच नाही. या गोष्टीमुळे आपलं लक्ष सतत इकडे तिकडे मग तिकडून तिकडे असं होत राहातं. इंटरनेटचा सततचा वापर मेंदूवर ताण आणतो. त्याने मेंदूला थकवा येतो आणि आपलं मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून मोबाईल, इंटरनेटपासून थोडावेळ आवर्जून लांब राहायला हवं. त्यामुळे थोडासा कंटाळा येऊन दिला तर ते आपल्याला फायद्याचं आहे.

     आपल्याला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा आपण नावीन्य शोधायला लागतो. कारण कंटाळा म्हणजे जे करायला हवं ते आपण करत नाहीये याची जाणीव. यापेक्षा बरंच काही करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असंही हा कंटाळा आपल्याला सांगतो. आणि या गोष्टीची आपल्याला जाणीव झाली, कंटाळा काय सांगतोय हे आपण ऐकलं तर आपण स्वतःला तशी मदतही करू शकतो. त्यामुळे खरं तर कंटाळा हा आपल्याला स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची एक संधीच निर्माण करत असतो. या दृष्टीने आपल्या कंटाळ्याकडे पाहिलं तर आपण आपल्या वागण्यात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

त्यामुळे कंटाळा येणं हे फक्त कंटाळवाणंच असतं असं नाही तर हा कंटाळा का येतोय, या कंटाळ्यात काय दडलंय, तो आपल्याला काय सांगू पाहातोय, असं त्याच्याकडे पाहायला हवं. म्हणून कंटाळ्यापासून लांब पळून जाण्याच्या प्रयत्नात आपलं काही चुकत तर नाहीये ना? हे निश्चित तपासून पाहायला हवं आणि कंटाळ्याला सामोरं जायला हवं. 

तर आपल्याला कंटाळा येतो म्हणजे काय होतं?

कंटाळा येण्यासाठी आपल्याकडे मुळात काही विशिष्ट प्रमाणात मानसिक ऊर्जा असणं गरजेचं असतं. आपल्याकडे फारशी मानसिक ऊर्जा नाही आणि आपल्या आसपासच्या जगातही फारसं काही घडत नाही, आणि फारशी आव्हानंही नाहीत तर ही खूपच छान अवस्था असते. रिलॅक्स वाटतं अशावेळी खरं म्हणजे! पण माझ्याकडे खूप मानसिक ऊर्जा आहे, मला काहीतरी करावसं वाटतंय, माझ्या क्षमता वापराव्याशा वाटतायत, पण आजूबाजूच्या जगात तसं काहीच सापडत नाही. आपलं असं काही आपल्याला मिळालं नाही की आपल्याला कंटाळा यायला 

सुरुवात होते. आता या क्षणाला कोरोनामुळे जे निर्बंध आले आहेत आणि निर्बंधाचा एकेक आठवडा जसजसा वाढत चालला आहे तसतसा हा कंटाळा अनेकांना जाणवायला लागला आहे. 

किती वेळ पुस्तकं वाचायची? मोबाईलवर किती वेळ घालवायचा? मधे मधे कोणत्या तरी गोष्टीत तात्पुरतं मन रमतं, पण परत प्रश्न येतोच मनामध्ये “आता काय.....?”

गेल्या वर्षी लॉकडाउन सुरू झाला आणि आपल्याला सतत स्वतःसोबत राहायला लागलं; तेही सगळे चोवीस तास. म्हणजे आधी कसं आपल्याला कोणतं ना कोणतं व्यवधान असायचं. तेव्हाही रिकामा वेळ मिळाला तर आता काय करायचं, हा प्रश्न अनेकांना सतावायचाच. पण तेव्हा आपण या प्रश्नाला उभं राहायलाही जागा देत नव्हतो. कारण स्वतःला रमवणं म्हणजे सतत कोणासोबत तरी वेळ घालवणं हेच समीकरण होतं. स्वतःला रमवण्यासाठी अशा सतत बाहेरच्या गोष्टी आवश्यक असतात, हेच समीकरण कित्येक जणांच्या मनात असतं. कारण स्वतःसोबत राहणं म्हणजे स्वतःला सामोरं जाणं. ही तशी सोपी गोष्ट नाही. मग सतत कसली ना कसली करमणूक शोधत राहायची; हा कंटाळ्यावरचा किंवा कंटाळा न येऊ देण्याचा मस्त उपाय. 

मनोरंजन करणं, करवून घेणं आणि त्यात कुठेही स्वतःचा विचार करायला जागाही न ठेवणं, या जीवनशैलीतून एकदम लॉकडाउनच्या जीवनशैलीत आल्यावर कालांतराने हा कंटाळा जाणवायला लागला. कारण आता आपल्याला पळून जायला काही जागाच उरल्या नाहीत म्हणूनच सगळं करून झाल्यावर कंटाळ्याची कंटाळवाणी जाणीव मनात उरते. या कंटाळ्याचा राग यायला लागतो, त्याने चिडचिड वाढायला लागते आणि हताशपणासुद्धा!

आणि हो या कंटाळ्यात भर घालणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कंटाळ्याच्या परिस्थितीवर आपलं काहीच नियंत्रण नसतं याची जाणीव!

कंटाळवाणं लेक्चर सुरू आहे, आपण काहीच करू शकत नाही. कंटाळवाणा प्रवास सुरू आहे पण त्यात बदल करणं आपल्या हातात नाही. आत्ताही या परिस्थितीवर आपलं काहीच नियंत्रण नाही आणि मुख्य म्हणजे या सगळ्यात ‘आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे’ याची जाणीव या कंटाळ्यात अजूनच भर टाकते.

