ऋतू हिरवा आरोग्याचा 

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
 

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ।।

 कवयित्री शांता शेळक्‍यांच्या या गीताने नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याचे ऋतू हिरवा असे नामकरण केले. तसे पाहिले, तर साहित्यात वर्षा ऋतू आणि त्यामध्ये आकाश व्यापून टाकणारे ढग म्हणजे कल्पनारम्य आणि तरल भावनाविश्वासाठी कधीही न संपणारा एक अनमोल खजिनाच असतो. समस्त भाषांमधल्या शब्दालंकारांच्या रूपकांसाठी अखंड आणि न आटणारा एक स्रोत असतो. 
 साहित्यक्षेत्रात पावसाळ्याचे एवढे कोडकौतुक होत असताना, आरोग्यक्षेत्रात मात्र तो जणू एक शापित गंधर्व आहे. त्याला अनेक आजारांचे आगार मानले जाते. ‘आला पावसाळा, तब्येत सांभाळा’, ‘पावसाळ्यात आरोग्य राखण्यासाठी सात टिप्स’, ‘पावसाळ्यात सांभाळायची पथ्ये’, ‘पावसाळ्यामध्ये आहारात या गोष्टी टाळा’ अशा अनेक मथळ्यांचे सल्ले देणारे लेख सर्वत्र झळकू लागतात. पण खरे पाहता, पावसाळ्यात सर्दी खोकल्यासारखे अनेक आजार उद्‌्‌भवत असले, संसर्गजन्य आजारांच्या अनेक साथी जोमात येत असल्या, तरी त्याला पावसाळा हे मूळ कारण नसून -
 आपण माणसांनी केलेला पर्यावरणाचा ऱ्हास, 
 आरोग्याचे नियम न पाळल्यामुळे कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती आणि 
 स्वच्छतेचे नियम वैयक्तिक आणि सार्वजनिक बाबतीत न पाळल्यामुळे डोके वर काढणारे संसर्गजन्य जिवाणू आणि विषाणू हे कारणीभूत असतात.

आरोग्यदायी वर्षा ऋतू
 कडक उन्हाळ्याच्या झळा सोसून तापलेल्या पृथ्वीला आणि तिच्यावरील माणसांना पावसाच्या धारा केवळ चिंब करत नाहीत, तर  ४० अंशाच्या पुढे गेलेले तापमान १८ अंशापर्यंत खाली आणून वातावरणात उल्हसित करणारा एक सुखद गारवा आणतात. उन्हामुळे आलेली मरगळ दूर होते आणि मनोव्यापार उल्हसित होतात.
