खाऱ्या सरोवरांचा प्रदेश 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नवलाई
 

दक्षिण अमेरिकेचे बोलिव्हिया पठार हे अँडीज पर्वताच्या उत्थापनानंतर (Uplifting) तयार झालेले पठार आहे. या पठारावर अनेक गोड्या व खारट पाण्याची लहानमोठी सरोवरे आणि क्षारांचे आवरण असलेले सपाट प्रदेश (Salt flats) आहेत. इथे पाण्याचा नैसर्गिक निचरा करणारे प्रवाहमार्गच नाहीत. या पठारावर सालार द युनी (Salar de Uyuni) नावाचा जगातील सगळ्यात मोठा क्षारांचे आवरण असलेला ११ हजार चौ. किमी. क्षेत्रफळाचा एक विस्तृत सपाट प्रदेश आहे. अँडीज पर्वतांत ३६५८ मीटर उंचीवर असलेला हा सपाट प्रदेश अनेक प्राचीन सरोवरांच्या क्रमबद्ध रूपांतरणातून (Sequential tranformation) तयार झालेला आहे. 

या सपाट प्रदेशावर उंचीतील फरक कुठेही एक मीटरपेक्षा जास्त नाही. त्यावर असलेला क्षारांचा थर काही मीटर जाड आहे. लिथियम या रासायनिक पदार्थाने समृद्ध असलेल्या एका खारट पाण्याच्या तळ्यावर (Pool of Brine) हा सपाट प्रदेश तयार झाला आहे. जगातले ५० ते ७० टक्के लिथियमचे साठे इथेच आहेत. हा प्रदेश इतका सपाट आहे, की पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहातील उंचीमापक यंत्राच्या (Altimeter) अंशांकनासाठी (Calibration) हा प्रदेश आदर्श मानला जातो. 

हा क्षार प्रदेश फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अनेक प्रजातींसाठी उत्तम प्रजनन प्रदेश आहे. हवामानाच्या दृष्टीनेही तो एक संक्रमण प्रदेश (Transitional zone) म्हणून काम करतो. या प्रदेशाच्या पूर्व भागात तयार होणारे क्‍युमुलोनिंबस प्रकारचे ढग पश्‍चिमेकडे असलेल्या चिली आणि अटाकामाच्या रुक्ष भागाकडे प्रवासच करू शकत नाहीत. या सालारचा भूशास्त्रीय इतिहासही मोठा रंजक आहे. प्राचीन काळात पठारावर असलेल्या अनेक मोठ्या सरोवरातील बदलांतून तो बनला आहे. साधारणपणे ३० ते ४० हजार वर्षांपूर्वी अँडीज पर्वताच्या या भागांत मिनचिन नावाचे एकच मोठे सरोवर होते. आत्ताच्या सपाट क्षार प्रदेशात दिसणाऱ्या कॅल्शियमयुक्त गाळाच्या रेडिओ कार्बन डेटिंगच्या साहाय्याने मिनचिन सरोवराचा हा कालखंड नक्की करण्यात आला. त्यानंतरच्या काळात म्हणजे १३ ते १८ हजार किंवा १५ ते २६ हजार वर्षांपूर्वी मिनचिन सरोवराचे रूपांतर टाऊका या १४० मीटर खोल तळ्यात झाले. कालनिश्‍चितीत पडणारा हा फरक, गाळाचे नमुने घेण्याचे ठिकाण बदलले की बदलतो असे आढळते. ११ हजार वर्षांपूर्वी ‘टाऊका’चे रूपांतर कोईपसा सरोवरात झाले. हे सरोवर जेव्हा आटले तेव्हा त्यातून सध्याची पुपो आणि उरूउरू ही लहान तळी आणि सालार द कोईपसा आणि सालार द युनी ही क्षार आवरण असलेली सपाट वाळवंटे तयात झाली. 

पुपो हे तळे तितीकाका या मोठ्या सरोवरानजीक आहे. पावसाळ्यात तितीकाका भरभरून वाहू लागते आणि त्याचे पाणी पुपो तळ्यात येते. तिथून ते कोइपसा आणि युनीच्या क्षार सपाटीप्रदेशात पूर निर्माण करते. सालार द युनीच्या प्रदेशाखाली खारट पाणी व क्षार यांनी मिश्रित असा तळ्यातला चिखल आढळतो. या प्रदेशाच्या मध्यभागी काही बेटेही दिसतात. ही बेटे म्हणजे पूर्वीच्या मिनचिन सरोवराच्या काळात बुडालेल्या ज्वालामुखींचे शीर्षभाग होत. सालार द युनी प्रदेशाचे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यातील तापमान २१ अंश सेल्सिअस आणि जूनचे १३ अंश सेल्सिअस असते. रात्रीचे तापमान नेहमीच खूप कमी असून ते ५ अंशांपासून वजा ९ अंश सेल्सिअस इतके खाली उतरते. 

या क्षार प्रदेशात सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि मॅग्नेशियम मोठ्या 
प्रमाणावर मिळते. इथे एकूण १० अब्ज टन क्षार असून त्यातले २५ हजार टनापेक्षाही कमी क्षार दरवर्षी निष्कर्षित (Extract) केले जातात. कमालीच्या खारटपणामुळे सगळ्या सालारमधे वनस्पती आणि प्राणीजीवनाचा पूर्ण अभाव असतो. मात्र सालार द युनीमधे कोरफड भरपूर उगवताना दिसते. नोव्हेंबरमध्ये हे फ्लेमिंगो पक्ष्यांचे प्रजननस्थान असते. आधुनिक उपग्रहांच्या साहाय्याने केलेल्या सर्वेक्षणात आता असे आढळून आले आहे, की क्षार आवरणाचा हा प्रदेश पूर्णपणे सपाट नसून त्यावर २ सेमीपर्यंत उंची असलेले उंचवटे आणि काही मिमी खोल भाग सगळीकडेच आहेत. अनेक रहस्ये या भागांत दडली असावीत असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या