आनंद - शोध की निवड?

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 6 डिसेंबर 2021

माइण्ड रि- माइण्ड

आपल्याला आनंद नेमका कोणत्या गोष्टीतून मिळणार आहे? असा आनंद मिळवण्याचा खरंच काही फॉर्म्युला असतो का? म्हणूनच प्रश्न असा आहे की हा आनंद ‘शोधायचाय की निवडायचाय?’ 

कोरोनाच्या या काळात दिवाळीची सुट्टी संपवून आपण सगळ्यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. दिवाळी हा आनंदाचा सण! आनंद मिळवण्याचा आणि आनंद वाटायचा सण. पण गेल्या दीड वर्षात जगातल्या गोष्टी वेगाने बदलत गेल्या. आजूबाजूला अनेक आमूलाग्र बदल झाले. आता आपण एका वेगळ्या जगात वावरायला लागलो आहोत. तसे कोरोनामुळे झालेल्या पडझडीबरोबर बाकीचेही प्रश्न होतेच आपल्या जगण्यात. कोरोनासोबतच पूर, चक्रीवादळासारख्या आपत्तींनाही आपण तोंड दिलं. या सगळ्याचा माणसाच्या जगण्यावर परिणाम होत गेला... मनावरही परिणाम होत गेला... शिवाय आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित असणारे खूप प्रश्न आहेतच ना? वाढती महागाई, नात्यांचे प्रश्न, जगण्याचे ताण... असे कितीतरी. नैराश्याचं एक सावटच मनावर रेंगाळत राहतंय, सतत. आनंदी असावंसं वाटतंच आपल्याला सगळ्यांना. मग या अशा जगात कुणालाही हा प्रश्न पडतोच, की हा आपला आनंद शोधायचा कुठं? कधी असं वाटतं तो हरवतंच गेलाय आयुष्यातून हळूहळू.

याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजच्या जगात प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची  भावना खोलवर रुजत चालली आहे. आपलं कोणत्याच गोष्टीवर कसलंच नियंत्रण नाही, याची जाणीव प्रखर होत आहे. जगण्यातली अशाश्वतता अंगावर येत आहे. मग कसा मिळणार तो आनंद...? कारण कितीतरी गोष्टी माझ्या मनाविरुद्धच घडताहेत ना! 

आनंद ही मनात चैतन्य निर्माण करणारी भावना आहे. जगण्याला सामोरं जाण्याची उमेद निर्माण करणारी भावना आहे. जगण्याच्या उत्साहात वाढ करणारी, आत्मविश्वास दृढ करणारी भावना आहे. जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला शिकवणारी भावना आहे. आपल्या सर्वांनाच ही भावना हवी आहे. पण अशा या जगात कसा मिळेल तो निर्भेळ आनंद? काय झालं किंवा केलं तर मला आनंद मिळेल? 

  • खूप पैसा मिळाला तर मी खूष होईन?
  • गाडी, बंगला ही माझ्या मनातली स्वप्न पूर्ण झाली तर मी खूष होईन?
  • छान नोकरी मिळाली तर?
  • मुलं छान मार्गी लागली तर..?

अशा अनेक प्रश्नांना आपण सामोरे जातो. पण ‘दिल खूष करने’ का फॉर्म्युला मात्र हाती लागत नाही.

खरंतर आजच्या या जगात आनंद शोधून सापडणार आहे का? म्हणूनच प्रश्न असा आहे की हा आनंद ‘शोधायचाय की निवडायचाय?’ 

विचार करा आणि तुमची एक यादीच तयार करा. आपल्याला आनंद नेमका कोणत्या गोष्टीतून मिळणार आहे? असा आनंद मिळवण्याचा खरंच काही फॉर्म्युला असतो का? अशा कितीतरी हव्या असणाऱ्या गोष्टींमध्ये आपण तो शोधत राहायचं का? आणि त्या गोष्टींमध्येही तो सापडेलच हे कशावरून? असा विचार केला की लक्षात येईल... आनंद शोधायचा नसतो, निवडायचा असतो...

खरंच कसा मिळेल हा आनंद...

Happiness is a choice. Actually you choose to be happy. या वाक्याचा विचार करून पाहिला तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की सगळं मनाविरुद्ध घडणाऱ्या या जगात अशीही काही माणसं आहेत की ती आनंदी दिसतात. त्यांना कसं बरं जमतं हे सगळं? आनंद कोणत्या गोष्टीशी निगडित असतो?

