...गमते उदास!

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

माइण्ड रि- माइण्ड

एक भावना म्हणून नैराश्य अगदी आपल्या रोजच्या जगण्यातही बऱ्याचदा जाणवत असते. तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं, की ती आपल्या मनाची एक स्थिती आहे. तो विशिष्ट घटनेला दिला जाणारा प्रतिसाद आहे. दुःख होणं, वाईट वाटणं, उदास वाटणं, नैराश्य येणं, खिन्नता जाणवणं, विषण्ण वाटणं, औदासिन्य येणं.. या सर्व नैराश्य या एकाच भावनेच्या छटा आहेत.

‘काहीच करावसं वाटत नाहीये... कंटाळा आलाय... नकोसं झालंय सगळं... वाटतं कधी संपणार आहे हे सगळं... काहीच समजत नाही... याला काही अंत आहे की नाही... वाटतं, की असे किती दिवस चालू राहणार आहे हे सगळं... खरंच का जगतोय आपण? कशासाठी चाललंय हे सगळं? एव्हढ्या साऱ्या दिवसांची मेहनत वाया जाणार का... सकाळ झाली की कशाला हा दिवस उजाडलाय, असं वाटत राहतं. कशातच मन लागत नाही. सारखंच काहीतरी होतं, बरंच वाटत नाही कशात, माझ्यात काही अर्थच उरला नाहीये, कुणाशी बोललं की थोडा वेळ बरं वाटतं, पण नंतर परत खूपच त्रास होतो. काय आहे या जीवनाचा अर्थ? आपण एक अपयशी व्यक्ती झालो आहोत... आणि कदाचित असेच अपयशी राहणार आहोत...’ गेल्या काही दिवसात विद्यार्थी, पालक, व्यावसायिक, नोकरदार...अगदी कुणाच्याही मनात अशाच प्रकारचे विचार येताना दिसतायत. एक प्रकारचा हताशपणा, निराशा.. सतत बोलण्यातून जाणवत आहे. 

मागच्या वर्षी कोरोना विषाणूने आपल्या आयुष्यात प्रवेश केला. कोरोनाचा काळ जसजसा पुढे जात आहे तसतसे बरेच वेगवेगळे प्रश्न त्यातून निर्माण होताना दिसत आहेत. या काळाचे आपल्या जगण्यावर पर्यायाने आपल्या मनावर होणारे परिणाम जाणवू लागले आहेत. गेल्या वर्षी जेव्हा या लाटेला सुरुवात झाली तेव्हा ती केव्हातरी (म्हणजे लवकरच) संपेल अशी आशा होती. पण आता पहिली लाट झाली... दुसरी संपते न संपते तोवर तिसऱ्या लाटेच्या चर्चा सुरू झाल्या... आणि अनेकांच्या मनात, बोलण्यात नैराश्याची झाक दिसू लागली. 

नैराश्य-अवसाद मनाच्या आत खूप खोलवर वेदना देणारा आणि आपलं जगणंच कमजोर करत नेणारा एक मानसिक आजार. 

“मी गेले काही दिवस फक्त काळ्याकुट्ट ढगातच राहत आहे असं वाटतंय.” 

“मला काही आवडत नाही. कशातच रस वाटत नाही... आनंद? मला माहिती नाही. सगळंच नकोसं वाटतंय.” 

“I am trapped... it's a dead end!” 

“I am a complete failure...”

“काय फरक पडणार आहे मी या जगात असले काय आणि नसले काय...?”

नैराश्य अनुभवणाऱ्या माणसांच्या मनात येणारे हे विचार..! जिथे प्रत्येक क्षण मणामणाचं ओझं घेऊन येतो. प्रश्नचिन्हांकित होऊन येतो... आणि असं का होतंय...? का वाटतंय? काहीच समजत नाही. पण मग खूप जणांना असं वाटेल की असं वाटण्यासारखीच तर परिस्थिती आहे. छान वाटावं असं कुठे काय चाललंय या जगात... का वाटावी आशा... जेव्हा डोळ्यादेखत सगळं हातातून निसटून जाताना दिसतंय... खरं आहे परिस्थिती खूप छान वाटावी अशी नाहीच आहे. पण मग अशा वेळी अशी उदासीनता दाटून येत असेल तर... तर काय करायला हवं...? 