उन्हाळ्यात विराणी आणि वैराण झालेली माळराने, जमिनी आणि पर्वतराजी पावसाच्या रिमझिम बरसातीने कच्च हिरवी होतात. हा हिरवा रंग डोळ्यांना सुखद गारवा देतो. हिरव्या रंगाने डोळ्यातल्या पारपटलाला गारवा येतो. या हिरव्या रंगाला निरखत राहिल्याने बौद्धिक कामाने आलेला शीण आणि मनाला आलेली मरगळ दूर होते. आजच्या संगणक युगात सतत कामात आणि धावपळीत थकणाऱ्या शरीराचे रोम अन् रोम पावसाने आणि या ऋतूतल्या हिरवाईने प्रफुल्लित होतात. वर्षा सहल आणि पावसात मनमुक्त भिजायला जाणाऱ्या युवकांना हे चांगलेच अनुभवायला मिळते. आकाशातून बरसणाऱ्या श्रावणधारा शरीरातल्या मज्जातंतूंना, स्नायूंना त्यांच्या गारव्याने प्रफुल्लित करतात, शरीरातले ‘फील गुड’ हार्मोन्स एक नितांत आणि अविस्मरणीय सुखद अनुभव देतात.
 अभ्यासातली एकाग्रता कमी प्रमाणात असलेल्या शाळकरी मुलांना झाडांच्या सान्निध्यात राहिल्यास त्यांच्यातील एकाग्रता वाढते. विविध संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे, की ही मुले वृक्षवल्लींच्या सान्निध्यात राहिल्यास त्यांच्यातला मानसिक ताण कमी होतो आणि त्यांची शारीरिक सक्रियताही वाढते. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने तसेच आल्हाददायक नैसर्गिक दृश्‍ये पाहिल्याने व्यक्‍तीचा राग, भीती आणि तणाव कमी होतो. निसर्गातल्या प्राकृतिक शक्तीचे आरोग्याला महत्त्वाचे उपयोग होतात. या पाण्यात काही नैसर्गिक क्षार असतात. पावसाळ्यात पावसाचे पाणी रोजच्या रोज एखाद्या स्वच्छ भांड्यात जमा करून त्याचा वापर केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
१. या पाण्याने केस धुतल्याने ते मऊ, तलम आणि आकर्षक होतात.
२. त्याने चेहरा धुतल्यास त्वचेचे आरोग्य सुधारू शकते.
३. या पाण्याने तळपाय धुतल्यास तळपायांची त्वचा मऊ मुलायम होते. 
४. पावसाच्या पाण्यात न्हायल्याने त्वचा नैसर्गिक स्वरूपात स्वच्छ होते. मात्र, आजच्या प्रदूषणामुळे अनेक आम्ले आणि दूषित वायू पावसाच्या थेंबात विरघळून पावसाचे पाणी आम्ल गुणधर्माचे आणि दूषित वायूंच्या उग्रतेने मलिन होते. त्याचे दुष्परिणाम केसांवर आणि त्वचेवर होतात. त्याने काहींना अंगाला खाज सुटते, पुरळ उठते, आगआग होते आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. 

