मनाची काटकता

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

माइण्ड रि- माइण्ड

आपल्यापैकी कुणीही जर आत्मचरित्र लिहायला घेतलं तर त्यात ‘लॉकडाउनचे दिवस’ ‘कोरोनाचा काळ आणि मी’ अशी प्रकरणं हमखास लिहिली जातील. कारण इतक्या थोड्या दिवसात या महासाथीने आपल्या आयुष्याचा एक मोठा भाग व्यापून टाकला आणि या काही दिवसात आपण सगळे कधीही न पाहिलेल्या आणि मनात कल्पनाही न केलेल्या प्रश्नांना सामोरे गेलो, अजूनही जात आहोत.

स्वतःच्या आयुष्याची भीती, आपल्या जिवलगांच्या आयुष्याची भीती, पूर्वीच्या आठवणी (ते हरवलेले दिवस), सतत जाणवणारा परिस्थितीबद्दलचा हताशपणा या सर्व परिस्थितीचा आपल्या रोजच्या जगण्यावर, कामावर झालेला परिणाम...  आणि असं बरंच काही...

कोरोनाकाळामुळे पुढच्या आयुष्यात आपले सगळ्यांचे जगण्याचेही संदर्भ बदलून जातील. टाळेबंदीच्या ‘आधी आणि नंतर’ असा एक संदर्भ सर्वांच्या जगण्याला येईल.  

जगभर आणि आपल्या आसपाससुद्धा अशा पद्धतीनं माणसं मृत्यूमुखी पडताहेत हे आपण यापूर्वी पाहिलं नव्हतं आणि अशा प्रकारचा एकटेपणाही अनुभवला नव्हता. अशा अनिश्चिततेसोबतही आपली कधीच ओळख नव्हती. त्यामुळे आपण ऑलरेडी एका नव्या जगात प्रवेश केलेला आहेच. या नंतरचं जग कसं असेल याची अजून काही कल्पना करता येत नाहीये. कारण समजतंय ते इतकंच की जगात सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळ्यांवर बरेच बदल होतायत.. आणि कदाचित सतत बदल होत राहणारं किंवा ज्याला चंचल म्हणता येईल अशा जगात आपल्याला राहावं लागेल. या अशा कल्पनेतल्या किंवा कल्पनेबाहेरच्या गोष्टींना सामोरं जायचं असेल तर मनाने काटक असायला हवं.

साथीच्या आजाराचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केलेल्या मानसशास्त्रज्ञांचंही हेच मत आहे. अशा प्रसंगानंतर माणसं पुन्हा नव्याने उभी राहातात. कोणत्याही आपत्तीला तोंड दिल्यानंतर माणसं तुलनेने खूपच लवकर त्यांचं आयुष्य पुन्हा सुरू करतात, हे अशा अनेक प्रसंगांनंतर दिसलेलं आहे. मनाचा काटकपणा ही तशी दुर्मीळ गोष्ट नाही, किंबहुना ती सहजगत्या निदर्शनास येणारी गोष्ट आहे, असं मानसशास्त्रज्ञांचं मत आहे.

अशा व्यक्ती पाहिल्या की राखेतून उडणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखं अद्‌भुतही वाटतं. नशीब, योग यासारखी कारणं आपण शोधत रहातो आणि मनाशी त्याचा एक अर्थ तयार करतो. पण या सगळ्याच्या मागे असते ती मनाची ताकद- मनाचा कणखरपणा. कठीण परिस्थितीतही मोडून न जाता पुन्हा उभं राहण्याची मनाची किमया. ताणलं जाऊनही न तुटता पुन्हा पूर्वस्थितीत येण्याची माणसाच्या मनाची क्षमता; परिस्थिती पूर्ण विरोधात असताना, आता सगळे पर्यायच संपले- कंप्लीट डेड एंड असं वाटत असताना आपल्या मनाने दाखवलेली उमेद, जिगर, धैर्य.

जगाला हादरवून टाकणाऱ्या ९/११च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम अनुभवलेले न्यू यॉर्कवासीय, ज्यांनी त्या हल्ल्यात आपले जिवलग गमावले अशा अनेक सर्वसामान्य माणसांचा अभ्यास करून जॉर्ज बोनॅनो नावाच्या मानसतज्ज्ञाने दाखवून दिलं, की मनाचा काटकपणा ही दुर्मीळ गोष्ट नाही. नाही तर बॉबस्फोटानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ववत चालू होणारी मुंबई आपल्याला दिसली असती का? किंवा लातूरचा भूकंप, सांगली, कोल्हापूरला आलेले पूर. या सगळ्या आपत्तींनंतर ज्या पद्धतीने तिथली माणसं उभी राहिली त्यातून त्यांचा काटकपणाच दिसतो.

