सहजीवनातील कंगोरे

डॉ. गौरी कानिटकर
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

नाटकातील लग्न

पती-पत्नी नात्याचा डोलारा विश्वास, प्रेम, आदर यावरच उभा राहत असतो. अशाच प्रगल्भ प्रेमाचा साक्षात्कार, असेच गहिरे नाते वि. वा. शिरवाडकर यांच्या  ‘नटसम्राट’ या १९७१ मध्ये रंगमंचावर आलेल्या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर आणि कावेरी यांच्यामध्ये दिसते. ‘नटसम्राट’ नाटकाचे कथानक बहुश्रुत आहे. परंतु अप्पासाहेब आणि कावेरी यांचे भावजीवन, सहजीवन आणि पती पत्नी नात्यातील कंगोरे कसे होते हे पाहणे रंजक ठरते. 

कर्तबगार पुरुष आपल्या स्वतःच्या क्षेत्रात प्रगती करत असतानाचा त्याचा प्रवास, प्रवासादरम्यान त्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थान मिळवताना तो घेत असलेले बाहेरच्या जगाचे असंख्य बरे वाईट अनुभव, त्यात झालेल्या मानसिक जखमा, खाल्लेल्या ठेचा, मिळणारे यशापयश आणि तो हे सगळे करत असताना त्याच्या नकारात्मक बाजूंचा विचार न करता त्याच्या सगळ्या गुणदोषांसकट आहे तसा स्वीकारत त्याला मनोमन साथ देणारी त्याची सहचारिणी हे दृश्य, त्या काळच्या जवळजवळ  सगळ्या मध्यमवर्गीय सुशिक्षित वर्गात थोड्याफार फरकाने असे. तडजोड करतच संसार करणे किंवा संसार म्हटले की तडजोड आलीच अशी दृढ मानसिकता असलेल्या स्त्रिया त्या काळात घरोघर बघायला मिळत असत. त्या काळाच्या बाईच्या जगण्याबद्दल शिरवाडकरांनी या नाटकातील अप्पांच्या तोंडी घातलेले संवाद ‘बाईचं जगणं’ अगदी यथायोग्य दाखवतात.

अप्पासाहेब कावेरीला म्हणतात, ‘कावेरी, गेल्या पन्नास साठ वर्षांत एक गोष्ट तुला सांगायची विसरूनच गेलो. आता सांगणार आहे ती. मला तू फार फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर. बायको हे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी. गलबत शीड उभारून साता समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडतं. हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे, आणि द्वेषाचेही.....  जगातले हे सारे उद्रेक अंगावर घेत असताना गलबत सतत पाहत असतं आपल्या बंदराकडे.... गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचं सांत्वन ही त्याला बंदरातच मिळतं. अशी आहे बंदराची महती. म्हणजेच बायकोची. म्हणजेच तुझी.’

‘नटसम्राट’ नाटकातले असे या दोघांमधले संवाद या नाटकाचे आणि अप्पासाहेबांच्या आयुष्याचे सार आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा समाज, त्या वेळची लग्नसंस्था, पती पत्नी सहजीवन, नवरा बायकोच्या नात्यातले उत्कट, गहिरे भावबंध या सगळ्याचे उत्तम प्रतिबिंब या संवादांतून उमटते. 

अप्पा आणि कावेरी या दोघांचे नाते, अनेक वर्षांच्या सहवासाने सर्वार्थाने एकमेकात विरघळलेले असणे, मावळतीच्या वयात असलेल्या दोघांचे परस्परांशी असलेले दृढ असे भावनिक नाते आणि वयाने लहान असलेल्या व त्या काळातील नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नंदा आणि नलूचे त्यांच्या जोडीदाराशी असलेले नाते या दोन्हींमध्ये फरक आहे. परस्परांमधले प्रेम, प्रेमाचे गहिरेपण यामध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत. 

पहिल्यापासून अप्पासाहेबांना तन मनाने साथ देणाऱ्या कावेरीसाठी अप्पासाहेब जे म्हणतील, करतील ते प्रमाण आहे; पण तरीही अप्पासाहेब जेव्हा त्यांची सगळीच्या सगळी संपत्ती मुलांना देऊन टाकतात तेव्हा कावेरीने त्यांना सांगितलेली गोष्ट तिचे नवऱ्यावरचे प्रेम तर दाखवतेच, पण तिचे संसारिक शहाणपणदेखील त्यातून दिसून येते. ती म्हणते, ‘आजच एव्हढी घाई कशाला करायला हवी होती? आणि माणसं वाईट नसली तरी म्हातारपण वाईट असतं. पुढचं  वाढलेलं ताट द्यावं, पण बसायचा पाट  देऊ नये माणसानं.’

मुलगा आणि सुनेने केलेल्या अपमानाने अप्पासाहेब आणि कावेरी अत्यंत व्यथित होतात. त्या प्रसंगातला कावेरीचा संवाद पहा, ती म्हणते, ‘आजची रात्र आपण स्टेशनवर काढू. कुठेही रस्त्यावर झाडाखाली राहू. पण इथे नाही. तुमचा अपमान एखादेवेळी तुम्ही सहन कराल, पण मी नाही करायची.’ एकमेकांबद्दलची आपुलकी दाखवणारी अशी अनेक वाक्ये नाटकभर विखुरलेली आहेत. 

