लॉकडाउनचा धडा

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 20 डिसेंबर 2021

माइण्ड रि- माइण्ड

परिस्थिती माणसाला खूप काही शिकवत असते, असं आपण नेहमीच म्हणतो. कोरोना विषाणूच्या निमित्ताने ज्या ज्या बदलांना आपण सामोरे गेलो त्या परिस्थितीने काय शिकवलं आहे आपल्याला?..आणि ही परिस्थिती अजूनही काय शिकवत आहे आपल्याला? 

गेले वर्षभर आपण कोरोना विषाणू आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात झालेले बदल, या गोष्टीचा आपल्या मनावर, मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम या विषयाच्या अनेक बाजूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ही अभूतपूर्व परिस्थिती अचानकपणे आपण सर्वांनी अनुभवली. त्या आधीचं आपलं जग वेगळंच होतं. त्यावेळी मुळात आपल्यावर आपल्या आयुष्यात अशाप्रकारे तुरुंगवास भोगायची वेळ येईल असं कधी वाटलं होतं का? किंवा बिग बॉससारखं असं एखाद्या घरात कोंडून राहण्याची वेळ येईल असं कधी मनात आलं होतं का? पण आपल्या ध्यानीमनी नसणाऱ्या गोष्टी अशा ध्यानीमनी नसतानाच  होतात आणि खूप फिलॉसॉफिकली बोलायचं तर, यालाच आयुष्य म्हणतात.

परिस्थिती माणसाला खूप काही शिकवत असते, असं आपण नेहमीच म्हणतो. पण  या वाक्यात एक बाब अध्याहृत आहे, तुम्ही परिस्थितीला गुरू मानत असाल तर ... आणि तरच..! म्हणून कोरोना विषाणूच्या निमित्ताने ज्या ज्या बदलांना आपण सामोरे गेलो त्या परिस्थितीनं काय शिकवलं आहे आपल्याला? ..आणि अजूनही ही परिस्थिती काय शिकवते आहे आपल्याला? काही मुद्दे सांगता येतील..

जबाबदार वर्तन
जबाबदार वर्तनाची एक सोपी व्याख्या आहे – माझ्या वागण्याचे आत्ता किंवा दूरगामी काय परिणाम होतील हे विचार करून वागणं. आत्ता या कोरोना विषाणूच्या निमित्ताने ‘जबाबदार वर्तन’ ही खूपच महत्त्वाची गोष्ट होऊन बसली आहे आणि त्याची जबाबदारी सर्वांनी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

साथीचे आजार जेव्हा पसरतात तेव्हा त्याची एक मानसिक बाजूसुद्धा असते, असं मानसशास्त्रज्ञ साथीच्या आजारांबाबत सांगतात. कोणतातरी एक जीवजंतू – विषाणू;  त्याची शरीराला लागण होणं इतकी ती गोष्ट मर्यादित नसते. पण या सर्व गोष्टींमध्ये माणसं कशी वागतात? या आजाराला किती समजून घेतात? त्याला आळा घालण्यासाठी त्यातली स्वतःची जबाबदारी कशी समजून घेतात? आणि किती स्वीकारतात? या गोष्टींना पण खूप महत्त्व आहे. ‘हा कोरोना विषाणू वाटतो तेवढा गंभीर  नाही, किंवा मला हा आजार होणार नाही,’ असं जर मला वाटत असेल तर मी खूप बेफिकिरीने त्याकडे बघेन आणि मग जबाबदारी न घेता वागेन. आणि उलट, ‘बापरे मी मरणार तर नाही ना?’ या भावनेचा मनावर खूप ताण आला, तर खूप भीतीने पॅनिक अवस्थेत बसून राहीन... आणि म्हणूनच कोरोना विषाणूची साथ थांबवायची असेल  तर जबाबदार वर्तनाला पर्याय नाही.

आपण सर्वांनी कोरोना साथीशी निगडित वर्तन करणं, म्हणजे व्यक्तींमधले पुरेसे अंतर, हात धुणं, मास्क वापरणे या गोष्टी समजून घेऊन त्याची जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे. या जबाबदार वर्तनाला अडथळा आणणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातली एक म्हणजे आवेग (impulsivity), सणकीपणे वागणं... मनात येईल तसं, त्या वागण्याच्या परिणामांचा विचार न करता वागणं. मग त्यामुळेच तर सोशल मीडियावर अफवांचा प्रादुर्भाव होतो, हेही आपण पाहिलं. जबाबदार वागणं का महत्त्वाचं आहे? कारण अशा वागण्यातच माझं, माझ्या कुटुंबाच्या, माझ्या आसपासच्या समाजाचं आणि पर्यायाने देशाचं हित आहे. आपली छोटीशी कृती देशाच्या हिताचे काम करू शकेल. कधी काळी असा विचार तरी कधी केला होता का?

