फंदफितुरी

मंजिरी पाटील
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा : कविता
 

आषाढाचे मेघ दाटले...आसुसलेले रान
चहुदिशांनी दाटून आले भिजले पान न पान
रानी अवघ्या रिमझिम झरती मल्हाराच्या सरी
आणि दूरवर घनशामाची वाजतसे बासरी....

रुमझुम रुमझुम नाद मोहवी भवतालाला असा
तालाचा त्या बोलाचा त्या पडघम वाजे जसा
सताल पाऊस झुलवतो मना हुरहुर काहूर उरी
श्वासामधुनी दरवळलेली तुळशीची मंजिरी....

ध्यास लागला राधिकेस त्या श्रीहरिचा अंतरी
म्हणुनि गोपिका अन गोपांशी केली फंदफितुरी
राधा गवळण झेलून घेते मदनाचे ते बाण
गात्रातून चैतन्य खेळता हरखून गेले प्राण...

संबंधित बातम्या