इतिहासात डोकावून पाहिलं तर मनाच्या काटकतेची अनेक उदाहरणं सापडतील. अगदी आजच्या काळातसुद्धा मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजाराला तोंड देत कर्जाच्या ओझ्यातून पुन्हा स्वतःला सावरणारा प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन काय किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगातून बाहेर पडून यशस्वी पुनरागमन करणारा क्रिकेटपटू युवराज सिंग काय, ही सगळी उदाहरणं आपल्याही मनाची उमेद वाढवणारीच आहेत. पण अशा प्रसिद्ध माणसांप्रमाणे आपल्या जवळपासही अशी अनेक माणसं दिसतात जी कठीण परिस्थितीतही टिकून राहतात.

माणसं मनानं काटक असतात म्हणजे त्यांना वाईट वाटत नाही, दुःख होत नाही किंवा त्यांना कसलाच ताण येत नाही असं नसतं. उलट या सर्वांना आपल्या जगण्यात असे धक्के बसतात, असं अपयश येऊ शकतं याची पूर्ण जाणीव असते. कोणत्याही आघातानंतर आपण काय गमावून बसलो आहोत याची पूर्ण जाणीव त्यांना असते. पण या सगळ्या गोष्टींना स्वीकारून जगण्याला सामोरं जाण्याची त्यांची तयारी असते. 

त्यामुळे आत्ता या परिस्थितीतून जाताना स्वतःला जसं टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे तितकंच हा काळ संपल्यावर नवीन जगात स्वतःला उभं करण्यासाठी मनाने काटक असणं महत्त्वाचं आहे.

माणसं जेव्हा कोणत्याही आपत्तीला सामोरी जातात तेव्हा त्यांच्या मनात विविध भावभावना निर्माण होतात (जशा आत्ता आपल्याही मनात निर्माण होत आहेत.) यात काही परस्परविरोधी भावनाही असतात. मनाचा काटकपणा या भावनांचा समतोल साधायला शिकवतो. या काळातून जाताना आयुष्यावरचं नियंत्रण साध्य करण्याआधी ही कदाचित खूप महत्त्वाची गोष्ट असते. 

मनाची काटकता म्हणजे जगण्यातल्या अशाश्वततेला, अनिश्चिततेला अतिशय धैर्यानं सामोरं जाण्याची क्षमता. मनाचा काटकपणा अशा कोणत्याही परिस्थितीत आपली सकारात्मकता (वास्तव न नाकारता) आणि आशावादी कृती जागी ठेवतो. मनाचा काटकपणा अशा कोणत्याही तणावपूर्ण काळात, अजून आपल्या हातात, नियंत्रणात जगण्यातल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत याचं भान जागं करतो. मनाचा काटकपणा म्हणजेच आपल्याच मनाने आपल्याला मारलेल्या हाका आहेत.

ज्या व्यक्तींमध्ये मनाचा काटकपणा असतो त्यांच्यामध्ये कोणते पैलू असतात?
    जाणीव – त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाची, त्यातल्या क्षमतांची, मर्यादांची, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीची, भावनांची जाणीव असते. तणावपूर्ण परिस्थितीतून जाताना भावनांच्या हाताळणीसाठी त्यांना याचा उपयोग होतो.