सजगता (Mindfulness)
सजगता  म्हणजे नेमकं काय हे समजावून, शिकवून जेवढं जमलं नसतं तितकं आत्ता समजतंय. सजगता म्हणजे आहे त्या क्षणामध्ये उपस्थित असणं. मला भूतकाळाचा विचार करायचा नाही, ना भविष्यकाळाचा! मी आत्ता जे करते आहे त्या क्षणामध्ये मला उपस्थित राहायचं आहे.

आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी ऑटो-पायलट मोडवर करत असतो. उदाहरणार्थ, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडी चालवत जातो, पण आपण तिथे कसे पोहोचलो ते समजतही नाही. दिवसभरातल्या अशा कितीतरी गोष्टी अशाच पद्धतीने ‘घडत’ असतात. त्यात अंघोळ आली, खाणं पिणं किंवा इतर बरीच कामं करणंसुद्धा आलं. दुसरं म्हणजे आपण अतिशय distracted -विचलित अशा जगात जगतो आहोत. म्हणजे, आपण सतत व्हॉट्सअॅप, फेसबुकमध्ये किंवा त्याच जगात वावरत आहोत. आपण आपल्या आयुष्यात उपस्थित आहोत का? आपण काय जगतो आहोत, काय करतो आहोत, आपल्याला भावनिक पातळीवर काय वाटतंय, आपल्या मनात कोणते विचार येतायत...

  • पण कोरोना विषाणूच्या निमित्ताने जी परिस्थिती आपण अनुभवली, त्या परिस्थितीमध्ये आपण आता सजग झालो आहोत. काही गोष्टी सांगायला, बोलायला लागलो आहोत.
  • उगाच चेहऱ्याला हात लावू नकोस
  • बाहेर काही अत्यावश्यक कामासाठी गेलात तर उगाच इकडे तिकडे स्पर्श करू नको. म्हणजे दुकानाच्या काउंटरवर हातच ठेवला, जिन्याच्या रेलींगला पकडलं, असं नको
  •  हात धुवत राहा मधेमधे -असं बरंच काही सांगता येईल.

मला जाणवलेली अजून दुसरी गोष्ट, कोरोना काळाच्या आधी आपण फक्त आणि फक्त कामाचाच विचार करत होतो. त्या काळात  बाकीच्या, आजूबाजूच्या वातावरणातल्या गोष्टी जाणवतच नव्हत्या. पण मागच्या वर्षी टाळेबंदीच्या काळात आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव व्हायला लागली. विविध पक्ष्यांचे आवाज ऐकू यायला लागले, वातावरणातले सूक्ष्मसे बदल जाणवायला लागले. आपण निसर्गाशी नव्याने नातं जोडायला लागलो, कारण या काळात त्याची जाणीव मनात निर्माण झाली.

तिसरी गोष्ट. टाळेबंदीमुळे आपल्या सर्वांकडे खूप वेळच वेळ निर्माण झाला होता, आणि तो वेळ मी कसा वापरणार आहे याबाबतची सजगता आपल्या मनात निर्माण झाली. पण जगण्याविषयी सजग राहणं महत्त्वाचं आहे. कारण कोरोना विषाणूसोबत जगताना, बदललेल्या जगात वावरताना सजग राहणं आपल्याला निश्चितपणे मदत करणारं ठरणार आहे.

समायोजन (Adjustment) 
परिस्थितीबरोबर समझोता म्हणजे काय हे एका प्रात्यक्षिकामधून आपण शिकलो. आणि आपण तो समझोता आपापल्या परीने करण्याचा प्रयत्न केला.  कारण, ऐकलं नाही बंड पुकारलं तर काय परिणाम होतील? माहिती आहेच आपणा सर्वांना! आपण सवय नसताना सतत घरात राहिलो, नव्या दिनाक्रमासोबत जुळवून घेतलं, प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण समायोजन म्हणजे काय हे शिकलो.

