एका घरात होती

गौरी कानिटकर 
सोमवार, 14 डिसेंबर 2020

नाटकातील लग्न

“माझा संसार चालवायला लोक नाही येणार. संसार लोकांच्या सर्टिफिकेटस वर नाही चालत. तो चालतो रुपये आणि पैशांच्या हिशेबातच. आणि ते स्वतःला मिळवावे लागतात. लोकांची पर्वा नाही मला. पर्वा आहे ती फक्त तुमची...... मला विश्वास हवा आहे तो फक्त तुमचा.” ----- हे उद्गार आहेत सुरेश खरे लिखित ‘एका घरात होती’ या नाटकातील नायिकेचे – उमाचे.

उमाचा पती श्रीधर हा कुटुंबातला कर्ता पुरुष – एका अपघातात जायबंदी होतो. त्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागतात. नोकरी सुटते. साहजिकच उमाला नोकरी करणे भाग पडते. ती एका खासगी कार्यालयात नोकरी करायला लागते. त्यांना मिनी नावाची आठ वर्षाची मुलगी असते. श्रीधरचे दोन्ही भाऊ अशोक आणि बाळ हे श्रीधर बरोबर राहत असतात. अशोक नोकरी करत असतो, पण बाळ बेकार असतो. एका स्त्रीने घराचे कर्ते पण सांभाळणे ही गोष्ट सोपी नसते. घराबाहेर पडून पैसे कमावून आणणे, त्याच बरोबर गृहिणीपण निभावणे अशी दुहेरी कसरत तिला करावी लागते. हे करताना घरातल्या व्यक्तींच्या आवडीनिवडी, खाणेपिणे, शिक्षण याची काळजी घेत असताना स्वतःच्या आवडी, इच्छा, आकांक्षांना दुर्लक्षित करणे हे ओघाने आलेच. स्वतःबद्दल विचार करायलाही फुरसत नसते. 

सहनशील, सोशिक हे बिरूद समाजाने स्त्रीवर लादलेले आहे आणि या जोखडात तिला बंदिवान करून टाकले आहे. उमाही घरातल्या सगळ्यांची जबाबदारी आणि त्यांच्या बाबतचे कर्तव्य उत्तम रीतीने पार पडत असते. फक्त घरातल्या लोकांनी तिच्या कष्टाची जाणीव ठेवायला हवी अशी तिची घरातल्यांकडून  किमान  अपेक्षा असते. 

उमा ज्या बॉसची सेक्रेटरी म्हणून काम करत असते त्याच्या बरोबर तिला बाहेर जावे लागत असते. तो तिच्या कामाचा भाग असतो. तिच्याविषयी बाहेर प्रवाद उठत असतात, पण तिला त्याची पर्वा  नसते. उमाचा लहान दीर बाळ शेवटपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहतो. पण अशोक एकदा तिला बॉस बरोबर थिएटर जवळ बघतो. हे तो श्रीधरला सांगतो. श्रीधर मनात संशयाचे भूत शिरते. तिच्या वागण्याचा तो त्याला हवा तसा अर्थ काढतो. ज्याच्यावरच्या प्रेमापोटी उमा एव्हढे कष्ट उपसत असते त्या आपल्या नवऱ्याच्या मनात आपल्या चारित्र्या विषयी शंका आहे,  हे कळल्यावर मात्र ती मनाने उध्वस्त होते. मनातून तुटून जाते. एकोणिसाव्या शतकातल्या स्त्रीचे सोसणे आणि उमासारख्या स्त्रियांच्या सोसण्याची जातकुळी निराळी दिसली तरी मनाची पडझड एकसारखीच!! 

‘हे सगळे आपण का करतो आहोत’ असा प्रश्न उमाच्या मनात निर्माण होणे स्वाभविकच असते. हिशोबी असणारा तिचा बॉस प्रमोशनच्या बदल्यात तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करतो, पण आपला नवरा आणि संसारावर जिवापाड प्रेम करणारी उमा बॉसला ठामपणे नकार देते. त्याची निर्भत्सना करते. मात्र, कोणतेही वाकडे पाऊल न उचलताही नवरा आपल्या चारित्र्यावर आरोप करतो हे तिला सहन होत नाही. श्रीधर तिला नोकरी सोडायला लावतो. विवाहित स्त्रीच्या जीवनात तिचे सारे आयुष्य ‘नवरा’ नावाच्या पुरुषावर अवलंबून असते. त्याने दाखवलेला मालकी हक्क तिला सहन होत नसतो. ती त्याला परोपरीने समजावून सांगत असतानाही तो तिचे ऐकत नाही. तिच्यावर हुकूमत गाजवण्यात त्याला पुरुषार्थ वाटतो. तो म्हणतो, “मी टायपिंग वर पैसे मिळवून घर चालवीन पण तू नोकरी करायची नाहीस.” 

घरातली परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी उमासारख्या स्त्रीला नोकरीचा राजीनामा देऊन घरात बसावे लागते. इतके वर्षात तिने एकटीने घाम गळून , जिद्दीने आल्या परिस्थितीला तोंड देऊन, अनेक लढाया लढून जे साम्राज्य स्वतःपुरते उभे केलेले असते ते त्याच्या एका फटक्यासरशी मोडून पडते. टायपिंगवर पैसे मिळवून घर चालवणे श्रीधरला कठीण जात असते. घराची परिस्थिती अधिकाधिक कठीण होत असते. 

