जबाबदार पर्यटन... सर्वांचीच गरज!

मनोज हाडवळे
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
 

मागील वर्षी राधानगरी धरणाच्या परिसरात गेलो असताना, एका गावातील रस्त्यावरचा फलक फार बोलका होता. ‘या गावात पर्यटकांना येण्यास सक्त मनाई आहे.’ एवढ्या निसर्गरम्य परिसरातील गावात, कोणालाही यावेसे वाटेल, यातून दोन पैसे स्थानिकांना मिळतील, रोजगार निर्मिती होईल असा साधा सरळ हिशेब असतानाही, स्थानिक लोकांना तो रोजगार आणि पर्यटनातून मिळणारे पैसे का नको आहेत, या प्रश्नाचे उत्तर मला तत्काळ मिळाले. निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक येतील, पण ते आल्यानंतर पर्यटनाच्या नावाखाली जे काय काय प्रकार करतील, त्यामुळे गाव व परिसरातील निसर्ग, स्वच्छता, शांतता, सुरक्षा आणि एकंदरच व्यवस्था याची लय कुठेतरी बिघडल्याशिवाय राहात नाही. इथे गावकऱ्यांसमोर दोन पर्याय होते. एकतर पर्यटनातून येणाऱ्या पैशांकडे पाहून त्या बदल्यात होणारे सामाजिक बदल, सुरक्षेचे प्रश्न, प्रदूषण हे दृष्टीआड करायचे किंवा जीवन मूल्यांना महत्त्व देऊन पर्यटनालाच राम राम करायचा. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. पण असे करणे हा योग्य मार्ग आहे का? किती गावांना हे शक्‍य आहे? किंवा असे केल्याने पर्यटक यायचे थांबतील का? 

मागील आठवड्यात दिल्लीच्या एका मित्राबरोबर गप्पा मारत असताना, त्याने मनालीचा एक अनुभव सांगितला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे मनालीला जायचे सर्व रस्ते बंद होते. ३० किलोमीटर अंतर जायला १०-१२ तास वेळ लागत होता. इतकी गर्दी पर्यटनाला उतरली होती. प्रशासनाला सांगावे लागले, की आता इकडे येऊ नका, इथे पाणीही नाही आणि राहायला जागाही नाही. प्रशासनाने असे सांगूनही लोक जायचे थांबले का? मे महिन्यात काजवा महोत्सव असतो, त्याला जाणारे पर्यटक, त्यातून बिघडणारा निसर्गाचा समतोल यावर वेगवेगळ्या व्यासपीठांवर सकारात्मक नकारात्मक अशी चर्चा झाली. वन खात्याने काही तत्कालीन उपाययोजना केल्या, पण त्याने पर्यटकांच्या वागण्यात काही बदल झाला का? एकेकाळी कास पठारावर अनेक दुर्मिळ फुले दिसत, जसजशी त्याची प्रसिद्धी होत गेली, तसतसे जेवढी फुले तेवढे लोक तिथे जायला लागले आणि पुढे काय झाले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सध्या पाऊस छान पडतोय! पावसाळी पर्यटनासाठी, विविध वयोगटातील पर्यटक मंडळी बाहेर पडत आहेत. पावसाळी पर्यटनाच्या स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत कशी पोचते याला अनेक पर्याय आहेत. जसे, पर्यटक ब्लॉग लिहितात, सोशल मीडियाच्या विविध साईट्‌सवर त्याविषयी माहिती देतात, फोटोज अपलोड करतात. विविध राज्याच्या कानाकोपऱ्यातील, विविध ऋतूतील फुलणाऱ्या पर्यटन स्थळांची माहिती त्यामुळे सहज उपलब्ध होते. ज्या ठिकाणी अशी पर्यटनस्थळे आहेत त्या ठिकाणचे स्थानिक लोक किंवा टूर कंपन्या, त्यातून दोन पैसे मिळतात म्हणून स्वतःही त्याचे मार्केटिंग करतात. बऱ्याचदा या सर्व प्रक्रियेत अभ्यासापेक्षा अति उत्साह जास्त असतो. त्यात आपल्या अशा वागण्याने भविष्यात कोणकोणते प्रश्न निर्माण होणार आहेत याचा विचार यातील कोणाजवळच नसतो. हरिहर किल्ल्यावर पर्यटकांचे तुंबलेले ट्रॅफिक आपण सर्वांनीच पाहिले. स्थानिक गिर्यारोहकांच्या मदतीने, प्रशासनाने सर्वांना खाली आणले आणि पुढील तीन महिन्यांसाठी हरिहर किल्ला पर्यटकांसाठी बंद केला. ताम्हिणी घाटातील जंगलात जायचे असेल, तर पूर्व परवानगी घेऊनच जाता येईल. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने, पर्यटनाच्या बाबतीत घेतलेला एक निर्णय वाचला. राज्यभरातील पर्यटनस्थळांपैकी जिथे सेल्फी काढायला जाऊन अति उत्साहात अपघात होतात आणि पर्यटक जिवानिशी जातात, अशा ठिकाणांची एक यादी तयार करून, या ठिकाणांना संवेदनशील पर्यटन स्थळे म्हणून घोषित करायची आणि तिथे सेल्फी काढायला बंदी करायची, असा तो निर्णय होता. 