स्वीकार (Acceptance) 
स्वीकार म्हणजे काय हे कोणत्याही मानसशास्त्रतज्ज्ञाने कितीही सोप्या भाषेत सांगितलं तरी न समजणारी गोष्ट. म्हणजे कळते पण वळत नाही. पण आजची परिस्थिती नाकारून चालणारच नाही. आपण तिचा जितका स्वीकार करू तितकी आपल्यालाच मदत होणार आहे. ‘स्वीकार’ या मुद्द्याबाबत आपण बरंच बोलतो, ऐकतो पण गोष्टी जेव्हा मनासारख्या घडत नाहीत तेव्हा तो ‘स्वीकार’ किती अवघड असतो हे ही आपल्याला समजतं.

स्वीकार म्हणजे आहे ही परिस्थिती अजिबात न नाकारता ती जशी आहे तशी बघणं! आणि ती जशी आहे तशी बघायला एक प्रकारचं धैर्य लागतं. गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारून खरं म्हणजे आपण स्वतःला मदत करत असतो. जेव्हा आपण घडणाऱ्या गोष्टींकडे त्या जशा आहेत तशा बघतो तेव्हा त्या परिस्थितीतल्या सर्व आवडणाऱ्या -न आवडणाऱ्या; पटलेल्या -न पटलेल्या, चुकीच्या किंवा बरोबर वाटणाऱ्या गोष्टींची दखल घेतो. आणि त्याची आपल्याला त्या गोष्टींना सामोरं जायला, त्यातून मार्ग काढायला, त्याबरोबर परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत होते. पण स्वीकार खरं म्हणजे आपल्याला एक प्रकारची मानसिक स्वस्थता देतो. गोष्टी नाकारत राहणं, हे असंच का- तसंच का नाही, अशा प्रश्नांसोबत झगडत राहणं, यात जो मनाचा झगडा होतो त्यात आपली खूप सारी मानसिक ऊर्जा जात असते. आणि त्यामुळे स्वीकार हा आपल्याला गोष्टी, परिस्थिती जशा आहेत तशा स्वीकारून त्याबरोबर पुढे जायला मदत करत असतो. स्वीकार आपल्याला सक्षम बनवतो आणि परिस्थितीची योग्य जाणीव मनात ठेवून त्यातून मार्ग काढायला शिकवतो. त्यामुळे स्वीकार ही सुरुवात आहे... बदलांना सामोरं जाण्याची सुरुवात!

सहवेदना, सहअनुभूती (Empathy)
 सहअनुभूती किंवा तद्‌नुभूती हा एक अनुभव आहे. दुसऱ्याच्या नजरेतून जग पाहण्याचा, दुसऱ्याच्या भावना जशाच्या तशा समजण्याचा अनुभव! सहवेदना समजून घेणं हे खरं म्हणजे एक कौशल्यच आहे. त्यासाठी आपल्याकडे मनाची संवेदनशीलता आणि जे आहे ते आहे तसं स्वीकारण्याची क्षमता असायला हवी.

कोरोना विषाणूसारखी आपत्ती जेव्हा येते तेव्हा या सहअनुभूतीचं काय होतं? 
असं म्हणतात की अतिशय कठीण काळातून जाताना माणसाचे खरे रंग समजतात.
या विलगीकरणाच्या काळात जगाचा वेग मंदावला आणि, मला वाटतं, मनाच्या संवेदनशीलतेला व्यक्त व्हायला जागा मिळाली. या काळात आपण एकमेकांशी सहकार्याने वागण्याचा प्रयत्न केला, अजूनही करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपण काही प्रमाणात का होईना सहानुभूतीशील झालो आहोत. खरं म्हणजे या काळात आपण माणूस म्हणून किती संवेदनशीलतेने राहू शकतो, हे आजमावण्याचा हा काळ आहे. आणि आपण संवेदनशील राहिलो तर समजूतदार होतो आणि एकमेकांशी सहकार्याने वागू शकतो. या काळात बऱ्याचजणांनी निःस्वार्थीपणे इतरांना मदत केल्याची अनेक उदाहरणं आपण ऐकतो आहोत, पाहतो आहोत. कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाला हे शक्य असेलच असं नाही, पण या काळात आपण आपल्या कुटुंबीयांसोबत संवेदनशीलतेने राहण्याचा प्रयत्न करायला लागलोय हीसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

लवचिकता (Flexibility)
बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अतिशय अनपेक्षित अशा घटना घडतात. जसा हा कोरोना काळ. या काळात आपल्या कुणाकडेच मनाची तयारी करायला पुरेसा वेळ नव्हता. अशा वेळी आलेल्या परिस्थितीनुसार तिला सामोरं जाताना आपल्या दृष्टिकोनात, विचार करण्याच्या पद्धतीत तत्काळ बदल करावे लागतात. जेणेकरून आपण अधिक सक्षमपणे परिस्थिती हाताळू शकू. आपल्या रोजच्या जगण्यातही असे काही अचानक झालेले बदल आपण सर्व जण अनुभवत असतोच. ऑफिसमध्ये कामामुळे उशीर झाला, अचानक घरी पाहुणे आले, एखादा महत्त्वाचा कार्यक्रम रद्द झाला, अशावेळी या मानसिक लवचिकतेने आपल्याला मदत केलेली आहेच. घरातल्या कामामध्ये खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलता येतो याचीही या निमित्ताने आपल्याला जाणीव झाली.

