भजी, वड्यांचे विविध प्रकार

सुप्रिया खासनीस
शनिवार, 20 जुलै 2019

चिंब पावसाळा
पावसाळा म्हटले, की छान गरम गरम वडे, भजी खावीशी वाटतात. गरम गरम भजीबरोबर मस्त चहा म्हणजे खवैय्यांसाठी पर्वणीच! अशाच काही भजी व वड्यांच्या विविध पाककृती...

मका भजी 
साहित्य : एक वाटी सुक्‍या मक्‍याचे पांढरे दाणे, ५-६ हिरव्या मिरच्या, एक चमचा मीठ, हिंग, हळद, जिरे, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा ते पाऊण वाटी डाळीचे पीठ
कृती : मक्‍याचे दाणे रात्री भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. नंतर पुरणयंत्रातून जाडसर काढून घ्यावेत किंवा मिक्‍सरमधून भरडसर काढावेत. त्यामध्ये डाळीचे पीठ, मीठ, मिरच्या, कोथिंबीर, हिंग, हळद व जिरे घालून पीठ तयार करावे. पाण्याचा वापर कमी करावा. आयत्यावेळी भजी तळावीत. गरमागरम फारच छान लागतात.

उडीद मेथी भजी 
साहित्य : एक वाटी उडीद डाळ, २ वाट्या जाड तांदूळ, जिरे, मिरे, १ वाटी मेथीची पाने, मीठ, हिरवी मिरची, आले, तेल, १ चमचा दही, चिमूटभर सोडा.
कृती :  डाळ तांदळाचा रवा काढून घ्यावा. रात्रभर दही, पाणी घालून रवा भिजवून ठेवावा. जिरे आणि मिरे यांची भरडसर पूड करून घालावी. हिरवी मिरची, आले वाटून घ्यावे. मेथीची पाने बारीक कुस्करून घ्यावीत. सर्व साहित्य एकत्र कालवावे. सोडा व गरम तेल (मोहन) घालून पीठ भजीच्या पिठाप्रमाणे भिजवावे. नेहमीप्रमाणे भजी करून तळावीत.

पालक भजी
साहित्य : एक जुडी पालक स्वच्छ धुऊन व चिरून, २ वाट्या डाळीचे पीठ, १-२ चमचे तिखट, पाव चमचा हळद, २ चमचे तेल, १ चमचा पांढरे तीळ, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल
कृती :  चिरलेल्या पालकामध्ये डाळीचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ घालून २ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. पिठात थोडे पाणी घालून पीठ कालवावे. फार पातळ करू नये. नंतर गोल भजी करून तळावीत. छान लागतात.

ब्रेड भजी 
साहित्य : एक-दोन स्लाईस ब्रेड, डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हिंग, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती :  प्रत्येक स्लाईसचे ४-४ तुकडे करावेत. नेहमीप्रमाणे भजीचे पीठ तयार करावे व त्यात एकेक तुकडा बुडवून भजी तळावीत.

बटाटा वडे
साहित्य : बटाटे, कांदे, चण्याच्या डाळीचे पीठ, मीठ, ओल्या मिरच्या, आले, लसूण, कोथिंबीर, तेल हे सर्व पदार्थ आपल्या अंदाजाने व चवीप्रमाणे घ्यावेत. किंचित सोडा.
कृती :  बटाटे चांगले उकडून घेऊन ते जाडसर किसणीने किसून घ्यावेत किंवा चांगले बारीक कुस्करावेत. त्यात कांदा बारीक चिरून घालावा. आले, लसूण व ओल्या मिरच्या वाटून घालावे. कोथिंबीर चिरून घालावी. मिश्रणावर फोडणी घालून ते चांगले कालवावे. त्याचे लहान गोल गोळे अथवा चपटे वडे थापून तयार करून ठेवावे. डाळीच्या पिठात मीठ, थोडे तिखट व किंचित सोडा आणि तापलेले थोडेसे तेल घालावे. पीठ पाणी घालून भजीसारखे सैलसर भिजवावे. तेल तापल्यावर वड्याचे तयार केलेले गोळे किंवा चपटे वडे पिठात बुडवून तेलात तळून काढावेत.