आनंद आणि संयम

गेल्या दोन वर्षात आपण सर्वांनीच अभूतपूर्व अशी टाळेबंदी अनुभवली. आजही तिचं सावट आपल्या जगण्यावर आहे. आपल्याला वाटतात तशा, म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे, आपण गृहीत धरल्याप्रमाणे गोष्टी घडतातच असं नाही, हे या काळात आपण चांगलंच अनुभवलं. त्याआधीच्या जगात रिमोट कंट्रोलचं बटण दाबलं की हव्या त्या गोष्टी आपल्या समोर उभ्या राहायला हव्या अशी आपली मानसिकता होती. चुटकीसरशी सर्व सुविधा पुरविणारं जग आपल्याला हवं आहे आणि अशा सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणाही आपल्या आसपास निर्माण होतायंत. पोळ्या करायला घरी येणाऱ्या बाईंकडे मोबाईल नसेल तर आपली चिडचिड होते आणि हवी असलेली गोष्ट आणून द्यायला (घरपोच डिलिव्हरी) कुणी उशीर केला तर ते आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे एका अर्थाने आपण चक्क लाडावलेलं बाळ होत चाललो आहोत. कोणत्याही गोष्टीची वाट पाहायला, कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी कष्ट करायला आपलं मन तयार असतं का? आपल्या अशा वागण्याचे दूरगामी परिणाम काय होतात, हे महत्त्वाचं वाटत नाही; पण आत्ता या क्षणाला हवी असलेली मजा मात्र हवीशी वाटते. अशा वेळेस खरोखरच एक क्षण थांबून आपली आनंदाची व्याख्या तपासून पहाविशी वाटते. तात्पुरत्या क्षणाचा आनंद मिळविण्याच्या नादात आपण आपल्या जगण्यातला खरा आनंद कुठे हरवून बसत नाही ना याचा शोध घ्यायला हवा.

आपली एकंदरीतच त्रास सहन करण्याची क्षमताच कमी झाल्याने (Low Frustration Tolerance) कामातलं सातत्य, अथक प्रयत्न अशा गोष्टी भयानक वाटायला लागतात. सगळं सहज सोपं असायला हवं असं वाटणारी वृत्ती आनंदाचे सोपे मार्ग पुढे करत राहते. पण त्यातून टिकणारा आनंद मिळतो का? हा खरा प्रश्न आहे. आनंद मिळवायचा असेल तर आपला संयम, सहनशीलता वाढवणंही नक्कीच महत्त्वाचं आहे.

आनंद - स्वप्रतिमा

स्वतःविषयी छान वाटणं हा आनंदाच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग आहे. मागे एकदा बारावीतला एक मुलगा समुपदेशनासाठी माझ्याकडे आला होता. आठवी, नववीपासून अभ्यासातलं त्याचं लक्ष उडालं होतं. क्षमता असूनही चांगले गुण मिळत नव्हते. कारण तेवढे कष्टच तो घेत नव्हता. आपण असं वागायला नको असं समजत होतं. पण नेमकं काय करायचं हे माहीत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता बरंच काही सांगत होती. स्वतःच्या वागण्यावर तो खूष नव्हता. स्वतःचं वागणं नियंत्रणात आणण्याची कुवत तो गमावून बसला होता. कधी कधी समजत असूनही आपण आपल्या वागण्यात, वृत्तीत बदल करत नाही. मी वागतेय ते चुकीचं आहे हे समजत असून त्यात बदल करत नाही. वजन वाढत चाललंय. मी व्यायाम करायला हवा, आहार नियंत्रित करायला हवा. पण आपण करत नाही.

वेळेचं नियोजन मी खरं तर करायला हवं. पण... किती कामांची चालढकल... खरं तर करायला नको पण... माझा राग माझ्याच मार्गातला अडथळा झालाय... पण... धूम्रपान केव्हाच बंद करायला हवं... आपल्याला स्वतः मधल्या अशा अनेक गोष्टी आवडत नसतात. नव्या वर्षीचे संकल्प कागदावर राहतात.  

“मी... ना असाच आहे...?” असं आपण स्वतःवर शिक्कामोर्तब करतो. पण असं आपल्याला स्वतःविषयी छान न वाटणं यातून आपल्या जगण्यातला आनंद किती कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे का? स्वतःविषयी समाधानी असणं ही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे.

रिकाम्या वेळात तुम्ही जेव्हा एकटेच असता, जेव्हा स्वतःलाच सामोरं जाण्याची वेळ येते, तेव्हा आपली मानसिकता कशी असते? स्वतःबरोबरचा तो वेळ आपण कसा घालवतो?

