काजवा 

मकरंद केतकर
सोमवार, 27 मे 2019

निसर्ग कट्टा
 

अँधेरी रात में दीपक जलाए कौन बैठा है?
गगन में गर्व से उठउठ,
गगन में गर्व से घिरघिर,
गरज कहती घटाएँ हैं,
नहीं होगा उजाला फिर,
मगर चिर ज्योति में निष्ठा जमाए कौन बैठा है?
अँधेरी रात में दीपक जलाए कौन बैठा है? 

हिंदीतील प्रसिद्ध कवी (कै.) हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील हा ‘दीपक’ आहे काजवा नावाचा कीटक. माणसाच्या निर्मितीपासून त्याने माणसाला स्तिमित केले आहे. जगभरात विविध संस्कृतींमध्ये याच्या प्रकाश निर्माण करण्याच्या अद्‌भुत क्षमतेवर कित्येक काव्यं लिहिली गेली आहेत. त्यामुळं बीटल्सच्या कवचपंखी कुळातला म्हणजे कोलिओप्टेरा या ऑर्डरमधला हा जीव माहीत नाही असा माणूस विरळाच. 

काजव्याला पाहायचं असेल तर शहरापासून लांब प्रकाश-प्रदूषणविरहित व शक्‍यतो वृक्षाच्छादित ठिकाणी जावं लागतं. क्वचित अगदी प्रत्यक्ष पाहिला नसला तरी कवितांमधून तरी निश्‍चितच भेटणारा हा ‘उडता दिवा’ पावसाळ्याच्या आधी फार मोठ्या प्रमाणात दिसतो. मे महिना सुरू आहे. लवकरच पावसाची ‘हवा’ व्हायला सुरुवात होईल आणि मग रानावनात दिवाळी साजरी व्हायला सुरुवात होईल. पावसाळ्याच्या आधी हवा दमट होऊ लागली, की काजव्यांच्या उत्साहाला उधाण येतं. कोशातून बाहेर आलेल्या काजव्यांच्या आयुष्याचा एकच उद्देश असतो - पुनरुत्पादन. त्यासाठी उत्क्रांतीदरम्यान त्यांच्या पूर्वजांनी एक अनोखी पद्धत शोधून काढली ज्याला ‘बायोल्युमिनसन्स’ म्हणतात. हे बायोल्युमिनसन्स फक्त काजव्यांतच सापडतं असं नाही, तर विविध प्रकारचे बॅक्‍टेरिया आणि बुरशीमध्येही ही प्रकाशमान होण्याची क्षमता आढळते. 

तर, काजव्यांच्या घड्या असलेल्या पोटाच्या टोकाला एक अवयव असतो ज्यात ल्युसिफेरीन नावाचं रसायन आणि ल्युसिफेरज नावाचं एन्झाईम (विचंतक) असतं. हे ल्युसिफेरज ल्युसिफेरीन आणि ऑक्‍सिजन यांचं पेशींमध्ये असलेल्या ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटशी संयोग घडवून आणतं आणि त्यातून प्रकाश निर्माण होतो. नर काजवे हा प्रकाश निर्माण करत उडतात व मादीला आकर्षित करायचा प्रयत्न करतात. मादी न उडता झाडाच्या किंवा एखाद्या झुडुपाच्या टोकावर बसून अगदी मंद प्रकाश निर्माण करते. मी माझ्या भटकंतीमध्ये अनेक वेळा अक्षरशः झाडंच्या झाडं काजव्यांनी लगडलेली पाहिली आहेत. एवढंच नाही, तर एक झाडं उजळलं की दुसरं विझायचं. दुसरं उजळलं की पहिलं विझायचं इतकं छान सिंक्रोनायझेशन पाहिलं आहे. मीलनानंतर मादी पालापाचोळ्यात किंवा झाडाच्या ढोलीत अंडी घालते व त्यानंतर दोघांचं आयुष्य संपुष्टात येतं. 

अंड्यातून बाहेर आलेले सुरवंट विविध मृदूशरीरी जिवांवर गुजराण करत वर्षभरानंतर कोषात जातात व पावसाळ्याच्या आधी कोशातून प्रौढ बाहेर येऊन हे चक्र सुरू ठेवतात. प्रौढांप्रमाणंच सुरवंटामध्येही प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. इतकंच काय, तर काही काजव्यांच्या जातींची तर अंडीही प्रकाश निर्माण करतात. प्रौढ काजव्यांचं आयुष्य जेमतेम काही आठवड्यांचं असतं. प्रौढ काजवे जाती-प्रजातीतील फरकानुसार परागकण किंवा कीटक खातात. काही प्रजातींमधल्या माद्यांना पंख नसतात व त्या एखाद्या अळीसारख्या जमिनीवर फिरत असतात. त्यांच्या शेपटीतील दिवा नरांना आकर्षित करतो. 

जगात जवळपास सर्व देशात काजवे आढळतात व तिथंही काजवा महोत्सव साजरा केला जातो. काजव्यांचं प्रकटणं ही आपल्याकडं पावसाच्या आगमनाची वर्दी समजली जाते. कोषात गुरफटून बसलेल्या त्यांच्या सुरवंटांना नव्या ऋतूच्या आगमनाचं ज्ञान कुठून प्राप्त होतं हे एक कोडंच आहे. हा दिवा अजून आपल्या डोक्‍यात पेटायचा बाकी आहे. 

संबंधित बातम्या