’एमएच ३७०’चे गूढ कायम 

रोहित हरीप
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नोंदी
मलेशियातून बीजिंगला जाणारे ’मलेशियन एअरलाइन्स’चे विमान मार्च २०१४ मध्ये हिंदी महासागरात अचानक दिशा भरकटून गायब झाले. हे विमान कुठे गेले ? त्यातील प्रवाशांचे काय झाले याबाबतचे काहीही धागेदोरे आजपर्यंत हाती लागलेले नाहीत.

मलेशियातून बीजिंगला जाणारे ’मलेशियन एअरलाइन्स’चे विमान मार्च २०१४ मध्ये हिंदी महासागरात अचानक दिशा भरकटून गायब झाले. हे विमान कुठे गेले ? त्यातील प्रवाशांचे काय झाले याबाबतचे काहीही धागेदोरे आजपर्यंत हाती लागलेले नाहीत. जगाच्या इतिहासातील हा सर्वांत गूढ आणि रहस्यमय अपघात मानला जातो. या विमानात सुमारे २३९ प्रवासी होते. यातील काही प्रवासी भारतीय होते. यातील कोणाचाही मागसुमही देखील लागला नाही. ही घटनेला आता तब्बल चार वर्षे पुर्ण होतील.

गेली चार वर्षे या विमानाचा हिंदी महासागरात  सतत कसून शोध घेण्यात येत आहे पण काहीही निष्पन्न झालेले नाही. चीन, मलेशिया, ऑस्टेलिया या देशांची नौदलदेखील या शोधमोहिमेत सहभागी झाली होती पण तेदेखील अपयशी ठरले. या तीन देशांकडून या शोध मोहिमेसाठी सुमारे दीडशे मिलियन डॉलर इतकी रक्कम खर्च करण्यात आली आणि सुमारे सव्वा लाख स्क्वेअर किलोमीटरचा समुद्र पिंजून काढण्यात आला. 

आता मलेशियन सरकारने पुन्हा ही शोध मोहीम नव्याने सुरू केली आहे. यावेळेस ’ओशन इन्फिनिटी’ या अमेरिकन कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ’ओशन इन्फिनिटी’  कंपनीला नव्वद दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

ही कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने समुद्रतळावर विमानाचा शोध घेणार आहे. पाच हजार स्क्वेअर किलोमीटरच्या पट्ट्यात जर विमानाचा शोध घेण्यात यश आले तर वीस मिलियन डॉलर, दहा हजार किलोमीटरच्या क्षेत्रात विमानाचा शोध लागला तर पन्नास मिलियन डॉलर आणि त्यापुढे तब्बल सत्तर मिलियन डॉलर इतकी रक्कम मलेशियन सरकारकडून या कंपनीला देण्यात येणार आहे.

या कंपनीचा मुख्य लक्ष्य हे विमानाचे अवशेष आणि कॉकपीटचा भाग शोधणे हे असणार आहे. 

’ओशन इन्फिनिटी’ या कंपनीकडून यासाठी आठ स्वयंचलिकत वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. ही वाहने समुद्राच्या तळावर या विमानाचा शोध घेतील. एकूण पासष्ट लोकांचा या मोहिमेत समावेश असणार आहे. त्यात मलेशियन सरकारच्या दोन प्रतिनिधींचा देखील समावेश आहे. तीन चार आठवड्यात ही मोहीम पूर्ण होईल आणि सुमारे साठ हजार स्क्वेअर किलोमीटरचा समुद्राचा पृष्ठभाग पालथा घालण्यात येणार आहे. यानंतरच ’एमएच-३७०’ चे गूढ उकलले जाईल.

’ओशन इन्फिनिटी’ ही प्रामुख्याने तेल आणि नैसर्गिक वायूंचे साठे शोधण्याचे काम करते. या व्यतिरिक्त समुद्रतळाचे मोजमापन करणे, समुद्र तळावर पाइपलाइनचे टाकणे या कामांमध्ये या कंपनीचे मोठे नाव आहे. या क्षेत्रातला अनुभव लक्षात घेऊन या कंपनीला ही कामगिरी सोपविण्यात आली आहे.  

संबंधित बातम्या