बेडकांचं प्रजनन 

मकरंद केतकर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

निसर्ग कट्टा
 

मागच्या लेखात आपण उभयचरांची आणि त्यातही मुख्यत्वे बेडकांची ओळख करून घेतली. या लेखात आपण त्यांच्या प्रजननाची माहिती करून घेऊ. उभयचर याचा अर्थ ज्याला ‘जीवनचक्राच्या पूर्तीसाठी पाण्याची गरज असते असे जीव’ हे आपण पाहिलं. बेडकांनाही त्यांच्या पुढच्या पिढीचं जीवन सुरू करण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. सर्वसाधारणपणे पावसाळा हा बेडकांच्या विणीचा हंगाम असतो. त्यापूर्वी आधीचा पावसाळा आटोपता आटोपता हे जीव माती खणून त्याखाली किंवा झाडांमधल्या ढोल्यांमध्ये, प्रजातींमधल्या सवयींनुसार शीतनिद्रा घेण्यासाठी जाऊन बसतात. आधीच्या कालखंडात त्यांची साठवलेली ऊर्जा खर्च झालेली असल्यानं शीतनिद्रेतून बाहेर आल्यावर ते मलूल असतात व सर्वप्रथम पोट भरण्याच्या कामाला लागतात. पोट भरत जातं तसतशी त्यांची त्वचा तजेलदार होऊ लागते व समाराधनेच्या कार्यासाठी ते तयार होऊ लागतात. याच काळात काही प्रजातींमध्ये नरांच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. उदा. पिवळेधम्मक होणारे बुलफ्रॉग्स. 

बेडकांच्या बहुतांश प्रजातींमध्ये फक्त नर बेडूकच ‘क्रोकिंक’ म्हणजे आवाज काढू शकतात. माणसांप्रमाणंच बेडकांच्याही गळ्यात ‘व्होकल कॉर्डस’ असतात. या तंतूंचं कंपन करून आवाज काढला जातो. परंतु, मादीपर्यंत हा आवाज पोचणं आवश्यक असतं. त्यासाठी प्रजातींमधल्या वैविध्यानुसार त्यांच्या गळ्याखाली एक किंवा दोन व्होकल सॅक्स असतात. नर बेडूक मोठा श्वास घेऊन या पिशव्यांमध्ये हवा भरतात आणि त्या तट्ट फुगवतात. गळ्यातून येणारा आवाज या फुगलेल्या पिशव्यांमधून अ‍ॅम्प्लिफाय होतो (तंबोऱ्याच्या भोपळ्यासारखा) आणि अगदी दूरवर बसलेल्या मादीपर्यंतही पोचतो. ज्याच्या आवाजाची तीव्रता सगळ्यात जास्त, त्याच्याकडं मादी आकर्षित होते. झाडांवर राहणारे बेडूक उदा. बुश फ्रॉग्स सर्वांत उत्तम जागा निवडून आवाज करतात. बेडकांना स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्यासाठी इतर नरांबरोबर स्पर्धा करावी लागते. या स्पर्धेदरम्यान प्रतिस्पर्धी नराच्या पिशव्या चावून फाडण्यापर्यंत मारामाऱ्या होतात. पण नरांचे हे आवाज फक्त मादीला आकर्षित करण्यासाठी नसतात. तर स्वतःची हद्द राखणं, अंड्यांचं पितृत्व सिद्ध करणं, धोक्याचा इशारा देणं, तणावग्रस्त स्थितीची सूचना देणं अशा कामांसाठीही विविध आवाज काढले जातात. मादीनं जवळ येऊन आपली पसंती दर्शवली, की दोघं अंड्यांच्या वाढीसाठी योग्य ठिकाणी जातात. सहसा नर असं ठिकाण आधीच निवडून त्या जागेवरूनच जाहिरात करतात. तर, अशा योग्य जागी आल्यावर नर मादीच्या पाठीवर स्वार होतो व पुढच्या पायांनी तिला पकडून ठेवतो. मादीनं अंडी घातली की नर तिच्या पाठीवर बसूनच त्याचा शुक्ररस अंडगुच्छावर सोडतो व दोघं विलग होतात. याला ‘एक्सटर्नल फर्टिलायझेशन’ अशी संज्ञा आहे. इथून पुढं जातीप्रजातींनुसार त्या अंड्यांचं व त्यातून येणाऱ्या बेडूकमाशांचं रक्षण तथा संगोपन करणं किंवा न करणं हे घडतं. 

बेडूक व भेकांच्या बहुतांश प्रजाती पाण्यात अंडी घालतात. ती ४ ते ६ दिवसात फलित होऊन त्यांचं बेडूकमाशात रूपांतर होतं. पुढं उपलब्ध अन्न, पाण्याचं तापमान इत्यादी घटकांनुसार साधारण ४० ते ६० दिवसांत बेडूकमाशांचं रूपांतर बेडूकपिलात होतं. ही बेडूकपिलं हुबेहूब मोठ्या बेडकांसारखीच दिसतात. वृक्ष बेडूक (tree frogs) आणि झुडूप बेडकांच्या (bush frogs) प्रजाती मात्र अनुक्रमे झाडाच्या आणि झुडपांच्या फांद्यांवरील फेनगृहात (Foam nest) किंवा जंगलातील जमिनीवर पसरलेल्या ओलसर पालापाचोळ्यात अंडी घालतात. वृक्षबेडकांच्या बेडूकमाशांची वाढ झाडाखाली साठलेल्या डबक्यात होते, तर झुडूप बेडकांच्या अंड्यांतून थेट बेडूकपिलंच जन्माला येतात. सुरकुत्या बेडूक (wrinkled frogs) झऱ्यांच्या व नाल्यांच्या काठावरील ओल्या दगडांवर अंडी घालतात आणि बेडूकमासे पाण्याच्या प्रवाहात वाढतात. इंदिराना कुळातील बेडूक ओल्या पाषाण कड्यांवरील कपाऱ्यांमध्ये अथवा खडकांवरील किंवा झाडांच्या बुंध्यावरील शेवाळात अंडी घालतात. या प्रजातींचे बेडूकमासे ओल्या पाषाण कड्यांवर किंवा पाण्याच्या कडेला असलेल्या ओलसर जमिनींवरच वाढतात. अतिशय कमी कालावधीकरता प्रकट होऊन निसर्गाच्या चक्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या नाजूक जीवांना प्रदूषण, परिसंस्थेचा विनाश आणि इतर संकटांचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच आपली प्रगती साधताना आपण त्यांच्याही गरजांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.

संबंधित बातम्या