पावसाळा स्पेशल मेनू

प्रीती सुगंधी
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
ज्या महिलांना व पुरुषांना स्वयंपाकाची आवड असते, त्यांचे स्वयंपाक घरात रोज नवनवीन प्रयोग सुरू असतात. अशांसाठीच या काही खास पावसाळी रेसिपीज...  

आलू-पनीर टिक्का
साहित्य : शंभर ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम बटाटे (७० टक्के उकडून घेतलेले बेबी बटाटे), १ कप दही, १ टेबलस्पून बेसन पीठ, १ टेबलस्पून गरम मसाला, तिखट, आले, लसणाची पेस्ट, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून लिंबाचा रस, अर्धा टेबलस्पून धनेपूड, जिरेपूड, सुंठ पावडर, बडीशेप पावडर, १ टीस्पून आमचूर पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ, सिमला मिरची, कांद्याचे चौकोनी काप.
कृती : प्रथम एका बाऊलमध्ये दही, बेसन पीठ, गरम मसाला, तिखट, आले-लसणाची पेस्ट, आमचूर पावडर, धनेपूड, जिरेपूड, बडीशेप पावडर, कोथिंबीर, सुंठ पावडर, चवीनुसार मीठ घेऊन चांगले एकजीव करावे. (पाण्याची गरज भासणार नाही.) नंतर पनीरचे चौकोनी काप करावे. बटाट्याचे दोन तुकडे करावे. सिमला मिरची आणि कांद्याचे चौकोनी काप करून दह्याच्या मिश्रणात टाकावे आणि २० मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर एका बांबू स्टिकमध्ये एक सिमला मिरची नंतर पनीर, बटाटा, कांदा असे एक एक आकारानुसार बांबू स्टिकमध्ये लावून घ्यावे आणि ग्रिल पॅनमध्ये चारही बाजूंनी भाजून घ्यावे. सर्व्ह करताना वरून चाट मसाला टाकून सर्व्ह करावे. पनीर आणि बटाटा लवकर शिजतात. ५ मिनिटांत चारही बाजू भाजून होतात. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

बिस्कीट पनीर पकोडे
साहित्य : एक कप बेसन, १ टेबलस्पून तांदळाचे पीठ, ७-८ बिस्कीट (मारी बिस्कीट), १ टीस्पून सोडा, हळद, तिखट, २ टेबलस्पून बारीक किसलेले पनीर, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून गरम मसाला, गोडा मसाला, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, २ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा.
कृती : प्रथम बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, सोडा, तिखट, गरम मसाला, कोथिंबीर आणि १ चमचा गरम तेल एकत्र करून त्याचे घट्ट आणि सैलसर पीठ कालवून घ्या. पाच मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर एका बाऊलमध्ये पनीर, मीठ, गोडा मसाला, कांदा, कोथिंबीर, गरम मसाला टाकून एकत्र करून घ्यावे. स्टफिंग तयार झाले. तेल गरम करण्यासाठी गॅसवर ठेवावे. तोपर्यंत मारी बिस्कीटाचे एकाचे दोन तुकडे करावेत. एका मारी बिस्कीटाचा तुकडा घेऊन त्यावर पनीरचे मिश्रण ठेवावे. नंतर दुसरे बिस्कीट त्यावर ठेवावे आणि बॅटरमध्ये बुडवून पकोडा लाल-गुलाबी रंगावर तळून घ्यावा. जास्त लाल रंग करू नये. गरमागरम सॉसबरोबर सर्व्ह करावे.  
टीप : हे पकोडे जास्तवेळ ठेवले, तर आतले बिस्कीट नरम होते. त्यामुळे खुसखुशीत लागत नाही.

चीज कॉर्न बाईट
साहित्य : दोन मक्‍याची कणसे, अर्धा कप बारीक चिरलेले चीज, १ टेबलस्पून बटर, तिखट, लिंबाचा रस, साधे व काळे मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून हिरवी चटणी, कोथिंबीर बारीक चिरलेली.
कृती : प्रथम कणीस गॅसवर भाजून घ्यावे. नंतर त्यावर मीठ, बटर आणि लिंबाचा रस लावून पुन्हा गॅसवर २ मिनिटे भाजून घ्यावे. नंतर त्यावर हिरवी चटणी लावून, तिखट व काळे मीठ टाकावे. नंतर एका ताटात चीज घ्यावे. त्यात साधे मीठ, काळे मीठ, तिखट, लिंबाचा रस टाकावा आणि चांगले एकजीव करावे. भाजून घेतलेले कणीस वरील मिश्रणात घुसळून घ्यावे आणि गरमागरम कॉर्न बाईट खायला द्यावा. कणीस भाजलेले असेल, तर ५ मिनिटांत ही रेसिपी तयार होते. सर्व्ह करताना कोथिंबीर टाकावी आणि सर्व्ह करावे.

