सहजपणे जगूया

डॉ. संज्योत देशपांडे
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

माइण्ड रि- माइण्ड

कोरोना विषाणूच्या निमित्ताने जी टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्यात जे बदल करावे लागले, त्यामुळे आपण सजगतेने जगायला शिकलो आहोत.

कोरोना काळ सुरू झाला.. टाळेबंदीमुळे आपण अचानक आपल्याच घरात बंद झालो. आपलं अतिशय वेगवान असलेलं जगणं क्षणार्धात जागच्या जागी थांबून गेलं. त्या आधी आपल्याला अशा पद्धतीने स्वतःसोबत राहण्याची वेळच आली नव्हती. पण तेव्हा संपूर्ण वेळ घरात आपण स्वतःसोबत राहायला लागलो आणि अनेक गोष्टींबाबत सजग झालो. सजग होणं, म्हणजेच माइण्डफुलनेस, म्हणजे नेमकं काय हे समजून शिकवून जेवढं जमलं नसतं तितकं या अनुभवातून आपल्याला समजायला लागलं.

सजगता म्हणजे आहे त्या क्षणामध्ये, त्याला कोणतेही नाव न देता, भावना न चिटकवता, त्याचं मूल्यमापन न करता, उपस्थित असणं. मला भूतकाळाचा विचार करायचा नाही, ना भविष्यकाळाचा! मी आत्ता जे करते आहे त्या क्षणामध्ये मला उपस्थित राहायचं आहे.

 • तर कोरोना विषाणूच्या निमित्ताने ही जी टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्यात जे बदल करावे लागले त्यामुळे आपण सजगतेने जगायला शिकलो आहोत. उदाहरणार्थ –
 • उगाच चेहऱ्याला हात लावू नकोस.
 • बाहेर काही अत्यावश्यक कामासाठी गेलास तर उगाच इकडे तिकडे स्पर्श करू नको. म्हणजे दुकानाच्या काउंटरवर हातच ठेवला, जिन्याच्या रेलींगला पकडलं.
 • हात धुवत राहा मधे मधे
 • असं बरंच काही सांगता येईल.

अजून मला जाणवलेली दुसरी गोष्ट – कोरोना काळाच्या आधीच्या जगात फक्त आणि फक्त कामाचाच विचार करताना बाकीच्या, आजूबाजूच्या वातावरणातल्या गोष्टी जाणवतच नव्हत्या. पण तुम्हाला आठवत असेल, त्या टाळेबंदीच्या काळात आपल्याला विविध पक्ष्यांचे आवाज ऐकू यायला लागले, वातावरणातले सूक्ष्मसे बदल जाणवायला सुरुवात झाली... त्या निमित्ताने आपण निसर्गाशी नव्यानं नातं जोडायला लागलो. 

तिसरी गोष्ट ः या निमित्ताने आपल्या सर्वांकडे जो खूप वेळच वेळ निर्माण झाला तो वेळ मी कसा वापरणार आहे याबाबतचीही सजगता आपल्या मनात निर्माण झाली, आणि अजून महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने आपल्याला स्वतःसोबत नातं जोडण्याची एक संधी मिळाली. कारण या काळाच्या आधी तसे आपण हरवलेलेच होतो. म्हणजे स्वतःसोबत असे जगत नव्हतोच. कारण त्यावेळी आपण बऱ्याच गोष्टी आपण आपल्याही नकळत –ऑटो पायलट मोडवर असल्यासारखं -करत होतो. म्हणजे, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडी चालवत जातो, पण आपण तिथे कसे पोहोचलो ते समजतही नाही. दिवसभरातल्या अशा कितीतरी गोष्टी आपण ऑटो पायलटवरच करत असतो. त्यात अंघोळ, खाणं-पिणं किंवा इतर बरीच कामं करणंसुद्धा आलं.

उदाहरणार्थ, रेखा सकाळी लवकर उठते. उठल्या उठल्या पांघरुणाची घडी घालते. ब्रश करून चहाचं आधण गॅसवर ठेवते आणि सवयीनं फ्रिज उघडते. फ्रीजमधील भाजी, दूध बाहेर काढते. स्वयंपाक करते. घर आवरते आणि असं सगळं आवरून वेळेत ऑफिसला पोहोचते. सवयीने संगणक चालू करते, दिवसभर असंच काम करते. मधेच येणाऱ्या फोनला उत्तर देते. दिवसभर काम करून रात्री घरी... मग परत अशीच कामं... झोप... आणि पुन्हा सकाळी सहाचा अलार्म.... चक्र चालूच. 

