स्वतःशी नातं जोडताना

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 7 जून 2021

माइण्ड रि- माइण्ड

कोरोना विषाणू मुळे आलेल्या या निर्बंधांच्या काळात स्वतःबरोबर नातं कसं जोडायचं? पण मग त्यासाठी तर तो जगण्याचा वेग, व्यग्रता ज्यामध्ये आपण तो स्वतःसोबतचा धागा हरवून जातो किंवा आपल्या स्वतःपासूनच आपण पळ काढतो तसं करणं आवर्जून थांबवायला हवं. स्वतःची ओळख वाढवणं किंवा स्वतःसोबत नातं जोडणं ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. त्यासाठी आपण नेमके कसे आहोत हे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करायला हवा.

गेल्या वर्षी पासून कोरोना विषाणू आपल्या आयुष्यात आला.. त्यामुळे गेल्या वर्षी लॉकडाउन सुरू झाला आणि आपलं सातत्याने सुरू असणारं जग थांबलं. त्यानंतर मात्र आपलं सगळं जगणंच बदलून गेलं. रोजच्या कमिटमेन्टस, रोजचा दिनक्रम, प्रत्येकाचं नॉर्मल जग हरवलं. आजूबाजूची सतत बरोबर असणारी माणसं दिसेनाशी झाली. थोडं सावरतंय असं वाटलं तोवर या वर्षी पुन्हा निर्बंध आले. अनेक जणांच्या मग लक्षात आलं आपल्याला या बाहेरच्या वातावरणातल्या (नेहमीच्या) गोष्टींशिवाय राहणं कठीण जातंय.

मी माझीच माझ्याबरोबर काय करणार आहे?
कारण आपल्यापैकी बरेच जण सतत आणि सतत फक्त बाहेरच्या जगाशीच जोडलेले असतात.

 • मला कामाचा काही फोन आलाय का?
 • माझा बॉस काय म्हणतोय?
 • आज नवीन काय काय? हे फंक्शन, तो कार्यक्रम, इकडे डिनर
 • माझ्याकडे (माझ्यासाठी महत्त्वाची असणारी) इतर माणसं लक्ष देतायेत का?
 • आणि हे जेव्हा काही नसतं तेव्हा सतत मोबाईलवरून सोशल मीडिया...
 • मोबाईलमुळे आपण आपल्या समोरच्या माणसांसोबत तर नसतोच पण आपण स्वतःसोबत सुद्धा नसतो..
 • कोरोना विषाणू मुळे जग बदलून गेलं आणि बऱ्याच जणांना एका अनोळखी वाटणाऱ्या व्यक्तीसोबत थांबण्याची वेळ आली. आणि ती अनोळखी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः.... आजूबाजूचा कलह थांबला आणि एक वेगळाच आवाज ऐकू यायला लागला.. कुठून येतोय तो आवाज? ओळखीचा तर वाटतोय.. हा तर आपलाच तर आवाज आहे.. आतला आवाज खरंतर आपल्या आतल्या आवाजाने याआधीही बऱ्याचदा बऱ्याच काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता.
 • इतकं काम करू नकोस. बर्न आउट होईल तुझा.
 • नाही म्हणता येत नाही आणि मग रडत बसते. खूप झालं, आता नाही म्हणायला शीक
 • आज लिफ्ट बंद पडली म्हणून जिना चढायला लागला, काय दमछाक झाली. व्यायाम करायला हवा.
 • सध्या सतत भांडणं का होताहेत माझी सर्वांशी..
 • कंटाळा आलाय (हे लॉकडाउनच्या आधीच्या काळातलंच वाक्य आहे)
 • मला हे आवडलेलं नाही – हे असं करू नकोस तू परत..असं नसतं वागायचं..
 • हा आवाज बरंच काही सांगत आला आहे वेळोवेळी..
 • पण आपणही विविध मार्गांनी तो आवाज दाबून टाकला, दुर्लक्षित केला, काही वेळेला आपल्या आजूबाजूच्या कलहात – गोंगाटात तो ऐकूच आला नाही. हा लॉकडाउन झाला आणि त्या आत्ताच्या आवाजाची जाणीव व्हायला लागली. तो बरंच काही सांगू पाहतोय आणि आता ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे आणि आजूबाजूचा कलहही नाहीये. मला जर माझ्याशी मैत्री करायची असेल तर सर्वात प्रथम मला माझा आतला आवाज ऐकू यायला हवा.

मैत्रीची / नात्याची सुरुवात या संवादातूनच होते ना! या आवाजाची भीती वाटण्याचं आणि त्याला टाळण्याचं खरंतर काही कारण नाही आणि आताच्या काळात स्वतःबद्दलची ही जाणीव निर्माण करायला आणि स्वतःबरोबर नातं जोडायला, स्वतःशी मैत्री करायला हा वेळ मिळाला आहे.

या कोरोना विषाणूच्या निमित्ताने आपण सगळे एका इतक्या मोठ्या घटनेचे साक्षीदार झालो आहोत आणि अचानक एकाएकी जगात एवढा बदल झाला. कोणत्याही तयारीशिवाय जेव्हा अशा बदलांना सामोरं जावं लागतं तेव्हा आपली स्वतःची स्वतःबद्दलची जाणीवच आपल्याला इथे मदत करणार आहे.

