काटेघरची शापित परी 

मकरंद केतकर
सोमवार, 29 एप्रिल 2019

निसर्ग कट्टा
 

खूप खूप वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. एका शापित परीची कहाणी. 
एक आटपाट अधिवास होता. त्या अधिवासात अनेक जीव सुखानं नांदत होते. कोणी सरपटणारे होते, कोणी चालणारे होते, कोणी उडणारे होते. सगळे अगदी मिळून मिसळून राहायचे. वेळप्रसंगी कोणा उपाशी जीवासाठी अगदी स्वतःचा जीव देण्यासही मागंपुढं पाहत नसत. एके दिवशी काय झालं, त्या अधिवासात पतंगांचं एक सुंदरसं दांपत्य राहायला आलं. त्या गावातल्या कोणीही आधी त्यांची दखल घेतली नाही. कोणाच्याही अध्यात न मध्यात असे बिचारे ते, तसे लाजाळू होते. सगळं गाव झोपलं, की रात्री हिंडून कसंबसं स्वतःचं पोट भरायचे आणि दिवसा कुठल्यातरी झाडाच्या कोपऱ्यात झोपून जायचे. पण पतंगांची ही जोडी खूप चांगल्या स्वभावाची होती. कधी आपल्या सुंदर रंगांनी थकल्या भागल्या जीवांना रिझवायचे, तर कधी कोणा उदास जीवाशी गप्पा मारून त्याचं दुःख हलकं करायचे. अनेक वेळा गावकऱ्यांना अवघड प्रसंगात मोलाचा सल्ला द्यायचे. 

असेच अनेक दिवस लोटले. हे दोघं हळूहळू त्या गावातल्या रहिवाशांचे, त्या अधिवासातले अगदी आवडते सदस्य झाले. एकेदिवशी त्यांच्या निःस्वार्थ मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून गावकऱ्यांनी त्यांना एक मोठ्ठा महाल बांधून दिला. आता हे दोघं त्या महालात राहू लागले. त्यांच्या महालाचे दरवाजे कायमच सगळ्यांसाठी उघडे असायचे. सगळं कसं छान चाललं होतं. पण एकदा काय झालं, त्या गावात एक आरसे विकणारा आला. आजपर्यंत त्या गावात कोणीच आरसे पाहिले नव्हते. त्यामुळं त्या आरशांची सगळीकडं खूप चर्चा झाली. ती ऐकून पतंगांच्या महालातूनही त्याला बोलावणं आलं. आरसेवाल्यानं आणलेले आरसे पाहून सौ. पतंग हरखून गेल्या व त्यांनी एक आरसा विकत घेतला. आता त्या दोघांचाही बराचसा वेळ आरशात स्वतःचं सुंदर रूप न्याहाळण्यात जाऊ लागला. पूर्वीपेक्षा आता त्यांचं गावकऱ्यांत मिसळणं कमी कमी होऊ लागलं. उलट स्वतःच्या रूपाबद्दल त्यांना गर्व वाटू लागला. महालात मदतीसाठी येणाऱ्या गरजूंना ते वाईटसाईट बोलू लागले. त्यांना हिणवू लागले. कोणी जेवणाचं आमंत्रण दिलं, तर त्याचं रंगरूप पाहून त्याचा अपमान करू लागले. 

हळूहळू गावकरी दुखावू लागले. मग एके दिवशी गावकऱ्यांनी देवाला साकडं घातलं, की यांना चांगलीच अद्दल घडव. मग देवानं त्या दोघांनाही शाप दिला, की यापुढं तुमच्या सगळ्या पिढ्या कुडाच्या झोपडीत राहतील आणि मोठे झाल्यावरही त्यांना कुठल्याही अन्नाचा आस्वाद घेता येणार नाही. तेव्हापासून या पतंगांचा कायमस्वरूपी पत्ता ‘मुक्काम पोस्ट काटेवाडी’ झाला. आता त्यांचे सुरवंट जन्माला आल्यावर स्वतःच्याच शरीरातून निघणाऱ्या रेशमाचा उपयोग करून छोट्या छोट्या काड्या स्वतःच्या अंगावर चिकटवून घेतात. त्यांना आतमधून स्वतःच्याच रेशमाचं अत्यंत चिवट अस्तर चिकटवतात. हे रेशीम इतकं चिवट, की दुसऱ्या कोणालाही ते फाडता येणं जवळजवळ अशक्‍यच. जिथं जातील तिथं हे काड्यांचं ‘काटेघर’ सोबत घेऊन हिंडतात. झाडाची पानं खात राहतात आणि खाऊन खाऊन त्यांचा आकार वाढला, की झोपडीची भिंत एका बाजूला उसवून त्यात नवीन काडी चिकटवून झोपडी थोडी मोठी करतात. यांचं बरचसं आयुष्य त्या कुडाच्या झोपडीतच जातं. मग एके दिवशी सुरवंटाचा पतंग होण्याची वेळ आली, की दगडाला नाहीतर झाडाला हे घर चिकटवून त्यात झोपून जातात. यांच्या फक्त नराला पंख असतात व फक्त तेच घराबाहेर पडतात. मादीला पंख नसतात व ती त्या घरातच मादक गंध सोडत नराची वाट पाहत बसून राहते. शापाच्या परिणामामुळं दोघांनाही अन्नग्रहण करायला तोंड नसतं. दोघांचंही आयुष्य जेमतेम आठ दिवसाचं असतं. या आठ दिवसात नर मादीला शोधत हिंडत राहतो. मिलनानंतर मादी त्याच झोपडीत अंडी घालते आणि दोघंही देहत्याग करतात. शापमुक्त होण्याची वाट बघत...

संबंधित बातम्या