साप, बेडूक आणि बरंच काही

इरावती बारसोडे
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
 

पाऊस सुरू झाल्यावर सारी जीवसृष्टी कशी न्हाऊन निघाल्यासारखी दिसते. निसर्ग नेहमीच सुंदर असतो, पण पावसाळ्यात तो विशेष देखणा दिसतो. काही ठराविक जीवांसाठी पावसाळा म्हणजे सुगीचा काळ. साप-बेडकांसाठी हा स्वच्छंदपणे बागडण्याचा हंगाम. बेडकांचा तर हा प्रजननाचा सीझन. मला साप-बेडकांविषयी विशेष जिव्हाळा नाही. ते लांबूनच बघायला आवडतात. पण, गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये याच साप-बेडकांची दुनिया खूप जवळून पाहायला मिळाली. फक्त तीन दिवसांत जी काही जैवविविधता बघायला मिळाली, त्यामुळे निसर्गाबद्दल आणखी आदर निर्माण झाला. 

निमित्त होते गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात बीएनएचएसने (बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी) आयोजित केलेल्या कॅंपचे. या कॅंपमध्ये फक्त तीन दिवसांत काय काय नाही पाहिले, साप, बेडूक, खेकडे, विंचू, पाली, नानाविध किडे आणि पक्षी. मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या प्रजाती पाहिल्या आणि त्याही खूप जवळून. त्यामुळे मला त्याचे इतरांपेक्षा जरा जास्तच अप्रूप वाटले. हा कॅंप निव्वळ अभ्यास दौरा असल्यामुळे या प्रत्येक सजिवाबद्दल बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, नवीन प्रजाती माहीत झाल्या.  

दक्षिण गोव्यातील सुर्ला येथील नेचर्स नेस्ट रिसॉर्ट येथे आमचे वास्तव्य होते. नेचर्स नेस्ट हे अगदी नावाला साजेसे ठिकाण आहे. काही मोजकीच कॉटेजेस आणि आजूबाजूला गर्द हिरवीगार झाडी. पावसामुळे वातावरण ओलेचिंब झाले होते. पावसाची संततधार नव्हती, अधूनमधून यायचा, पण आला की जोरदार कोसळायचा. थांबला की नंतर कितीतरी वेळ छपरावरून, पानांवरून पागोळ्या पाझरत राहायच्या. या कॅंपचा हेतूच मुळी तेथील हर्पेटोफॉनाचा (हर्पेटोफॉना म्हणजे सरपटणारे प्राणी आणि हर्पेटॉलॉजी म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास) अभ्यास करणे हा होता. तिथले स्थानिक रमेश आणि गजानन हे दोघे आमच्या प्रत्येक ट्रेलला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून यायचे. दोघेही गप्पीष्ट आणि त्यांना मराठी येत होते, त्यामुळे फावल्या वेळात त्यांच्याकडून जंगलातल्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळाल्या. कॅंपची सुरुवात झाली ती नेचर नेस्टमध्येच. रिसॉर्टच्या आवारामध्ये फिरणाऱ्या दोन सापांना तिथल्या कर्मचाऱ्यांनी पकडले होते. एक होता हम्प नोज पिटव्हायपर आणि दुसरा माऊंटन ट्रिंकेट स्नेक. त्यांना नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले. तीन दिवसांत रिसॉर्टच्या आवारातच अनेक प्रजाती पाहायला मिळाल्या. अतिशय सुंदर गुलाबी खेकड्यापासून ते हॅमरहेड स्लग, जायंट पिल मिलिपीड सारख्या कीटकांपर्यंत खूप काही तेथे होते. जायंट पिल मिलिपीड त्याला हात लावला किंवा त्याला आजूबाजूला धोका जाणवला, तर तो पैसा किड्यासारखा वाटोळा होतो.