सध्या पावसाळी पर्यटनासाठी माळशेजघाट सारख्या ठिकाणी पर्यटकांची झुंबड उडते. दरड कोसळण्याचा धोका असलेल्या धबधब्यांजवळ लोक समूहाने जमतात. अचकट विचकट चाळे करतात. नशेत असतात. यात मुलेमुली हे सारखेच आघाडीवर असतात. त्यांच्या अशा उपद्रवी पर्यटनामुळे इतर संवेदनशील पर्यटकांसाठी अशा ठिकाणी जायची इच्छा होत नाही. ३१ जुलैपर्यंत माळशेज घाटही पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. ज्या परिसरात पावसाळी पर्यटनासाठी लोक जातात, तिथल्या स्थानिक लोकांची मानसिकता अनेक प्रकारे समोर येते. काहींच्या मते, जर पर्यटक इकडे येत असतील, त्यांच्या पार्किंग, जेवण, चहा-नाश्‍ता, मुक्कामाची व्यवस्था यातून चार पैसे मिळत असतील, तर बदल्यात केला थोडा धांगडधिंगा, टाकला थोडा कचरा, फोडल्या थोड्या बाटल्या आणि झाला थोडा त्रास तर एवढे काय बिघडतेय? अशा मानसिकतेच्या लोकांना तात्पुरता फायदा दिसतो आहे. भविष्यातील अडचणींची जाणीव जरी असली, तरी त्यांची आजची आर्थिक गरज त्यांना तसे वागायला भाग पाडते. दुसरी मानसिकता अशी असते, की आपला स्थानिक निसर्ग, शांतता, स्वच्छता जपली जायला हवी. यासाठी कमी पर्यटक आले, तरी चालेल पण ते जबाबदार पर्यटन करणारे असावेत. वरील सर्व बाबींचा आपण एकत्रित विचार केला, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. पर्यटकांनी शिस्तीत वागावे. पर्यटनाचा आनंद घ्यावा यासाठी शासन व प्रशासन काही उपाययोजना करताना दिसत आहे. त्यासाठी काही कडक नियमावलीसुद्धा तयार केली जात आहे. काही स्थानिक लोक पर्यटकांनी शिस्त पाळावी, पर्यटनाचा आस्वाद घेताना भान ठेवावे यासाठी काम करताना दिसत आहेत. काही पर्यटक मंडळी जबाबदारीने पर्यटन करत आहेत. असे असतानाही अपेक्षित परिणाम का साधला जात नसावा? मला सापडलेली कारणे अशी वाटतात -

