पावसाचं घर
चिंब पावसाळा : कविता
पाऊस थेट घरातच पडायचा
घरातली भांडीकुंडी जायची संपून
माझी मोठी बहीण अन मी त्याला फेकायचो घराबाहेर
तरी त्याचा घरातला मुक्काम हलायचा नाही
तो भरून असायचाच बासनात
जरावेळानं तो शाळेच्या दप्तरावर यायचा
पुस्तकांत बसायचा लपून
दप्तर ठेवायचं कुठं त्याच्यापासून?
कारण त्यानं कुठलीच जागा
सोडलेली नसायची
तो माझ्या कवितेच्या वहीवरही यायचा
म्हणून पोटाच्या बाजूनं
मी खोसायचो वही इजारीत
तो तर माझ्या अंगभरही असायचाच
बहिणीनं रानावनातून वेचून आणलेल्या
वाळक्या काटक्याकुटक्या, गवऱ्या
तो तर त्यांच्यावरही यायचा आडेलवाणी
आई कावून जायची चूल फुंकून फुंकून
कारण तो चुलीतही यायचा
अन तव्यावरच्या भाकरीवरही..
आम्हास उपाशी ठेवून पाऊस जायचा निघून
तरीही डोळ्यात पाणी म्हणून
उरलेला असायचाच..
डोळ्यातला पाऊस पुसून बहीण वाचत बसायची
माझ्या भिजलेल्या कविता
पाऊस निथरत राहायचा वहीवरून खाली
रात्रभर कविताही कूस बदलत राहायची..पावसानं भिजलेली जागा टाळत..!