आत्मघात

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

माइण्ड रि- माइण्ड

मनाच्या कक्षा कितीही रुंदावल्या तरी काही मृत्यू त्यात सामावून घ्यायला, समजून घ्यायला कठीणच जातात. आत्महत्या हा त्यापैकी एक मृत्यू! 

गेल्या काही दिवसात आत्महत्यांच्या बातम्या वाचताना मन सुन्न होऊन गेलं आहे. इतक्या तरुण वयात आपलं आयुष्य संपवून टाकावासं वाटण्यासारख्या अशा काय घडामोडी या माणसांच्या आयुष्यात घडत आहेत..? काही माणसांच्या आयुष्यातला जगण्याचा अर्थ इतका संपून जाऊ शकतो, की त्यांना मरण जवळ करावसं वाटतं? गेल्या वर्षभरात आत्महत्यांच्या अनेक बातम्या आपण वाचल्या.. ऐकल्या.. कोरोनाच्या या काळात या बातम्यांनी आपल्याला खूपच अस्वस्थ केलं. मग असं मनात येतं की एखाद्या घटनेनं आपल्या जगण्याची किंमतच संपून जाते का? 

आत्महत्यांच्या या बातम्या वाचताना जाणवतं ते इतकंच, की असह्य होत जाणाऱ्या ताणतणावांना तोंड द्यायला अनेकजणांना मरण हा एकच पर्याय वाटतो. 

प्रत्येक माणूस जगण्याच्या एका टप्प्यावर स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधायला लागतो. जीवनात अनेक घटना घडत जातात आणि त्या प्रत्येक घटनेला अनुसरून तो त्याचं जीवन तोलत जातो. घेतलेल्या प्रत्येक श्‍वासाचा अर्थ त्याला लावता आला तर जगणं सुरळीत, सरळमार्गी चालू राहातं, पण काही कारणाने तर सगळ्या जगण्यातच जर निरर्थकता आल्याच्या भावनेने विचारांच्या पातळीवर अनेक माणसं मरणापर्यंत पोहोचतात. अगदी आत्तापर्यंत असलेला जगण्याचा इंद्रधनुषी रंगच मुळी सापडेनासा होतो. जगण्याच्या वाटाच हरवून जातात, किंवा रस्ताच मुळी चक्क एका ठिकाणी येऊन थांबतो. मन दुखायला लागतं, मनाची वेदना असह्य होते आणि या त्रासातून बाहेर पडायला एकच मार्ग दिसतो, आत्महत्या! 

माणसाला स्वतःचं जगणं का संपवावंसं वाटतं, याचं महत्त्वाचं कारण आपण किती जगतो यापेक्षाही आपण कसं जगतो याबद्दलच्या त्याच्या कल्पना त्याला जास्त महत्त्वाच्या असतात.. “आत्महत्या हा एक पळपुटेपणा आहे,” असं एक सर्वसाधारण विधान अनेकजण करतात, पण त्या कृतीपर्यंत पोचणारी मनाची प्रक्रिया नेमकी कशी असते हे समजून घेणं नक्कीच खूप गरजेचं आहे. 

नैराश्य ः जगण्यातले सर्व आशेचे किरण लुप्त पावलेले असतात. कुठंही बघितलं तर मनात फक्त आणि फक्त निराशाच दिसते. आत्महत्या करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीत प्रामुख्यानं आढळणारी भावना! ‘डेड एण्ड’ची सतत आणि सततची भावनाही कळतनकळतपणे माणसाला अगतिक बनवत नेते. ही अगतिकता आता आपल्या आयुष्यात काहीच बदल होणार नाही या निराशेतून येण्यापेक्षा, बदल झाला नाही तर जगणंच मुश्कील होईल या विचारातून जास्त येते. त्यामुळे मनाची तगमग वाढत जाते.

अपराधीपणा हासुद्धा या अगतिकतेचा भाग असू शकतो. हा अपराधीपणा किंवा ही प्रचंड खंत आपण गमावलेल्या संधीची असते, आपण केलेल्या चुकांची असते, आपल्याच काही वागण्याची असते.

