पाऊस बदललाय का?

अभिजित घोरपडे
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
 

मोसमी पाऊस काही दिवसांत परिस्थिती कशी पालटून टाकतो, याचा प्रत्यय या वर्षी पाहायला मिळाला, अजूनही मिळतोय. या वर्षी राज्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाईचा विषय उग्र झाला होता. त्याला पावसाच्या अनुषंगाने अनेक कारणे होती. गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यातील पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे आधीच पाण्याचा अनुशेष होता. त्यातच या वर्षीचा उन्हाळा कडक होता. तसा तो कमी-अधिक प्रमाणात दरवर्षी असतो. मात्र, या वेळचे वेगळेपण म्हणजे तुरळक अपवाद वगळता मोठ्या उन्हाळी पावसाने हजेरी लावलीच नाही.
ही पार्श्‍वभूमी घेऊनच या वेळचा जून महिना उजाडला. मॉन्सून अर्थात मोसमी वाऱ्यांचे आगमन लांबले. त्याला अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाचे निमित्त झाले. हे वारे केरळमध्ये आठवडाभर उशिराने दाखल झाले. त्यानंतर कसेबसे महाराष्ट्रात पोचले, पण त्यांच्याबरोबर म्हणावा असा पाऊस नव्हताच. त्यामुळे मॉन्सून आल्याचे जाहीर झाले, पण पावसाचा पत्ता नाही, अशी स्थिती निर्माण झाली. अगदी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हीच अवस्था होती. उशाशी धरणे असलेल्या ठिकाणांनाही पाणीटंचाईची झळ पोचू लागली होती.

मॉन्सूनने पालटलेली परिस्थिती
या स्थितीत मॉन्सूनने रंग बदलला आणि जून महिन्याच्या शेवटच्या तीन-चार दिवसांपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. त्याने संपूर्ण चित्र पालटून टाकले. विशेषतः कोकण आणि जास्तीत जास्त धरणे असलेल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर दमदार पाऊस पडला, तो अजूनही सुरूच आहे. त्यामुळे ३० जून ते १० जुलै या नऊ दिवसांमध्ये राज्यातील धरणांच्या साठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. ३० जून रोजी हा साठा साडेसहा टक्‍क्‍यांच्या आसपास होता. त्यात वाढ होऊन तो साडेचौदा टक्‍क्‍यांवर पोचला आहे. या नऊ दिवसांमध्ये पाणीसाठ्यात तब्बल ४०५५ दशलक्षघनमीटर अर्थात १४३ टीएमसी इतकी वाढ झाली आहे. ही वाढ कोयना धरणात मावणाऱ्या एकूण पाणीसाठ्याच्या जवळजवळ दीडपट इतकी आहे. सांगायचा मुद्दा असा, की पावसामुळे परिस्थिती कशी पालटून जाते याचे हे उत्तम उदाहरण. त्याचाच अनुभव या वर्षी घ्यायला मिळाला आहे. या वर्षी भारतासाठी मोसमी पावसाचा अंदाज ९६ टक्के इतका आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या पुढच्या काळातही चांगल्या पावसाची अपेक्षा करण्यास हरकत नाही.
पावसाच्या अनुभवावरून त्याच्या बदलाबाबत अलीकडच्या काळात विविध मुद्दे उपस्थित केले जातात. त्यापैकी काही असे - पावसाचे आगमन उशिराने होऊ लागले आहे आणि पावसाळा पुढे सरकत आहे. दुसरा मुद्दा पावसाच्या प्रमाणाबाबत आणि तिसरा - हवामान बदलांचे काय परिणाम होत आहेत याबाबत.
हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्या अनुषंगाने काही बदल जाणवतही आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण आपल्याला वाटते तितके नक्कीच नाही. याबाबत एकेक मुद्द्याचा परामर्श घेऊया.

पाऊस बदलल्याची भावना आणि वस्तुस्थिती
पावसाचे आगमन लांबल्याचे आणि पावसाळा पुढे सरकल्याची भावना लोकांमध्ये आहे. मात्र, या मानण्याला आकडेवारीचा आधार दिसून येत नाही. मोसमी पाऊस केरळमध्ये ३१ मे किंवा १ जून रोजी दाखल होत असल्याचे अलीकडची सरासरी आकडेवारी सांगते. त्यानंतर तो महाराष्ट्रात पोचण्यास विशेष विलंब लावतो, असेही पाहायला मिळत नाही. याबाबत एक बाब प्रकर्षाने सांगावी लागेल. मॉन्सून अर्थात मोसमी वारे आपल्या प्रदेशात पोचणे आणि दमदार पाऊस सुरू होणे यात थोडा फरक आहे. अनेकदा एखाद्या प्रदेशात मोसमी वारे पोचले, तरी ते तिथे दमदार पाऊस देतीलच असे नाही. या वर्षीची स्थिती तशीच होती. त्यामुळे या मुद्द्यावर लोकांचे पहिल्यासारखा पाऊस येत नसल्याचे निरीक्षण आणि मॉन्सूनच्या आगमनाची तारीख याबाबत आकडेवारी भिन्न असू शकते.
पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे की घट?.. या मुद्द्याचे थोडक्‍यात उत्तर द्यायचे, तर सुमारे दीडशे वर्षांतील आकडेवारी असे सांगते, की महाराष्ट्रातील आणि भारतातीलही पावसाच्या प्रमाणात विशेष काही बदल झाले नाहीत. काही भागासाठी हे बदल पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचे तर दीडशे वर्षांची आकडेवारी सांगते, महाबळेश्‍वरच्या पावसात दशकाला १२५ मिलिमीटर इतकी घट होत असल्याचे दिसून येत आहे. हीच बाब सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील इतर भागांना लागू करता येऊ शकेल. त्याचबरोबर बहुतांश भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळातील पावसाच्या तीव्र घटना याचाच प्रत्यय देतात. तापमानात वाढ होत असताना हे बदल अपेक्षित आहेत. कारण हवा जितकी गरम तितकी तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. परिणामी, ती जास्त बाष्प धारण करते. तिला हे बाष्प सोडण्यासाठी पूरक स्थिती मिळाली, की ती जास्त बाष्प सोडण्यास (म्हणजेच जास्त पाऊस पाडण्यास) कारणीभूत ठरते.
याशिवाय देशाचा विचार करता, काही भागात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी होत आहे, तर दुसरीकडे ते काही प्रमाणात वाढतही आहे. मात्र, त्यात पुढील काळात फार मोठे बदल संभवत असल्याचे अभ्यास तरी सांगत नाहीत.

