नाती आपुली...

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 5 जुलै 2021

माइण्ड रि- माइण्ड

गेल्या वर्षी कोरोना महासाथीची लाट आली आणि आपल्याला त्यामुळे अनेक गोष्टींचं भान आलं. आपलं आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आपली प्रतिकार शक्ती. अशा कितीतरी गोष्टी. पण या सगळ्यात एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ती गोष्ट म्हणजे आपली इतरांबरोबरची नाती. 

गेल्या वर्षी अचानक टाळेबंदी लागू झाली आणि आपल्या मनात नाती नावाच्या एका महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल एक जाणीव निर्माण झाली, कारण आपण सगळेच संपूर्ण वेळ घरात राहायला लागलो. तुम्हाला आठवत असेल मग खूप जणांनी आवर्जून अनेक जणांना फोन केले. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, ख्याली खुशाली विचारण्यासाठी प्रयत्न केले. त्याच काळात कौटुंबिक हिंसाचाराच्याही काही बातम्या वाचायला मिळाल्या. कोरोना  विषाणूच्या आधीच्या काळात आपली जीवनशैली ज्या पद्धतीची होती त्यात कुटुंबासाठीचा वेळ अगदीच कमी झाला होता. पण कोरोना विषाणूमुळे ही परिस्थिती बदलली, आपल्याला संपूर्ण वेळ घरात राहावं लागलं.

प्रत्येक कुटुंबाचं स्वतःच असं एक रुटीन असतं. या टाळेबंदीच्या काळात कुटुंबाचा तो ताल, तो ऱ्हिदम पूर्णपणे थांबला. सर्व कुटुंबाला सगळे चोवीस तास सतत बरोबर राहावं लागलं. खरंतर आता आपल्याला आपल्या जोडीदारासोबत, मुलांसोबत, घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत इतका वेळ बरोबर राहण्याची सवयच बहुधा कुणालाच राहिलेली नव्हती. त्यामुळे या कोरोना विषाणूच्या निमित्ताने जेव्हा पूर्ण वेळ सगळ्यांना इतका वेळ एकत्र राहण्याची वेळ आली तेव्हा त्याचा जोडप्याच्या, कुटुंबातल्या इतर व्यक्तींबरोबरच्या नात्यावर काय परिणाम होत असेल, हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाच्या गरजा, व्यवस्था, मुलांची काळजी यात कदाचित जोडप्यांना एकमेकांकडे पाहायला वेळ झाला नसेल (तसा तो नेहमीच नसतो) पण जेव्हा एखाद्या गोष्टीचं नावीन्य संपतं आणि एक रुटीन चालू होतं तेव्हा नात्यांवर काय आणि कसा परिणाम होतो हा खरा प्रश्न आहे. आता जेव्हा ही परिस्थिती लांबते आहे, असं दिसतंय तेव्हा ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

कोरोना विषाणूच्या आधीच्या काळात खरंतर बरीचशी जोडपी एकमेकांबरोबर पुरेसा वेळ मिळत नाही म्हणून नाराज असत. पण असं असलं तरी तेव्हाच्या जीवनशैलीत प्रत्येकाला एक स्वातंत्र्य होतं. आपला वेळ कसा घालवायचा याचं स्वातंत्र्य आणि तसा तो वेळ घालवायला बरीचशी संधीही होती.. पण जेव्हा सतत चोवीस तास, एकमेकांसोबत घरात राहायला लागलं तेव्हा चिडचिडीचं एक सावट कदाचित रेंगाळायला लागलं, आणि काही जणांच्या बाबतीत त्याचे मोठे उद्रेक अगदी हिंसाचारापर्यंत झाले. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला सतत इतका वेळ घरातल्या व्यक्तींसोबत, जोडीदारासोबत घालविण्याची सवय राहिली नाही, हे मान्य केलं तर कदाचित हा ताण कमी व्हायला मदत होऊ शकते.

आपल्याला आता इतक्या दिवसांनी खूप वेळ बरोबर राहायला मिळाला आहे म्हणजे तो क्षण न क्षण आता बरोबरच घालवायला हवा असा अट्टाहास करण्याचं कारण नाही. इथेही आधीच्या आपल्या जीवनशैलीत लागू असलेलं गुणात्मक वेळेचं (Qualitative Time) सूत्र तसंच ठेवायला हरकत नाही. कारण आपण किती वेळ बरोबर घालवतो यापेक्षाही तो कसा घालवतो याला महत्त्व आहे.

दिवसभरातला मला माझा वेळ हवासा वाटणं, त्यात मी मला हव्या असलेल्या गोष्टी करणं, माझ्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यायाने माझ्या नात्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पण यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जशी माझी गरज आहे तशी ती माझ्या जोडीदाराचीही असू शकते हे लक्षात ठेवायला हवं (नाहीतर....)

काही जणांची घरं खूप लहान असतात, जिथे घरातल्या माणसांना सतत एकमेकांसोबतच राहावं लागतं अशावेळी ही गरज समजून घेणं आव्हानात्मक असू शकतं. कोरोना विषाणूमुळे अचानक सर्वांना खूप वेळ मिळायला लागला आणि मग आता तो कसा घालवावा हा प्रश्न निर्माण झाला. मुळात वेळ कसा घालवावा किंवा अट्टाहासाने तो सतत एकत्रच घालवावा अशा कुणाच्या तरी हट्टापायी नात्यावर परिणाम होऊ न देणं महत्त्वाचं.