जामून बटर मसाला
साहित्य : एक कप जांभूळ (बिया काढून बारीक तुकडे केलेले), २ टेबलस्पून जांभूळ प्युरी, २ टेबलस्पून बटर, अर्धा कप ब्रेडचे तळलेले तुकडे, १ टेबलस्पून मिरचीची पेस्ट, चणा मसाला, किसलेले चीज, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून सुके खोबरे.
कृती : एका कढीत बटर टाकून त्यात जांभळाची प्युरी टाकावी. त्याला २ मिनिटे वाफ येऊ द्यावी. नंतर एका कढईत बटर घेऊन त्यात मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, लिंबाचा रस, चणा मसाला, सुके खोबरे टाकून २-३ मिनिटे परतून घ्यावे व त्यात जांभळाची प्युरी टाकावी. नंतर ब्रेडचे आणि जामूनचे तुकडे त्यात टाकावे. वरून अर्धा कप पाणी टाकावे. एक उकळी द्यावी. चवीनुसार मीठ टाकून किसलेले चीज आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे. यामध्ये गोड, तिखट, आंबट, खारट सगळ्या टेस्ट येतात. त्यामुळे ते जास्त छान लागते.

जामून पराठा
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, १ टेबलस्पून तेल. 
सारणासाठी साहित्य ः एक कप जांभळाचे तुकडे (बिया काढून बारीक तुकडे केलेले), चवीनुसार मीठ, २ टेबलस्पून ओले खोबरे, २ टेबलस्पून ड्रायफ्रूट पावडर (काजू, बदाम), १ टीस्पून इलायची पावडर, २ टेबलस्पून तूप (पराठा भाजण्यासाठी).
कृती : एका परातीत पीठ घेऊन त्यात मीठ आणि तेल टाकून पीठ मळून घ्यावे (पुरी सारखे पीठ मळून १० मिनिटे भिजत ठेवावे). एका बाऊलमध्ये जांभूळ, मीठ, खोबऱ्याचा कीस, ड्रायफ्रूट पावडर, इलायची पावडर हे सगळे एकत्र करून घ्यावे आणि २ मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर पिठाचा एक गोळा घेऊन पोळी लाटून त्यावर सारण भरावे. वरून दुसरी त्याच आकाराची पोळी लाटून पहिल्या पोळीवर ठेवावी. पाण्याच्या साहाय्याने कडा बंद करून घ्याव्यात. पराठा तुपात भाजून घ्यावा. हा पराठा कुरकुरीत छान लागतो. पीठ तयार असेल, तर ५ मिनिटांत तयार होतो. मधुमेह असणाऱ्यांसाठी हा जास्त फायदेशीर आहे.

ॲपल पकोडे
साहित्य : एक मोठे बारीक किसलेले सफरचंद, १ कप बेसन, १ टीस्पून ओवा, १ टीस्पून बडीशेप पावडर, १ टीस्पून हिंग, हळद, १ टेबलस्पून तिखट, पावभाजी मसाला, १ कप तेल (तळण्यासाठी), १ टेबलस्पून थंड तेल मोहनासाठी, १ टेबलस्पून जाड रवा, चवीनुसार मीठ, १ टीस्पून लिंबाचा रस.
कृती : सर्वांत आधी सफरचंदाचा कीस घ्यावा आणि लिंबाचा रस लावून ५ मिनिटे बाजूला ठेवावा. नंतर एका बाऊलमध्ये बेसन, रवा, ओवा, बडीशेप पावडर, हिंग, हळद, तिखट, पावभाजी मसाला टाकून सर्व एकत्र करून ५ मिनिटे बाजूला ठेवावे. गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवून बेसनामध्ये सफरचंदाचा कीस टाकावा. नंतर थंड तेल टाकावे. चवीनुसार मीठ टाकावे. सर्व एकत्र करून तेलात पकोडे तळून घ्यावेत आणि गरमागरम सर्व्ह करावेत. 