मनाची वेदना ः आत्महत्येची कृती करायला असह्य होत जाणारी मनाची वेदना हे एक महत्त्वाचं कारण असतं ही वेदनाच इतकी असह्य असते, की माणसाला आपल्या जाणिवाच पूर्णतः संपवून टाकाव्याशा वाटतात. माणूस त्या काळात इतका असह्य होतो, की तो आपल्या समस्येचं उत्तर आत्महत्येत शोधायला लागतो. श्‍नाइडमन या मानसशास्त्रज्ञानं मानसिक दृष्टिकोनातून विचार करताना परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणानं ठेचली गेलेली मानसिक गरज ही आत्महत्या करण्यापाठीमागे ताण निर्माण करणारा महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हटलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आयुष्यभराचा त्रास संपवण्याची भूमिका हे बहुतांश आत्महत्यांमध्ये आढळणारं सामर्थ्य आहे. 

आक्रमकता ः हासुद्धा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारा महत्त्वाचा पैलू. आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती स्वतःबाबतच आक्रमक होत जातात आणि स्वतःवरच आघात करून घेतात. त्यामुळेच फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाच्या मते, आत्महत्या म्हणजे त्या व्यक्तीनं स्वतःवरच केलेला खुनशी हल्ला आहे. हे वागणं जर लक्षात घेतलं तर राग किंवा संताप किंवा उद्विग्नता हासुद्धा या व्यक्तीच्या भावनेचा पैलू आहेत. 

सामाजिक दृष्ट्या एखाद्या व्यक्तीची काही कारणानं मानहानी होणं हेसुद्धा अनेकांच्या बाबतीत आत्महत्येला प्रवृत्त करणारं कारण असू शकतं. आपल्या झालेल्या अप्रतिष्ठेतून बचावाचा, तोंड लपवण्याचा मार्ग म्हणून अनेकजण मरण पत्करतात. त्यामुळे परीक्षेतलं अपयश, चांगली नोकरी जाणं, कर्जबाजारी होणं, घरातून मुलीनी पळून जाणं या किंवा अशा घटनांतून त्या व्यक्तीला स्वतःचीही इतकी लाज वाटते, की जगाला आणि स्वतःलाही सामोरं जाणं त्यांना कठीण होऊन बसतं. हा विचार कदाचित इतका प्रबळ होतो की ‘लोक काय म्हणतील?’ हा विचार मनावर जास्त राज्य करतो किंबहुना सत्ताच गाजवतो. अर्थात त्या प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी हे पाऊल उचललं जातं. 

एकाकीपणा ः काही कारणानं माणसं समाजापासून तुटत जातात, एकटी पडत जातात आणि त्यातून आत्महत्येला प्रवृत्त होतात. काही कारणानं जेव्हा माणसाचं समाजाबरोबरचं नातं बदलतं तेव्हा या बदललेल्या नात्याबरोबरही समाजात वावरणं त्याला अत्यंत कठीण होतं आणि हीसुद्धा आत्महत्येला प्रवृत्त करणारी गोष्ट असू शकते. 

पण विचार केला तर असं लक्षात येईल, की त्या क्षणाला त्या व्यक्तीचा संपूर्ण दृष्टिकोनच इतका संकुचित होऊन जातो, की, जगण्याचे कोणतेच पर्याय समोर दिसत नाहीत. त्यामुळे जर सगळी परिस्थिती सुसह्य बनवायची असेल तर त्यातून कायमची सुटका मिळवणे हा आणि फक्त हाच पर्याय जवळचा वाटायला लागतो. परिस्थितीशी जुळवून घ्यायचं असेल तर आत्महत्येला पर्याय नाही असं तीव्रतेनं वाटणं या सगळ्या प्रक्रियेत प्रकर्षानं जाणवतं. 

आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचेपर्यंत द्विधा मनोवस्था हाही या व्यक्तींच्या मानसिकतेचा महत्त्वाचा पैलू असतो. भावनिक पातळीवर अनेक भावनांचं संमिश्रण झालेलं असताना विचारांच्या पातळीवर ही माणसं सतत ‘टू बी ऑर नॉट टू बी’च्या झोक्यावर हिंदकळत राहतात. या विचारांच्या धारेतच बऱ्याचदा आपल्या जवळच्या व्यक्तींना कधी कळत किंवा कधी नकळत आपल्या हेतूच्या सूचना देतात. या सूचना कधी अगदी स्पष्ट तर कधी ‘बिटवीन द लाइन्स’ सारख्या असतात. ती खरं म्हणजे त्यांची एक प्रकारे मदतीची हाकच असते. 

