बुरशीसाठी सुगीचे दिवस

डॉ. किरण रणदिवे
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
 

रखरखीत उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसाळ्याला आपण आपल्या मनात साठविण्याचा जसा प्रयत्न करतो, तसेच धरणीमाताही पावसाला स्वतःमध्ये साठविण्याचा प्रयत्न करते. ही नैसर्गिक साठवण करत असतानाच निसर्गामध्ये प्रत्येक सजीवाचे सुगीचे दिवस सुरू झालेले असतात, त्यात बुरशीचाही समावेश होतो. 

सहजपणे घरातील रुक्ष वाटणाऱ्या कुंडीतही एखादी छोटीशी रंगीत छत्री दिमाखात डोलायला लागते. आता ही कशाला इथे आली, असा यक्ष प्रश्‍न काहींना पडतो व भीतीपोटी काहीजण ती छत्री काढून फेकून देतात. सर्वसाधारणपणे बुरशी म्हटले, की निरुपयोगी, विषारी, आजार निर्माण करणारी अशी प्रतिमा जरी असली, तरी काही ठराविक प्रकारच्या बुरशी सोडल्या, तर बहुतांशी बुरशी या उपयोगीच असतात. बऱ्याचदा उपयोगी म्हटले, तरी माणसाला खाता आल्या किंवा औषधी असतील तरच उपयोगी नाहीतर निरुपयोगी अशी काहीशी समजूत असते. 

आपल्याला माहिती असलेच, की निसर्गामध्ये प्रत्येक सजीवाचे कार्य हे ठरलेले असते. त्यामुळे या ना त्या मार्गाने सर्वच सजीव उपयोगीच असतात. तसेच सर्व बुरशींमध्येही असलेले सर्व गुणधर्म कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी उपयोगी असतात. परंतु, ते नक्की कोणत्या आजारावर वापरतात किंवा इतर कोणत्या गोष्टींसाठी उपयोगी असतात, यावर आणखी संशोधन फार उपयुक्त ठरणार आहे. 

पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम भजी आपण ताव मारत खातो. परंतु, तेथील जवळच्या वृक्षांवरील शैवालातून डोकावणाऱ्या मनमोहक छत्रीकडे दुर्लक्ष करतो. अनेक रंगीबेरंगी छत्र्यांची मजेदार गोलाकार फेर धरून उगविणाऱ्या बऱ्याच जाती आपल्याला पश्‍चिम घाटामध्ये दिसत असतात. प्रत्येक वनस्पतीच्या रुजण्याच्या प्रक्रियेपासून ते फुलण्याच्या प्रक्रियेपर्यंत छोट्या मोठ्या बुरशी आपापले कार्य शांततेत करत असतात. आपल्या आषाढ अमरी अर्थात ऑर्किड पाहा ना. या ऑर्किड्‌सच्या मुळांशी वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी पाहायला मिळतात. किंबहुना ठराविक जातींच्या ऑर्किड्‌सच्या मुळाशी ठराविकच बुरशी (मायकोरायझा) असतात. 

जंगलामध्ये भटकंती करत असताना पानांवर जणू काही कोणी मेंदी काढली आहे की काय अशा काही बुरशी आलेल्या असतात, तर काही वेळा काळवंडलेली पाने आपल्या व्यथा सांगताना दिसतात. या बुरशी आपल्या कवकजालामार्फत पानांतील अन्नरस शोषून घेतात. 

धो-धो पावसामध्ये तर कित्येक बुरशी जणू कोसळणाऱ्या सरींसमवेत खोडावर दिमाखात बसून गप्पा मारताना दिसतात. जास्तीत जास्त आर्द्रता असणाऱ्या जंगलांमध्ये बुरशींचे काही अनोखेच भाईबंद पाहायला मिळतात. कधी कधी तर झाडांच्या बेचक्‍यामध्ये साठलेल्या मातीत उगवलेल्या छत्रीवर उपजीविका करावयास आलेल्या कीटकांनाच भक्ष्य बनविण्यासाठी काही कोळी आपली हुशारी दाखविताना दिसतात. 