कुटुंबात प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या गरजा असतात. आताच्या बदललेल्या परिस्थितीत या गरजा समजून घेणं आणि त्या प्रमाणे एकमेकांसोबत समायोजन (adjustment) साधण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे या काळात आपण एकमेकांशी कसे वागतो आहोत (किंबहुना मी माझ्या जोडीदाराशी कसे वागत आहे?) याचं मूल्यमापन करायला या काळाचा उपयोग करायला हरकत नाही.

 • मी माझ्या जोडीदाराला किती गृहीत धरलं आहे?
 • मला माझ्या जोडीदारासोबत पारदर्शकपणे बोलता येतं का?
 • माझ्या जोडीदाराच्या असण्याने किंवा नसण्याने मला फरक पडतो का? कसा?
 • माझा माझ्या जोडीदारावर विश्वास आहे का?
 • माझ्या या नात्याकडून काय अपेक्षा आहेत ?
 • माझ्या जोडीदाराच्या माझ्या कडून काय अपेक्षा आहेत? 
 •  नात्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी मी काय प्रयत्न करत आहे? 
 • असे काही प्रश्न विचारून आपलं नातं नेमकं कसं आहे, त्यात कोणत्या चांगल्या गोष्टी
 • आहेत आणि कुठे बदल करायला हवेत असं तपासून पाहायला हवं. नात्यातली गुणवत्ता वाढवायला या काळाचा वापर करायला हरकत नाही.

लक्षात ठेवायच्या काही गोष्टी 

 • सर्वात प्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपण दोघं, प्रकृतीने भिन्न व्यक्ती आहोत. तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय सांगितलंत? पण त्यामुळे आत्ताच्या
 • परिस्थितीचा प्रत्येकावर होणारा परिणाम हा भिन्न असणार आहे. एखाद्याला या परिस्थितीची खूप भीती वाटत असेल तर दुसरा कदाचित शांतपणे परिस्थिती हाताळणारा असू शकेल. 
 • प्रत्येकाची याबाबतची प्रतिक्रिया भिन्न असण्याची मुभा आपण एकमेकांना द्यायला हवी (आपण सहवेदना, स्वीकार या गोष्टींबद्दल विचार करतच असतो ना?) नाहीतर तुझं बरोबर की माझं यात वातावरण बिघडवण्यापेक्षा या गोष्टीला सामोरे जाण्याचे आपल्या जोडीदाराचे जे मार्ग आहेत त्याचा आदर केला तर कदाचित गोष्टी सोप्या होऊ शकतील.
 •  सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे तुम्ही एकाच पार्टीत आहात. ‘हा विरुद्ध ही’ असा हा सामना नाही.)
 • कोणतंही नातं निरोगी ठेवायचं असेल तर प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस थोड्या वेळासाठी का होईना गरजेची असते. या टाळेबंदीच्या, त्या नंतरच्या निर्बंधांच्या  काळात अशी स्पेस हवीशी वाटणं हे चूक नाही हे लक्षात ठेवा. दिवसभरात असा थोडा वेळ स्वतःचा स्वतःसाठी काढून ठेवायला हवा. तसा तो मिळाला नाही तर चिडचिड व्हायला सुरुवात होते आणि त्याचं प्रतिबिंब नात्यावर पडतं.
 • तुमच्या जोडीदाराच्या तुम्हाला भावलेल्या गोष्टींची आवर्जून रोजच्या रोज दखल घ्या आणि शक्य असेल तर त्या गोष्टी लिहून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
 • आपल्या प्रत्येकाची मनःस्थिती आत्ताच्या काळातून जाताना जराशी ठीक नसणार आहे त्यामुळे काही वेळेस जोडीदाराच्या काही न आवडलेल्या प्रतिक्रिया फार मनाला लावून घेऊ नका. Always try to give benefit of doubt to your partner.
 • शक्य झालं तर जे काही घडतं आहे त्याकडे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करा. (याचा फायदा होतो, असा एका संशोधनातला निष्कर्ष आहे)

    सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत कोण चूक, कोण बरोबर असा विचार करण्याची पद्धत बदलून टाका. नातं चांगलं ठेवणं ही माझी जबाबदारी आहे असं त्याकडे प्रत्येकानं पाहायला हवं.
    सतत एकमेकांवर दोषारोप करून प्रश्न सुटणार नाहीत याचं ही भान ठेवायला हवं. 
प्रत्येक नात्याचे म्हणून काही प्रश्न असतात. इतके दिवस कदाचित आपण याकडे दुर्लक्ष करत होतो. पण या कोरोना विषाणूच्या निमित्ताने हा जो वेळ मिळाला आहे त्याकडे आपल्या सर्वांना मिळालेली रिलेशनशिप हिलींगची एक संधी म्हणून पाहता आलं तर अजून 
खूप गोष्टी सुचत राहतील.

संबंधित बातम्या