पावसाचं मन 

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
 

हा  आषाढातला पाऊस... ज्याची सगळेच चातकासारखी वाट पाहत असतात. प्यायला पाणी हवं, शेतीला हवं, आपल्या नदीला पाणी हवं, एकूण काय ही जीवसृष्टी जगायलाच पाणी हवं म्हणजेच पाऊस हवा... हे खरंच, पण पाऊस हवा या जीवातली मनसृष्टी जगवायलाही. पाऊस आल्यानं भोवतालचं कसं हिरवंगार होतं. तसंच शब्दसरी बरसवायला उत्सुक मनही हिरवं होतं. तो बरसणारा पाऊस आणि त्याला कवेत घेऊन वावरणारं, भरून येणारं, हे आभाळ या कल्पना मनातली शब्दसृष्टी नुसती जागीच करत नाहीत, तर त्या आपल्याला जगायलाही उभारी देतात. रोजच्या कटकटींपासून थोडा काळ का होईना मुक्ती देऊन क्षणांत सौंदर्यनिर्मिती करतात. 

जसं पावसाचं येणं, बरसणं, ढग दाटून येणं, आभाळ भरून येणं असं काही म्हणताना भौगोलिक घटना म्हणून नाही पाहात आपण. तर हे शब्द, या कल्पना आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात. ऑफिस सुटतानाची वेळ आणि नेमका पाऊस कोसळतोय... आता घरी कसं जायचं या चिंतेत असताना जर थोडंसं असं मनात आलं, की.. ‘बरसायचं असतं तेव्हाच... आभाळही दाटून येतं'... की चिंता थोडी कमी होते, नकळत आपणही या शब्दांत, कोमल भावनेत गुंतत जातो. मन वास्तवातून थोडं रम्य काल्पनिक जगात विहरतं. प्रश्‍न कमी होत नाहीत, पण त्याची तीव्रता मात्र कमी होते. या पावसाच्या निमित्तानं होणारी शब्दांशी मैत्री आपल्याला अशी साथ करते. ही शब्दांशी मैत्री म्हणजे कविता, लेख किंवा साहित्य निर्मिती असंच काही नाही. कविता, लेखन केलं जात नाही, ते स्फुरतं. त्यामुळं सर्वांना ते कौशल्य लाभतंच असं काही नाही. पण कवितेप्रमाणं कोमल भाव नक्कीच मनात आपण रुजवू शकतो. 

आज थोडा प्रयत्न तर करूया. आपल्या लाडक्‍या कवयित्री शांताबाईंना एकानं विचारलं, की आकाश आणि आभाळ हे एकच अर्थ असलेले शब्द. तरी तुमच्या एका कवितेत ते तुम्ही वेगळे का वापरले. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘अरे नाही, निरभ्र असतं ते आकाश आणि भरून येतं ते आभाळ’. याचा सहज विचार केला तर वाटलं, की आपलं मन जेव्हा कल्पना रेखाटायची वेळ असते, तेव्हा आकाशासारखं असतं, एखाद्या कोऱ्या कॅनव्हासप्रमाणं आणि आभाळासारखं भासतं जेव्हा प्रेमानं, करुणेनं, दुःखानं दाटून येतं, भरून येतं. 

पाहा, मग असं म्हणता येईल का .. 
'मनाला आणि आभाळाला 
भरून यायला वेळ लागत नाही. 
मनसोक्त कोसळता आलं की 
पुन्हा मोकळं व्हायला वेळ लागत नाही' 

दाटून येणं याप्रमाणंच हे कोसळणं किंवा बरसणं हे शब्द आपल्याला कितीतरी मनाची गुपितं सांगून जातात. आपल्यापैकी प्रत्येकालाच.. मन कोणाजवळही पटकन मोकळं करता येत नाही. विश्‍वासाचं कुणी नसेल, तर मनात सगळं आपण साठवून ठेवतो. वाट पाहात असतो, की कधी सगळं बोलता येईल. मिळते अशी संधी मग कधीतरी, आश्‍वासक कोणी असं भेटतंही, विचारांचे ढग मनात मग दाटून येतातही, नेमका त्याच वेळी मग मनावरचा बांध फुटतोही आणि बोलता बोलता अश्रूंचे पाट वाहतातही.... नंतर पुन्हा स्वच्छ निळ्या आकाशाप्रमाणं मन निरभ्र होऊन जातंही. 