जंगलाच्या रस्त्यावरील कुजलेला पालापाचोळा छोट्याशा काडीने बाजूला केल्यावर त्याच्या खालील जग तर खूपच वेगळे असते. आपला विश्‍वासही बसणार नाही इतके वेगवेगळे सजीव गुण्यागोविंदाने आपली वस्ती थाटून असतात. त्यामध्ये बुरशीचा एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो. त्याला ‘मिक्‍सोमायसीट्‌स’ असे म्हणतात. यातील गंमत म्हणजे बिजाणू रुजल्यावर त्यातून बाहेर पडणारा छोटा अमिबा आणि अनेक अमिबा एकमेकांशी जोडत तयार होणारे प्लाझमोडीयम अर्थात संपेशीका. या संपेशीकेपासून पुन्हा तयार होणारे बुरशी समूह... सगळेच मजेशीर!

अशाच पालापाचोळ्यामध्ये एखादा कीटक गतप्राण झालेला आढळतो. नीट पाहिले तर त्या कीटकाच्या सर्वांगावर वाढलेले पांढरे कवकतंतू त्या कीटकाची ओळखसुद्धा नीटशी पटू देत नाहीत. या बुरशींना शिकारी बुरशी म्हणतात. पण यातही आवडीचा कीटक असेल तरच शिकार, नाहीतर उपवास अशी यांची खासियत. कित्येक शास्त्रज्ञांनी वनस्पतींवर पडणाऱ्या कीटक रोगांवर प्रभावीपणे यांचा वापर केला आहे, हे लक्षात ठेवायला हवे. मातीमधील कीटकांच्या शरीरावर मातीमध्येच वाढून जणू विजयोत्सव साजरा करण्यासाठी काही शिकारी बुरशी जमिनीवर डोकी काढतात. यात ‘कॉर्डीसेप्स’चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अनेक औषधांमध्ये याचा सर्रास वापर होत असल्यामुळे याला जगभरात मागणी आहे. परंतु, आपल्या पश्‍चिम घाटांमध्ये नक्की त्याचे किती प्रकार आहेत हेसुद्धा सांगणे कठीण आहे. कारण, त्यावरील अत्यंत तुटपुंजे संशोधन. अगदी रक्ताच्या रंगापासून ते पिवळ्या धम्मक रंगापर्यंत यातील विविधता मन मोहित करते. शैवालामध्ये असणाऱ्या कीटकांवरही या पाहायला मिळतात.

जरासे डोंगर उतारांवर जणू काही जमिनीमधून काळ्या जिभा बाहेर आल्या आहेत, असे वाटणारी बुरशी म्हणजे ‘जिओग्लॉसम’ (Geoglossum). जमिनीतून वरती वेगवेगळ्या रंगांची बोटे वर काढावी अशा क्‍लॅव्हॅरीयासारखे बुरशी प्रकार आपल्या पश्‍चिम घाटात अगणित पाहायला मिळतात. त्यात असणाऱ्या विशिष्ट रसायनांमुळे या बुरशींना जगभरात अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. ताडोबा अभयारण्यात पावसाळ्यात गेल्यास बऱ्याच बांबूच्या मुळाशी यातील अत्यंत देखणा असा गडद निळा प्रकार पाहायला मिळतो आणि विशेष म्हणजे त्याचे शेत आल्यासारखे येते. या शेतांबरोबरच काही भुई फोडही आपल्याला पाहायला मिळतात. यांना ‘लायकोपरडॉन’ किंवा ‘पफबॉल’ असे संबोधतात. या भुई फोडांच्या असंख्य जाती आपल्या पश्‍चिम घाटात पाहायला मिळतात. काही आदिवासी जमाती तर औषधापासून आहारपर्यंत सर्वत्र याचा वापर करताना दिसतात. 