कॅंपचा पहिला ट्रेल जवळच्याच पठारावर होता. पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे मस्त हिरवेगार झाले होते आणि अर्थातच चिखलही होता. हे पठार लॅटेराईट दगडाने तयार झालेले होते. खास दगडाचा उल्लेख अशासाठी, की या लॅटेराईट दगडावर काही विशिष्ट सापांच्या प्रजाती आढळतात. त्यामधला एक साप म्हणजे सॉ स्केल्ड व्हायपर. साधारण तीन तासांत या सापाचे तीन नर आणि एक मादी आढळली. याच ट्रेलमध्ये बरोइंग, बुश, बुल हे तीन प्रकारचे बेडूक, विंचू, ग्लायडिंग गेको (गेको ही एक प्रकारची पाल असते.) आणि बरेच कीटक पाहायला मिळाले. पावसाळा असल्यामुळे झाडाच्या खोडावर उगवलेले कप मशरुमसारखे बुरशीचेही काही प्रकार बघायला मिळाले. त्या दिवशी रात्री आम्ही आणखी बेडूक शोधायला बाहेर पडलो. स्किटरींग, ऑरनेट नॅरो माऊथेड आणि मालाबार ग्लायडिंग या नवीन प्रजाती पाहिल्या. मालाबार बेडूक पाण्याच्या डबक्‍याजवळच्या झाडावर फोम नेस्ट बांधतो. लांबून घरटे बघितले, तर पानांना फेस आल्यासारखे दिसते. डबक्‍याजवळ घरटे बांधायचे कारण म्हणजे घरट्यामधून बाहेर आलेले टॅडपोल्स (बेडकाची अतिशय लहान पिले) थेट पाण्यामध्ये पडतात आणि पाण्यामध्ये त्यांची वाढ होते.

पावसामध्ये जंगल अनुभवायची मजा काही वेगळीच असते. आम्ही दोन जंगल ट्रेल्स केल्या. एक, भगवान महादेव वन्यजीव अभयारण्यामध्ये आणि दुसरी तांबडी सुर्ला फॉरेस्ट ट्रेल. शहरी माणसाला जंगल वेगळेच भासते. आजूबाजूला दाट झाडी, समोर दिसते ती फक्त पायवाट. कधीकधी तीही इतकी अरुंद होते, की एकावेळी जेमतेम एकच माणूस कसाबसा जाऊ शकेल. कोणत्याही दिशेला पाहिले, तरी हिरव्या रंगाच्याच वेगवेगळ्या छटा. या हिरव्या रंगातून कधी काय वळवळेल सांगता येत नाही. त्या दिवशीही असाच झाडातून वळवळला. लांबसडक हिरवागार हरणटोळ. पानांमध्ये पहिल्यांदा तो दिसलाही नाही, कारण पानांचा आणि त्याचा रंग अगदी सारखा. त्याने हालचाल केली त्यामुळे तो दिसला. पाली, इतर लहान सापांवर जगणारा हा हरणटोळ थोडासा विषारी असतो. इंग्रजीत याला ग्रीन व्हाइन स्नेक म्हणतात. पटकन न दिसणाऱ्या या हरणटोळाने आम्हाला दोन वेळा दर्शन दिले. खराखुरा हरणटोळ बघितल्यावर मला पुलंच्या बिगरी ते मॅट्रिकमधल्या दामले मास्तरांचे वर्णन आठवल्याशिवाय राहिले नाही.

पावसाळ्यात इथल्या जंगलांमध्ये पायाला जळवा फार चिकटतात. म्हणून खबरदारीसाठी ग्रुपमधल्या काहींनी गुडघ्यापर्यंत येणारे खास ‘लिच सॉक्‍स’ घातले होते. पण, आमचे गाइड मात्र निवांत सॅंडल्स आणि चप्पल घालून चालले होते. सवयीचा भाग, दुसरे काय? तांबडी सुर्ला फॉरेस्ट ट्रेलमध्ये झरा ओलांडावा लागतो. तो जंगलातला झरा असल्यामुळे चांगले मांडीपर्यंत पाणी होते. प्रवाहाला जोरही होता. पण, पाणी इतके स्वच्छ की तळातला प्रत्येक दगड स्पष्ट दिसत होता. आम्ही झऱ्यापाशी आलो आणि पावसानेही तीच वेळ गाठली. वरून पाऊस आणि खाली खळखळणारा झरा, असा पाण्याचा दुहेरी सामना करतच आम्ही झरा ओलांडला.  

