संधीपादसृष्टी 

मकरंद केतकर
सोमवार, 18 मार्च 2019

निसर्ग कट्टा
 

आजपासून पुढचे काही दिवस आपण संधीपादसृष्टीतल्या विविध जिवांची ओळख करून घेणार आहोत. संधीपाद म्हणजे काय? संधीपाद म्हणजे ज्या जिवांच्या पायांमध्ये अनेक सांधे असतात असे जीव. मग आता तुम्ही म्हणाल, की माणसाच्या पायामध्ये अनेक संधी म्हणजे जॉइंट्‌स असतात. मग आपणही संधीपाद झालो का? तर उत्तर ‘नाही’ असं आहे. संधीपाद ही संज्ञा अपृष्ठवंशीय म्हणजे इनव्हर्टिब्रेट्‌स जीवांसाठी वापरली जाते. ज्या जिवांना पाठीचा कणा नसतो पण पाय असतात. शास्त्रीय भाषेत यांना ‘आर्थ्रोपॉड्‌स’ म्हणतात. 

आपल्याला सहजासहजी दिसणारे आर्थ्रोपॉड्‌स म्हणजे कीटक म्हणजे - षटपाद, ॲरॅकनिड्‌स - म्हणजे अष्टपाद आणि मायरियोपॉड्‌स - म्हणजे शतपाद किंवा सहस्रपाद. कीटकांमध्ये (म्हणजे सहा पाय असलेल्या जिवांमध्ये) माश्‍या, मुंग्या, फुलपाखरे, चतुर, खंडोबाचा घोडा, वाळवी, झुरळं, बग्स, बीटल्स अशा विविध जिवांचा समावेश होतो. अष्टपाद जिवांमध्ये विंचू, कोळी, मृगाचे किडे या जिवांचा समावेश होतो. तर सहस्र किंवा शतपाद जिवांमध्ये पैशाचे किडे, गोम या जिवांचा समावेश होतो. याशिवाय पावसाळ्यात दिसणारे खेकडे, मच्छिबाजारात दिसणारे कोळंबी, लॉबस्टर्स हे ‘क्रस्टेशियन्स’ जीवही आर्थ्रोपॉड्‌समध्ये समाविष्ट होतात. पुढच्या काही लेखांमधून यातल्या विविध जिवांची माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. मला खात्री आहे, यानंतर या जिवांबद्दल तुमच्या मनात असलेली भीती, गैरसमज, अंधश्रद्धा वगैरे संपुष्टात येऊन तुम्ही निश्‍चितच त्यांच्याकडं वेगळ्या दृष्टीनं पाहाल. 

चला तर मग सुरू करूयात. आधी सुरुवात षटपाद जिवांपासून करू... कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेले हे जीव पृथ्वीवर प्रचंड संख्येनं, किंबहुना सर्वांत जास्त संख्येनं आढळतात. त्यांचे काही तपशील पुढीलप्रमाणे - 

सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवण्यासाठी आपण षटपाद जिवांचं - मांसभक्षी, वनस्पती भक्षी आणि सफाई करणारे अशा तीन प्रकारात वर्गीकरण करून घेऊ. 

सुरुवात करताना आपण आधी षटपाद जिवांच्या, शास्त्रीय भाषेत वर्गीकरणाच्या तक्‍त्यात ज्याला ‘ऑर्डर’ म्हणतात त्या विविध ऑर्डर्स आणि त्यांची थोडक्‍यात वैशिष्ट्यं पाहू... 

लेपिडॉप्टेरा : (लेपिस = खवले, टेरा = पंख) या खवलेपंखी ऑर्डरमध्ये फुलपाखरं आणि पतंग येतात. 
कोलिओप्टेरा : (कोलिओस = कवच, टेरा = पंख) या कवचपंखी ऑर्डरमध्ये बीटल्स तसेच काजवे येतात. यांचे पंख कडक कवचाखाली लपलेले असतात. उडण्यापूर्वी ते हे कवच वर उचलतात आणि आतले पंख बाहेर आणून उड्डाण करतात. 
हेमिप्टेरा : (हेमी = दोन, टेरा = पंख) या द्विपंखी ऑर्डरमध्ये बग्स म्हणजे ढेकूणवर्गीय जीव तसेच सिकाडास येतात. 
हायमेनोप्टेरा : (हायमेन = पडदा, टेरा = पंख) या ऑर्डरमध्ये मुंग्या, वास्पस आणि ‘बी’ज येतात. उदा. हनी बी (मधमाशी), कुंभार माशी. 
डिप्टेरा : (डाय = दोन, टेरा = पंख) या द्विपंखी ऑर्डरमध्ये फ्लाइज म्हणजे खऱ्या माश्‍यांचा समावेश होतो. उदा. आपल्या अन्नावर बसणारी परिचयाची हाउस फ्लाय. 
ऑर्थोप्टेरा : (ऑर्थो = सरळ, टेरा = पंख) या सरलपंखी ऑर्डरमध्ये ग्रासहॉपर्स, क्रिकेट्‌स म्हणजे रातकिडे तसेच कॅटीडिड्‌स यांचा समावेश होतो. 
ब्लाट्टोडिया : (ब्लाट्टा = अंधार, ओडिया = प्रकार) या निशाचर ऑर्डरमध्ये मुख्यत्वे रात्री सक्रिय असणाऱ्या झुरळं, तसंच वाळवी या कीटकांचा समावेश होतो. 
ओडोनाटा : (ओडोन = दात, आटा = असणारा) या दंतमुखी ऑर्डरमध्ये चतुर आणि टाचणी या कीटकांचा समावेश होतो. 
मॅंटोडिया : (मॅंटीस = देवदूत, ओडिया = प्रकार) या ऑर्डरमध्ये नाकतोडा या जिवाचा समावेश होतो. 
न्युरोप्टेरा : (न्युरो = शीरा, प्टेरा = पंख) या शीरपंखी ऑर्डरमध्ये अँटलायन्स, लेसविंग्स आणि आऊलफ्लाइज या कीटकांचा समावेश होतो. 

या व्यतिरिक्तही अनेक ऑर्डर्स आहेत ज्यांची माहिती लिखाणाच्या ओघात मी देईनच. मंडळी, नावं मोठमोठी दिसली तरी चिंता करू नका. एकदा मी त्यांच्या गमतीजमती तुम्हाला सांगू लागलो, ना की मग तुम्हाला पाठांतराची गरजच उरणार नाही इतकं ते आत्मसात होऊन जाईल. कारण अर्थ समजला की पाठांतराची गरजच उरत नाही.

संबंधित बातम्या