अगदी पूर्वीच्या म्हणजे आदिमानवाच्या काळात माणूस जेव्हा आपल्या जीवन मरणाशी निगडित असणाऱ्या आव्हानांना सामोरं जात होता तेव्हा त्याला कंटाळा यायलाच वाव नव्हता. पण जग हळूहळू बदलत गेलं आणि आपलं जगणंही. आधुनिक जगात माणूस प्रगत होत गेला, तेव्हा केव्हातरी या कंटाळ्याने आपल्या आयुष्यात प्रवेश केला. या कोरोनाच्या निमित्ताने या कंटाळ्याची आपल्याला जाणीव झाली इतकंच. आत्ता या परिस्थितीतून जातानाचा कंटाळा हा या चर्चेचा एक भाग झाला. पण या निमित्ताने आपण या कंटाळ्याला टाळूनच पुढे जात होतो हे तर समजलं.

आधी जेव्हा कंटाळा येत होता तेव्हा त्याचा विचार करायचा असतो, हे आपण कधी विचारात घेतलंच नव्हतं. आणि म्हणून या लॉकडाउनमधून जाताना येणाऱ्या कंटाळ्याला जरा तपासून बघू या. कंटाळा आपल्याला आपण या जगासोबतचं आपलं नातं तपासून पाहायला सांगतो आहे. 

या कंटाळ्याकडे लक्ष द्यायलाच हवं कारण कंटाळ्याचे दुष्परिणाम खूपच त्रासदायक असतात. कंटाळा घालवायला काही माणसं खा-खा करतात, काही माणसं जुगार खेळायला लागतात, व्यसनाधीन होतात. दीर्घकाळ कंटाळा अनुभवणाऱ्या लोकांना कालांतराने चिंता, नैराश्य अशा गोष्टींचा त्रास होऊ शकतो. सतत कंटाळा येणारी माणसं कामात चालढकल करत राहतात. त्यामुळे त्यांचा कामाचा उरकही खूप कमी होतो. आपल्या या वागण्यापाठीमागे कंटाळा आहे, हे पाहायलाही अनेकांना त्रास होतो आणि म्हणून कंटाळ्याकडे दुर्लक्ष करणं योग्य गोष्ट नाही.

मग कंटाळा घालवण्यासाठी माणसं करमणुकीकडे वळतात. पण ते कंटाळ्यावरचं वरवरचं उत्तर आहे. त्याने तात्पुरतं बरं वाटतंही पण त्याने आयुष्यातला कंटाळा जात नाही. म्हणून कंटाळा आपल्याला काय काय सांगायला बघतोय ते ऐकण्याचा प्रयत्न केला, तर त्या कंटाळ्यातून सकारात्मक उत्तर शोधता येऊ शकेल.

आपण सर्वचजण आपल्या जगण्यात काही अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो, ती आपली मानसिक गरज असते. लॉकडाउनच्या आधी आपण प्रवाहासोबत वाहत होतो. त्यात कदाचित आवर्जून असा विचार करायला वावच नव्हता पण सध्याच्या नेहमीचं जगणं हरवलेल्या जगात हे सगळं नेमकं काय चाललं आहे – का चाललं आहे असे प्रश्न मनात येत राहातात. याचा अर्थ शोधावासा वाटणं आणि परिस्थितीत झालेली उलथापालथ याची सांगड घालताना अचानक स्तब्ध व्हायला होतं. काय अर्थ आहे या सगळ्याच की आता सगळंच अर्थहीन होत चाललं आहे.. आणि हे अर्थहीन आहे असं वाटायला लागतं तेव्हा कंटाळा यायला लागतो.

कोरोनाच्या या काळात जीव वाचवायच्या नादात आपलं जगणंच जेव्हा बंदिस्त होत गेलं तेव्हा आपण आता जगण्यातला अर्थ गमावून बसत चाललो आहोत का? असं ही अनेकांना वाटायला लागलं आणि जगण्यात वाटणारी अर्थहीनता हीसुद्धा कंटाळ्याला आमंत्रण देणारी असते. पण त्यावेळीही कंटाळा आपल्याला यात काहीतरी बदल करा, स्वतःमध्ये स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणा असंच सांगत असतो. त्यामुळे तशा अर्थाने कंटाळ्यामध्ये परिवर्तनाची, सर्जनशीलतेची बीजं रोवलेली असतात. फक्त त्यासाठी स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहायला हवं. इतिहासातले अनेक दाखले ही तुम्हाला हेच सांगतील.

     सर आयझॅक न्यूटनने कॅलक्युलसचा सिद्धांत अशाच साथीच्या रोगाच्या काळात लिहिला.  विल्यम शेक्सपिअरचं प्रसिद्ध ‘मॅक्बेथ’ सुद्धा साथीच्या रोगाच्या काळात लिहिलं गेलं. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. 

     स्वा. सावरकरांचं ‘कमला’ हे महाकाव्यही त्यांनी अंदमानच्या तुरुंगवासात लिहिलं. 

अशी अनेक उदाहरणं देता येतील. प्रश्न एवढाच आहे स्वतःसोबत राहणं कंटाळवाणं नसतं, तर ते खूप छान असू शकतं हे आपण या निमित्ताने समजून 
घेणार आहोत का?

संबंधित बातम्या