दुसरं म्हणजे आपण अतिशय विचलीत अवस्थेतल्या जगात जगतो आहोत. उदा. आपण सतत व्हॉट्सअॅप, फेसबुक यामध्ये वाहवत जातो किंवा अशाच समोर येणाऱ्या कोणत्यातरी गोष्टीत... आपल्याच विचारात.. आपण त्यात आपल्या नकळतपणे इतके वाहवत जातो की आपण आपल्या आयुष्यात उपस्थित आहोत का? हा प्रश्न पडतो. काही काही माणसं तर त्यामुळे मला त्यांच्याच आयुष्यात अनुपस्थित आहेत असंच वाटत राहतं. आपण काय जगतो आहोत, काय करतो आहोत, आपल्याला काय करायचं आहे, आपली उद्दिष्ट, आपल्याला भावनिक पातळीवर काय वाटतंय, आपल्या मनात कोणते विचार येतायत या सगळ्याचं भान अशावेळी निघून जातं. मग अशी माणसं फक्त जिवंत असतात, पण त्याचं आयुष्य ते जगत नाहीत.

रोजच्या सवयीच्या गोष्टी आपण अशा जाणिवेशिवाय तर करतोच, पण काही कामाच्या गोष्टीही सवयीच्या झाल्या की आपण त्याही अशाच ‘ऑटो पायलट मोड’मध्ये करत राहतो. ‘अर्थात प्रत्येक न प्रत्येक गोष्टीकडे सतत बारकाईने लक्ष द्यायलाच हवं असं नाही; पण या ‘ऑटो पायलट मोड’मध्ये काही गोष्टी मात्र हरवून जातात, आणि त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःबद्दलची जाणीव, ‘सेल्फ अवेअरनेस.’ कारण जगण्याच्या ओघात आपल्या सवयी, आपलं रुटीन, आपल्या प्रतिक्रिया, आपलं वाटणं असं सगळं आपोआप घडत जात असतं. आपल्या नकळत जे घडतंय ते क्षणभर थांबून बघायला, पॉज घ्यायला आपल्याला वेळ नसतो, किंवा तसं करण्याची आपली तयारी असतेच असं नाही. स्वतःविषयी जाणीव निर्माण करणं, स्वतःच स्वतःला सामोरं जाणं ही तशी सोपी गोष्ट नाही, पण जगण्यासाठी मात्र आवश्यक गोष्ट आहे. आपण आपलं आयुष्य कसं हाताळतो आहोत आणि आपण असं का हाताळतो आहोत हे जाणून घ्यायला हवं. 

सेल्फ–अवेअरनेस- ‘स्व’ची जाणीव. आपण कसे आहोत याची जाणीव निर्माण करणं- स्वतःला ओळखणं, ओळखायला शिकणं- स्वतःमधल्या क्षमता, कमतरता जाणून घेणं, आपली विचार करण्याची पद्धत, भावना अनुभवण्याची; व्यक्त करण्याची पद्धत, आपला स्वभावदोष, आपली मूल्यं, आपल्या सवयी. स्वतःविषयीचं सर्व काही जाणून घेऊन सुरुवात करायचीच असेल तर त्या ऑटो पायलट मोडमधून पॉज घ्यायला हवा आणि स्वतःकडे पाहायला हवं.

 •     माझं काय चालू आहे? मला काय करायचं आहे? मला काय वाटतंय?
 •     मला माझ्या जोडीदाराचा सारखा राग येतोय का? 
 •     पैशाचं सारखं टेन्शन येतंय का?
 •     माझा आत्मविश्वास हरवत चाललाय का? 
 •     माझ्या क्षमता मला वापरताच येत नाहीयेत का? 

सतत बाहेरच्या जगात वावरताना आपल्याला या आतल्या जगाचा विसर पडत जातो. बऱ्याचदा या गोष्टी मनात जाणवतही असतात; पण यापासून दूर जाण्याचे हे विचार, हा ताण टाळण्याचे हजारो मार्ग आपल्याकडे असतात आणि आपल्या कळत-नकळतपणे आपण ते वापरत राहतो. आपण असं काही करतो हे समजलं तर आणि तरच ही ‘स्व’ची जाणीव निर्माण करण्यातले अडथळे दूर करून आपल्याला स्वतःकडे पाहता येईल. 

त्यामुळे सर्वांत प्रथम चूक-बरोबर, चांगलं-वाईट असा कोणताही हिशोब न मांडता काय आहे ते पाहायला शिकणं. आपल्या आतल्या जगात डोकावून पाहणं, स्वतःला अधिकाधिक समजून घेणं. 

यातून आपल्या क्षमता- कमतरतांची, स्वभावाची जाणीव तर होतेच, पण आपल्या भावना, विचार करण्याची पद्धत यांचीही जाणीव होते आणि आपला स्वतःचा स्वतःसोबतचा संवादही त्यातून व्हायला सुरुवात होते. माझं म्हणणं, माझा आतला आवाज मला ऐकायला यायला लागतो. आपला हा स्वतःसोबतचा संवाद आपल्याला भावना हाताळायला मदत करतो. आपली भावनिक बुद्धिमत्ता जोपासायची असेल तर त्या प्रवासाची सुरुवात जाणिवेतूनच चालू होते.