नैराश्य, डिप्रेशन हा आजच्या काळात अगदी सहजगत्या वापरला जाणारा शब्द. अगदी काहीही झालं तरी आपण हा शब्द वापरत असतो. गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत की आपल्याला डिप्रेशन येतं. 

पण मग हे नैराश्य, डिप्रेशन म्हणजे तरी नेमकं काय? ‘नैराश्य’ या गोष्टीचा तीन प्रकाराने विचार करावा लागतो आणि नेमकं आपलं नैराश्य यातल्या कोणत्या प्रकारात आहे हे समजून घ्यावं लागतं. तर नैराश्य ही एक भावना म्हणून, नैराश्य हे एक लक्षण म्हणून, नैराश्य एक आजार म्हणून समजून घ्यावा लागतो. काय नेमका फरक आहे हा? हा समजला तर आपण स्वतःला जास्त चांगली आणि योग्य ती मदत करू शकू. म्हणून सर्वात आधी आपण हा फरक समजून घेऊयात....
नैराश्य एक भावना

एक भावना म्हणून नैराश्य अगदी आपल्या रोजच्या जगण्यातही बऱ्याचदा जाणवत असते. तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की, ती आपल्या मनाची एक स्थिती आहे. तो विशिष्ट घटनेला दिला जाणारा प्रतिसाद आहे. दुःख होणं, वाईट वाटणं, उदास वाटणं, नैराश्य येणं, खिन्नता जाणवणं, विषण्ण वाटणं, औदासिन्य येणं.. या सर्व नैराश्य या एकाच भावनेच्या छटा आहेत.

कधी आपण कोणाकडून फसवलो गेलो, खूप साऱ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं, गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत, जवळच्या नात्यात खूप ताण निर्माण झाले, नातं तुटलं, कुटुंब विभक्त झालं, एकाकी पडल्यासारखं वाटलं अशा कितीतरी घटनांना सामोरं जाताना मनाला वाईट वाटतं. आपली घोर निराशा होते. हिरमोड होतो. काही गोष्टी आपल्या हातातून कायमच्या निसटल्या असा सल निर्माण होतो. अशा कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाताना निराश वाटणं ही अत्यंत स्वाभाविक भावना आहे. जसं आत्ताच्या कोरोनाच्या काळात गोष्टी खूपच बदलून गेल्या आहेत. अनेक जणांची स्वप्नं, मनसुबे उद्‌ध्वस्त झाले आहेत. पुढे जगण्याचे मार्ग शोधायला प्रचंड धडपड करावी लागत आहे. अशा वेळी निराश वाटणं, उदास वाटणं स्वाभाविक आहे. 

नैराश्य हे दुसऱ्याच आजाराचं लक्षण? 
अनेक शारीरिक व मानसिक आजारांमध्ये नैराश्य हे एक लक्षण म्हणून ‘नैराश्य’ आढळतं. उदाहरणार्थ हायपोयायराइडाझम, हृदयविकार यासारख्या शारीरिक आजारांमध्ये तर स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता यासारख्या मानसिक आजारांमध्ये इतर अनेक लक्षणांसोबत ‘नैराश्य’ हे एक लक्षण म्हणून आढळतं. कोरोनाची लागण होऊन गेलेल्या अनेक जणांनाही अशी उदासीनता जाणवत आहे. 

डिप्रेशन/ नैराश्य हाच आजार?

जेव्हा आपण ‘नैराश्य’ एक मानसिक आजार म्हणून समजून घेतो तेव्हा त्यात अनेक लक्षणांचा समूह आढळतो. 