काय असतात या सूचना?
    अशा व्यक्ती आत्महत्येविषयी काही बोलतात किंवा लिहितात. 
    अ) मी असले काय किंवा नसले काय... काय फरक पडणार आहे? 
    ब) मी जन्मालाच आलो नसतो तर बरं झालं असतं? 
    क) आपण परत भेटलोच तर बोलूच

 • भविष्याविषयी पूर्ण निराशा, हतबलता ः आपण अडकलो आहोत, त्यातून बाहेर पडायला काहीच मार्ग नाही, गोष्टी कधीच चांगल्या होणार नाहीत. अशी पूर्णपणे असहायतेची, निराशेची भावना त्यांच्या बोलण्यात दिसते.
 • स्वतःविषयीची नकारात्मक भावना ः मी पूर्णतः अपयशी व्यक्ती आहे. मी जगात नसेन तर भलंच होईल जगाचं, किंवा आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी एक ओझं झालेलो आहोत. आपल्यात काहीच अर्थ नाही अशी स्वतःविषयीची शरमेची, अपराधीपणाची किंवा तिरस्काराची भावना. 
 • राहिलेल्या गोष्टी पूर्ण करणे. आपलं मृत्युपत्र तयार करणे, आपल्या जवळच्या-प्रिय व्यक्तींना स्वतःजवळच्या मौल्यवान वस्तू देणे. कुटुंबासाठी काही व्यवस्था करून ठेवणे. 
 • मृत्यूचा, मृत्यू या संकल्पनेचा विचार करत राहणे, मृत्यू काय असतो, त्याने काय होतं असे विचार करत राहणे किंवा तशा आशयाच्या कविता करणे, पोस्ट लिहिणे. 
 • निरोपाची भाषा ः अचानकपणे मित्र-मैत्रिणी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना भेट देणे, त्यांचा निरोप घेणे. 
 • कोषात जाणे ः फोन बंद करणे, फोनला उत्तर न देणे, जवळच्या माणसांचा संपर्क कमी करणे किंवा बंद करणे, प्रचंड आत्ममग्नता वाढणे.
 • स्वतःला इजा होईल अशा गोष्टी करणे, व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढणे, स्वतःची काळजी न घेणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे.
 • आत्महत्येसाठी व्यवस्था करणे ः आत्महत्या करण्यासाठी दोरखंड, विषारी औषधं किंवा हत्यारे मिळवून ठेवणे. 
 • अचानक लाभलेली मानसिक शांतता: आत्महत्या करणाऱ्या माणसाची त्याचा निर्णय पक्का झाला की मनाची तगमग थांबते व त्या निर्णयाने मनाला शांतता लाभते. 
 • आत्महत्या करणाऱ्या लोकांची द्विधा मनोवस्था हाच खरं म्हणजे त्यांना वाचविण्याच्या प्रक्रियेतला मध्यवर्ती मुद्दा ठरू शकतो. 

असह्य होत जाणारी मनाची वेदना हे आत्महत्या करण्यापाठीमागचं कारण असतं. ती वेदना कमी करणं, तिला सांभाळायला शिकणं ही यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट! भावनांचं विरेचन किंवा मनावरचा भार हलका करणं या काळात अत्यंत महत्त्वाचं असतं. आपली वेदना असह्य होत जाणारा तो काळ असतो त्या काळात तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन रुंदावला. जगण्याचे इतरही पर्याय समोर आले तर त्यांना आत्महत्येपासून दूर राहता येतं. मुळात जगणंच जेव्हा असह्य होत जातं तेव्हा त्या काळात त्या व्यक्तीला गरज असते ती प्रचंड प्रामाणिक, भावनिक आधाराची! भावनिक पातळीवर त्यांना आधार मिळत गेला, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली तर आत्महत्येकडे वळलेली पावलं कदाचित वेगळ्या रस्त्याकडे वळू शकतील. 
यासाठी सर्वांत उत्तम पर्याय म्हणजे हेल्पलाईन! मनात गर्दी करणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या विचारांना वाट मोकळी करून देणारा उत्तम मार्ग! अत्यंत जागतिक क्षणी हवा असणारा, आधार देणारा पर्याय म्हणजे हेल्पलाईन! किमान त्या क्षणाला तरी मन मोकळं करता आलं तरी याचा मनाची वेदना कमी व्हायला उपयोग होतो. त्यावेळी हेल्पलाईनवरचा समुपदेशक या व्यक्तीला समुपदेशनासाठी येण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. मानसोपचारतज्ज्ञ, प्रशिक्षित समाजसेवक यांच्या मदतीने त्या व्यक्तीच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करता येते. त्या माणसाची आत्महत्येची प्रवृत्ती लक्षात घेऊन त्याला औषधोपचार-मानसोपचार यांचा वापर करता येतो. हेल्पलाईनबरोबर समुपदेशन केंद्र हीसुद्धा आजच्या काळाची गरज बनू पाहते आहे. 

