‘कीर्रर्र’तनकार 

मकरंद केतकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

निसर्ग कट्टा
 

पांडुरंग हरी। वासुदेव हरी। 
..तर मंडळी आपल्या आजच्या कथेच्या मथळ्याला अजिबात अनुरूप नसलेल्या या कर्णकर्कश्‍श चरित्रनायक गुरुदेवांची कथा आज मी आपल्यासमोर सादर करत आहे. टळटळीत दुपारी रानावनात भटकणाऱ्या मंडळींना या अद्‌भुत विभूतीचा प्रत्यय निश्‍चितच येतो. त्यांच्या ‘कीर्रर्र’तनाचा रंग उच्चकोटीला पोचल्यावर, ‘या किड्याच्या तर..’ असे (त्यातल्यात्यात फिल्टर केलेले) मंगल उद्‌गार, सभामंडपाच्या म्हणजे झाडाखाली घटकाभर विसावलेल्या श्रोतृवर्गाच्या मुखातून अतिशय स्वाभाविकपणे प्रकटतात. 

इंग्रजीत सिकाडा असं म्हणत असले तरी आपल्या मातृभाषेत ‘मध्यान्हीचा जागल्या’ असे सार्थ नाव घेऊन कामदेवाशी एकरूप झालेल्या Hemiptera वर्गातील या मदनाचे हे आख्यान, पाल्हाळ किंवा कीर्रर्र, आपल्या रतीला आकर्षित करण्यासाठी असतं. वाचकगणांना आश्‍चर्य वाटेल, पण गुरुदेवांना शंभर डेसिबल्सपेक्षाही अधिक उच्च आवाजात ‘कीर्रर्र’तन करण्याची ही सिद्धी भूमातेच्या कुशीत अनेक वर्षं (प्रजातीनुसार साधारण दोन ते सतरा) तप केल्यानंतरच प्राप्त होते. अशा दशकाहूनही अधिक काळाची मोजणी लोटल्यावर आपल्या सहयोगी आणि योगिनींबरोबर लक्षावधी देहांमधून गुरुदेव जमिनीमधून प्रकट होतात. बाहेर आल्यावर एखादी उंच जागा शोधून आधी देहाची जुनी वस्त्रं त्यागली जातात. यालाच स्वभाषेत कात आणि परकीयांच्या भाषेत मोल्ट असंही म्हटलं जातं. त्यानंतर काही दिवस नवे कवच वाळवून कठोर करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते.. आणि मग सुरू होते, आराधना.. दिवसभर उच्चरवानं रतीला हाक घालून, जोड्यानं कामदेवाला शरण जाण्याची! 

पांडुरंग हरी। वासुदेव हरी। 

पण त्या हाकेसाठी आवश्‍यक असलेले सूर गळ्याऐवजी पोटातून प्रकट केले जातात. या देहाच्या अवतारात गुरुदेव दोन्ही बाजूच्या पंखांखाली फासळ्यांच्या आकारांचे दोन ड्रमसदृश लवचिक अवयव घेऊन प्रकट झालेले असतात. याला शास्त्रीय भाषेत टिम्बल म्हणतात. या ड्रम्सना आतून स्नायू जोडलेले असतात. हे स्नायू आकुंचन प्रसरण पावले, की ड्रम्समधून कीर्रर्र आवाज निर्माण होतो. हा आवाज लांबट पोटातून वर्धित ऊर्फ ॲम्प्लिफाय केला जातो (तंबोऱ्याच्या भोपळ्यात होतो तसा) आणि पोटाचे आकुंचन प्रसरण करून ध्वनीची पातळी कमी जास्त केली जाते. आता गुरूदेव म्हटलं म्हणजे शक्तीही अद्‌भुतच हवी की नाही? त्यामुळं अनेक वर्षं तपाच्या दैवीशक्तीचा वापर करून उत्कटतेनुसार सेकंदाला पन्नास ते शंभर या वेगानं हे स्नायू खेचले आणि सोडले जातात. हे झालं श्रींचं. योगिनी सिकाडा मात्र केवळ ‘टीक टीक’ एवढाच आवाज करून ‘स्थळ आवडलं’ हे कळवतात. यानंतरच्या आवश्‍यक त्या योगक्रिया पार पाडून, साधारण महिनाभराच्या अस्तित्वानंतर, तमाम गुरुदेव पंचत्वात विलीन होतात. योगिनी मात्र काही दिवसांनी नाजूक फांद्या कातरून त्यात अंडी घालतात व त्याही गुरुदेवांच्या मार्गे निघून जातात. 

प्रकटन ते निर्वाण या दरम्यान जिवंत राहण्यासाठी झाडांच्या खोडातून रस शोषला जातो व त्यातील पाणी थेंबांच्या स्वरूपात त्यागलं जातं. असे हजारो जागले ऊर्फ गुरुदेव जेव्हा ही क्रिया पार पाडत असतात तेव्हा अक्षरशः बारीक थेंबांचा पाऊस पडत असतो. खुद्दांनी आजवरच्या माफक भ्रमंतीत अनेकदा हा वर्षाव अनुभवलेला आहे. तसेच या कालावधीत अनेक जागले पक्षी-प्राण्यांचं अन्न बनतात, तर काही जण जुनं कवच त्यागण्याच्या अवस्थेतच त्यात अडकून मृत्युमुखी पडतात. 

नैनं छिन्दन्ती शस्राणी... 

पुढं सहा ते दहा आठवड्यांनी भाताच्या दाण्याएवढ्या आकाराची पिल्लं अंड्यातून बाहेर येतात व जमिनीकडं झेपावतात. जमिनीत शिरून ते झाडांच्या मुळांमधून पोषक अमृतप्राशनाच्या कामाला लागतात. कालांतरानं पुन्हा एकदा प्रकट होण्यासाठी. 

ह.भ.प ऊर्फ हळूच भजी पळवणारे 
मकरंदबुवा केतकर

संबंधित बातम्या