परस्परावलंबनाची कडी 

मकरंद केतकर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

निसर्ग कट्टा
 

मित्रांनो, या जगात कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपण सगळेच परस्परांवर अवलंबून असतो. यामुळे अनेकदा गोष्टी सोप्या होतात, एकमेकांना जगण्यासाठी मदत होते, कधीकधी स्वतःचा जीव वाचवता येतो वगैरे. मात्र, असं हे अवलंबून असणं काहीवेळा दोनपैकी एकाच जीवासाठी, तर कधीकधी दोन्ही जीवांसाठी उपयोगी असतं. कुठल्याकुठल्या गोष्टींसाठी सजीव एकमेकांवर तसेच निर्जीव गोष्टींवर अवलंबून असतात हे आता पाहू; 

अ)    ऊर्जा : ऊर्जेसाठी वनस्पती सूर्यप्रकाशावर अवलंबून आहेत, शाकाहारी प्राणी वनस्पतींवर अवलंबून आहेत; तर मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगतात. 

ब)    निवारा : वनस्पती त्यांच्या प्रकारांनुसार इतर झाडं, माती, दगड, सजीव, पाणी अशा विविध गोष्टींवर अवलंबून असतात. तर विविध प्राणी, पक्षी, सरीसृप व कीटक वनस्पतींच्या आश्रयानं जगतात. 

क)    परस्परावलंबन : अनेकदा दोन जीवांमध्ये परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्‍यक बदल झालेले नसतात. अशा वेळी ते दोन जीव एकत्र येऊन एकमेकांची गरज भागवतात. 

ड)    संरक्षण : मागं म्हटल्याप्रमाणं काही वनस्पती आपल्या मधुर रसानं मुंग्यांना आकर्षित करतात. या मुंग्या इतर कीटकांपासून या झाडांचं संरक्षण करतात. 

क)    पुनरुत्पादन : अनेक वनस्पती पुनरुत्पादनासाठी सजीव तसेच निर्जीव घटकांवर अवलंबून असतात. 

परस्परावलंबनाची उदाहरणं तपशिलात पाहायची असतील, तर आपण आपल्या घरातल्या मसाल्याच्या डब्यापासून सुरुवात करू. आपल्या घरात मसाल्यात वापरलं जाणारं दगडफूल हे शास्त्रीय भाषेत ‘लायकेन’ या प्रकारात येतं. बुरशी आणि शैवाल म्हणजे अल्गी (शेवाळं नाही, ते वेगळं), या दोघांच्या परस्परावलंबनातून तयार होणारी ही रचना आहे. बुरशीमध्ये हरितद्रव्य नसतं पण तिच्यात ओलावा खूप असतो. तसंच ती मातीतून पोषकद्रव्यं शोषून घेऊ शकते. तर शैवाल स्वतःचं अन्न तयार करू शकतं. पण त्याला वाढण्यासाठी सातत्यानं जो ओलावा लागतो तो त्याला बुरशीमधून मिळतो. अशाप्रकारे बुरशी शैवालाला सुरक्षाकवच देते आणि त्याबदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवतं. कोट्यवधी वर्षांपूर्वी अशा प्रकारे दोन वनस्पती एकत्र आल्या आणि हे सिंबायोसिस सुरू झालं. मोठ्या वनस्पतींवर वाढणाऱ्या दोन प्रकारच्या वनस्पती आहेत. शास्त्रीय भाषेत त्यांना एपिफाइट्‌स आणि पॅरासाइट्‌स असं म्हणतात. आपल्या परिचयाच्या आणि सुंदर फुलं येणाऱ्या ऑर्किड्‌सच्या अनेक जाती एपिफाइट्‌स आहेत. एपिफाइट्‌सचं वैशिष्ट्य म्हणजे, ज्या जाती मोठ्या झाडांच्या खोडांवर वाढतात त्या मूळ झाडाची हानी करत नाहीत. त्या केवळ आधारापुरतं खोडांवर वाढतात. एपिफाइट्‌स मोठ्या वृक्षाच्या खोडावरील मृत पेशींमधून पोषण व हवेतील आर्द्रतेमधून पाणी मिळवतात. याच्या विरुद्ध बांडगूळ वर्गातल्या वनस्पती परजीवी (पॅरासाइट्‌स) असतात. ज्या ‘होस्ट’च्या खोडावर तर वाढतातच, परंतु त्याच्या अन्नद्रव्यवाहक नसांमध्ये आपली मुळं घुसवून त्यानं मिळवलेलं अन्न चोरतात. असं मोठ्या प्रमाणात झाल्यास मूळ झाड मरण पावतं. 

बीजप्रसाराचं उदाहरण पाहायचं, तर वनस्पती आणि प्राण्यांमधील अगदी सगळ्यांना ठाऊक असलेलं उदाहरण म्हणजे मधमाश्‍या किंवा फुलपाखरं. मध आणि परागकण मिळवण्यासाठी अनेक कीटक फुलांना भेटी देतात व दुसऱ्या फुलाकडं जाताना नकळत इकडचे परागकण तिकडं वाहून नेऊन वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या कार्याला ‘पायभार’ लावतात. तसंच फळांमध्ये तयार झालेल्या बियांचा प्रसार करण्याच्या कामात अनेक पक्षी व प्राणी मदत करत असतात. अनेक प्रकारच्या वनस्पती उदा. वड, पिंपळ वगैरे.. यांच्या बियांचा प्रसार होण्यास पक्षी मदत करतात. पक्ष्यांच्या पचनसंस्थेतून या वनस्पतींचं बी गेल्यानंतर त्या बीचं कवच मृदू होतं व पक्ष्याच्या विष्ठेतून बाहेर पडल्यावर ते चटकन रुजतं. परजीवी वनस्पतींचं अजून एक गंमतशीर उदाहरण म्हणजे ‘कॉर्डिसेप्स फंगस.’ पक्व झाल्यानंतर या बुरशीचे ‘स्पोअर्स’ म्हणजे बीजकण हवेत उधळले जातात. हे उधळलेले बीजकण जेव्हा कीटकांच्या शरीरावर पडतात, तेव्हा ते तिथंच रुजून त्या कीटकाच्या शरीरातील जीवनरसांवर वाढतात. अशाप्रकारे बुरशीची शिकार झालेल्या कीटकांच्या अंगावर बुरशी उगवलेली दिसते. अर्थात यामध्ये कीटकाचा मृत्यू होतो. यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही. कारण कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारे जे अनेक घटक निसर्गात आहेत त्यातलीच ही एक बुरशी आहे.
तर अशी ही परस्परावलंबनाची निसर्गाच्या साखळीतली अत्यंत महत्त्वाची कडी. ही नसेल तर धान्य पिकणार नाही, नवीन जागी झाडं वाढणार नाहीत आणि मसाल्याला दगडफुलाचा स्वादही येणार नाही.

संबंधित बातम्या