 • सतत उदास, दु:खी भावना 
 • कोणत्याही गोष्टीचा आनंद घेता न येणं
 • सतत थकवा जाणवणं, अंगात ताकद नसल्यासारखं वाटणं
 • झोप जास्त किंवा कमी होणं, सकाळी पूर्ण झोप न झाल्यासारखं वाटणं
 • भूक कमी किंवा जास्त होणं
 • जगण्यातला रस कमी होणं
 • शरीरसंबंधांची इच्छा कमी होणं
 • चिडचिडेपणा, अस्वस्थपणा 
 • निराश, हताश, असहाय वाटणं
 • मन एकाग्र करायला त्रास होणं
 • स्वतःविषयी कमतरतेची भावना 
 • निर्णय क्षमतेवर परिणाम
 • सातत्याने अपराधीपणाची भावना 
 • माणसांना टाळावंसं वाटणं. 
 • आत्महत्येचे विचार मनात येणं. 

अशा प्रकारची लक्षणं काही काळापर्यंत सतत जाणवतात तेव्हा नैराश्य हा आजार असं त्याकडे पाहायला हवं. हा आपल्या ‘मूडस्’चा आजार असतो. मेंदूतील रासायनिक बदलांमुळे हा आजार होतो. त्याचा रोजच्या वागण्यावर, कामावर, नातेसंबंधांवर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट असतं. अर्थात योग्य औषधोपचार व मानसोपचाराच्या मदतीनं यातून बाहेर पडता येतं.
पण नैराश्य या आजाराबाबत मुळातच अनेकांच्या बऱ्याच कल्पना असतात. 
  

 • नैराश्य वगैरे असं काही नसतंच. उगाच कसली तरी फॅडं म्हणायची... 
 • हे काही नाही, सुख बोचतंय... 
 • नैराश्य म्हणजे काय? मनाचा कमकुवतपणा.. दुसरं काही नाही. 
 •  काही नाही सरळ दुर्लक्ष करायचं... उगाच कसले मनाचे चोचले पुरवायचे?
 • अति विचारांचा परिणाम दुसरं काय? 
 • औषधाने वगैरे काही होत नाही. तो उपायच नाही मुळी त्याच्यावर...

मुळात नैराश्य नावाचा काही आजारच असतो, हेच आपणाला पटत नसतं त्यामुळे त्याबाबतची जागरूकता, गांभीर्य हा तर पुढचा विषय झाला. पण सध्याचं वातावरण बघता ‘नैराश्य’ या आजाराचा आपण सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता आली आहे. कारण सध्या याचा परिणाम युवा पिढीवर होताना दिसत आहे. असा हा मानसिक आजार आपल्या घराचं दार ठोठावू शकतो अशी शक्यता असताना आपण त्याबाबत अनभिज्ञ राहणं योग्य ठरणार नाही. कारण या आजाराला वयाचं बंधन नाही..
कोरोना काळाच्या आधी पासूनच ‘जागतिक आरोग्य संघटने’ने नजीकच्या काळात नैराश्य हा आता एक नंबरचा आजार होणार आहे असं आपल्याला सांगून  सतर्क केलं होतंच. 

 • नैराश्य ही भावना म्हणून जाणवत असेल तर या गोष्टी तपासून पहा. 
 • नैराश्य ही भावना आपल्याला किती वेळा जाणवते? या भावनेची वारंवारता काय आहे? याची नोंद घ्या...
 • कोणते प्रसंग घडले, की आपल्याला निराश वाटतं?  हे तपासा...
 • त्या प्रत्येक प्रसंगाचा तुम्ही लावलेला अर्थ काय होता? 
 • नैराश्य जाणवायला मी स्वतः किती जबाबदार आहे? बोला तर स्वतःशीच खरं! 
 • या प्रश्नांचा स्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमची उत्तरं काही अंशी तरी सापडतील...आणि उत्तरं सापडली नाहीत तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.
 • नैराश्य हा आजार जाणवत असेल तर मात्र तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 
 •  औषधोपचाराचं महत्त्व जाणून घ्या. 
 •  रोज व्यायाम करा, योग्य आहार घ्या. निरोगी जीवनशैली स्वीकारा. 
 •  वास्तववादी उद्दिष्टे तयार करा.  
 •  मित्राशी/जवळच्या व्यक्तीशी मन मोकळे करा. 
 •  कोणताही महत्त्वाचा निर्णय अशा मनःस्थितीत घेऊ नका. 
 •  मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. 
 •  विवेकनिष्ठ विचारपद्धती समजून घेऊन आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

संबंधित बातम्या