पोह्याचे वडे
साहित्य ः एक वाटी पोहे, पाव वाटी चण्याचे पीठ, १ मोठा कांदा, कोथिंबीर, ओल्या मिरच्या, ओले खोबरे, हळद, जिरे, मीठ, तेल, साखर
कृती : पोहे धुऊन घ्यावेत. कांदा, मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. नंतर त्यात खोवलेले ओले खोबरे, हळद, जिऱ्याची पूड, चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सर्व जिन्नस एकत्र कालवावे. चण्याचे पीठ पोह्यात मिसळून त्यावर दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. नंतर वर तयार केलेले मिश्रण चांगले एकत्र कालवून घ्यावे. आवश्‍यकता वाटल्यास थोडे पाणी घालावे. ते मिश्रण वडे करण्याइतपत घट्ट असावे. नंतर वडे थापून तळून काढावे. एखाद्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे.

नारळाचे वडे
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, ४-५ लाल सुक्‍या मिरच्या, ६-७ हिरव्या मिरच्या, २ वाट्या खोवलेले खोबरे, मीठ व तेल
कृती : तांदूळ व डाळी भिजत घालाव्यात. ४ तासानंतर त्यातील पाणी काढून टाकावे. तांदूळ व डाळी वाटून घ्याव्यात. फार वाटू नये. वाटताना पाणीही घालू नये. पीठ घट्ट हवे. लाल व हिरव्या मिरच्या वाटून तो गोळा पिठात घालावा. तसेच खोबरे घालून चवीनुसार मीठ घालावे व मिश्रण कालवून एकसारखे करावे. नंतर त्याचे पाहिजे तेवढे मोठे वडे थापून तळून काढावे.

कोहळ्याचे वडे
साहित्य : एक वाटी उडदाची डाळ, २ वाट्या कोहळ्याची कीस, ७-८ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, १ चमचा तिखट, पाव चमचा हळद, कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.
कृती :  उडदाची डाळ स्वच्छ धुऊन ४ ते ५ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर उपसून मिक्‍सरवर मध्यम वाटावी. त्या डाळीत कोहळ्याचा कीस घालावा. तसेच मिरच्यांचे तुकडे, तिखट, मीठ, हळद व चिरलेली कोथिंबीर घालून पीठ कालवावे. त्या पिठाचे वडे थापावेत. तेलात तळून काढावेत. हे वडे हलके होतात व खावयास चांगले लागतात.

चण्याच्या डाळीचे वडे
साहित्य : दोन वाट्या चण्याची डाळ, एक मोठा कांदा, ४-६ मिरच्या, मूठभर कढीलिंबाची पाने, ४ चमचे चण्याचे पीठ, मीठ, तेल, धने
कृती :  चण्याची डाळ २-३ तास भिजत ठेवावी. कांदा चिरून घ्यावा. मिरच्यांचे तुकडे करावेत. डाळ उपसून घ्यावी. डाळ, मिरच्यांचे तुकडे, कांदा, कढीलिंब एकत्र करून पाणी न घालता मिक्‍सरवर जाडसर वाटावे. वाटलेले मिश्रण सैल वाटल्यास त्यात जरुरीप्रमाणे डाळीचे पीठ घालावे. चवीप्रमाणे मीठ घालून वडे थापावेत व तळावेत. हे वडे कुरकुरीत लागतात.

कांद्याची भजी 
साहित्य : चार-पाच मोठे कांदे, २ वाट्या डाळीचे पीठ, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, ४ चमचे तेल, मीठ चवीनुसार, पाव चमचा बेकिंग पावडर, तळण्यासाठी तेल.
कृती :  कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. त्यावर तिखट, हळद, मीठ व ४ चमचे तेल गरम करून घालावे. हाताने थोडे कालवून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे. १५-२० मिनिटांनी मिश्रणात डाळीचे पीठ घालावे व हलक्‍या हाताने मिसळावे. कांद्याला सुटलेल्या पाण्यात पीठ मिसळेल. वेगळे पाणी वापरू नये. त्यात पाव चमचा बेकिंग पावडर घालावी. नंतर तेल तापायला ठेवावे व कांदा हाताने मोकळा करून वेड्यावाकड्या आकाराची भजी घालावीत व चांगली तळून काढावीत.