लोकांचा वेगळा अनुभव
लोकांना वाटत असलेल्या बदलांबाबत उपलब्ध आकडेवारी किंवा हवामानशास्त्रीय अभ्यासात विशेष पुरावे उपलब्ध नाहीत. याचा अर्थ लोकांना वाटते ती वस्तुस्थिती नाही किंवा अगदी स्थानिक पातळीवर काही बदल होत आहेत, ते आकडेवारीत ध्वनित होत नाहीत. जे काही घडत आहे ते या दोन्ही शक्‍यतांच्या मधे कुठेतरी असण्याची शक्‍यता अधिक आहे. लोकांना आधीच्या काळाबद्दल नेहमीच आस्था असते आणि सध्या सर्व काही बिघडते आहे, बदलते आहे अशीही त्यांची भावना असते. त्यामुळे वाटते ते सर्व काही खरे असेल असे नाही.
मात्र, याच्या विरुद्ध काही निरीक्षणे लोकांनी व्यक्त केली आहेत. आम्ही काही वर्षांपूर्वी ‘भवताल’च्या मंचावर लोकांच्या पावसाबाबतच्या आठवणींची माहिती मागवली होती. त्यात लोकांना आधी अनुभवलेला पाऊस आणि त्यात नेमकेपणाने काय बदल झाले आहेत, याबाबत माहिती कळविण्यास सांगितले होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून आलेली माहिती पावसामध्ये बरेच बदल झाले आहेत हे सांगणारी होती. विशेषतः पावसाचा भरवसा किंवा निश्‍चितता कमी झाल्याचे प्रमुख निरीक्षण होते. हा मुद्दा व्यक्तिसापेक्ष आहे आणि हे बदल हवामान विभागाकडून नोंदवल्या जाणाऱ्या सरासरी आकडेवारीत ध्वनित होणारेही नाहीत. याबरोबर लोकांनी मांडलेले दुसरे निरीक्षण होते - पूर्वी पावसाचे नेमक्‍या दिवशी/वेळी आगमन व्हायचे. आता तसे होत नाही. याशिवाय पावसातील सातत्य, त्याच्या पडण्यातील लय या गोष्टीही बदलल्याचे निरीक्षण आवर्जून मांडले होते.

याचा अर्थ काय?
या सर्व निरीक्षणांचा अर्थ काय? हे समजून घेणे आवश्‍यक आहे. पावसात जे काही सूक्ष्म बदल झाल्याचे लोकांनी सांगितले आहेत, ते मोठ्या प्रमाणावर दिसत नाहीत, कदाचित पुढेही दिसणार नाहीत. मात्र, या बदलांचा शेतीवर, स्थानिक परिसंस्थेवर-पर्यावरणावर, तेथील जीवांवर, लोकांच्या जगण्यावर नक्कीच परिणाम झालेला असणार. यांचा मागोवा, परामर्श आपण कसा घेणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पावसात पूर्वीही असे बदल झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून दुष्काळ, स्थलांतरे, स्थित्यंतरे असे परिणाम घडून आले आहेत. आता सूक्ष्म पातळीवर असे काही घडत आहे का? हेही सखोलपणे पाहावे लागेल. वरवर अवर्षणग्रस्त भागातून अशी स्थलांतरे होत असताना दिसतात, पण त्यांचे प्रमाण - तीव्रता यानिमित्ताने शोधावी लागेल. पावसातील बदल टिपताना ते आकडेवारी, हंगाम किंवा तांत्रिक अंगाने टिपायला हवेतच, ते तसे हवामान विभागाकडून किंवा त्या विषयातील अभ्यासकांकडून टिपले जातही आहेत. मात्र, त्याचे छोट्या-छोट्या घटकांवर होणारे बदल टिपणे तितकेच महत्त्वाचे आहे. याबाबत बरेच काही करण्याजोगेही आहे. या वर्षीच्या पावसाच्या निमित्ताने त्याची चर्चा आणि सुरुवात करायला हरकत नाही.

संबंधित बातम्या