तारुण्यात रंगभूमीची सेवा करण्यात कावेरीसाठी करावयाच्या राहून गेलेल्या गोष्टींची पूर्तता करण्याचा प्रयत्न अप्पासाहेब करत असतात. दोघांचे म्हातारपण, कावेरीचे आजारपण आणि त्यातून आलेली असहायता यामुळे कर्तबगार, वाघासारख्या नवऱ्याचे ते हतबल रूप कावेरीला बघवत नसते. आपण गावाकडे निघून जाऊ असे ती त्यांना सुचवते. ते जाण्याचे ठरवत असतानाच त्यांची मुलगी नलू अप्पांवर पैसे चोरीचा आळ घेते. आणि त्यामुळे अप्पासाहेब आणि कावेरी पुरते खचतात. त्यांच्या स्वाभिमानाला, अस्मितेला फार मोठी ठेच लागते. यादरम्यान मावळतीच्या वाटेवरचे दोघांचे सहजीवन, मुरांब्यासारखे मुरलेले त्यांचे नाते, परस्परांना जपणे, एकमेकांसाठी जास्तीत जास्ती काहीतरी करण्यासाठीची धडपड यांतून त्यांचे भावनिक आणि हृद्य नाते प्रकर्षाने जाणवते. 

हे नाटक १९७१ सालातले आहे. मोडकळीला आलेल्या कुटुंबाचे प्रभावी  चित्रण या नाटकात दिसते. वडिलांनीच मिळवलेले पैसे घेऊन, त्यांची म्हातारपणाची पुंजी घेऊन, त्यांचा अपमान करणे हे दृश्य त्याकाळच्या समाजात जागोजागी दिसत होते. या नाटकाच्या आगमनानंतर मध्यमवर्गावर या नाटकाचा मोठा परिणाम झाला होता. रूढीमान्य अशा कुटुंब संस्थेवरचा हा आघात पचवायला काहीसा जड गेला तरी स्वतःच्या नावावर असलेली संपत्ती आपण हयात असताना मुलांच्या नावावर करायची नाही, असा धडा तत्कालीन समाजातल्या पालक पिढीने घेतल्याचे जाणवले, हे नाटककाराचे मोठे यश आहे. सर्वसामान्य लोकांच्या बोलण्यातदेखील ‘स्वतःसमोरचे  ताट द्यावे , पण बसायचा पाट  देऊ नये’ हे कावेरीच्या तोंडचे वाक्य येत असे. कावेरी आणि अप्पा यांचे एकमेकांवरचे प्रेम हे गहिरे असले तरीही त्यात कावेरी ही अधिक समंजस आहे. म्हणूनच हे नाते टिकले आहे. हा समंजसपणा एकतर्फी आहे. जोडीदाराला आहे तसा स्वीकारणे हे विवाहमूल्य इथे दिसते. सहनशीलतेपेक्षा सहिष्णुता हे मूल्य सहजीवन अधिक प्रगल्भ करते. त्यांच्या नात्यातील गहिरेपणा शब्दातीत आहे. एकमेकांना समंजसपणे साथ करीत, परस्परांना सांभाळत, एकमेकांची काळजी घेत, एकमेकांसाठीच जणू उरलेले असे त्यांचे हृद्य नाते रंगवले आहे. 

परंतु विवाहसंस्था, वैवाहिक जीवन या दृष्टीने दोघांकडे पाहिले तर अप्पांनी बाहेर जाऊन काम करायचे, आणि ते करत असताना विवाहाच्या अलिखित संकेतांना, नीती नियमांना दृष्टीआड करायचे (स्वतःला हवे तसे वागायचे), आणि कावेरीने मात्र घरात राहून घरातल्या गोष्टी सांभाळायच्या हे पारंपरिक नाते या दोघांमध्ये दिसते. शिवाय तिला एका बाजूला ‘सरकार’ म्हणायचे आणि निवृत्तीच्या वेळी आलेली पुंजी दोन्ही मुलांमध्ये वाटून टाकताना ‘सरकार’चा विचारही घ्यायचा नाही, हे कुठेतरी खटकते. तसेच ‘गलबत’, ‘किनारा’ अशा उपमा देऊन पत्नीला एका देव्हाऱ्यात बसवायची, ही प्रथा खटकणारी आहे. ‘मैत्रिणी अनेक होत्या, पण बायको मात्र तू एकच,’ असे म्हणून स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करायचे. हीच परिस्थिती विरुद्ध असती तर ‘किनारा’ व्हायची तयारी अप्पासाहेबांनी दाखवली असती का? पुरुषी वर्चस्व असणाऱ्या आपल्या संस्कृतीत याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागते. परंतु आताच्या काळातील मुलगी मात्र पतीने पत्नीसाठी किनारा होण्याची अपेक्षा करत आहेत, नव्हे तो त्यांचा आग्रहच आहे.

नाती, त्यांच्यातील बंध, कर्तव्य, भावना या सर्वांचा पुनर्विचार करायला लावणारे हे नाटक आहे.  

संबंधित बातम्या