बटाटा भजी 
साहित्य : तीन-चार मोठे बटाटे, २ वाट्या भरून डाळीचे पीठ, २ चमचे तांदळाची पिठी, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, ३ चमचे तेल, मीठ चवीनुसार, चिमूटभर सोडा, तळण्यासाठी तेल.
कृती :  बटाट्याची साल काढून त्याचे गोल पातळ काप चिरावेत. मिठाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवावेत. नंतर हाताने चोळून बाहेर काढून चाळणीत निथळत ठेवावेत. डाळीच्या पिठात तांदळाचे पीठ व ३ चमचे तेल कडकडीत करून घालावे. त्यात चवीनुसार तिखट, मीठ व थोडी हळद घालावी. पीठ सरबरीत कालवावे. त्यात चिमूटभर सोडा घालावा. तेल तापल्यावर बटाट्याची एक-एक चकती पिठात बुडवून भजी घालावीत व खरपूस तळावीत.

उडीद वडे
साहित्य : उडदाची डाळ, कांदा, लसूण, तिखट, मीठ, जिरे, कढीलिंब, सुके खोबरे, तेल
कृती :  उडदाची डाळ ८ तास आधी भिजत घालावी. नंतर ती बारीक वाटून घ्यावी. वाटलेल्या डाळीच्या प्रमाणात व चवीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, लसूण, खोबरे, तिखट, मीठ, जिरे व कढीलिंब (बारीक करून) इ. सर्व जिन्नस घालावेत. भजीच्या पिठाप्रमाणे पीठ करून वडे तळून काढावेत. हे वडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरम गरम खाण्यासाठी द्यावे, मस्त लागतात.

मिरची भजी 
साहित्य : जाडसर बुटक्‍या मिरच्या, हरभरा डाळीचे पीठ, ओवा, तीळ, धन्या-जिऱ्याची पूड, थोडा रवा, मीठ, कोथिंबीर, चिंच, गूळ, खसखस
कृती :  बाजारात जाड मिरच्या मिळतात. त्या उभ्या चिरून आतील बिया काढून टाकाव्यात. गरम पाण्यात थोडे मीठ घालून त्यात मिरच्या थोडावेळ बुडवून ठेवाव्यात. नंतर बाहेर काढून निथळत ठेवाव्यात. तेलावर रवा थोडा भाजून घ्यावा. चिंचेचा दाट कोळ काढून त्यात चवीप्रमाणे मीठ, गूळ, ओवा (भरडसर), तिळकूट, खसखस, धन्या-जिऱ्याची पूड घालून एकत्र कालवून सारण तयार करावे. ते सारण मिरच्यांत भरावे. चण्याच्या पिठात मीठ, चिरलेली कोथिंबीर व कडक तेलाचे मोहन घालावे. पीठ भजीच्या पिठाइतपत भिजवावे. त्या पिठात मिरच्या बुडवून भजी तळून काढावीत.

कोबी वडे
साहित्य : एक वाटी किसलेला कोबी, १ मोठा कांदा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड ते दोन वाटी डाळीचे पीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा गरम मसाला, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, जिरे, अर्धा लिंबू, १ लहान डाव मोहनसाठी तेल व तळणीसाठी आवश्‍यक तेल.
कृती :  कांदा, कोबी किसून घ्यावा. किसलेला कोबी व किसलेला कांदा एकत्र कालवावे. त्यात मिरच्यांचे बारीक तुकडे करून घालावे. त्यामध्ये वर दिलेले इतर सर्व साहित्य घालावे. गरम तेलाचे मोहन घालावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी. कोबी, कांदा, कोथिंबीर यांचा ओलेपणा पीठ भिजवण्यास पुरेसा असतो. पाणी वापरू नये. नंतर त्याचे छोटे छोटे वडे करून तळावेत. छान लागतात.

संबंधित बातम्या