मलई मिरची भाजी
साहित्य : पन्नास ग्रॅम हिरवी मिरची, १ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून आमचूर पावडर, बडीशेप पावडर, धने पूड, १ टीस्पून हळद, हिंग, १ टीस्पून जिरे, ३ टेबलस्पून मलई (घरची मलई), १ टेबलस्पून दूध, चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम हिरवी मिरची बिया काढून बारीक कापून घ्यावी. फोडणीसाठी एका कढईत तेल टाकावे. त्यात हिंग, जिरे, हळद, धने पूड, बडीशेप पावडर टाकून चांगले परतून वरून मिरची टाकावी. नंतर त्यात दूध टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी. त्यात मीठ टाकून २ मिनिटे शिजवून घ्यावे. नंतर त्यात मलई टाकून १ मिनिट परतून घ्यावे आणि गरमागरम पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे. 
टीप : मलई टाकल्यानंतर १ मिनिटाच्या आत परतून घ्यावे. नाहीतर मलई फाटण्याची भीती असते.

मेथी जामून सॅंडविच
साहित्य : आठ-दहा ब्रेड स्लाईस, चवीनुसार मीठ, १ कप जांभळाचे तुकडे (बिया काढून बारीक तुकडे केलेले), अर्धा कप मेथीची भाजी (बारीक निवडून स्वच्छ धुतलेली), ८-१० किशमिश (बारीक तुकडे केलेले), १ टीस्पून लिंबाचा रस, २ टेबलस्पून बटर, २ केळी (बारीक काप केलेले), २ टेबलस्पून दही (फ्रेश दही).
कृती : एका कढईत बटर घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मेथीची भाजी टाकून २ मिनिटे वाफ द्यावी. नंतर त्यात जांभळाचे तुकडे, लिंबाचा रस, मीठ, किशमिश टाकावे आणि चांगले परतून घ्यावे. साधारण ३ मिनिटे परतावे. नंतर ब्रेडची स्लाईस घेऊन त्यावर बटर लावून तव्यावर ठेवावी. त्यावर केळीचे ४-५ तुकडे ठेवावे आणि त्यावर दुसरी स्लाईस ठेवावी. नंतर त्यावर मेथी जांभळाचे सारण भरावे आणि आणखी एक स्लाईस बटर लावून ठेवावी. (अशा ३ ब्रेड स्लाईस एका सॅंडविचसाठी लागतील.) वरून बटर लावून खरपूस भाजून घ्यावे आणि सॉसबरोबर सर्व्ह करावे. सर्व्ह करताना त्रिकोणी तुकडे करावेत.

शेंगदाणा ब्रेड वडा
साहित्य : एक कप जाड रवा, २ टेबलस्पून दही (फ्रेश दही), २ बटाटे उकडून मॅश केलेले, ७-८ ब्रेड स्लाईस (मिक्‍सरमध्ये चुरा केलेला), अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, १ टेबलस्पून गरम मसाला, धने पूड, तिखट, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून बारीक कापलेला लसूण, तळण्यासाठी तेल.
कृती : रवा, दही एकत्र करून ५ मिनिटे भिजत ठेवावे. नंतर त्यात बटाटे, ब्रेड स्लाईसचा चुरा, शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला, धने पूड, तिखट, लसूण, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून चांगला गोळा करून घ्यावा. पाण्याची गरज नाही. वडे करताना पाण्याचा हात लावून गोळा हातावर थापून मधे एक भोक पाडून तेलात तळून घ्यावा. लालसर गुलाबी रंगावर तळून घ्यावा आणि दह्याबरोबर सर्व्ह करावा.

टी प्रिमिक्‍स
साहित्य : शंभर ग्रॅम दूध पावडर, ४५ ग्रॅम साखर, २० ग्रॅम चहा पावडर (तुमच्या आवडीनुसार), ५ इलायची, २ लवंग, दालचिनीचा अर्धा तुकडा, चहा करण्यासाठी २ कप पाणी, दीड टेबलस्पून टी प्रिमिक्‍स.
मसाल्याची कृती :  दूध पावडर, साखर, चहा पावडर, इलायची, लवंग, दालचिनी एकत्र करून मिक्‍सरमध्ये बारीक करून घेतली, की झाली टी प्रिमिक्‍स पावडर तयार. ही पावडर डब्यात ठेवावी. प्रवासात, पिकनिकमध्ये याचा उपयोग होतो. १५-२० दिवस टिकते. चहा करण्यासाठी एका पातेल्यात एक कप पाणी एकूण दीड टेबलस्पून टी प्रिमिक्‍स पावडर टाकावी. २-३ उकळ्या येऊ द्याव्यात. २ मिनिटांत चहा तयार.

संबंधित बातम्या