पण आजची परिस्थिती ही आपण सर्व जण अनुभवत आहोत तिथे या मानसिक लवचिकतेची खूपच आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी शाळा अजून बंद आहेत, त्यामुळे मुलं घरात आहेत, बाहेर कुठे जाता येत नाहीये, घरात सर्व कामं करावी लागतायेत, काही जणांना घरून काम करावं लागतंय. म्हणजेच एकावेळी अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. पण आपल्यामध्ये अशी लवचिकता असते तेव्हा आपण जास्त स्पष्टपणे विचार करू शकतो. आणि मग आपल्याला या परिस्थितीला सामोरं जाण्याचे अनेक मार्ग दिसायला लागतात. म्हणून आपल्या विचारांमधला हट्टीपणा कसा कमी करता येईल याचा विचार करायला हवा. आपण एखाद्या गोष्टीबाबत जितके जास्त आग्रही, जेवढे जास्त हट्टी तेवढा आपल्यालाच जास्त त्रास. म्हणून लवचिकता वाढवायची असेल तर योगासारख्या गोष्टींचा आणि त्याचबरोबर विवेकनिष्ठ विचारपद्धती सारख्या गोष्टींचाही नक्कीच उपयोग होतो.  

आपण आपल्या जगण्याचा वेग कमी करू शकतो आहोत. कोरोना काळाच्या आधी सतत कमालीची रॅट रेस, टार्गेट अचिव्ह करा, डेडलाईन सांभाळा, सतत कशाचं तरी भान सांभाळा (म्हणजे वेळेचं, पैशाचं, बोलण्याचं) म्हणजे सतत सतर्क राहा. आपल्या वेगवान आयुष्यात आपल्या हातून कितीतरी गोष्टी नुसत्या निसटून जात होत्या. आपण वेग कमी करू शकतो हे या  निमित्ताने आपल्याला नक्की समजलं आहे. म्हणजे आत्ता आपल्या सर्वांसाठी हे ‘न्यू नॉर्मल’ आहे जे जगताना आता असा विचार करायची वेळ आली आहे की आधीचं आपलं जगणंही खरच ‘नॉर्मल’ होतं का?
आपण सर्वांनी एकाच वेळेस ‘अशाश्वतता’ म्हणजे काय हे अनुभवलं आहे आणि त्या अशाश्वततेचा स्वीकार करून आपण आत्ताही आयुष्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो आहोत.

मनाची काटकता (Resilience) 
आपण मनाने काटक आहोत हेही आपल्याला या निमित्ताने समजलं आहे. मनाची काटकता म्हणजे रबरासारखं ताणलं जाऊन न तुटता पुन्हा पूर्व स्थितीत येण्याची माणसाच्या मनाची क्षमता. मनाचा कणखरपणा. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता उभं राहण्याचा मनाचा निश्चलपणा. मनाची दृढता, असं किती तरी सांगता येईल मनाच्या काटकपणाबद्दल.

शारीरिक अथवा मानसिक प्रतिकारशक्तीला गृहीत धरायचं नाही, याचाही धडा या निमित्ताने आपण शिकलो आहोत. 

शिकतोय ना आपण बऱ्याच गोष्टी...........? पण सगळ्या मीच कशाला सांगायला हव्या? मला माहितीये तुम्हालाही खूप काही सुचतंय, जाणवतंय- मग लिहा! लिहून काढा, वाट कशाची पाहताय?

जाता जाता थोडं गंभीरपणे सांगायचं तर या परिस्थितीनंतरचं जग वेगळं असणार आहे आणि त्या वेगळ्या जगात आपण तसेच पूर्वीसारखे राहून चालणार नाही...खरं ना? 
तर स्वतःची काळजी घ्या..सुरक्षित राहा..

आणि जगण्याची गुणवत्ता जपण्याचा प्रयत्न करत राहा.

(या लेखाबरोबर ‘माइण्ड रि-माइण्ड’ हे सदर समाप्त होत आहे.)
 

संबंधित बातम्या