एक दिवस उमाचे बॉस – प्रधान साहेब - यांचे एक पत्र घरी येते. उमा घरी नसते. तिच्या गैरहजेरीत श्रीधर ते पत्र फोडून वाचतो. त्या पत्रात त्यांनी लिहिलेले असते, “माझ्या ऑफरला तुम्ही दिलेला नकार हा माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव होता. यू  आर ग्रेट! मी तुमची क्षमा मागतो. तुम्ही प्लीज पुन्हा नोकरीवर या,” आपले पत्र आपल्या परोक्ष फोडले म्हणून उमा चिडते. श्रीधर तिला सांगतो, “तू आता नोकरीवर जा,” उमा स्पष्ट शब्दात त्याला नकार देते. घराची गरज म्हणून ती करत असलेली नोकरी सोड हे श्रीधर सांगतो आणि आता परत तिथेच नोकरी कर हेही तोच सांगतो. 

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर स्त्रीने काय करायचे हेही कायमच पुरुषाने ठरवले आहे. तिने नोकरी करावी की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. या सगळ्यामध्ये तिला काय किंमत आहे? वैवाहिक जीवनात मानहानिकारक तडजोडी तिला कराव्या लागतात. त्यामुळे मनाच्या गाभ्यातून ती दुःखी असते. नवऱ्याच्या  तालावर नाचत असताना तिच्या मनाची ओढाताण होत असते. सगळं जमवून घेत असताना तिची दमछाक होत असते. पण ती रडत व कुढत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःला अपराधीही मानत नाही.

ती श्रीधरला म्हणते, “ज्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर संशय घेतलात ..... तो माझ्या प्रामाणिकपणाबद्दल , माझ्या शीलाबद्दल सर्टिफिकेट देणार .. आणि तुम्ही त्याच्या वर विश्वास ठेवणार .. आणि ..मी.. मी तुम्हाला जीव तोडून सांगितलं ... मी तशी नाही... मी माझ्या  मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीत ... त्यांनी माझा गैरफायदा घेतला नाही... तर कुणी विश्वास ठेवला माझ्यावर? जपायचं त्याला काचही जपता येते ... जपायचं नाही त्याला दगडही जपता येत नाही. ... संसार जपता जपता मी सारं हळूवारपणे  जपत होते, पण मला कधी कुणी समजून घेतलं  नाही. ... माझी हीच जिद्द होती की एक चाक डगमगायला लागलं तर दुसऱ्या चाकानं हा संसार चालवायचा ... मला फक्त विश्वास हवा होता.. आणि तो देखील फक्त तुमचा. ...” 

सुरेश खरे यांनी उमाच्या दुःखामागे असणाऱ्या कारणांचा वेध घेतला आहे. कोण कुठला तिऱ्हाईत माणूस तिच्या निष्कलंक चारित्र्याची खात्री सांगणार आणि मग तिच्या नवऱ्याला ते पटणार, हेच नेमके तिचे दुःख आहे. त्याने तिच्या बॉसचे ऐकले पण तिला समजून घेतले नाही हाच तिचा दुखरा भाग आहे. तिथेच ती मनाने त्याच्यापासून दूर जाते. पती पत्नी नात्याचे पावित्र्य भंग पावते. पती-पत्नी नात्याचा पाया विश्वास आहे. त्या नात्यातून विश्वास निघून गेल्यावर त्या नात्याला कोणताही अर्थ उरत नाही. 

श्रीधरच्या मनातही स्वतःबद्दल न्यूनगंडचीची भावना असते. अपघातामुळे आलेले अपंगत्व, त्यामुळे आलेले रिकामपण ह्यामुळे श्रीधर मनाने  दुबळा झालेला असतो. त्यात उमा आपल्या हातून निसटून जाईल का अशी भीती त्याला पोखरत असते. त्यातूनच मग संशयाचं भूत मनात शिरतं. आपण आपली बायको, मुलगी यांना पोसू शकत नाही ही भावना एका पुरुषासाठी फार दुर्दैवी असते. जसे स्त्रीला समाजाने एका विशिष्ट चौकटीत बसवले तसेच पुरुषाला देखील त्याच्या कर्तव्यांच्या चौकटीत बसवले आहे. 

नवरा बायकोचे नाते हे जितके हक्काचे आणि जवळचे असते तितकेच ते एखाद्या अनपेक्षित घटनेने परकेही होत जाते. पूर्वी परस्परांवरून जीव ओवाळून टाकणारे , परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडालेले नवरा बायको त्यांच्या नात्यात अविश्वास आला की परस्परांसाठी अचानक परके होतात. हे नाते जेव्हढे घट्ट असते तितकेच ते नाजूक  असते. प्रेम आणि विश्वास हे उत्तम सहजीवनाचे पायाभूत गुण आहेत. परस्पर विश्वास हा लग्नसंस्थेचा पाया आहे हे या नाटकातून स्पष्टपणे समोर ठेवले जाते. त्याच बरोबर मनमोकळा संवाद हा देखील नात्याचा पाया आहे. दोघांनीही मोकळेपणाने बोलून प्रश्न काही प्रमाणात सुटू शकले असते असे कुठेतरी  ह्या नाटकात वाटत राहते. पण प्रेम म्हणजे आधार शोधायचे, एकमेकांवर विसंबून राहायचे आणि केवळ सवय म्हणून स्वीकारण्याचे नाते नाही. टोकाचा निर्णय दोघांसाठी हानिकारक असतो. विवाहाचे आयुष्यातील नेमके स्थान काय? हा प्रश्न कायमच मनात उभा राहतो

संबंधित बातम्या