स्वतःविषयी छान वाटणं हा आनंदाच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग आहे. ‘जब वी मेट’ मधली गीत आठवून पहा बरं. ‘मै अपनी फेव्हरीट हूँ..’ असं म्हणणारी किंवा ‘मेरा फेव्हरीट गेम जिंदगी है..’ असं सांगणारी, स्वतःवर अतिशय खूष असणारी! आपलं स्वतःवर प्रेम असणं, स्वतःविषयी सकारात्मक वाटणं, स्वतःबरोबर कंफर्टेबल राहता येणं या आनंदाच्या प्रक्रियेतल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा जेव्हा आपण स्वतःवर नाखूष होतो तेव्हा या आनंदाला तडा जातो आणि मग आपण स्वतःशी अजूनच वाईट वागत राहतो. चुकीचं वागतोय असं समजून मग आपण स्वतःत बदलही करत नाही. स्वतःबद्दलची सकारात्मक स्वप्रतिमा मनात असणं ही आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. आनंद हवा असेल तर स्वतःविषयी छान वाटणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मनातली स्वप्रतिमा ही नेहमीच आपल्या जगण्यावर परिणाम करणारी ठरते. म्हणून आनंद हवा असेल तर स्वतः:विषयी छान वाटणं खूप महत्त्वाचं आहे. 

आनंद आणि जीवनशैली

कोरोनाच्या काळात एकंदरीतच निरोगी राहण्याविषयी, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याविषयी खूपच जागरूकता वाढली. इतके दिवस आपण काय करत होतो आणि आता काय करायला हवं हे समजावून घेऊन, स्वतःची काळजी घेण्याचे प्रयत्न अनेक जण करायला लागले.  आता जग पूर्वपदावर आणण्याच्या नादात आपण नुसतेच जर धावायला लागलो तर मनात पुन्हा एकदा सेकंदासेकंदाचा हिशोब करत बसावा लागेल आणि मग स्वतःसाठी वेळ राहणार नाही, सगळेजण नुसते धावताना दिसतील. आपली नाती, छंद, घर, स्वतः आपण; सगळं नुसतं कायमचं होल्डवर ठेवलंय अशी अवस्था व्हायला लागेल. म्हणून आपली जीवनशैली कशी आहे याचं भान ठेवा आणि ठरवा आणि प्लॅन करा, एक मीटिंग आनंदाबरोबर...

आनंद आणि आयुष्याचा अर्थ

आपण का जगतो? कशासाठी जगतो? या जगण्याचा अर्थ काय...? अशा बेसिक प्रश्नांना सामोरं जायला खरंतर वेळ नसतो. पण आयुष्यातल्या काही घटना, घडणारे प्रसंग असे प्रश्न केव्हा ना केव्हा उभे करतात? जसा आत्ता कोरोना काळातून जाताना हा प्रश्न आपल्या मनात डोकावला. आपलं अस्तित्व तपासून पाहायला लावणाऱ्या या प्रश्नांची रेडिमेड उत्तरं नसतातच. पण आपापल्या कुवतीप्रमाणे आपण ती शोधत राहतो. आपण जसे आहोत त्याला आपण जबाबदार आहोत. माझ्या वागण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या भावनांना मी जबाबदार आहे... बऱ्याचदा या ‘स्वत:च्या असण्याची’ जबाबदारी आपण स्वीकारली तर आयुष्याचे वेगळे अर्थ आपल्याला समजत राहतात... आणि त्यामुळे जगण्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण होतो आणि आनंद ही अशावेळी आपल्या आवाक्यातली गोष्ट वाटायला लागते.

आनंद आणि नियंत्रण

कोणत्या गोष्टी माझ्या नियंत्रणाखाली आहेत आणि कोणत्या गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेरच्या आहेत याचं भान बऱ्याचदा आपल्या मनावरचा ताण कमी करतं... आणि खरंच तोही आनंदाकडे जाण्याचा एक मार्गच आहे.

आनंद - स्वातंत्र्य आणि उमेद 

खरंच आनंद ही अशी स्वतःमध्ये, स्वतःच्या वृत्तीमध्ये असलेली गोष्ट बाहेर कुठे शोधायला हवी का? आपण असे बाहेरच्या जगात, माणसांमध्ये - वस्तूंमध्ये - नात्यांमध्ये आनंदाचे क्षण शोधायला लागलो तर तो आनंद कदाचित मुठीतून निसटून जाणाराच असेल. खरा आनंद हा आपल्या आत्मनिर्भर वृत्तीत असतो. मनानं स्वतंत्र असणं त्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण करत असलेली निवड आणि त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची उमेद यासाठी आवश्यक आहे.

आपल्या भावनांना आपण योग्य प्रकारे हाताळायला शिकलो तर त्याने आपल्या जगण्यातले ताण हाताळायला मदत होते. आणि अशावेळी आनंद आपल्याला आपल्या आवाक्यातली गोष्ट वाटते. कारण नाउमेद करणाऱ्या गोष्टी जरी घडल्या तरी अशावेळी आपली उमेद संपत नाही.
आनंद ‘शोधायचा की निवडायचा?’ 

काय वाटतं तुम्हाला...?

संबंधित बातम्या