पण जेव्हा नाहीच कोणी भेटत बोलायला तेव्हाची मनस्थिती रेखाटायलाही हा पाऊसच येतो धावून. म्हणजे असं काही सुचतं.. 
'आज कसं अचानक .. 
मनसोक्त भिजता आलं 
आठवणींनी भिजलेलं मन 
पावसात ओलं करता आलं 
आणि त्याच वेळी 
गालावरून ओघळलेल्या 
थेंबातलं आभाळ कोणाच्याही नकळत 
पुन्हा एकदा मोकळं करता आलं' 

हे असं काही मनात येतं तेव्हा पावसाच्या बरसण्याबद्दल अजून काही वेगळे भावही मनावर प्रसन्न होतात. म्हणजे, असं वाटतं की आठवणींचा पाऊस बरसतो आणि एकांतात तो आपल्याला भिजवून जातो. हे भिजवणं या अगदी जैविक क्रियेला आपल्या मनात किती तरी वेगळा अर्थ नकळत आपण देतो. कारण आठवणी यायला लागल्या, की मग त्यांना कोणी अडवू शकत नाही. बालपणीच्या आठवणी, सख्यासोबत्यांबरोबर, घरच्यांबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणी, दुखावलेपणाच्या कटू आठवणी, अर्धवट राहिलेल्या अनेक गोष्टींच्या बोचऱ्या आठवणी. कुठल्या का असेना. पण येतात तेव्हा आपली देहबोलीच बदलून टाकतात, चेहऱ्यावरचे भाव बदलून जातात. त्याक्षणी समोर काही वेगळं सुरू असतं, पण आपल्याला मात्र भूतकाळात घेऊन जातात. म्हणजे आपला सगळा नूर पालटून टाकतात. नखशिखांत भिजलोय पावसात असं वाटायला लागतं या आठवणींमध्ये बुडताना. एक प्रकारे भावनिक विरेचनच अनुभवतो आपण. अनुभवलं असेल हे बऱ्याच जणांनी. 

तरुणपणीच्या अलवार, तरल प्रेमाच्या आठवणी असतील तर खजिनाच असतो तो आपल्या मनात. किती सुंदर भाव जपलेले असतात आपण. एखादं कापड जरीचं भरतकाम केल्यावर कसं अधिक सुंदर दिसू लागतं, तसे हे आठवणीतले भाव आपलं रोजचं जगणं सुंदर करून जातात. हुरूप येतो ती दैनंदिनी उत्साहानं पार पडायला. मग मनात नकळत असेही शब्द घोळत राहतात. 

.. हलक्‍याच पावलांनी हा 
पाऊस येऊनि गेला ... 
... पांघरून मखमली 
आठवणींचा शेला ... 

मुळात पाऊस हा पृथ्वीतलावर निसर्गानेही साजरा केलेला नवनिर्मितीचा उत्सव आहे. मग मनातही नवनवीन संकल्पनांचा उगम झाला तर नवल नाही. आभाळाचं भरून येणं, मग पावसाचं कोसळणं या घटना जशा मनाच्या अगदी जवळच्या तशीच अजून एक घटना अनेक सुंदर कल्पनांना जन्म देणारी. 

ती घटना म्हणजे ‘पहिला पाऊस पडून गेल्यावरचा मृद्‌गंध'... अत्तराचेही भाव कोसळतील असा तो गंध असतो असं म्हणतात. याचाही मानवी मनाशी अगदी जवळचा संबंध आहे. तप्त धरतीवर पावसाच्या पाण्याचे थेंब पडले, की गोडसर अशा मातीच्या सुवासानं आपला जीव वेडावतो, नकळत त्या तप्ततेतही शीतलतेची ग्वाही मिळते. तसंच सततच्या कटकटींनी वैतागलेल्या मनाला ‘कोणी समजून घेत आहे आपल्याला' या विचारांनी थंडावा मिळतो. त्यानं आपल्या विचारांनाही थोडा गोडवा लाभतो. 

चला मंडळी या आषाढातल्या पावसात आपण आपल्या मनातल्या नवनवीन कल्पनांना थोडी जागा करून देऊ आणि नव्या जोमानं श्रावण सरींचं स्वागत करायला सज्ज होऊ. कोण जाणे एखाद्या प्रेमी जिवाला असंही काही सुचेल.. 

सखे ग, 
आज साऱ्या श्रावण सरी 
तुझ्या भेटीला आल्या 
आणि तुझ्यावर कोसळताना 
तुझ्याच प्रेमात नाहून निघाल्या. 
त्यांना वाटत होतं की.. 
त्यांच्या सारखं कोण बरसू शकेल .. 
पण त्यांना माहीत नव्हतं 
की तुझ्या स्पर्शाचा ओलावा 
त्यांना इतका भिजवेल ! 

संबंधित बातम्या