दिवसा नयनरम्य वाटणारे जंगल रात्री वेगळेच वाटते. दुसरी नाइट ट्रेल रिसॉर्टच्या जवळच्याच जंगलात होती. आसपास वस्ती नसल्यामुळे तसा प्रकाश नव्हताच. रस्त्यावरून मधूनच ये-जा करणाऱ्या वाहनांचाच तेवढा उजेड होता. जंगलात शिरल्यावर तर तोही नाहीसा झाला. आमच्याकडे असलेल्या विजेऱ्यांचाच तेवढा प्रकाश. बारीकसा पाऊस सुरू होता. सततच्या पावसाने आता चिखलाबरोबर ठिकठिकाणी डबकीही साचली होती. त्यातूनच वाट काढत पायवाटेच्या आजूबाजूला एखादा बेडूक, साप दिसतोय का, ते पाहात सर्वजण चालले होते. अंधारात कुठे चाललोय हे कळायचा प्रश्‍नच नव्हता. रमेश आणि गजाननच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चाललो होतो. थोडावेळच असे गेलो असू. मधेच एके ठिकाणी थांबून रमेश म्हणाला, ‘सगळे इथे गोळा व्हा आणि आपापल्या विजेऱ्या बंद करा.’ सगळेच एकमेकांकडे बघायला लागले, आपण ऐकले ते बरोबर ऐकले का? हा खरेच टॉर्च बंद करायला सांगतोय का? सगळ्यांच्या मनातील विचार ओळखून शेवटी रमेश म्हणाला, ‘जोपर्यंत तुम्ही सगळे दिवे बंद करत नाही, तोपर्यंत आपण इथे जे पाहायला आलोय ते दिसणारच नाही.’ अखेर एकेक विजेरी बंद झाली आणि शेवटचा उजेड नाहीसा झाल्यावर रमेश ज्या झाडाखाली उभा होता, ते झाड एकाएकी चमकायला लागले. मिट्ट काळोख, वरून पावसाची रिमझिम, नीरव शांतता... आणि अंधारात चमकणारे ते झाड... नेहमीच स्मरणात राहील असा प्रसंग होता तो. झाड चमकायचे कारण म्हणजे त्याच्या खोडावर आलेली बुरशी. बायोल्युमिनसन्ट बुरशी होती ती. ही बुरशी संपूर्ण काळोखात चमकते. जंगलात अनेक झाडांवर पावसाळ्यात अशी बायोल्युमिनसन्ट बुरशी येते, असे रमेश म्हणाला. आम्हाला ती झाडेपण बघायची होती. पण, ती जंगलात बरीच आत होती. या रात्रीच्या सफरीमध्ये ट्री मॅंटिस, टू टेल आणि व्हिप नावाचे कोळी, बॅंडेड गेको, ब्रुक्‍स आणि गार्डन लिझर्ड नावाच्या पाली, अंबोली बुश नावाचा बेडूक ही जीवसंपदा पाहायला मिळाली. 

जंगलांमध्ये अनेक फुलपाखरे आणि पक्षीही बघायला मिळाले. पोपट, पांढऱ्या गळ्याचा खंड्या, बुलबुल, स्पायडर हंटर बर्ड, व्हाइट चीक्‍ड बार्बेट, ब्ल्यू बिअर्डेड बी इटर असे असंख्य पक्षी पाहायला मिळाले. मालाबार ग्रे हॉर्नबिल हा पक्षीसुद्धा खूप वेळा दिसला.  

पावसाळा हा एकच ऋतू असा आहे, ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहतो. पाऊस येतो आणि जीवसृष्टी कात टाकून नव्याने बहरते. तिचे चक्र अविरतपणे सुरू राहते. पावसाशी अनेकांच्या आठवणी जोडलेल्या असतात. प्रत्येकाला पाऊस दर वर्षी काहीतरी वेगळे देऊन जातो. गेल्या वर्षी तो माझ्या मनात निसर्गाविषयी कुतूहल निर्माण करून गेला.

संबंधित बातम्या