 •  समस्या सोडविण्याचे कौशल्य (Problem Solving Skills) – कोणतीही समस्या समोर आली तर अशी माणसं त्याचं बारकाईनं निरीक्षण करतात. त्यातले बारकावे समजून घेतात. त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करतात आणि योग्य पद्धतीने ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. समस्येकडे ते आव्हान म्हणून पाहतात, अडथळा म्हणून नाही!
 • आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची ते योग्य ती जबाबदारी घेतात. सर्वच गोष्टी नशीबासारख्या गोष्टींवर दोषारोप करून बसून राहात नाहीत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या नियंत्रणातल्या गोष्टींचा ते वापर करतात.
 • चिकाटी – अशा माणसांमध्ये चिकाटीने काम करण्याची वृत्ती असते. कोणत्याही गोष्टींचा न कंटाळता पाठपुरावा करणं त्यांना महत्त्वाचं वाटतं.
 • कोणताही त्रास सहन करण्याची क्षमता मनाने काटक असणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त असते. 
 • त्यांच्यामध्ये स्वतःच्या भावनांचं, मनात निर्माण होणाऱ्या ऊर्मीचं नियोजन करण्याची क्षमता असते.
 • मदत मागता येण्याची क्षमता – मनाने काटक असणाऱ्या व्यक्ती अडचणीच्या वेळी मदत मागू शकतात. त्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही.
 • सकारात्मक स्व-प्रतिमा- स्वतःबद्दलचा स्वीकार आणि स्वतःकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. 
 • निरोगी नातेसंबंध: इतरांशी असणारे निरोगी नातेसंबंध हा मनाच्या काटकतेला खतपाणी घालणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. 
 • आतासारख्या अनिश्चित काळाला सामोरं जाताना मनाची काटकता जपायची असेल, वाढवायची असेल तर काय करायला हवं? 
 • आपण ज्या चौकटीतून जग बघण्याचा प्रयत्न करतोय ती चौकट अजून थोडी मोठी करायला हवी. त्यामुळे त्यात इतर काही गोष्टी दिसतील ज्या आत्तापर्यंत दिसत नव्हत्या आणि त्यानं परिस्थितीचं आकलन व्हायला, त्यातले बारकावे समजायला त्याची मदत होईल.
 • स्वतःकडे बघण्याचा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन- मनाने काटक असणाऱ्या व्यक्ती स्वतःकडे लढवय्ये  म्हणून पाहतात. कारण कोणत्याही परिस्थितीतून त्यांना स्वतःला तारून न्यायचं असतं. त्यामुळे ते स्वतःकडे परिस्थितीचा बळी म्हणून पाहात नाहीत.
 • बदल हा आपल्या जगण्यातला एक मूलभूत भाग आहे. आपल्या आसपासचं जग कायम बदलत असतं, त्यात छोटे, मोठे बदल होत असतात आणि त्याचा जगण्यावर परिणाम होत असतो. या बदलांचं भान या व्यक्ती जागं ठेवतात.
 • या व्यक्ती विचारांमधील लवचिकता जोपासण्याचा प्रयत्न करतात. विचारांमधला हट्टीपणा कमी करण्याचा प्रयत्न करतात.
 • मनाने काटक असणाऱ्या व्यक्ती स्वतःची काळजी घेतात. स्वतःच्या शारीरिक, मानसिक आरोग्याकडे आवर्जून लक्ष देतात. आपली ऊर्जा टिकून कशी राहील याचा ते प्रयत्न करतात.
 • ते स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवतात.
 •  नातेसंबंधांची काळजी घेतात. निरोगी नाती निर्माण करायला खूप प्रयत्न करावे लागतात व त्यात खूप ऊर्जा गुंतवावी लागते याचं त्यांना भान असतं.
 • अशा व्यक्तींना स्व संवादांचं भान असतं व आपल्या आतल्या आवाजाशी ते जोडलेले असतात.
 • मेडिटेशन करणं, स्वतःचे विचार लिहून काढणं, स्वतःच्या भावना व्यक्त करणं अशा गोष्टी करत राहिल्याने मनाचा काटकपणा वाढवण्यास मदत करता येते.
 • मनाची काटकता जपायची असेल तर आपल्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.

मनाचा काटकपणा वाढवणं हीसुद्धा प्रत्येकासाठी वेगवेगळी प्रक्रिया असू शकते. कदाचित त्याचे मार्गही वेगळे असू शकतात पण त्यासाठी आपलं स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम असायला हवं. 

आत्ता आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीतून जाताना आपल्यामध्येही हा काटकपणा आहे याची जाणीव अनेक जणांना झाली असेल. आपण निभावून नेत आहोत गोष्टी, आपण करत आहोत चिकाटीने हे जेव्हा जाणवतं तेव्हा ‘अरे हे आहे की आपल्यामध्येसुद्धा’ याची जाणीव होते. अशा प्रसंगातून गेल्यावर अशा व्यक्तींची आयुष्याबद्दलची समज खोलवर होते. कधी या निमित्तानं आयुष्य नव्यानं आखावं लागतं. आयुष्याकडे, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलणारा हा क्षण असतो. आपल्याला तो क्षण समजून घेण्याचा प्रयत्न करायचाय. कारण हा क्षण आपल्याला स्वतःमध्ये बदल जाणवून द्यायला मदत करणारा आहे. या निमित्ताने बरीच माणसं आता मला जगण्यात काय महत्त्वाचं आहे? मी कोणत्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात. असाही विचार करायला लागतात. म्हणून या परिस्थितीत निरोगी शरीर व निरोगी मन टिकवणं हेच आत्ताचं आव्हान आहे. हा काळ संपला, आपण एका न्यू नॉर्मलमध्ये प्रवेश केला की तेव्हा आपल्याला मनाची काटकता मदत करणारच आहे. कारण तेव्हा कदाचित नवीन आव्हानं, नवीन तडजोडी असतील आणि त्याला सामोरं जायला हीच मनाची काटकता आपल्याला मदत करेल. 

त्यामुळे आत्ता आपल्या समोरच्या आव्हानांना कसं सामोरं जायचं आणि आपल्या काटकतेला कसं खतपाणी घालायचं याचा विचार करू या.

संबंधित बातम्या