शिओमी भारतात अव्वल

रोहित हरीप
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नोंदी

शिओमी ही चीनमधील मोबाईल तयार करणारी कंपनी आता भारतातील स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांमधील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगला मागे टाकत शिओमीने अग्रस्थान पटकावले आहे. सध्या शिओमी कंपनीचा भारतीय बाजारपेठेतील उलाढातील हिस्सा २७ टक्के झाला असून, सॅमसंग कंपनीचा हिस्सा २५ टक्‍क्‍यांवर उतरला आहे. 
शिओमी कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारतात एकूूण ऐंशी लाख फोन विकले तर त्या तुलनेत सॅमसंगने विकलेल्या मोबाईल फोनची संख्या पासष्ट लाखाच्या घरात आहे. ’बजेट स्मार्टफोन’ च्या विभागात सॅमसंग कंपनीचे जास्त मॉडेल उपलब्ध नसल्याने तसेच या विभागात शाओमीच्या ‘नोट ३’ व ‘नोट ४’ या मालिकेतील मोबाईल्सची विक्रमी विक्री झाल्याने सॅमसंग कंपनीला अग्रस्थानावरुन पायउतार व्हावे लागले. शिओमी कंपनीचे मार्केट चीनमध्ये आक्रसत असताना भारतात मात्र ही कंपनी सध्या आघाडीची बनली आहे.

ॲमेझॉनचे कॅशलेस दुकान
दुकानात जा, हवे असलेले सामान उचला आणि बाहेर पडा. पैसे देण्याची गरज नाही, बिलासाठी लांबलचक रांगा नाहीत, सुट्ट्या पैशाचा घोळ नाही. भविष्यातील सुपर मार्केटची रचना अशी असणार आहे. 
ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून या प्रकारचे पहिले स्टोअर ॲमेझॉनने अमेरिकेतील सिएटल शहरात सुरू देखील केले आहे. या दुकानात जाऊन तुम्ही दूध, भाज्या, वेफर्ससारखे पैसे न देता खरेदी करू शकता.
याआधी ॲमेझॉनच्या कार्यालयात अशा प्रकारच्या दुकानाची चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर हा प्रयोग ॲमेझॉन कंपनीकडून करण्यात आला आहे. कॉप्युटर स्कॅनर, खास तयार केलेले अल्गोरिदम आणि सेन्सर्स यांच्या मदतीने जो माणूस खरेदी करण्यासाठी येईल त्याची ओळख डिजिटल स्वरूपात पटवली जाईल. तुमचा मोबाईल फोन आणि क्रेडिट अथवा डेबिटची माहिती येथे संग्रहित केली जाईल त्यानंतरच तुम्हाला येथे खरेदी करणे शक्‍य होईल. रिटेल क्षेत्रात व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी ॲमेझॉन प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. याआधी अमेरिकेत काही ठिकाणी त्यांनी बुक स्टोअर सुरू  केले आहेत, तसेच अनेक मॉल्समध्ये जागाही खरेदी करून ठेवल्या आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या