नेपाळमध्ये चीनचे इंटरनेट कनेक्‍शन

रोहित हरीप
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नोंदी

भारत आणि चीन या देशांच्यामध्ये वसलेला नेपाळ हा अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी वसलेला देश आहे. या दोन देशांच्या सत्ता संघर्षात हा देश कायम बफर स्टेट म्हणून काम करत असतो. स्वातंत्र्यानंतर जागतिक राजकारणात भारताचा धाकटा भाऊ अशी ओळख असलेला नेपाळ हा देश गेल्या दशकभरापासून राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहे.

भारत आणि चीन या देशांच्यामध्ये वसलेला नेपाळ हा अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी वसलेला देश आहे. या दोन देशांच्या सत्ता संघर्षात हा देश कायम बफर स्टेट म्हणून काम करत असतो. स्वातंत्र्यानंतर जागतिक राजकारणात भारताचा धाकटा भाऊ अशी ओळख असलेला नेपाळ हा देश गेल्या दशकभरापासून राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहे. भारताचा हस्तक्षेप वाजवीपेक्षा जास्त आहे असा समज करून नेपाळ मागच्या दाराने चीनला जवळ करत आहे. नेपाळमधील भूकंपानंतर तर चीनने संधी साधून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू केली आहेत. त्यासाठी भरभक्कम निधी चीन नेपाळमध्ये ओतत आहे. 

या सगळ्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर नेपाळने इतके वर्ष भारताकडून येत असलेले इंटरनेट कनेक्‍शन बंद करून चीनच्यामार्फत इंटरनेट जोडणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील ’चायना टेलिकॉम ग्लोबल’ही कंपनी नेपाळमध्ये इंटरनेट पुरवणार आहे. याआधी नेपाळचा जगाशी असलेला इंटरनेट संपर्क केवळ भारताच्या माध्यमातून होत होता. भारताच्या बिहार राज्यातील बिरतनगर, भैराहवा आणि बिरगुंजा या प्रांतातून ऑप्टिकल केबलच्या माध्यमातून नेपाळला इंटरनेटची जोडणी दिलेली होती. 

चीनने नेपाळला इंटरनेट जोडणी देण्यासाठी ऑप्टिकल फायबरची नवी लाइन २०१६ मध्ये टाकली होती. चीनमधील बातमीनुसार ही इंटरनेट जोडणी थेट हाँगकाँग बंदरापर्यंत नेण्यात येणार आहे. हाँगकाँग हे संपूर्ण आशिया खंडामध्ये हाय स्पीड इंटरनेट कनेक्‍शन आणि सर्वाधिक डाटा स्टोअरेजच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नेपाळसारख्या देशाला नक्कीच फायदा होणार आहे. चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ’सिल्क रुट’ची जोरात उभारणी चीनकडून सुरू आहे. या व्यापारी मार्गावर असणाऱ्या सर्व सहभागी देशांचे डिजीटलयाझेशन करणे हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याअंतर्गत चीनकडून नेपाळला हायस्पीड इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी देण्यात आली आहे. चीनच्या या प्रकल्पात भारत सहभागी झालेला नाही. या सिल्क रुटचा काही भाग पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याने भारताने या प्रकल्पावर बहिष्कार टाकला आहे.

नेपाळमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्याऱ्या ’चायना टेलिकॉम ग्लोबल’ या कंपनीने याआधी पाकिस्तान, लाओस आणि थायलंड या देशांमध्ये इंटरनेट सेवा पुरवली आहे. 

संबंधित बातम्या