 • आत्महत्या करावीशी वाटणाऱ्या व्यक्तीला कशी मदत करता येईल?   वर दिलेल्या गोष्टींपैकी काही लक्षणं दिसत असतील तर त्याची दखल शक्य तितक्या लवकर घ्यायला हवी. अशा गोष्टीविषयी कसं बोलू, बोलू की नको असं वाटणं स्वाभाविक आहे, पण तुम्ही त्यांच्याशी बोललात तर तुम्ही काळजी करता आहात हे त्यांना जाणवतं आणि बोलून/विचारून आपण त्यांना बोलण्यासाठी, मन मोकळं करून देण्यासाठी संधी निर्माण करत असतो.    अशा व्यक्तीचं म्हणणं मनापासून ऐकून घ्या. त्यांना कोणतेही सल्ले देऊ नका किंवा सकारत्मक विचारांचे डोस पाजू नका.
 • त्यांना एकटं सोडू नका- मी कायम तुझ्यासोबत आहे हा दिलासा त्यांना द्या! (I am just a phone call away) 
 • तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्या. त्यांना तज्ज्ञ व्यक्तींकडे जाण्यासाठी तयार करा / घेऊन जा. नंतरही ते तज्ज्ञ व्यक्तींच्या संपर्कात आहेत ना/उपचार चालू ठेवले आहेत ना याची खात्री करा. 
 • त्यांनी आत्महत्येसाठी काही साधनं गोळा केली असतील तर ती त्यांच्या हाताला लागणार नाहीत अशी व्यवस्था करा. 
 • त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी (self care) यासाठी त्यांना प्रवृत्त करा. व्यायाम, योग्य आहार – निरोगी जीवनशैली याचा यावेळी खूप उपयोग होऊ शकतो. 
 • मनाचा ताण परत वाढायला लागला, मनाची तगमग वाढायला लागली तर तू काय काय करू शकशील अशा योजनांची/ उपायांची चर्चा त्या व्यक्तीसोबत करा. उदा. खूप त्रास झाला तर मी सूर्यनमस्कार घालेन, कशात तरी मन गुंतवेन, अमुकला फोन करेन इत्यादी.

आत्महत्यांच्या लक्षणांबाबत 
(warning signs) सूचनांबद्दल जागरूक राहिलं तर आत्महत्या टाळता येऊ शकतात. आत्ताच्या काळात आपण सर्वांनीच याबाबत जागरूक असणं गरजेचं झालेलं आहे.

 • जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार आत्महत्या हे मृत्यूला जबाबदार ठरणारं जगातलं १०व्या क्रमांकाचं कारण आहे. 
 • जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार जगभरात जवळजवळ दहा लाख लोक आत्महत्येच्या कारणाने मरण पावतात.
 • जगात पुरुषांनी आत्महत्या करण्याचं प्रमाण बायकांपेक्षा तिप्पट ते चौपट आहे. 
 • सर्वात महत्त्वाचं म्हणजे १५ ते ३५ या वयात आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त दिसतं. 
 • जगभरात दर ४० सेकंदाला एक आत्महत्या होत असते. 
 • भारतातलं या संदर्भातलं चित्र आपल्याला काय सांगतं? 
 • भारतात दर वर्षाला अंदाजे १.८ लाख व्यक्ती आत्महत्या करतात अशी नोंद आहे. 
 •  १५ ते २९ या वयात भारतात आत्महत्येचं प्रमाण सर्वात जास्त दिसतं. 
 • एकतर्फी प्रेमातून, अयशस्वी प्रेमातून होणाऱ्या आत्महत्या, परीक्षांचे निकाल, पैशांच्या समस्या, शेतीतील नापिकी कर्जबाजारीपणा, हुंडा, घरात होणारे अत्याचार अशा अनेक कारणांनी भारतात आत्महत्या होत असतात.

संबंधित बातम्या