पावसाळ्यातील शापित आरोग्य
पावसाळ्यात आरोग्याच्या तक्रारी खूप उद्‌्‌भवतात. पण त्यासाठी आपणच जबाबदार असतो. आपण विशेष खबरदारी घेत नाही, म्हणून हे आजार आपल्याला होतात. तसे पहिले, तर हिवाळ्यातली थंडी सर्वत्र पसरते, अगदी दारे खिडक्‍या बंद केलेल्या घरातही. त्या थंडीच्या परिणामाने आपल्या तब्येतीवर परिणाम होतात, तीच गोष्ट उन्हाळ्यात घडते. आपण घरात बसूनही उष्णतेच्या झळा आपल्याला छळत राहतात. उन्हाळ्यात होणारे डीहायड्रेशन आपल्याला चार भिंतीत राहूनही त्रास देते. पण पावसाळ्याचे तसे नाही. प्रतिबंधक उपाय न केल्याने पावसाळ्यात निरनिराळे आजार उफाळून येतात. 

 श्वसनसंस्थेचे आजार : पावसात तुम्ही अनिर्बंध भिजलात, अंग कोरडे केले नाही, डोके दीर्घकाळ ओले ठेवले, तर शिंका येतात. सर्दी होते. सर्दी होणे आणि शिंका येणे हा तसा आजार नसतो. आपल्या शरीराला पाण्यात दीर्घकाळ ओले राहिल्याने जो गारवा येतो, त्याला शरीराचा हा प्रतिबंधात्मक उपाय असतो. त्याला औषधाची गरज नसते, फक्त पावसात जाताना छत्री, रेनकोट वापरलात किंवा पावसात भिजून आल्यावर अंग लगेच कोरडे केले आणि गरम गरम चहा-कॉफी घेतलीत, तर काहीही त्रास होत नाही. त्यात युगानुयुगे चालत आलेला गवती चहा घेतलात, तर मग पावसाच्या धारांची काय बिशात आहे तुमच्या नाकातून पाण्याच्या धारा निर्माण करण्याची.
सर्दीची काळजी घेतली, तर खोकलाही होणार नाही. जर पावसाच्या ओल्या गारठ्याने घशात खवखव झाली, खोकल्याची उबळ येऊ लागली, तर कोमट पाण्याच्या गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा करत राहिलात, तर हा खोकलाही पळून जातो. त्यासाठी कोणतेही ॲण्टिबायोटिक घ्यायची गरज नसते. वैद्यकीय शास्त्रानुसार अशा खोकल्याला ॲण्टिबायोटिकची तर सोडाच, पण कुठल्याही कफ सिरपचीदेखील आवश्‍यकता नसते.
 पावसाळ्यात श्वसनसंस्थेवर आक्रमण करणाऱ्या व्हायरसची म्हणजे विषाणूंची आणि बहुविध जातींच्या जिवाणूंची फौज तयार असते. पावसाळ्यात सर्दी झाली आणि ती कमी व्हायला वर सांगितल्याप्रमाणे योग्य उपाय केले नाहीत, तर ते जंतू नाकातून घशात जातात. त्यात मग टॉन्सिल्स सुजतात, घसाही सुजतो. या टप्प्यावर तेव्हाही फिकीर केली नाही, तर ते जंतू श्वासनलिकेत आणि तिथून पुढे फुफ्फुसात जातात. याचा परिणाम म्हणून दीर्घकाळ राहणाऱ्या खोकल्याचे आजार म्हणजे ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया असे आजार उद्‌भवतात. या आजारांमध्ये मात्र डॉक्‍टरांकडून तपासून घेऊन योग्य ती औषधे लगेच सुरू करावी लागतात. 
या आजारात योग्य ती औषधे घेण्यात कुचराई केली, तर श्वासनलिका सतत सुजून त्यांचे आकुंचन प्रसरण होत नाही, त्यात अडथळे निर्माण होतात. फुफ्फुसातले वायुकोष कमी होत जातात आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटीस, सीओपीडी, ब्रॉन्किओलायटिस, एम्फायझिमा असे आजार व्हायला वेळ लागत नाहीत. हे आजार पावसाळी हवेत वेगाने निर्माण होतात. पण त्यामागे पावसाळा नव्हे, तर ते आजार छोट्या स्वरूपात असताना वेळेवर औषधे न घेणे, अतिरिक्त धूम्रपान करणे, विषारी वायूंच्या कारखान्यात काम करणे अशी कारणे असतात.  
काही व्यक्तींना जन्मजात दमट हवामानाचा त्रास होतो आणि त्यांच्या श्वासनलिका आकुंचन पावून त्यांना दम लागतो. हा एक आनुवंशिक, जनुकीय स्वरूपाचा आणि काही ॲलर्जीमधून निर्माण होणारा त्रास असतो. पावसाळ्यातच नव्हे, तर अनेकांना हिवाळ्यातही याचा त्रास होतो. त्यामुळे पावसाळ्याला त्यासाठी बदनाम करण्यात अर्थ नाही. वैद्यकीय सल्ल्याने तोंडाने औषधांचे फवारे (इन्हेलर) घेतल्याने तो नियंत्रित होतो. 