१. पर्यटन, मग ते पावसाळी असो, साहसी असो, जल पर्यटन असो की कोणतेही पर्यटन असो, ते नेमके का करायचे हेच पर्यटकांना उमगलेले नसते. पर्यटन आनंद मिळण्यासाठी करायचे, हे मान्य पण हा आनंद नेमका कशाच्या बदल्यात?
२. राज्यभरात गावोगावी विविध प्रकारचा निसर्ग फुलत असताना, काही ठराविक ठिकाणेच जास्त प्रसिद्धीस येतात आणि पर्यटक हजारोंच्या संख्येने तिथे गर्दी करतात. या गर्दीला सामाजिक भान नसते, शिस्त नसते. त्याचबरोबर या गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे त्यांना सुविधा कशा द्यायच्या या पातळीवर स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्याकडे कुठलेही शाश्वत धोरण नसते.
३. बरीचशी पर्यटन स्थळे ही वनखात्याच्या अख्यातरीत येतात. त्याचबरोबर पर्यटन स्थळांच्या परिसरातील गावे आणि गावकरी हेही अशा पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनात असतात. पण तत्कालीन फायदा डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील नियोजन नसल्यामुळे पर्यटकांवर वचक राहात नाही.
४. ज्याच्यासाठी हे सर्व चाललेय तो पर्यटक वर्ग हा बेभान, बेछूट आणि बेशिस्त होत चालला आहे. तिथल्या निसर्गाप्रती त्याला काहीही देणेघेणे नसल्यासारखी त्याची वर्तणूक आहे.

 या सर्वांचा परिपाक असा होतोय, की कुठे शासनाला जमावबंदीचे तर कुठे प्रवेशबंदीचे आदेश काढावे लागत आहेत. पर्यटकांच्या बेशिस्त वागण्याने छेडछाड, वादावादी, हाणामारी होत आहे. पर्यटकांनी टाकलेला कचरा, फोडलेल्या बाटल्या याचा त्रास निसर्ग, शेतकरी यांना होत आहे. हे सर्व शिस्तीत आणणे नितांत गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल?
१. शासन, प्रशासन, स्थानिक नागरिक व पर्यटक यांच्या समन्वयातून त्या त्या पर्यटनस्थळी, जबाबदार पर्यटनाचे धोरण आखले जावे. एमटीडीसी, वनविभाग, पुरातत्त्व विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग यातील ज्या ज्या विभागाच्या अखत्यारीत पर्यटन स्थळ येत असेल, त्यांनी स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन, येणाऱ्या पर्यटकांसाठी काही नियमावली करून ती यशस्वीपणे राबवायला हवी.
२. स्थानिक लोकांनी तात्पुरत्या रोजगाराचा विचार न करता, शाश्वत रोजगारनिर्मितीसाठी, जबाबदारीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे.
३. येणारे पर्यटक हे आपल्यातीलच असल्यामुळे, घरात लहानमोठ्यांनी, निसर्ग, वारसा स्थळे व त्यांचे संवर्धन आणि यावर आधारित जबाबदार पर्यटन याची साधक बाधक चर्चा करावी. जेणेकरून घरातील तरुण मुले जेव्हा पर्यटनाला बाहेर पडतील, तेव्हा ते जास्त जबाबदारीने वागतील.
 बेजबाबदार, उथळ आणि उपद्रवी पर्यटनाचा त्रास हा निसर्गाला, स्थानिकांना, तेथील मूलभूत सुविधांना होतो. शेतकऱ्यांना, परिसरातील महिलांना होतो. स्वतः पर्यटकांना, प्रशासन आणि शासनालाही होतो. थोडक्‍यात काय तर सर्वांनाच होणारा हा त्रास टाळण्यासाठी जबाबदार पर्यटन ही सर्वांचीच गरज होऊन बसली आहे.
(लेखक जबाबदार पर्यटन जुन्नर चळवळीत स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.)

संबंधित बातम्या