वाळूखालची मंदिरे 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

म्हैसूर शहरापासून ४५ किमी अंतरावर कावेरी नदीच्या डाव्या तीरावर तलकाडू नावाचे एक गाव आहे. इथे प्राचीन मंदिरांचा एक समूह असून त्यातली बरीचशी मंदिरे आजही वाळूच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. इथे एकूण ३० मंदिरे असावीत असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ख्रिस्तपूर्व २४७ ते २६६ या काळात हरीवर्मा नावाच्या राजाने ही मंदिरे शोधल्याचे उल्लेख आढळतात. 

म्हैसूर शहरापासून ४५ किमी अंतरावर कावेरी नदीच्या डाव्या तीरावर तलकाडू नावाचे एक गाव आहे. इथे प्राचीन मंदिरांचा एक समूह असून त्यातली बरीचशी मंदिरे आजही वाळूच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. इथे एकूण ३० मंदिरे असावीत असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ख्रिस्तपूर्व २४७ ते २६६ या काळात हरीवर्मा नावाच्या राजाने ही मंदिरे शोधल्याचे उल्लेख आढळतात. 

कावेरीकाठी असलेले जुने तलकाडू शहर जवळजवळ दीड किमी लांब पसरलेल्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. कावेरी नदीच्या एका वळणावर तलकाडू गावाजवळ साडेचार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा वाळूच्या टेकड्यांनी बनलेला एक सखल उंचवटा (Low mound) आहे. या उंचवट्यावर १९९० मध्ये केलेल्या उत्खननांतून प्राचीन मंदिरांचा एक समूह उघडा पडला; ज्यातली  अनेक मंदिरे भग्नावस्थेत आहेत. ती ख्रिस्तपूर्व सहाव्या ते सतराव्या शतकांत बांधली गेली असावीत, असे पुराजीवशास्त्रीय संशोधन सांगते. 

सतराव्या शतकात या प्रदेशात भूकंपसदृश एक मोठी नैसर्गिक आपत्ती आली  होती. त्यात ही सगळी मंदिरे नदीने वाहून आणलेल्या वाळूखाली गाडली गेली. इथे केलेल्या संशोधनात असेही आढळून आले आहे, की नदीपात्राजवळचा हा उंचवटा केवळ वाळूनेच बनला नसावा. कारण उत्खननानंतर आज उघड्या पडलेल्या काही मंदिरांपाशी वाळूचा ढीग साठून ती नष्ट झाल्याचे कुठलेच पुरावे आढळत नाहीत. तर ती भूकंपासारख्या शक्तिशाली कंपनांमुळे भग्न झाली असावीत, असे सुचविणारे अनेक पुरावे सापडतात. 

गेल्या पाचशे वर्षांत नदीचा मार्ग बदलला असावा अशीही काही भूरूपशास्त्रीय (Geomorphic) चिन्हे या प्रदेशांत आढळून येतात. नदीकाठचा भूभाग नदीने केलेल्या प्रचंड वाळूच्या संचयनासह उंचावला गेल्यामुळे (Uplifting) व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या कंपन लहरी आणि नदीने घेतलेले वळण अशा अनेक कारणांनी इथली मंदिरे उद्‌ध्वस्त झाली असावीत व काही वाळूत दाबली गेली असावीत. 

इथल्या काही मंदिरांच्या आजूबाजूच्या नदीतील गाळाच्या थरात, घरबांधणीतल्या विटा, दगडधोंडे यांचे बारीक वाळूत अडकलेले अनेक लहान लहान तुकडेही दिसून येतात. यावरून इथे भूकंपसदृश हालचाली झाल्या असाव्यात असा निष्कर्ष काढता येतो. या भागात मंदिरांच्या जवळपास असलेली तत्कालीन घरे भूकंपानंतर पुन्हा बांधली गेली असावीत अशाही खुणा मंदिर परिसरात आढळून येतात.  तलकाडूच्या वायव्येला ३ किमी अंतरावर असलेल्या हेमिंगे या गावाप्रमाणेच तलकाडू गावातही मेगालिथिक (ख्रिस्तपूर्व ४५०० ते १५००) म्हणजे अश्‍मयुगाच्या अखेरची किंवा ताम्रयुगातील संस्कृती असावी, असे पुराजीवशास्त्रीय संशोधन सांगते. मंदिरांचा हा सगळा समूह त्या वेळच्या अनेक राजांच्या कार्यकाळात बांधला गेला असावा आणि तलकाड हे ‘मंदिरांचे शहर’ (Temple city) म्हणूनच वाढले असावे, असे संकेत या वाळूच्या उंचवट्यावर केलेल्या उत्खननांतून मिळाले आहेत. 

या वर्षाच्या सुरुवातीला या भागांत उत्खनन करताना, नदीच्या पुरापासून गावाचे संरक्षण करण्यासाठी बांधलेली एक प्राचीन भिंत सापडली आहे. नदीपात्रात आणि आजूबाजूला बांधकामांसाठी फारसा दगड मिळत नसल्यामुळे विटा, माती व चुन्याचा वापर करून ही भिंत बांधल्याचे दिसून येते. ३ मीटर जाडीची आणि ३३ मीटर उंचीची ही दगडी भिंत हा त्याकाळच्या उत्तम बांधकाम शैलीचा नमुना असल्याचे मानण्यात येते. आज या भिंतीचा ५ मीटर लांबीचाच भाग दिसत असला तरी मुळातच ती एक किमी लांब नक्कीच असावी असे लक्षात येते. पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत साधारणपणे एक हजार वर्षे ही भिंत अतिशय भक्कमपणे उभी असावी, असेही जाणवते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या