पोटाचे आजार : पावसाळ्यात उलट्या जुलाबांचे आजार वाढतात. हे केवळ मानवाच्या बेशिस्तीमुळे, बकालपणामुळे आणि अस्वछ्तेने पसरणारे आजार असतात. पावसाळ्यात जलाशयांमधील पाण्याची पातळी ढवळून निघते. हे अस्वच्छ गढूळ पाणी पिण्यात आल्यास उलट्या, जुलाब, मळमळ, आमांश असे रोग होतात. अनेकदा नळातून पिवळट पाणी येते. घराबाहेर पाणी पिताना अस्वच्छ जागी साठवणूक करण्यात येणारे पाणी प्यायल्यानेही असे त्रास होतात. खराब पाण्यात पोहताना पाणी तोंडातून जाऊन हे त्रास होतात. पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवणे ही सरकारची जबाबदारी असते. नदीच्या किंवा तळ्याच्या पाण्याचा गावांना पुरवठा करण्यापूर्वी ते ‘फिल्टर’ करून पूर्णपणे निर्जंतुक करण्याची जबाबदारी पार न पाडल्याने ते होते.
आपल्या घरात असे पाणी आल्यास ते गाळून, उकळून न वापरल्याने हे आजार होतात. गावा-शहरातील हॉटेल्स, खानावळी अन्न-पाण्याच्या स्वच्छतेची काळजी घेतात, की नाही याची जबाबदारी तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या आरोग्य विभागाची असते. त्या जबाबदारीची प्रतारणा केल्याने आमांश आणि जिवाणूंनी होणाऱ्या उलट्या-जुलाबांची, गॅस्ट्रोची साथ पसरते. पावसाळ्याला त्यात उगाचच बदनाम केले जाते. 
काही वेळेस घराबाहेरचे अन्न खाण्यात आल्यानेही असे त्रास उद्‌भवतात. उघड्या अन्नावर माशा बसतात. या माशा इतर ठिकाणांहून संसर्गयुक्त पदार्थाचे वहन करीत असतात. त्यांच्या पायांना/पंखांना असे खराब पदार्थाचे कण चिकटतात व ते दुसऱ्या चांगल्या पदार्थांना दूषित करतात. हे पदार्थ आपल्या पोटात जाऊन विविध रोगांना आपण बळी पडतो. अन्नपदार्थ उघड्यावर विकणाऱ्या हातगाड्या, स्टॉल्स यांना आरोग्याचे नियम पाळल्यासच व्यवसायाला परवानगी देणे हे प्रशासनाच्या हातात असते. या गोष्टींकडे काणाडोळा केल्यानेच पावसाळ्यात हे आजार फोफावतात.
पावसाळा असो की कोणताही ऋतू असो. घरात स्वयंपाकापूर्वी भाजी मंडईतून आणलेल्या भाज्या स्वच्छ पाण्यात धुऊन घेणे गरजेचे असते. पावसाळ्यातल्या चिखलात भिजलेल्या भाज्यांमध्ये संसर्ग निर्माण करणारे जंतू, कीटकांची अंडी असू शकतात. विशेषत: पालेभाज्या आणि फळे घेताना अनेकदा त्यात गांडुळेसुद्धा सापडतात. घरगुती स्वच्छतेची ही मूलभूत गोष्ट न पाळल्यास पोटाचे आजार होणारच. त्याला पावसाळ्याला बिचाऱ्याला का नावे ठेवता?
पावसात भिजून त्वचा सतत ओली राहिल्यास बुरशीचा संसर्ग होतो. विशेषतः पावसात भिजल्यावर अंगावरील ओले कपडे न बदलता ते तसेच दिवसभर वापरले, तर हा त्रास हमखास होतो. धुतलेले कपडे पावसाळ्यात लवकर वाळत नाहीत. अशा स्थितीत न वाळलेली ओली अंतर्वस्त्रे वापरल्यास जांघा, काखा यामध्ये अशी बुरशीजन्य किंवा फंगल इन्फेक्‍शन्स हमखास होतात. पायातील ओले मोजे, ओले बूट यामुळे किंवा सतत पावसाच्या साचलेल्या पाण्यात काम करावे लागल्याने पायांच्या बोटांत चिखल्या होतात. नखेसुद्धा बुरशीच्या संसर्गाने खराब होतात. केस ओले ठेवल्यास टाळूवर असे बुरशीजन्य आजार उद्‌भवतात. म्हणजेच कोरडे अंग न ठेवल्याने, ओले कपडे वापरल्याने आजार होतात. यात पावसाळ्याला का दोष द्यायचा?