जेव्हा अशी स्वतःची, स्वतःला, स्वतःबद्दलच जाणीवच नसते ना तेव्हा आपल्याला स्वतःची मतं नसतात किंवा ती असली तरी मांडता येत नाहीत. अशावेळी जगण्याला दिशा नसते ना कुठले जगण्यातले प्राधान्यक्रम. आणि बऱ्याचदा तर आयुष्यात मला काय करायचंय, कुठे पोचायचं आहे तेही समजत नाही. मग स्वतःविषयी कमतरतेची भावना रेंगाळत राहाते मनात किंवा सतत कसल्या तरी दडपणाखाली आहोत आपण असं वाटत राहातं, आणि आतमध्ये खूप पोकळपणा जाणवत राहातो. या साऱ्याचा परिणाम अर्थातच आपल्या इतर नात्यांवर ही पडत राहातो किंबहुना संपूर्ण जगण्यावर..
म्हणून या निमित्ताने  ‘मैत्री’ करायची आहे स्वतःबरोबर – नुसती तोंडओळख नाही. तर समजून घ्यायचंय स्वतःला ..
तर विचार करू यात 
  

 आपण कसे वागत होतो आत्तापर्यंत स्वतःशी किंवा कसे वागवत होतो स्वतःला? (या ओळखीच्या-मैत्रीच्या कार्यक्रमात एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. जे वाटतं ते प्रामाणिकपणे सांगायचं आहे – बरं ते स्वतःलाच सांगायचंय)

 • कसं आयुष्य जगत होतो आपण आत्तापर्यंत? त्यात फक्त मी आणि मीच होतो की फक्त इतरांनाही जागा होती?
 • किती काळजी घेत होतो स्वतःची? की खूपच..इतकी की आता कोणताही त्रास सहनच होतं नाहीये की.. पूर्ण दुर्लक्षच करत होते मी स्वतःकडे?
 • मला सतत इतरांच्या मान्यतेची (approval) गरज भासते का?
 • मला जे वाटतं ते मी मनमोकळेपणाने बोलू शकते का?
 • मला स्वतःसोबत कंफर्टेबल वाटतं का?
 • मी अमुकची बायको, तमुकचा भाऊ, यांचा मुलगा किंवा त्यांचा मित्र सोडून मी कोण आहे?
 • माझ्या प्राधान्यक्रमांच्या यादीमध्ये माझा नंबर कितवा आहे?
 • आपण आपल्याला हवे तसे वागतोय की फक्त इतरांना हवे तसे?
 • माझ्या क्षमता आणि माझ्यातल्या कमतरता मला नक्की माहिती आहेत का? 
 • असे बरेच प्रश्न विचारू शकतो आपण स्वतःलाच. खरंतर आपण आपल्या आतला आवाज ऐकायला लागलो की ते सर्व प्रश्न आपोआप ऐकू यायलाच लागतात. फक्त आता दुर्लक्ष न करता आपण त्या आवाजाचं ऐकायचं ठरवलं तो सांगतोय तसं वागायचं ठरवलं तर खरंतर खूप बरं होईल.

हे प्रश्न जसजसे आपण स्वतःला विचारत जाऊ तसं लक्षात येईल की आपण खरोखरच जसे आहोत तसंच आयुष्य जगतोय की आपण एक छान आयुष्य जगत असल्याचा आभास आपण स्वतःसमोर निर्माण केला आहे?

स्वतःची ओळख वाढवणं किंवा स्वतःसोबत नातं जोडणं ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. त्यासाठी आपण नेमके कसे आहोत हे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करायला हवा. माझी मूल्यं, माझी विचारसरणी काय आहेत? हे जाणून घ्यायला हवं..

    आपण आपल्या जगण्यात कसे आणि काय निर्णय घेतो याने आपण स्वतःला अधिकाधिक समजत जातो आणि म्हणून इथून पुढे मला कसं आयुष्य घालवायचं आहे याची स्पष्ट जाणीव मनात निर्माण करायला हवी.

    आपल्या जगण्याचा या निमित्ताने आढावा घ्यायला हरकत नाही. आपण कोणती आव्हाने कशी पेलली? आपण कुठे कमी पडलो? आपण आपल्या मूल्यांना – विचारांना धरून वागलो का? स्वतःला ओळखायचं असेल तर मनाचे सगळे आडपडदे बाजूला करून, आतले कप्पे उघडण्याचा प्रयत्न करायला हवा.

    कोणते सल माझ्या मनात घर करून बसले आहेत आणि ते जाण्यासाठी मी काही करत आहे का?

इतके दिवस ज्यांच्याकडे लक्ष पुरवलं नाही अशा स्वतः मधल्या बऱ्याच गोष्टींना स्पर्श करता येईल. पण हे सगळं करायचं तर तो जगण्याचा वेग, व्यग्रता ज्यामध्ये आपण तो स्वतःसोबतचा धागा हरवून जातो किंवा आपल्या स्वतःपासूनच आपण पळ काढतो तसं करणं आवर्जून थांबवायला हवं आणि वेळ काढून आतमध्ये डोकवायला हवं.
या निमित्ताने आपल्या यश अपयशाच्या व्याख्या ही तपासून पाहायला हव्या आणि तसंच आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घेण्याचीही तयारी हवी.

हा विषय तसा न संपणारा आणि खूप सारे कंगोरे असणारा. पण आजच्या सारख्या परिस्थितीत ही स्वतःबद्दलची जाणीव निर्माण करायला हा काळ वापरला तर त्याचा नक्कीच उपयोग होईल.

संबंधित बातम्या