आपला स्वतःबरोबरचा संवाद जेव्हा वाढतो, तेव्हा आपलीही स्वतःबद्दलची समज सखोल होत जाते, आपण स्वतःला अधिक समजून घ्यायला लागतो आणि समजायला लागतो. मग आवश्यक त्या ठिकाणी आपण स्वतःचे लाड करणं कमी करू शकतो किंवा स्वतःला उगाचच जास्त शिक्षा करण्यापासूनही परावृत्त करू शकतो. आपण अधिकाधिक ‘माणूस’ होत जातो. अर्थातच हे माणूसपण आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतं. स्वतःबद्दलच्या जाणिवेतून आपण अधिक सजग बनत जातो, आणि ही सजगता आपल्याला आपलं मानसिक आरोग्य जोपासायला, स्वतःची काळजी घ्यायला मदत करते. 

अर्थात ‘स्व’च्या जाणिवेचा हा प्रवास स्वतःच्या स्वीकाराकडे विनाशर्त जायला हवा आणि त्यासाठीही विशेष प्रयत्न करायला हवा. यात महत्त्वाचा प्रश्न उरतोच, की स्वतःविषयीची जाणीव निर्माण करायची कशी? 

 • सजगता ः आपल्या आत सजगतेने पाहणं, आपण जे करतो आहोत तिथे मनाने उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणं, स्वतःचं व स्वतःच्या विचार- भावनांचं निरीक्षण करणं, त्याची नोंद घेणं आणि त्यांचा विनाशर्त स्वीकार करणं. बहिणाबाई म्हणतात तसं आपलं मन मुळातच भिरभिरणारं आहे. आपण काही गोष्टी सजगतेने करायला शिकलो तर मनाला थोडी स्थिरता यायला मदत होते. शरीरातल्या संवेदनांचीही जाणीव होते. आपल्या शरीर-मनाचा संवाद त्यातून उलगडत जातो.
 • डायरी लिहिणं ः मनात येणारे विचार, आपल्याला काय वाटतंय ते लिहून काढणं ही खूप मदत करणारी गोष्ट आहे. बऱ्याचदा यातून आपल्याला आतल्या आवाजाची जाणीव मनात निर्माण होते. मनातले विचार बाहेर पडतात. विचारांचा गुंता कमी व्हायला त्याची मदत होते. मन मोकळं होतं. विचारांना दिशा येते. 
 • आतला आवाज ‘ऐकायला’ शिका ः आपण आतला आवाज ऐकायला लागलो तर आपण स्वतःशी बोलायला लागतो. आपली स्वतःसोबतची मैत्री वाढते. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत आपण राहू शकतो का? अर्थातच नाही. म्हणून स्वतःबरोबर मैत्री करायची असेल तर हा संवाद महत्त्वाचा. 
 • दिवसभरात थोडा वेळ तरी स्वतःसोबत राहा ः अनेक माणसांना थोडा वेळसुद्धा एकटं राहायला, स्वतःमध्ये डोकावून पाहायला नको वाटतं. आजच्या काळात थोडा वेळ जरी आपण रिकामे असलो तरी लगेच नकळतपणे आपल्या फोनमध्ये घुसतो. टिव्ही, सोशल मीडिया- फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इंटरनेट या गोष्टी आपल्याला यासाठी मदत करतात. स्वतःच्या विचारांना सामोरं जाण्यापेक्षा अशी व्यवधानं (distractions) आपण सहजगत्या स्वीकारतो. स्वतःबरोबर मैत्री करायची असेल तर दिवसभरातला थोडा वेळ तरी स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे. 

    तुमच्या जवळच्या माणसांना त्यांचं तुमच्याविषयी मत विचाराः आपल्याबरोबर काम करणाऱ्या माणसांचं आपल्या घरातल्या माणसांचं आपल्याबाबत एक निरीक्षण असतं. आपल्याला ते खऱ्या अर्थाने ओळखत (‘ओळखून’) असतात. स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर आपल्या जवळच्या माणसांना त्यांचं मत विचारा. त्याने आपल्याबाबत एक वेगळा दृष्टिकोन निर्माण व्हायला मदत होईल. 

आपल्या सर्वांनाच एक छान गुणवत्ता असणारं आयुष्य हवं आहे, आणि त्यासाठी ही स्वतःबरोबरची मैत्री नक्कीच गरजेची आहे.  

सध्याच्या काळात जगण्याविषयी सजग राहणं महत्त्वाचं आहे कारण कोरोना विषाणू च्या आपत्ती नंतर संपूर्ण जगभरात जे बदल होत आहेत त्यामध्ये सजग राहणं आपल्याला निश्चितपणे मदत करणारं ठरणार आहे.

संबंधित बातम्या