संसर्गजन्य साथीचे आजार : पावसाळ्यात डबकी साठल्याने त्यात ॲनाफेलिस डासांची पैदास होऊन त्यांच्या दंशामार्फत मलेरिया पसरतो. पावसाळ्यात घरांमध्ये, घरातल्या कुंड्यांमध्ये किंवा टेरेसवर ठेवलेल्या निरुपयोगी वस्तूंमध्ये किंवा रस्त्यावर फेकलेल्या टायरमध्ये स्वच्छ पाणी साठल्यास त्यात एडीस इजिप्ती डास निर्माण होतात. त्यांच्याद्वारे डेंगीचा आणि चिकुनगुन्याचा प्रादुर्भाव होतो. घरात, छपरावर, आपल्या आजूबाजूस स्वच्छ पाणी साचू न देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पाण्याची डबकी निर्माण होऊ न देणे हे आरोग्यविभागाचे कार्य असते. घर आणि प्रशासन या दोन्ही पातळीवर साचणाऱ्या पाण्याचा निचरा न केल्याने हा आजार पसरतो. मग पावसाळा यात दोषी का मानायचा?
जी गोष्ट डासांची तीच माश्‍यांची. वैयक्तिकरीत्या आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छता न राखल्याने माश्‍या निर्माण होतात. उघड्या अन्नावर माश्‍या बसतात. त्यांच्या पायातून आणि पंखातून त्या इतर ठिकाणांहून आणलेल्या संसर्गयुक्त पदार्थाचे वहन करीत असतात. त्यांच्या पायांना आणि पंखांना असे दूषित पदार्थाचे कण चिकटतात. ते दुसऱ्या चांगल्या पदार्थांना दूषित करतात. हे पदार्थ आपल्या पोटात जाऊन उलट्या-जुलाब, कॉलरा, कावीळ, टायफॉईड अशा विविध रोगांना आम जनता बळी पडते. याचा दोष निष्कारण पावसाळ्याच्या माथी मारला जातो.

लेप्टोस्पायरोसिस : लेप्टोस्पायरोसिस हा आजार ‘लेप्टोस्पायरा’ प्रजातीच्या जिवाणूंमुळे होतो. पावसाळ्यात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त दिसते. या आजाराचे जिवाणू मानवी शरीरात थेट शिरत नाहीत, तर म्हैस, घोडा, बकरी, उंदीर, कुत्रा अशा प्राण्यांच्या मूत्राद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. या प्राण्यांना या जिवाणूंपासून कोणताही त्रास होत नाही. ते त्यांच्या शरीरात अनिर्बंधपणे वाढतात आणि त्यांच्या मूत्रातून हे जिवाणू त्यांच्या शरीराबाहेर पडतात. या मूत्राचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या माणसांच्या शरीराशी संपर्क आल्यास हा आजार संपर्क येणाऱ्या माणसांना होतो. पावसाळ्यात आलेल्या पुरामध्ये किंवा रस्त्यावरून वाहणाऱ्या पाणलोटामध्ये या प्राण्यांचे मूत्र मिसळून हे जंतू पसरतात. विशेषतः गोठ्यांमध्ये पाणी शिरून तिथले मूत्र या पाण्यात पसरते. मुंबईमध्ये पावसाळ्यात जमिनीखालची गटारे तुंबून त्यातील पाणी रस्त्यावरून वाहू लागते. यात त्या गटारातील लेप्टोस्पायरा जंतूंची लागण झालेल्या उंदरांचे मूत्र विरघळून पसरते आणि हा आजार त्या पाण्यातून चालणाऱ्या माणसांना होतो. या आजाराची बाधा प्रामुख्याने पूरग्रस्त भागात किंवा शेती करणाऱ्या लोकांना पटकन होते. 
हा आजार तसा साधा वाटतो. या आजाराचे निदान वेळेवर न झाल्यास आणि त्यामुळे योग्य तो इलाज न झाल्यास, रुग्णांची मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात. मेंदूच्या आवरणांना सूज येऊन मेनिनजायटीस हा गंभीर आजार होतो. यामध्ये रुग्ण मृत्युमुखी पडण्याची दाट शक्‍यता असते. 