वेगवेगळी महागडी औषधे जेवणाचा भाग असल्यासारखी आपण घेतो पण औषधी बुरशींकडे कधी वळतच नाही, असे म्हणायला हरकत नाही. अंगदुखीसारख्या साध्या दुखण्यापासून ते कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर बऱ्याच औषधी बुरशी वापरल्या जाऊ शकतात, किंबहुना आदिवासींकडून वापरल्या जातात. जगभरामध्ये प्रथम क्रमांकावर असणाऱ्या संशोधन विषयाबद्दल आपणही जागरूकता दाखविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त औषध म्हणूनच नाही, तर जगातील अत्यंत उच्च दर्जाचे बांधाबांध करण्याचे साहित्य म्हणून बऱ्याच बुरशींच्या कवकजालाचा वापर होतोय. पाण्यातील प्रदूषणकारी घटकांना नियंत्रित ठेवण्याचे कामही कित्येक बुरशी करत आहेत, हेही सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच प्लॅस्टिक वेगाने कुजविण्याची प्रक्रिया करणाऱ्या बुरशींनाही विसरून चालणार नाही. या आणि अशा अनेक बुरशी योगदानांना आपण न विसरता आत्मसात केले, तर खरोखरच मानवाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळीच प्रगती पाहावयास मिळेल यात शंका नाही. 

संपूर्ण जगभरामध्ये अवघ्या २० टक्के बुरशींचे वर्गीकरण झालेले आहे. म्हणजे जवळपास ८० टक्के बुरशी आपल्याला ज्ञातच झालेल्या नाहीत. आपल्या भारतामध्ये या क्षणी किती बुरशी आहेत हे सांगणारे संदर्भग्रंथ अत्यंत दुर्मिळ झाले आहेत. काही डेटाबेसेस (Data bases) आता भारतातून पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहेत. ते www.fungifromindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यात आणखी भरीस भर म्हणून वर्गीकरणशास्त्र (टॅक्‍सोनॉमी, Taxonomy) या विषयाकडे आणि किंबहुना वनस्पतिशास्त्राकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोनही खूप बदलला आहे. जिथे जगभरामध्ये दररोज एका वर्गीकरण शास्त्रज्ञाची गरज आहे, तिथे विद्यार्थी मात्र वर्गीकरणशास्त्रापासून दुरावत चालले आहेत. वर्गीकरणशास्त्र म्हणजे खूपच कष्टदायक आहे, असा काहीसा गैरसमज बळावत चालला आहे. वर्गीकरणशास्त्र ही एक मूलभूत शाखा आहे. याकडे आता सर्वांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. जैवविविधता संवर्धन युगामध्ये वर्गीकरणशास्त्राला जगभरातून खूप मागणी आहे. आता बऱ्याच संस्था वेगवेगळ्या वर्गीकरणशास्त्राविषयी निगडित काही अभ्यासक्रम राबवीत आहेत, ही स्तुत्य गोष्ट आहे. 

हे सगळे खरे असले तरी बुरशीशास्त्र या मूलभूत विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक बुरशी जर का कित्येक दुर्धर आजार बरे करत असेल तर जगभरात ८० टक्के वर्गीकरणाविना शिल्लक राहिलेल्या बुरशींचा अभ्यास केला, तर नक्कीच मानव जातीला वरदानच ठरतील अशा लाखो जातींचा शोध लावता येईल. हे सगळे खरे असले तरी आम्ही यात काहीही करू शकत नाही असा काहींचा गैरसमज असू शकतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सजीवाबद्दलचा आदर वाटणे गरजेचे आहे. आपल्या कुठल्याही कृतीमुळे कोणत्याही सजीवाला जगणे कठीण होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी लागेल. एवढी काळजीसुद्धा अनेक सजीवांच्या जीवनचक्रामध्ये मोलाची भर घालत असते. हल्ली अनेकदा मोठ्या संख्येने वृक्षारोपणाचे कार्यक्रम होताना दिसतात, ही खरोखरच स्तुत्य गोष्ट आहे. परंतु, प्रत्येक वृक्षाच्या मुळाभोवती असणारे नक्की कोणते सजीव त्या वृक्षाच्या स्थिर होण्याच्या प्रक्रियेत हातभार लावतात या विषयावर मात्र म्हणावे तेवढे संशोधन केले जात नाही, ही शोकांतिका आहे. या अशा कित्येक महत्त्वाच्या प्रश्‍नांवर अनेकदा आपल्याला बुरशीचे तोडगे देता येतील यात शंका नाही. परंतु, तत्पूर्वी आपल्याला त्याचा सखोल अभ्यास करावा लागेल.

संबंधित बातम्या