पावसाळा आरोग्यदायी होण्यासाठी
पावसाळ्यातील बहुतेक आजार सार्वजनिक स्वच्छतेच्या योजना अयशस्वी ठरल्याने होतात. यात सरकारी कुचराई जशी कारणीभूत असते, तसेच नागरिकांमधील सार्वजनिक आरोग्यातील अनास्थासुद्धा. पावसाळा आरोग्यदायी हिरवा ऋतू होण्यासाठी वैयक्तिक स्वरूपातसुद्धा काही काळजी घ्यावीच लागते. उदा - 

 • पाणी उकळून, गाळून स्वच्छ करून प्यावे. शक्‍य असल्यास घरात चांगला फिल्टर बसवावा.
 • पावसात अकारण भिजणे टाळावे.
 • ऑफिसला किंवा कामाला जाताना पायमोजे आणि कपड्यांचा जास्तीचा जोड घेऊन जावा. ओल्या कपड्यांत वावरणे टाळावे. 
 • आपल्याबरोबर अंग आणि केस पुसण्यास एखादा पंचा किंवा नॅपकिन बाळगावा.
 • शक्‍यतो रबरी चप्पल किंवा मागील बाजूने पूर्ण बंद असलेल्या रबरी सॅंडल्स वापराव्या.
 • भेळ, पाणी पुरी, शेवपापड, कच्छी दाबेली, अंडा भुर्जी अशी जंकफूड्‌स टाळावीत. 
 • बाहेरून आणलेली मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.
 • आहारात झिंक, क जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असावे. लाल भोपळा, तीळ, खोबरे, शेंगदाणे तसेच लिंबू, संत्रे, मोसंबी, अननस यांनी प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
 • जखम झाल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन त्वरित इलाज करावा. विशेषतः पायावर अगदी खरचटल्याची जखम असली, तरी पावसाच्या साचलेल्या पाण्यात जाऊ नये.
 • घरात आणि परिसरात डास, चिलटे, पिसवा, माश्‍या झाल्यास कीटकनाशकांचा फवारा मारावा. 
 • शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नये. 
 • पावसाळ्यात उकडलेले, उकळलेले आणि भाजलेले अन्न खावे. कच्चे, तळलेले आणि आंबवलेले पदार्थ टाळावेत.
 • मिठाई, चीज, पनीर, मांसाहार शक्‍यतो टाळावा.
 • एक दिवसापेक्षा अधिक दिवसांचा ताप, उलट्या, जुलाब अंगावर काढू नये. डॉक्‍टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.
 • कावीळ, टायफॉईड, एन्फ्लूएन्झा, स्वाईनफ्लू अशा रोगांसाठी प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने गरजेप्रमाणे लसीकरण करून घ्यावे. लहान मुले, वयोवृद्ध, क्षीण व्यक्ती यांनी विशेषत्वाने याचा विचार करावा.

ज्यांना अस्थमा, सीओपीडी असे त्रास आहेत, त्यांनी तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून विशेष प्रतिबंधक इलाज करावे.  
     पावसाळ्यात उपवासाचे दिवस अधिक प्रमाणात असतात. उपवासाच्या दिवशी पदार्थामध्ये साबुदाण्याचा, तेलाचा मुबलक प्रमाणात वापर केला जातो. हे पदार्थ जपून खावेत. त्याऐवजी आहारात ताज्या फळांचा समावेश करावा.

थोडक्‍यात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था अपयशी ठरल्याने हा आजार माणसांना होतो. भुयारी गटारांमध्ये उंदरांची पैदास होऊ न दिल्यास आणि पावसाळ्यात भूमिगत गटारांमधले पाणी रस्त्यावरून वाहणार नाही याची व्यवस्था केल्यास या आजारांची लागण होणार नाही. हा आजार होण्यास पावसाळा केवळ नाममात्र निमित्त ठरतो.     
 

संबंधित बातम्या